आज‘आरंभ’ची सानपाडा, तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर्स, तुर्भे एनएमएमसी, पवने व दिघा येथे सहा केंद्रे सुरू आहेत. दोन हजारांहून अधिक मुले येथे शिक्षण घेत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झोपडपट्टीतील मुलांसाठी शाळा सुरू करत शिक्षणाचा आरंभ करणाऱ्या, त्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांमधली भक्कम पगाराची नोकरी सोडून देणाऱ्या, मुलांमधलं आत्मभान जागवत त्यांना स्वावलंबी करणाऱ्या शोभा मूर्ती यांचे हे अनुभव.
मीलहानपणापासून अभ्यासात हुशार. हातात घेईन ते काम तडीस नेणार हा माझा खाक्या. वडील टी.के.एस.मूर्ती बीएआरसीमध्ये संशोधक तर आई गिरिजा कमालीची शिस्तप्रिय. त्यांच्याकडूनच माझ्यात चिकाटी आणि अथक मेहनत घेण्याची वृत्ती बाणवली गेली. अर्थशास्त्रात गती होती. मग वाणिज्य शाखा घेऊन शिक्षण सुरू झालं. एकदम सुखवस्तू घरातलं वातावरण. मी संवेदनशील होते. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे कायमच तटस्थपणे पाहण्याची सवय मला लागली. अशा वातावरणातच मी १९८६ साली सीएची परीक्षा उत्तीर्ण झाले. घरातल्यांना अत्यंत आनंद झाला. मीही ‘टाटा इलेक्ट्रिक’ या कंपनीत ट्रेनी अकाउण्टण्ट म्हणून रुजू झाले.
लॅक्मे’मध्येही काही प्रमाणात तसंच काम होतं. दिवसामागून दिवस जात होते. पण कॉर्पोरेट जगातील काम मनाला समाधान देत नव्हतं. पैसे खूप मिळत होते, पण एक प्रकारची कृत्रिमता जाणवायची. आयुष्यात काहीतरी उणीव असल्याची जाणीव मन सैरभैर करायची. तेव्हा आपण व्यावसायिक कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी ‘अयोग्य उमेदवार’ आहोत, असं सारखं वाटत राहायचं. मग एक दिवस ‘यूएसएड’ या संस्थेला ऑडिटर पाहिजेत अशी जाहिरात पाहिली आणि थेट मोर्चा तिकडे वळवला.
लगेच अर्ज केला आणि माझी निवडही झाली. ही अमेरिकन संस्था ‘आंतरराष्ट्रीय विकास’ डोळ्यासमोर ठेवून काम करते. या संस्थेद्वारे लष्करेतर परकीय मदत देण्यासाठी अमेरिकन सरकार कटिबद्ध आहे. या संस्थेत काम करण्याचा अनुभव माझं संवेदनाविश्व ढवळून काढणारा होता. कामानिमित्ताने मी त्यावेळी भारतातल्या यापूर्वी कधी नावही न ऐकलेल्या, मागास भागांना भेटी दिल्या. मुख्यत्वेकरून आदिवासी भागांना आणि तेही मध्य प्रदेश, उत्तरांचल, राजस्थान तसेच गुजरातसारख्या राज्यांच्या. अनेक गावं पक्क्य़ा रस्त्यांनी जोडलेली नव्हती. एका वेळच्या जेवणाचीसुद्धा कित्येकांना भ्रांत असायची. कमालीची गरिबी, घरात अठराविश्वे दारिद्रय़ आणि अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा. त्यामुळे विकास हा शब्द त्यांच्यापासून कोसो दूर होता. घरांना दरवाजेही नसायचे. कारण घरात चोरीला जाण्यासारखं काहीच नसायचं. अज्ञानामुळे पिळवणूक होत होती. भकास आयुष्याचे साक्षीदार असणारे ते चेहरे आजही माझ्या डोळ्यांसमोर आहेत.
या सामाजिक विरोधाभासाने मला अस्वस्थ केलं. एकीकडे रग्गड पैसे कमावणारे माझ्यासारखे लोक आहेत तर दुसरीकडे हे भुकेकंगाल लोक. ही दरी कशी मिटेल? आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य नव्हतेच. मग यापैकी सुदैवी परिस्थितीत मी मोडली जातेय, ते का बरे ? एखादी वीज चमकावी आणि लख्ख प्रकाश पडावा तसं झालं आणि मला जाणवलं, की शिक्षण. माझ्या शिक्षणानं मला मान्यवरांच्या पंक्तींत आणून बसवलं. त्यामुळेच माझा सामाजिक व आर्थिक दर्जा उंचावला. शिक्षण हेच परिस्थिती बदलण्याचं, सुधारणा घडवण्याचं प्रभावी माध्यम ठरू शकेल. बस्स हाच तो क्षण ज्याक्षणी मी काय केलं पाहिजे, हे मला समजलं..नव्हे आतून उमगलं. या क्षणाची मी अत्यंत ऋणी आहे.
