अजिबात तिखट नसणारी ही मिरची हल्ली लाल-पिवळ्या तसंच केशरी-हिरव्या रंगात मिळते. पूर्ण वाढ झालेल्या रसरशीत मिरचीत ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. शरीराच्या वाढीसाठी लागणारं ‘ब’ जीवनसतत्त्व आणि कॅल्शियम, मॅग्नेशियमसारखी खनिजंही या मिरचीत आहेत. त्यातलं मँगनीज हाडांना उपयुक्त ठरतं. विशेषत: लाल-पिवळी मिरची गोडसर असते आणि त्यात बीटा कॅरोटिन आणि जीवनसत्त्व ‘ई’ असतं. भोपळी मिरची फार शिजवू नये. या मिरचीचा स्वाद आणि रंग यामुळे पदार्थ आकर्षक दिसतो.

मिरची ढोकळा
साहित्य: ३ मोठय़ा आकाराच्या भोपळी मिरच्या (तीन रंगाच्या असतील तर चांगलं). एक वाटी बेसन, एक वाटी ताक, १ चमचा लिंबाचा रस, एक चमचा वाटलेली आलं-मिरची, चवीला मीठ, साखर, अर्धा चमचा इनोज फ्रुट सॉल्ट, फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल, मोहरी, हिंग, हळद, एक चमचा तीळ.
कृती: भोपळी मिरच्या मधोमध कापून बिया काढून टाकाव्या. प्रत्येक भागाला आतून बाहेरून थोडं तेल, लिंबाचा रस आणि मीठ चोळावं. बेसन, ताक, मीठ, साखर, मिरची, चिमूटभर हिंग, हळद, इनोज एकत्र करावे आणि हे मिश्रण मिरच्यांच्या वाटय़ात ओतून त्या मोठय़ा बाऊ लमध्ये ठेवाव्या आणि झाकण ठेवून २ मिनिटं मायक्रोवेव्हमध्ये ठेवाव्यात. पीठ शिजलं नसेल तर आणखी काही सेकंद ठेवता येतील. तेलाची फोडणी करून त्यात तीळ परतावे आणि फोडणी मिरच्यांवर घालावी. खाताना मिरच्यांचे काप करावे.
> वसुंधरा पर्वते
vgparvate@yahoo.com