संघर्षांशिवाय आयुष्याने तिला काहीच दिलं नाही, पण तिने मात्र आपलं आयुष्य इतरांसाठी खर्च केलं. विविध वस्त्यांवरील साडेसहा हजार बाल कामगारांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या, वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी चौदा वीटभट्टी शाळा चालवणाऱ्या व स्त्रियांसाठी ‘एकटी’ ही संस्था सुरु करणाऱ्या कोल्हापूरच्या अनुराधा भोसले या सशक्त, कणखर स्त्रीविषयी..
ज्याकठीण भूतकाळाशी आपण सामना केला तो भूतकाळ माणसं एकतर विसरू पाहतात किंवा त्याचं भांडवलं करून जगू पाहतात. या दोन्ही गोष्टी नाकारून, भूतकाळातील समस्यांना संपवण्याचं, त्या प्रश्नापासून इतरांचं आयुष्य वाचवण्याचं काम करणं ही आव्हानात्मक गोष्ट आहे. कोल्हापुरातील अनुराधा भोसले हेच करत आहेत. लहानपणी गरिबी, बालकामगारीचे बसलेले चटके  लक्षात ठेवून आज त्या अशाच हजारो वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम करत आहेत. ‘अवनि’ (अन्न, वस्त्र, निवारा) या संस्थेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे, भंगार गोळा करणाऱ्या, कचरा वेचणाऱ्या, वीटभट्टय़ा, हॉटेल, बांधकाम इथे काम करणाऱ्या बालमजुरांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क त्या मिळवून देत आहेत. कोल्हापुरात दरवर्षी १४ नोव्हेंबरला-बालदिनी मुलांना आनंद देणारे अनेक कार्यक्रम पार पडतात. ‘अवनि’ संस्थेची मुलं मात्र ‘शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ अशा घोषणा देऊन आगळावेगळा बालदिन साजरा करतात. त्यांच्याबरोबर घोषणा द्यायला असते, त्यांची अनुराधा ताई!
अनुराधाचं आजवरचं आयुष्य  पाहिलं तर एक लक्षात येतं, संघर्षांशिवाय आयुष्याने तिला दुसरं काही दिलंच नाही. नगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूर इथल्या भोकर गावची अनुराधा लग्न होऊन १९९६ साली कोल्हापुरात आली. लग्नाआधीचं नाव अ‍ॅगाथा अमोलिक. वडील प्राथमिक शिक्षक, आई अशिक्षित. एकूण बारा भावंडं. त्यात अनुराधाचा क्रमांक अकरावा. घरची परिस्थिती जेमतेम. आई अतिशय कष्टाळू. कष्ट करत आयुष्याशी दोन हात करण्याचं बाळकडू आईनेच दिलं. प्राथमिक शिक्षण झाल्यावर अनुराधा पाचवीपासून एका शिक्षकाच्या घरी राहून शिकू लागली. दिवसभर शाळेत जायचं, संध्याकाळी शिक्षकाच्या घरची कामं करायची. दहावीच्या परीक्षेसाठी फी भरायला पैसे नव्हते. नववीच्या सुट्टीत जाऊन गावी भांगलण केली, भांगलणीची मजुरी फीसाठी वापरली. अकरावी-बारावीसाठी अनुराधा श्रीरामपूरला गेली. तिथे एका संस्थेत साफसफाई आणि वरकाम करत शिकू लागली. संस्था त्या बदल्यात तिला जेवण द्यायची. त्यानंतर समाजकार्याची पदवी घ्यायला ती मुंबईला गेली. ‘निर्मला निकेतन’मध्ये राहून बीएसडब्ल्यू झाली. काही काळ जळगाव, औरंगाबाद, पुणे इथे नोकरी केली. पण ती नोकरीच होती. समस्येच्या मुळाशी जाऊन काम करायला मिळत नव्हतं. अनुराधा अस्वस्थ होती. याचदरम्यान लग्न झालं. ‘अवनि’ या सांगलीतील संस्थेची ओळख झाली.