 नंतर तीन वर्षे ‘क्राय’मध्येही आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहिलं. पण तब्बल ९ वर्षांच्या झगमगाटीच्या, आकर्षक पण तितक्याच फसव्या कॉर्पोरेट कारकिर्दीला मी पूर्णविराम देत १९९७ मध्ये ‘आरंभ’ची स्थापना केली.
माझं शिक्षण वांद्रे येथील कॉन्व्हेंट स्कूलमधलं. पण नंतर आम्ही स्थायिक झालो नवी मुंबईतील वाशी येथे. त्यामुळे येथे नव्याने वसू लागलेल्या व धारावीखालोखाल अवाढव्य पसरलेल्या तुर्भे येथील झोपडपट्टीची मला माहिती होती. या झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाच्या वाटेने नेत त्यांचं आयुष्य बदलायचं, असं ठरवलं. एका विशिष्ट समाजाचा वा समूहाचा उद्धार हे माझं ध्येय नव्हतंच. पण निम्नस्तरातील लोकांचं आयुष्य शिक्षणाच्या लाटेने मुख्य प्रवाहात आणण्याचा माझा ध्यास होता. कारण ‘माझं शिक्षण’ हीच माझ्याकडची मोठी संपत्ती होती, हे तोपर्यंत पुरतं कळून चुकलं होतं. झोपडपट्टीतील महिला व मुलं ही माझ्या दृष्टीनं सुधारणा घडवण्याचं साधन होतं. मग तुर्भे येथील झोपडपट्टीत ‘आरंभ’चं पहिलं केंद्र सुरू झालं.
पण सुरुवात इतकी सोपी नव्हती. पंधरा-सोळा वर्षांपूर्वी ७०-७५ हजार रुपयांची नोकरी सोडून अशा कुठल्याशा मार्गाने जाणे, हेच मूर्खपणाचे समजले जायचे. आणि उच्चभ्रू लोकांच्या मते तर हे भिकेचे डोहाळे होते. माझ्या घरातूनच मला विरोध झाला. तोपर्यंत लाइफ स्टाइलही कॉर्पोरेट झाली होती. कितीही महागडी वस्तू विकत घेण्यासाठी दुसऱ्यांदा विचार करण्याची गरज भासत नव्हती. अशा वेळी ‘भिकाऱ्यांना शिकवणे’ (माझ्या घरच्यांनी माझ्या कामाचा काढलेला सोयीस्कर अर्थ) मलाही जड जाणार होते. पण अनामिक ऊर्मीने मी ते केले.
या भागात शिकवायचं तर मराठी येणं अपरिहार्य होतं. मला तर मराठीचा गंधही नव्हता. आमचा भाजीवालासुद्धा इंग्रजीत बोलायचा. कॉलेजला असताना भाषा म्हणून मी फ्रेंच शिकले होते. तरी मी माझ्या निर्णयावर ठाम होते. आज मला मोडकंतोडकं मराठी बोलता येतं. अर्थात याचं श्रेय माझ्या मुलांनाच आहे.
 तर झोपडपट्टीत आमचं पहिलं केंद्र सुरू झालं, भर पावसात, ३१ जुलै रोजी. एका छोटय़ा खोलीमध्ये. त्याचं छप्पर होतं गळकं. मुलांना रोज त्यांच्या घरातून, गल्लीतून गोळा करून इथं आणावं लागायचं. जी काही दोन-चार डोकी शेवटपर्यंत टिकायची तीच खोलीत साचलेलं पाणी काढून बाहेर टाकायची. या झोपडपट्टीत राहणारे बहुसंख्य हे स्थलांतरित. उत्तर प्रदेश, ओरिसा, तामिळनाडू अशा देशातल्या कानाकोपऱ्यातल्या भागातून उज्ज्वल भविष्याची स्वप्नं घेऊन येथे स्थिरावलेले. आजूबाजूच्या बांधकामाच्या साइटवर मजुरी करणारे, काही एपीएमसी बाजारातील धान्यगोदामात रोजंदारीवर. ज्यांच्याकडे तेवढेही कौशल्य नाही असे व शिक्षणाचा गंधही नसलेल्या त्यांच्या बायका, मुली कचरावेचक म्हणून काम करणाऱ्या. अशा घरातली मुलंही सानपाडा, तुर्भे येथील सिग्नलवर भीक मागणारी किंवा आई-वडिलांबरोबर तिथल्या कामाला जुंपलेली. त्यामुळे या मुलांना शिकण्यासाठी उद्युक्त करायचं तर त्यांच्या आई-वडिलांच्या गळी हे उतरवावं लागणार, हे मी जाणलं.
