मला भरभरून यशाची नेहमी भीती वाटायची. त्यानं माणसं तुटतात, आपण एकटे पडतो असं वाटायचं. आपल्याला नकोच ते यशबिश! पण मला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यापासून गेल्या काही दिवसांत माझ्यावर मनापासून केलेल्या प्रेमाचा वर्षांव बघते आहे. भीती कमी होते आहे. यश इतकं काही धोक्याचं नसतं तर.. त्याला इतकं घाबरायचं कारण नाही.. त्याच्याकडे नीट बघते. शांतपणे. संपूर्णपणे. त्याला नि:संग स्वीकारते.
गेले काही दिवस एक नवीन शिक्षण सुरू आहे. भरभरून झालेला आनंद नि:संग मनानं स्वीकारण्याचं शिक्षण. बावरल्यासारखं होत आहे. माझे गुरू पंडित सत्यदेव दुबे एक कविता म्हणायचे, त्यातली एक ओळ आठवते आहे, ‘बेटा ये सुख है, इससे डरो मत, अपनालो इसे..’ शब्द कदाचित इकडेतिकडे होतील पण त्या ओळीचा अर्थ नक्की असाच होता. स्वप्नं पाहणं ओळखीचं आहे; त्या स्वप्नांसाठी अपार मेहनत करणं ओळखीचं आहे; पण अचानक एके दिवशी ते स्वप्न पूर्णच होणं.. एक स्वप्न पूर्ण होणं म्हणजे काही शेवट नसतो, त्यापुढेही पुढचा मकाम वगैरे सगळं कळतं आहे. पण तरी एक काही तरी मोठं पूर्ण झालं आहे त्याचं काय करायचं.. हवेत जायचं नाही, जमिनीवर राहायचं, शांत राहायचं, अजून काय काय करायचं.. काही स्वप्नं आपण वेगळी अशी पाहतच नाही. ती आपल्या असण्याबरोबरच येतात. नाक, कान, डोळे तशीच ही स्वप्नं.
 राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे माझ्या अभिनयाच्या क्षेत्रातल्या कुणाहीसाठी असंच एक स्वप्न. जे वेगळं म्हणून पाहावंच लागत नाही. या क्षेत्रात काहीही करू पाहणाऱ्या प्रत्येकाचा तो एखादा अवयवच. इतकी र्वष राष्ट्रीय पुरस्कारांच्या घोषणेचा दिवस म्हणजे ‘आपलंही नाव कधी या यादीत झळकेल का..’ असं असोशीनं वाटण्याचा दिवस. अखेर या वर्षी ते झळकलं. आता पुढे? तिथपर्यंत पोचेपर्यंत वाटत राहतं तिथं पोचलं की सगळे प्रश्न संपतील. ‘ते’ म्हणजेच सर्वकाही. ‘ते’ एकदा मिळू दे फक्त.. ‘ते’ म्हणजे फक्त राष्ट्रीय पुरस्कारच नाही तर अनेक र्वष स्वप्न पाहिलेलं किती किती काही काही.. ‘इतके पैसे मिळू देत फक्त’, ‘अशी भूमिका मिळू दे फक्त’, ‘हे होऊ दे फक्त’, ‘ते होऊ दे फक्त.’ मग बास! लाइफ सेट है बॉस! मला नकारात्मक व्हायचं नाहीये. भरपूर आनंद झालाय खरंच, पण अजूनही खूप काही होतं आहे. जाणवतं आहे, पुरस्कार मिळाला त्या एका दिवसाने क्षणात माझं आधीचं ‘असणं’ बदलू शकत नाही. बदलत नाही. गंमत म्हणजे रोज सकाळी उठल्यावर आणि नंतर दिवसभरातसुद्धा अनेक गोष्टी कळत-नकळत मनात येत असतात. व्हाव्याशा वाटणाऱ्या अशा. पुरस्कार जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी नेहमीच्या सवयीनं मनात आलं, ‘मला कधी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर?’ तो मिळतो त्या एका दिवसाने बाहेर खूप जणांसाठी खूप काही बदलतं पण माझ्या आतली ‘मी’ तीच असते ना. अचानक सगळं मोठं कसं होईल? जे जसं आहे तसंच आहे. आहे त्यापेक्षा मोठंही नाही आणि लहानही नाही.