 कोल्हापूरसारख्या पुरोगामी विचाराच्या शहरात आल्यावर अनुराधांच्या विचाराला दिशा मिळाली. मान्यवरांचे विचार वेगवेगळ्या व्याख्यानांतून ऐकायला मिळाले. वर्गसंघर्ष, शोषितांचे प्रश्न अशा गोष्टी तिने समजून घेतल्या. त्या वेळी या प्रश्नांची व्याप्ती खूप मोठी आहे हे त्यांना जाणवलं.
सांगलीच्या वेरळा विकास प्रकल्पाला कोल्हापुरात काम सुरू करायचं होतं. त्याच वेळी अनुराधा अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रंकाळा बचाओ, महिला संघर्ष अशा चळवळीतून कामही करत होत्या. ‘अवनि’चं काम फक्त बसून करायचं काम नव्हतं. बालकामगारांसाठी काम करायचं तर त्यांपर्यंत पोहचणं आवश्यक  होतं. अनुराधाने भंगार गोळा करणाऱ्या मुलांशी मैत्री केली. त्यांच्याबरोबर वावरून त्यांचा विश्वास मिळवला. ‘तुम्ही शिकलं पाहिजे, नाहीतर आयुष्य भंगार गोळा करण्यातच जाईल’ हे मुलांच्या मनावर ठसवायला सुरुवात केली. अनुराधांनी याचबरोबरीने कोल्हापूर जिल्ह्य़ातील डवरी, लमाण, फासेपारधी, गोसावी समाजाच्या वस्त्यांवर जायला सुरुवात केली. शाळेत न जाणाऱ्या मुलांना गोळा करून या वस्त्यांमध्ये शाळा सुरू केली. या शाळेसाठी शिक्षक कुठून आणायचे हा प्रश्न होता. अनुराधा त्या वस्त्यांच्या आसपासच्या महाविद्यालयीन मुला-मुलींकडे गेली. ज्यांना समाजकार्याची आवड होती त्यांना प्रशिक्षण दिलं. आणि अशातऱ्हेने शाळांचे शिक्षक तयार झाले. अशा ३६ शाळा अनुराधांनी सुरू केल्या. या मुलांचं थांबलेलं शिक्षण सुरू केलं. त्यांना जवळच्या शाळेत दाखल करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं. आजवर अनुराधांनी साडेसहा हजार मुलांसाठी पुन्हा शिक्षणाच्या पायवाटा  तयार केल्या आहेत.
पावसाळा संपला की कोल्हापूरच्या आसपास वीटभट्टय़ा उभ्या राहतात. या भट्टय़ांवर काम करणारे कामगार आपल्या कुटुंबासह या भट्टय़ांवर मुक्काम ठोकतात. आपलं गाव सोडून आलेल्या कामगार मुलांची शाळा बुडते. या मुलांसाठी २००२ साली अनुराधांनी वीटभट्टीवर शाळा सुरू केली. शिरोली, दोनवडे, वसगडे, सरनोबतवाडी इथल्या वीटभट्टय़ांवर दरवर्षी ऑक्टोबर ते मे महिन्यात शाळा भरते. सकाळी दहा ते दुपारी दीडपर्यंत शाळा. त्या मुलांच्या मूळ शाळेतून त्या मुलांची माहिती, शैक्षणिक कुवत याची माहिती मागवली जाते. मे महिन्यात त्यांची परीक्षा घेऊन, निकाल तयार करून या मुलांना त्यांच्या मूळ शाळेत पाठवलं जातं. जूनपासून मुलांची पुढची इयत्ता सुरू होते. कोल्हापूर जिल्ह्य़ात आज अशा चौदा ‘वीटभट्टी शाळा’ अनुराधा चालवतात.