या महिला तयार झाल्या. पण कमी पैशात राबणारी मुलं हातची गेल्याने ठेकेदार या महिलांवर राग काढायचा. मला रात्रीअपरात्री फोन यायचे. ‘शाळा बंद करा नाही तर शाळा तुमच्यासकट उडवून टाकू’ अशा धमक्या यायच्या. कधी शाळेच्या खोलीबाहेर कचरा टाकून ठेवलेला असायचा. तर कधी एकही मूल वस्तीतच नसायचं. मी हताश व्हायचे. पण रात्री बारालाही उठून पोलिसांत तक्रार करायला जायचे. मुस्लीम समाजाच्या लोकांनी टोकाचा विरोध केला. पण माझ्या वडिलांनी या काळात खूप सहकार्य केले. मुलांनाही शिकायची गोडी वाटू लागली होती. मुलंच त्यांच्या मित्रांना घेऊन यायची. अशा तऱ्हेने शाळेतील मुलांची संख्या वाढली. वस्तीतल्या बायका पाठीशी उभ्या राहिल्या. प्रोत्साहन देऊ लागल्या.  
रस्त्याच्या आडोशाला, पुलाखाली किंवा रेल्वे ट्रॅकच्या बाजूला यांची घरं विखुरलेली आहेत. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. क्षयरोग, हिवताप हे रोग तर त्यांच्यात सर्रास दिसून येतात. अपुऱ्या आरोग्यसुविधांमुळे अनेकदा मुलंही त्याला बळी पडतात. गरिबीमुळे पालक मुलांना शाळेत घालत नाहीत, तर काहींची शाळा दहा वर्षांचे होईपर्यंत सुटलेली असते. १३-१४ वर्षांची मुलं दिवसातले दहा-बारा तास काम करतात. तर पंधरा वर्षांपर्यंत मुलींची लग्नही लावून दिली जातात. अशा वस्तीत एका महिलेने काम सुरू करणं हे एक आव्हान होतं. लहान मुलांनाही इथं गुटखे-तंबाखू खाण्याचं व्यसन असायचं, तर मोठय़ांचं काय बोलणार? त्यात मी बाहेरची असल्याने लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा संशयी होता. पण आनंददायी शिक्षण हा हेतू घेऊन मी ‘आरंभ’ची वाटचाल सुरू ठेवली. त्यासाठी अनेकदा चाकोरीबाहेरचे पर्यायही निवडले. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जाऊन गळती झालेल्या मुलांची नावं-पत्ते मिळवायचे. मग त्यांच्या मागावर राहायचं व काहीही करून त्यांना आपल्या शाळेत सामील करून घ्यायचं असा शिरस्ताच तयार झाला.
नीतिमत्ता ती काय फक्त समाजातल्या पांढरपेशा लोकांनाच, हा समज या झोपडपट्टीतील मुलांनी खोटा ठरवला. ‘आम्ही नक्की शाळेत येऊ’ असं वचन मला दिल्याने ६ वर्षांचा भाऊ व त्याची ३ वर्षांची लहान बहीण दोघे सलग तीन दिवस सकाळी शाळेला येऊन बसायचे. त्यांची आई स्टोव्हच्या भडक्याने ४० टक्के भाजली होती. पण काय करायचे हे न कळाल्याने हे दोघे सकाळी शाळेला येत व नंतर तिच्या जवळ बसून असत. ते गप्प गप्प असल्याने मी विचारणा केल्यावर त्यांच्या काही दोस्तांनी मला ही घटना सांगितली. मी सुन्न झाले. तडक त्यांच्या घरी जाऊन त्या बाईला हॉस्पिटलमध्ये नेले. नंतर ती वाचली, पण मुलांच्या कुटुंबापर्यंत माझं कार्यक्षेत्र विस्तारल्याने माझं काम सुकर झालं असं आता वाटतं. दोन-दोन दिवस उपाशीपोटी असणारी मुलं शाळेत येऊन अभ्यास करत. पण चुकूनही आपल्या घरी चूल पेटली नसल्याचं मला कळू देत नसत. त्यांच्याकडे असणाऱ्या स्वाभिमानाने माझ्याच जगण्याच्या व्याख्या बदलल्या हे नक्की. सहवासामुळे मुलांशी असणारी जवळीक वाढली. तरीही विरोध सुरूच होता. शाळेचं नवीन केंद्र सुरू झालं की धमक्यांची पत्रं आणि फोन सुरू व्हायचे. अनेकदा मी इतकी कंटाळायचे की ‘बस्स झालं आता उद्या यायचं नाही’, असं ठरवून घरी जायचे. पण दुसऱ्या दिवशी परत सकाळी मुलांचे वाट पाहणारे डोळे आठवायचे व न चुकता मी शाळेत हजर व्हायचे. सुरुवातीला शोधून आणावी लागणारी मुलं नंतर इतक्या आवडीने मेहनतीने शिकायची की त्यांची ही गोडी पाहून मला बळ मिळायचं. काही द्वाड मुलंही होतीच. काही माझ्या बॅगेतून पैसे चोरून नेत. माझ्या घरी जेवायला नेल्यावर घरच्या वस्तू गायब व्हायच्या. तेव्हा तर असं वाटायचं, ज्यांच्यासाठी करतोय, त्यांना तरी किंमत आहे का आपली? का करावं आपण हे? पण आई-बाबांनी अशा वेळी हिंमत दिली. पाच वर्षे झटलीस आणि आता का मागे फिरतेस, मग पुन्हा प्रवास सुरू व्हायच्या.