माझे शरीरशास्त्राचे गुरू परुळेकरसर आणि माझा नवरा संदेश यांच्यातलं एक संभाषण आठवतं आहे. संदेशने त्याच्या एका कार्यक्रमासाठी एव्हरेस्ट सर केलेल्या कुणा एका थोर माणसाची मुलाखत चित्रित केली होती. त्यात त्यांना प्रश्न विचारला, ‘एव्हरेस्ट सर केल्यावर शिखरावर असताना काय वाटलं?’ ते म्हणाले, ‘आता पुढे काय?’ असं वाटलं. असं क्षणिक वाटणं साहजिकच पण सततच हेच वाटत राहिलं तर? यावर परुळेकरसर सांगत होते, खेळाच्या क्षेत्रात अगदी लहान वयात खूप दैदीप्यमान यश मिळवणारे अनेक खेळाडू असतात. काही खेळांमध्ये तर खेळाडूची कारकीर्द लहान वयात सुरू होऊन तारुण्यात संपतेसुद्धा. अशा वेळी कधी कधी लहान वयात ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवलेल्या एखाद्या खेळाडूला असंच होऊ शकतं, ‘आता पुढे काय?’ अचानक त्या बक्षिसानंतर तो डिप्रेशनमध्ये जातो. व्यसनांच्या आहारी जातो. त्याची कारकीर्द एका पदकातच संपुष्टात येते. आयुष्य हातातून निसटून जातं. इतकं मोठं यश पचवायचं कसं कळत नाही. या सगळ्याला ‘ऑलिम्पिक सिंड्रोम’ असंच नाव आहे.. सचिन तेंडुलकरला इतक्या लहान वयात ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळाला तो फक्त त्याच्या खेळासाठी नसणार, तर इतक्या लहान वयात इतकं मोठं यश पुन:पुन्हा मिळूनही ते पुन:पुन्हा योग्य तऱ्हेने पचवण्यासाठीही असणार! सचिनचं काय होत असेल? दररोज नवनवे विक्रम करण्याची आतली शक्ती तो कुठकुठून मिळवत असेल? नव्याण्णव धावांवर सगळ्या जगाचे डोळे त्याच्या एका धावेकडे लागलेले असताना कुठल्या शांतपणे शंभरावी धाव घेऊन तो शांत बॅट हवेत उंचावत असेल.. किती घट्ट, शांत नातं असेल त्याचं त्याच्या आतल्या असण्याशी. बाहेर कितीही उलथापालथ होवो, चांगली किंवा वाईट, शंभर धावा, दोनशे धावा, हजार धावा, काही हजार धावा, शून्यावर चीत. तो तोच आहे. तो त्याच्या आतल्या त्याच्या नि:संग असण्याला धरून आहे. माझ्या पुरस्काराची आणि सचिनच्या मिळकतीची कुठेच तुलना होऊ शकत नाही हे मी पुरेपूर जाणते. पण माझ्यापुरतं माझ्या छोटय़ाशा आयुष्यात हे पहिल्यांदात घडलं आहे. हे काही दिवस फार फार आनंदाचे आहेत. पण हे दिवस हे जाणण्याचेही आहेत, ‘मी तीच आहे. भवताल तात्पुरता बदलल्यासारखा वाटला तरी तोच आहे.’ पुरस्कार जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मी मुद्दाम नेहमीसारखी उठून जिमला गेले.
काहींना याचं आश्चर्य वाटलं, पण माझ्यासाठी ते जाणं फार महत्त्वाचं होतं. पुन्हा रुटीन सुरू. माझं तेच शरीर. त्याचा तोच व्यायाम. त्या सगळ्यात एक सुंदर भर पडली आहे, अनेक हसऱ्या चेहऱ्यांची. अभिनंदन करणाऱ्या अनेक हातांची. हे सगळं मी निगुतीनं साठवते आहे. मला भरभरून यशाची नेहमी भीती वाटायची. त्यानं माणसं तुटतात, आपण एकटे पडतो असं वाटायचं. मनातल्या मनात वाटायचं, आपण आपलं गुपचूप मनापासून आपलं काम करत राहू. आपल्याला नकोच ते यशबिश! गेल्या काही दिवसांत माझ्यावर मनापासून केलेल्या प्रेमाचा वर्षांव बघते आहे. भीती कमी होते आहे. यश इतकं काही धोक्याचं नसतं तर.. त्याला इतकं घाबरायचं कारण नाही.. त्याच्याकडे नीट बघते. शांतपणे. संपूर्णपणे. त्याला नि:संग स्वीकारते. त्याच्यापासून पळणं नको. अडकणंही नको. सहज स्वीकार. कृतज्ञ स्वीकार.