अनुराधा यांचं सामाजिक काम वेगाने सुरू असताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बरीच उलथापालथ सुरू होती. पहिल्यापासून तिच्या सासू- नणंदाना त्यांचं काम पसंत नव्हतं. घरातील सगळी कामं करूनही तिला वाद, मारहाण, अपमानास्पद वागणूक देणं संपलं नव्हतं. तोवर अनुराधा ‘कादंबरी’ आणि ‘ग्रंथ’ या दोन मुलांची आई झाल्या होत्या. पण पती दुसऱ्या मुलीत गुंतला आहे हे लक्षात येताच २००४ साली अनुराधांनी मुलांना घेऊन घर सोडलं. दोन मुलांची जबाबदारी, संस्थेचं वाढणारं काम, घटस्फोटासाठी मनस्ताप, न्यायालयाचे खेटे अशा अनेक पातळीवर अनुराधा त्या काळात लढली. ‘मला रडणं आवडत नाही. लढणं आवडतं. मी कधी पराभूत होऊन माहेरी गेले नाही. घरातून बाहेर पडले तेव्हा जवळ काही नव्हतं. आज ही काही नाही. ‘माझं’ म्हणून काही नाही. पैसा जमवलेला नाही. माझ्या मुलांची काळजी समाज घेईल’ अनुराधा आत्मविश्वासाने सांगतात.
अनुराधांची भटकंती दिवसभर सुरू असते. गॅरेज, हॉटेल्स, बांधकाम, दुकानं इथे छापे टाकून बालकामगारांची सुटका त्या करतात. बालकामगार दिसला की त्याच्याशी बोलायचं, त्याच्यात शिकायची इच्छा दिसली तर संबंधित मालकाशी बोलून त्याची नोकरीतून मुक्तता करायची. काही वेळा आई-वडील मुलाला शाळेत पाठवायला तयार नसतात. त्यावेळी अनुराधा आई-वडिलांवर गुन्हा दाखल करायलाही घाबरत नाही. ‘प्रत्येक मुलाला शिक्षण मिळायलाच’ हवं हे त्याचं ध्येय बनलं आहे.
अनुराधांचं काम चहू अंगांनी सुरू असतं. बालकामगारासोबतच त्यांने महिलांच्या हक्कासाठी आंदोलने केली आहेत. विधवा, परित्यक्तांना निवृत्ती वेतन मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रंदिवस धरणं धरलं होतं. त्यामुळे ३,४७१ महिलांचं निवृत्ती वेतन सुरू झालं.
अनुराधाने विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता म्हणून एकटं राहणाऱ्या महिलांसाठी ‘एकटी’ ही संस्था सुरू केली आहे. या महिलांना  स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
अनुराधांच्या ‘अवनि’त राहून आज पन्नास मुलं-मुली शिक्षण घेत आहेत. शालेय शिक्षणाबरोबरच हस्तकला, संगीत चित्रकला शिकवली जाते. मुलं आकाशकंदील, शुभेच्छापत्रे तयार करतात. त्याची विक्री केली जाते. मुलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला जातो. ‘अवनि’ शासनमान्य असली तरी शासनाचं अनुदान संस्थेला मिळत नाही. अमेरिकेतील ‘महात्मा गांधी पीस फाऊंडेशन’ने संस्थेला पायाभूत सुविधांसाठी मदत केली आहे. त्या संस्थेचे कार्यकर्ता स्कॉट कॅफोरा आयुष्यभरासाठी ‘अवनि’त काम करायला येऊन राहिले आहेत. त्यांच्यासोबत अनुराधा यावर्षीच्या एप्रिलमध्ये अमेरिकेला जाऊन आल्या. कॅलिफोर्निया, शिकागो, अ‍ॅनअँतनिओ या राज्यात जाऊन तिथली बालगृहे पाहून आल्या. तिथल्या व्हॅनगार्ड विद्यापीठात भारतीय महिलांच्या प्रश्नावर बोलल्या. त्यांनी त्यांना तिकडे पुन्हा बोलावलं आहे.
अनुराधा आज सगळ्या अर्थाने ‘अवनि’मय आहे. मुलं जेवली का, अभ्यास केला का, कोण आजारी आहे याची विचारपूस करीत, कधी प्रेमळ आई, कधी खोडकर ताई, कधी कडक मास्तरीण अशा भूमिका पार पाडत आहेत. सगळ्या मुलांना त्यांच्या घरी हक्काचं शिक्षण मिळावं आणि ‘अवनि’सारख्या संस्थांची समाजात गरज शून्य ठरावी, हेच त्यांच्या आयुष्याचं स्वप्न आहे.