असं करता करता आता ‘आरंभ’ सुरू होऊन १६ वर्षे लोटली. आजच्या घडीला ‘आरंभ’ची सानपाडा, तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर्स, तुर्भे एनएमएमसी, पवने व दिघा अशी सहा केंद्रे सुरू आहेत. दोन हजारांहून अधिक मुले येथे शिक्षण घेत आहेत. दहावीपर्यंतच्या मुलांसाठी संगणकासह गणित, विज्ञान व इंग्रजीसाठीचे क्लासेसही चालवतो. मेणबत्त्या बनवणे, शिवणकाम, स्क्रीन प्रिंटिंग अशासारखे व्यावसायिक प्रशिक्षण देणारे वर्गही आम्ही नुकतेच सुरू केले आहेत. आत्तापर्यंत आमची ११० मुलं पदवीधर झाल्याचं खूप समाधान आहे.
 या ‘उठाठेवी’ने मला काय दिलं..या प्रश्नाचं उत्तर आहे अढळ समाधान. या मुलांचे पालक मुलाची प्रगती पाहून आठवणीने भेटायला यायचे. मी काय सांगते त्याकडे लक्ष द्यायचे. नुसते सल्ले न ऐकता त्याचा पाठपुरावा करायचे. यामुळे मी कुणीतरी आहे, माझ्यामुळे यांच्या आयुष्यात काहीतरी बदल होतोय, मी तो घडवू शकतेय, हा आत्मविश्वास माझ्यात नव्याने जागा व्हायचा. त्याने नवीन प्रयोग करण्याचं धाडस मिळायचं.  
अनेक मुलांच्या वडिलांना-मामांना मी दुकानात कामं शोधून दिली. माझ्या ओळखीच्या कुणाला घरकामासाठी बाई हवी असेल तर त्यांच्याकडे मी वस्तीतल्या बायकांना काम मिळवून द्यायचे. कुणाला डॉक्टरकडे झाडू मारणं-लादी पुसणं अशी मानाची कामं मिळवून दिली. कुटुंबातील महिला तिच्या पायावर उभी असेल तर संसाराची गाडी सुरळीत चालेल, या हेतूने अनेक बायकांना छोटी-मोठी कामं मिळवून देत गेले व त्यांच्याशी असणारं माझं नातं अधिक दृढ होत गेलं.
अनेकदा लोक ‘आरंभ’ हेच नाव का असं विचारतात. आश्चर्य म्हणजे हे नाव याच लोकांनी मला सुचवलं. कुठलंच इंग्रजी नाव देऊ नका, हा त्यांचाच आग्रह. देवनागरीत नाव हवं व ते तसंच लिहिलंही जावं, हासुद्धा त्यांचाच अट्टहास. ही सुरुवात आहे बदलाच्या दिशेने. शिक्षणाची ज्योत पेटवून हा प्रवास सुरू झालाय, म्हणून ‘आरंभ’.