गुलजारसाहेबांना या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. तो तर किती मानाचा सन्मान! त्यानंतर त्यांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं. त्यांनी ते अगदी छान, सहज हसून स्वीकारलं आणि ते त्या दिवशी सकाळी खेळून आलेल्या टेनिसच्या मॅचविषयी मला भरभरून सांगायला लागले. किती सहज स्वीकार, इतक्या मोठय़ा सन्मानाचा.. परुळेकरसर एकदा म्हणाले होते, कुठलाही धावपटू त्याला अपेक्षित वेळ नोंदवण्यासाठी, म्हणजे समजा नऊ सेकंद, त्या नऊ सेकंदांसाठी वर्षभर कसून मेहनत करत असतो. तो जेव्हा जिंकतो तेव्हा त्या दिवशीच्या त्या नऊ सेकंदांमागे मागची सगळी मेहनतीची र्वष असतात. शिवाय त्यामागे त्याची प्रार्थनाही असते. प्रार्थना म्हणजे ‘देव देव, जप-तप’ नाही. त्या एका अनामिक शक्तीला केलेली प्रार्थना जी सगळं सुरळीत पार पाडते. ती शक्ती जी शर्यतीच्या दिवशी त्याच्या पायात ‘क्रॅम्प’ वगैरे न येण्याची काळजी घेते, ती शक्ती जी कुठल्याही सायकलस्वाराची सायकल शर्यतीच्या दिवशी पंक्चर होऊ देत नाही. त्या शक्तीच्या जोरावर तो कुठलासा धावपटू त्याची कुठलीशी विक्रमी वेळ नोंदवतो, भरपूर आनंदी होतो आणि दुसऱ्या दिवशीच्या पहाटेपासून त्यानेच नोंदवलेला विक्रम तोच कसा मोडू शकेल याचा ध्यास घेऊन नव्यानं मेहनतीला लागतो.
या सगळ्यात जाणवलेली एक मोलाची गोष्ट.. कुठल्याही छोटय़ा किंवा मोठय़ा यशाला जवळच्या माणसाच्या असण्याने अर्थ येतो. हा सगळा खेळ आपण आपल्या एकटय़ासाठी थोडाच मांडतो. माझं यश माझ्यापर्यंत पोचवणारी माझी माणसं माझ्या आसपास नसती तर.. मी मोठमोठ्ठे पुरस्कार मिळवलेली, खूप पैसा असलेली यशस्वी माणसं दिवसभराच्या कामानंतर रात्री एकटी पडून दारूच्या आहारी गेलेली पाहते आहे. मध्ये एका पार्टीत अनेक वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला माझा एक मित्र तर्र्र अवस्थेत दारूचा पुढचा पेग घ्यायला झुलत उठला तेव्हा मी न राहवून त्याला म्हटलं, ‘‘का पितोस एवढी? तुला काय दु:ख आहे? तुला तर इतक्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय!’’ तेव्हा तो त्याचे एकटे डोळे माझ्यावर खिळवून म्हणाला होता, ‘‘त्यानं काय होतं बाळा? राष्ट्रीय पुरस्कारालासुद्धा एक दिवस गंज चढतो..’’
माझ्यासमोर माझ्या नवऱ्यानं- संदेशनं स्वत:च्या हातानं करून दिलेलं एक ग्रीटिंग आहे. एक मुलगी हात पसरून उभी, तिच्या आत अजून एक मुलगी हात पसरून उभी, तिच्या आत अजून एक. आनंदाला भरभरून घेऊ पाहणारी. पुरस्कार मिळाल्या क्षणी आईला बातमी दिली. फोन ठेवला आणि आत खोल कुठेसं दुखलं. तिला एसएमएस केला, ‘बाबा’ त्यानंतरचा तिचा मेसेज कायम मनात राहील,  ‘ते आहेत. कायम. नसले तरी..’ माझ्या हातात एक सुंदर अंगठी आहे, सासूबाईंची. पुरस्काराची बातमी कळताच क्षणात माझ्या हातात घातलेली. या सगळ्या गोष्टी एक जाणीव देतायेत. आयुष्य वेगवेगळ्या शर्यतींनी भरलेलं आहे. कुणी पैशाच्या शर्यतीत पुढे, तर नातेसंबंधाच्या शर्यतीत मागे, कुणी करिअरमध्ये पुढे तर आरोग्यात मागे. आपण आपल्याला कुठकुठली शर्यत महत्त्वाची वाटते ते बघायचं.
माझ्या एका मित्राच्या आयुष्यातली एक शर्यत आठवते आहे. त्यानं आणि त्याचा मित्र परागनं एका सायकल शर्यतीत भाग घेतला होता. शर्यत सुरू झाली तशी पराग सायकल हाणत झपाटय़ानं पुढं गेला. माझा मित्र आधी जोरात होता, मग मात्र दमला. पराग आणि इतर सगळेच माझ्या या मित्राला मागे टाकून निघून गेले. अचानक माझ्या या मित्राला एक भलामोठा चढ लागला. कसाबसा जीव खाऊन तो तो चढ चढला. वर येऊन पाहतो तो काय.. पराग त्याची वाट पाहत तिथं थांबलेला होता. माझा मित्र त्याला म्हणाला, ‘मी दमलो, मी सोडतो शर्यत, तू तरी पुढं जा.’ पराग त्याला म्हणाला, ‘शर्यत सोडायची नाही, पूर्ण करायची, चल!’ माझा मित्र आणि पराग पुन्हा सायकलवर चढले. शर्यत पुन्हा सुरू झाली. ते कितवे आले माहीत नाही, पण माझ्यासाठी ते जिंकलेले होते, आहेत आणि राहतील!   

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका