चायोटे हे टोमॅटोसारखं फळ आहे. जे भाजी म्हणून वापरलं जातं. मूळ मेक्सिकन असलेली, मोठय़ा हिरव्यागार पेअर वा पेरूसारखी दिसणारी ही भाजी उत्तर भारतात चू चू म्हणून ओळखली जाते, दक्षिणेतही चायोटे हे सांबार, भाजीमध्ये घातलं जातं. दुधीच्या गुणधर्माच्या या भाजीत कॅलरीज कमी आणि चोथा भरपूर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी खावी.
चायोटेच्या सेवनाने मलावरोध कमी होण्यास मदत होते, आतडय़ाचं चलनवलन वाढतं तसंच रक्तातली साखर आटोक्यात राहते. चायोटेमध्ये ‘क’ जीवनसत्त्व तसंच अनेक उपयुक्त खनिजं आहेत. थोडी कुरकुरीत असलेली ही भाजी कच्ची किंवा कमी शिजवून खाल्ली तर चांगली लागते. सालासकट खाता येते.
चायोटे भाजी
साहित्य : दोन मध्यम चायोटे, एक मोठा चमचा तूप, १ चमचा जिरं, दोन हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीला मीठ, साखर, लिंबाचा रस.
कृती : चायोटेचे सालासकट चौकोनी तुकडे करावे. तूप तापवून जिरं तडतडवावं, मिरच्यांचे तुकडे घालून परतावे, चायोटे घालून, परतून एक वाफ द्यावी. मीठ, साखर, लिंबाचा रस, दाण्याचा कूट घालून, ढवळून खाली उतरावी.-
-वसुंधरा पर्वते (vgparvate@yahoo.com)