इतक्या वर्षांत अनेक मुलं हाताखालून गेली. शिकून स्वत:च्या पायावर उभी राहिली. पण त्यांच्यातला शेखर मंजुळकर हा अंध मुलगा विशेष लक्षात राहिला. ५ वर्षांचा असल्यापासून तो शिकण्याच्या ओढीने ‘आरंभ’मध्ये आला. त्याचं कुटुंब अशिक्षित, त्यामुळे भविष्य अंधारातच होतं. पण त्याच्यात जबरदस्त इच्छाशक्ती होती. सेंट झेव्हियर्स कॉलेजच्या मदतीने त्याचं अभ्यासाचं साहित्य ‘ब्रेल’ मध्ये उपलब्ध झालं. त्याने मेहनतीने बारावीत ७३ टक्के मिळवले. आज वाशीच्या आयसीएल कॉलेजमध्ये त्याने बी.ए.साठी प्रवेश घेतला आहे तेही शिष्यवृत्तीवर. कॉलेजने त्याच्या हॉस्टेलचीही सोय केली आहे. त्याच्या यशाचा आम्हाला अभिमान आहे. सुभाष हेगडे या दुसऱ्या एका मुलाने आयटीआय पूर्ण केलं. त्याचं कौशल्य व हुशारी पाहून एल.एन.टी. कंपनीने त्याला घेतलं व आज पस्तीस हजार रुपयांच्या पगारावर ओमनमधील एका कंपनीत तो रुजू होणार आहे. कल्पना पडधन ही तर शाळा सोडून दिलेली मुलगी. चार वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा शाळेत आली. लवकरच ती पदवीधर होणार असून आतापर्यंत तिने बालवाडी शिक्षिकेचा कोर्सही पूर्ण केला आहे. अनेक मुलं-मुली स्वावलंबी झाले पण कुणीही शाळेला, आम्हाला विसरलं नाही. आताही रविवारी ते किमान दोन तासांचा वेळ काढून येणार. कोणतंही काम सांगितलं तरी नाही म्हणणार नाही. अनेकजणांची तर मुलंही आता आमच्या शाळेत येतायत. काहीजण आमच्याकडेच अर्धवेळ नोकरी करतात. अनेक पालकही मुलांना आठवणीने ‘मॅडम को बोल के आना काम का पक्का हो गया है’ असं म्हणून आमच्याकडे आवर्जून पाठवतात. आम्हालाही त्याने प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे हे कार्य पुढेही चालू राहील, अशी आशा आहे.
कधी कधी विचार करते, या साऱ्यात माझी भूमिका काय ? बदल घडवण्याचे शिवधनुष्य आपण एकटय़ाने पेलले का..तेव्हा लक्षात येतं मी एक निमित्तमात्र. मी शिकवण्याची इच्छा दर्शवली, पण मुलं शिकलीच नसती तर. महिला माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या नसत्या, त्यांनी पुढे जाण्याचा विश्वास दिला नसता तर हा प्रवास अशक्यच होता. माझ्या आतल्या आवाजाला साद देत इथवरचा प्रवास झाला, पण त्याचं श्रेय घेण्याइतका अहंकार या मुलांनीच माझ्यात निर्माण होऊ दिला नाही. गेल्या पाच वर्षांत २-३ एनजीओ या भागात येऊन निघून गेल्या. लोकांनी प्रतिसादच दिला नाही. तेव्हा वाटलं आपल्यात काय बरं वेगळं होतं, मग वाटतं प्रामाणिकपणा व मेहनत यांचा आदर होतोच. म्हणून मी नेहमी सांगते, ‘‘यशासाठी शॉर्टकट शोधू नका. टेढी ऊंगली से घी मत निकालो. आज या कल उसका असर दिखेगा ही. उलटा मेहनत और लगन से काम करो. विश्वास रखो की तुम जितोगे..’’ मुलांचा प्रवास त्या दिशेने होतो आहे.
मला वाटतं, सगळ्यांनाच नोकरी सोडून समाजकार्य करता येणार नाही. पण आपापल्या परीने आपण समाजाचं देणं फेडलं पाहिजे. सुशिक्षित लोकांनी दर महिन्याला फक्त दोन हजार रुपये जरी सत्कारणी लावले तरी खूपजणांचं आयुष्य बदलू शकतं, हा माझा विश्वास आहे. शिवाय आठवडय़ातले ४-५ तास जरी तुम्ही वंचित मुलांच्या शिक्षणासाठी दिलेत तर खूप मोठा बदल आपण घडवून आणू शकू. कारण बदल होण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपणच सुधारणेच्या दिशेने पावले टाकायला हवीत.(शब्दांकन-भारती भावसार)
संपर्क- आरंभ, ३१-बी, गीतांजली,  सेक्टर १७,
वाशी- ४०० ७०३ दूरध्वनी-०२२-२७६८०९६५
वेबसाइट- http://www.aarambh.org
ई-मेल – info@aarambh.org