बहुतांश लोकांमध्ये वय वष्रे १२ ते २० पर्यंत शरीरातील घडय़ाळ उशिरा झोप आणते, पण प्रौढावस्थेत प्रवेश केल्यावर मात्र अनेकांचे घडय़ाळ हे समाजाच्या घडय़ाळासारखेच (११ ते ६) अशी वेळ देते. एक टक्का लोकांमध्ये मात्र कायम उशिराचे घडय़ाळ असते. रात्री ११ वाजल्यानंतर या लोकांच्या प्रतिभेला स्फुरण चढते. मध्यरात्री कल्पना सुचतात. का बरे निसर्गाने या सात टक्के मुलांना आणि एक टक्का समाजाला अशा उशिराच्या घडय़ाळाची देणगी दिली असेल? कसे असते चंद्रवंशीय लोकांमधील ‘झोपेचे घडय़ाळ’.
मागील लेखामध्ये आपण रंजनची गोष्ट वाचली. रंजनप्रमाणेच अनेक पालकांनी आपल्या मुलांमध्ये ही बाब पाहिली असेल की वय वष्रे बारानंतर हळूहळू झोपेची वेळ उशिरा होते आहे. झोपेचे घडय़ाळ बदलण्याची ही प्रक्रिया केवळ अपवादात्मक मुलांमध्येच नसते. समाजातील या वयोगटाच्या तब्बल २० टक्के (म्हणजे पाचात एक) इतक्या मोठय़ा प्रमाणात हा फरक दिसतो. यातील जवळजवळ एक तृतीयांश (म्हणजे सबंध समाजाच्या सात टक्के) इतक्या मुलांमध्ये लक्षणीय उशिरापण दिसते. बहुतांश लोकांमध्ये वय वष्रे १२ ते २० पर्यंत हे घडय़ाळ उशिरा झोप आणते, पण त्या वयानंतर मात्र (म्हणजे कॉलेज संपून खऱ्या अर्थाने प्रौढावस्थेत प्रवेश केल्यावर) अनेक लोकांचे घडय़ाळ हे समाजाच्या घडय़ाळासारखेच (११ ते ६) अशी वेळ देते. एक टक्का लोकांचे मात्र कायम उशिराचे घडय़ाळ असते. ही लोकं रात्री नऊनंतर अति उत्साही असतात. रात्री ११ वाजल्यानंतर त्यांच्या प्रतिभेला स्फुरण चढते. मध्यरात्री कल्पना सुचतात. या उलट पहाटे पाच ते सातची वेळही त्यांना उठायला अतिशय कष्टप्रद असते.
का बरे निसर्गाने या सात टक्के मुलांना आणि एक टक्का समाजाला अशा उशिराच्या (डिलेड) घडय़ाळाची देणगी दिली असेल? उक्रांती आणि सामाजिक जडणघडणाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचे मत ऐकून या चंद्रवंशीय लोकांची कॉलर ताठ होईल!
सुमारे एक लाख वर्षांपूर्वीपासून ते अगदी इसवीसन पूर्व दहा हजार वर्षांपर्यंत आदिमानव आणि मानवजात हे टोळ्यांनी गुहेत राहत. तसे बघायला गेले तर इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाला पळण्याकरता बळकट स्नायू किंवा हल्ला चढवायला सुळे अथवा वाघ-सिंहासारखे नखे दिलेले नाहीत. रात्री जेव्हा सबंध जमात गुहेत झोपलेली असे तेव्हा गुहेच्या तोंडापाशी द्वाररक्षक म्हणून विशिष्ट लोकांचीच आवश्यकता असे. या द्वाररक्षकांचा तल्लखपणा रात्री वाढणे महत्त्वाचे ठरे. अशा रीतीने हा ‘चंद्रवंशीय’पणा गेल्या लाखभर वर्षांमध्ये अगदी जनुकांपर्यंत (जीन्स) भिनला! पण आता गेल्या दोन हजार वर्षांत कोणी गुहेत राहत नाही आणि विजेच्या दिव्याचा शोध तर गेल्या दोनशे वर्षांतला! पण जनुकांमध्ये बदल व्हायला हा फारच कमी काळ आहे. अशा रीतीने समाजामध्ये दर १४ लोकांमध्ये एक चंद्रवंशीय आढळतो.
माझ्या पाहण्यामध्ये ‘चंद्रवंशीय’ लोकांच्या स्वभावाच्या काही गमतीदार बाबी आल्या आहेत. अर्थात यच्चयावत चंद्रवंशीयांना त्या लागू नाहीत. चंद्रवंशीय व्यक्ती या उत्स्फूर्त असतात. किंबहुना, नियमांचे तंतोतंत पालन आणि नियोजन हा त्यांचा स्वभाव नाही. शेवटच्या क्षणालादेखील हे लोक आपला निर्णय बदलू शकतात. त्यामुळे शंभर टक्के ‘चंद्रवंशीय’ लोक एखाद्या समाजात अथवा कंपनीत असले तर तेथे अराजक माजू शकते! पण त्याचबरोबर कक्षेबाहेर जाऊन विचार (आऊट ऑफ बॉक्स) करून नावीन्य आणणे हे या लोकांना उत्तम जमते. ‘चंद्रवंशीयपण’ मानसिक नसून जैविक (फिजिऑलॉजिकल) आहे हे ध्यानात घ्यायला हवे.
हे घडय़ाळ आणि त्याचे आपल्या शरीरावर, तसेच वागण्यावर परिणाम समजावून घ्यायचे असेल तर टप्प्याटप्प्याने त्याची कार्यरचना जाणून घेऊयात. मी मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे वेळ देणारे घडय़ाळ शरीराच्या प्रत्येक पेशीत असते. तरी या सर्व घडय़ाळांवर नियंत्रण ठेवणारे वरिष्ठ घडय़ाळ (मास्टर क्लॉक) मात्र आपल्या मेंदूत असते. १९७२ साली झुकेर आणि मूर या शास्त्रज्ञांच्या प्रयोगशाळेत सर्वप्रथम वरिष्ठ घडय़ाळ मेंदूच्या ‘हायपोथलॅमस’ या भागात आढळले. हा भाग आपली तहान, भूक, झोप, जाग, शरीराचे तापमान वगरे गोष्टी नियंत्रित करत असतो.
बऱ्याच लोकांचा अनुभव असतो की भूक लागली असली तरी समाधान न झाल्याने आपण पिझ्झा, केक, जिलब्या इत्यादी पिष्टमय पदार्थावर ताव मारतो. ‘हायपोथलॅमस’मध्ये असलेल्या ‘समाधान’ केंद्राने काम न केल्याने अशा रीतीने अनेक लोकांची जाडी वाढते! आपण या शारीरिक कारणाकडे न बघता, मानसिकतेलाच दोष देतो. शास्त्रीयदृष्टय़ा हे मनाचे (सायकॉलॉजिकल) दोष नसून शारीरिक (फिजियॉलॉजिकल) आहेत. असो.
झुकेरने ऱ्हिसस माकडांवर प्रयोग केले. जेव्हा या माकडातील हा विशिष्ट भाग (घडय़ाळ) नष्ट केले, तेव्हा सबंध शरीराच्या क्रियांमध्ये बेदिली माजली. झोप / जाग चक्र पार बिघडून गेले. त्यानंतर त्याने चंद्रवंशीय माकडातील ‘घडय़ाळ बसवले’. ताबडतोब सुरळीतपणा आला पण आता ही माकडेदेखील उशिरा झोपू लागली!
माणसांमध्येदेखील हे वरिष्ठ घडय़ाळ हायपोथलॅमसमध्ये उजवीकडे एक आणि डावीकडे एक असे आढळते. प्रत्येक घडय़ाळात साधारणत: दहा हजार पेशी असतात. गेल्या तीन दशकांत रेण्वीय जीवशास्त्राने (मॉलेक्युलर बायॉलॉजी) इतकी प्रचंड प्रगती केली आहे की, प्रत्येक पेशीमध्ये असलेली विवक्षित प्रथिने आणि ती निर्माण करणारी जनुके (जीन्स्) यांचा छडा लागलेला आहे. या जनुकांमध्ये नियंत्रण पद्धती अगदी अचूक घडय़ाळाप्रमाणे असते.
या नियंत्रण पद्धतीच्या कमी-अधिक वेगानुसार तुमचे घडय़ाळ उशिरा अथवा लवकर चालते. हे सर्व विवेचन करण्याचे कारण असे की, जर तुम्हाला या वरिष्ठ घडय़ाळाचे काटे बदलायचे असतील तर असे उपाय करावे लागतील की जे या जनुकांवर प्रभाव टाकतील. आपण जेव्हा विविध उपायांवर चर्चा करू तेव्हा ही बाब ध्यानात असू द्यावी.
‘कार्टर’ नावाचा १६ वर्षीय मुलगा माझ्याकडे उपचारासाठी आला होता. सिएॅटलमध्ये एका जोडप्याने त्याला आसरा दिला होता. दिवसभर चिडचिडेपणा; वरिष्ठांनी म्हणजे शिक्षकांनी अथवा पालकांनी काही सल्ला दिला तर बरोबर त्याच्या उलट वागणे, अभ्यासात आजिबात लक्ष न देणे, वर्गात डुलक्या घेणे आदी प्रकारांनी त्रस्त होऊन पालकांनी बालमानसोपचारतज्ज्ञांचे दरवाजे ठोठावले होते. त्यातील एका तज्ज्ञाने माझे व्याख्यान ऐकले होते आणि या मुलाच्या घडय़ाळाशी दिवसभराच्या घटनांचा संबंध आहे हे जाणले होते. आमच्या अमेरिकेतील लॅबमध्ये शरीराच्या अंतर्गत असलेले तापमान (कोअर बॉडी टेम्परेचर) मोजण्याचे एक आगळे तंत्रज्ञान आहे. यात एक ‘कॅप्सूल’ गिळली जाते आणि आतडय़ातून प्रवास करताना ही कॅप्सूलअंतर्गत तापमान एका रेकॉर्डरकडे पाठवते. अशा रीतीने चोवीस तासांच्या तापमानाचा आलेख मिळतो. आपल्या शरीराचे तापमान दिवसभरामध्ये ०.५ सेल्सिअसच्या फरकाने कमी-जास्ती होते. पण हे बदलणेदेखील या घडय़ाळानुसारच असते. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत हे तापमान हलकेसे वाढत जाते. मग खाली उतरायला लागल्यावर तुम्हाला जागे राहणे कठीण जाते आणि झोप येते. रात्रभरात तापमान खाली येते. सकाळी परत हलकेसे वाटायला लागते. ते वाटायला लागल्यानंतर अध्र्या तासात जाग येऊ लागते आणि झोपणे कठीण जाते. थोडक्यात, तापमानाचा आलेख आपल्याला घडय़ाळानुसार अपेक्षित असलेली जाग आणि झोपेची वेळ अचूक दर्शवतो.
‘कार्टर’ला जेव्हा ही कॅप्सूल देऊन आलेख काढला, तेव्हा यामधून धक्कादायक निष्कर्ष निघाले. कार्टरचे घडय़ाळ त्याला पहाटे ५ वाजता झोपायची परवानगी देत होते आणि उठण्याची वेळ होती दुपारी २ वाजता!
थोडक्यात, कार्टरच्या बाबतीत रात्रीचा दिवस होता आणि दिवसाची रात्र! त्याला दिलेली औषधे कृत्रिमरीत्या दिवसा जागेपण आणत होती. इतक्या टोकाच्या परिस्थितीत कधी-कधी घडय़ाळ बदलण्याऐवजी आपली जीवनशैलीच बदलणे सोपे ठरते. सर्वच लोकांना, विशेष करून पालकांना हा पर्याय रुचतोच असे नाही. मग हे घडय़ाळ बदलायचे काय उपाय आहेत, त्या मागे असलेले शास्त्र आणि सूर्यवंशीय लोकांबद्दल पुढच्या (२ ऑगस्ट) लेखात!
चंद्रवंशीयाचं घडय़ाळ
बहुतांश लोकांमध्ये वय वष्रे १२ ते २० पर्यंत शरीरातील घडय़ाळ उशिरा झोप आणते, पण प्रौढावस्थेत प्रवेश केल्यावर मात्र अनेकांचे घडय़ाळ हे समाजाच्या घडय़ाळासारखेच (११ ते ६) अशी वेळ देते.
First published on: 19-07-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clock and sleep cycle analysis