१८५५ मध्ये स्त्रियांसाठी ‘सुमित्र’ या मासिकाचे प्रकाशन सुरू झाले, तेव्हापासून सुमारे दीडशे वर्षे स्त्रियांची या नियतकालिकांबरोबरच्या नात्याची सुरुवात झाली. स्त्रीमनाशी संवाद सुरू झाला. त्या वेळचे अनेक विषय, परिसंवाद आजच्या काळातही लागू होतील असे आहेत. काय चर्चा रंगायच्या मासिकांतून, काय विषय अभ्यासले गेले पाक्षिकांतून, कशी होती शीर्षके, कोण कोण होत्या लेखिका, संपादिका त्या त्या काळात?  हे जाणून घेणे उद्बोधक ठरेल. त्या रंजक अभ्यासाचा हा आढावा दर पंधरा दिवसांनी.
आजच्या युगाचे एका वाक्यात वर्णन करायचे तर ‘माध्यमांचे युग’ असेच करावे लागेल. इंटरनेटच्या माहितीच्या महाजालाने आज अवघे जीवनच व्यापून टाकले आहे. बहुवाहिन्या परस्परांतील स्पर्धेच्या उत्साहात रोज आपल्या ताटात हवे-नको ते सारे वाढत आहेत. मसालेदार राजकारण ते मसालेदार खाद्यपदार्थ, वज्र्य काही नाहीच. या साऱ्या पसाऱ्यात स्त्रियांसाठी खास काय आहे? असल्यास तसे किरकोळच. माध्यमांच्या या पसाऱ्यात विचारांना चालना, प्रबोधन, संस्कार, संवाद फारसे कुठे जाणवत नाही, वाटावं की वन वे ट्रॅफिक आहे.
या दृष्टीने विचार केला की वृत्तपत्रं, नियतकालिकांच्या मुद्रित माध्यमांचे वेगळेपण व वैशिष्टय़ निश्चित जाणवते. समाजातून वृत्तपत्र, नियतकालिकांकडे म्हणजेच मुद्रित माध्यमांकडे आणि माध्यमांकडून पुन्हा समाजाकडे आदान-प्रदानस्वरूपी वाहणाऱ्या अशा प्रवाहांनी समाजमनाचे पोषण होते. वाचकांशी संवाद करीत नियतकालिके, वृत्तपत्रे वाचकांच्या अभिरुचीला विकसित करीत वाचकांना समृद्ध करतात. वृत्तपत्रे वाचकांना दैनंदिन जीवनाबरोबर ठेवतात. तर नियतकालिके (पाक्षिके, साप्ताहिके, मासिके इत्यादी) वाचकांना काळाबरोबर ठेवतात. म्हणूनच मुद्रित माध्यमाचे आणि तत्कालीन समाजाचे, वाचकांचे एक दृढ, जवळचे मानसिक नाते निर्माण झालेले असते. म्हणूनच कोणत्याही काळाच्या अभ्यासाला मुद्रित माध्यमाशिवाय दुसरे प्रभावी साधन नाही.
स्त्रियांच्या संदर्भात तर हे नाते अधिक उत्कट, अधिक जिव्हाळय़ाचे आहे. गेल्या काही वर्षांतील हे नाते नसून जवळजवळ दीडशे (१५०) वर्षांचे जुने आहे. १८५५ मध्ये स्त्रियांसाठी ‘सुमित्र’ या मासिकाचे प्रकाशन सुरू झाले. तेव्हापासून स्त्रियांच्या नियतकालिकांबरोबरच्या नात्याची सुरुवात झाली. स्त्रीमनाशी संवाद सुरू झाला. अजूनही हा संवाद चालू आहेच. या संवादाचा, या जिव्हाळय़ाच्या नात्याचा इतिहास बनला. काळाची स्पंदने त्यात उमटली. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर संवादाचे स्वरूप पालटले. गुरू-मार्गदर्शक-तत्त्वज्ञ (गाइड, टीचर, फिलॉसॉफर) या तीनही भूमिकांतून स्त्रियांच्या नियतकालिकांनी स्त्रीमनाचे संवर्धन केले. विषय, आशयाचा काळानुरूप कायापालट आपोआप होत राहिला. बोलणारे, लिहिणारे बदलले. वाचणारे, ऐकणारे नवे आले. परंतु परस्परांच्या संवादात कुठेच खंड पडला नाही. कारण स्त्री, स्त्रीमन, स्त्री-जीवन या संपूर्ण काळातला महत्त्वाचा विकसनशील, परिवर्तनशील घटक होता. स्त्रियांच्या विकासासाठी होणारे शैक्षणिक, सामाजिक कार्य त्यातून पालटणारा विचारव्यूह, बदलणारे सांस्कृतिक वातावरण इत्यादींच्या समन्वयातून एकोणिसाव्या शतकाच्या साधारण उत्तरपर्वात स्त्री-जीवनाची दीर्घकाळची घडी बदलून नवीन दिशेने वाटचाल सुरू झाली.
काळाबरोबर उत्क्रांत होत जाणाऱ्या वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावर परिवर्तनाच्या स्वरूपानुसार युग संवेदना बदलली. ‘काळाची गरज’ बदलली. त्या बदलांशी समांतर स्वरूपात स्त्री-मनाशी होणारा संवाद बदलला. उद्दिष्टे बदलली. मासिकांचे अंतरंग नवे नवे रूप धारण करीत आले. स्त्रियांच्या मासिकांची नावे व उपशीर्षके बघितली तरी बदलत्या संवादाचे स्वरूप स्पष्ट होईल. १९०० पर्यंत शीर्षके कोणती होती,
तर -‘अबला मित्र,’  ‘स्त्रियांसाठी उपयुक्त मासिक पुस्तक,’ ‘स्त्री शिक्षण चंद्रिका,’ ‘स्त्रियांना उपयोगी पडतील अशा विषयांवर सुबोध लेख,’ ‘गृहिणी,’ ‘कुलवधूंच्या ज्ञानवर्धनार्थ आणि मनोरंजनार्थ मासिक पुस्तक!’

१९०० नंतर मासिकांच्या शीर्षकांत व उपशीर्षकांत फरक पडू लागला. ‘महाराष्ट्र महिला,’ ‘कुल स्त्रियांकरिता व कुलस्त्रियांनीच चालविलेले नूतन मासिक, ‘गृहिणी रत्नमाला,’ ‘स्त्रियांच्या उन्नतीसाठी कुलस्त्रियांनी चालविलेले मासिक,’ ‘गृहलक्ष्मी,’ ‘ज्ञानी व स्वतंत्र स्त्री ही शक्ती व वैभव आणि मानव जातीचे सौंदर्य होय!’तसेच  ‘वनिता विश्व!’ वनितांच्या जागतिक प्रगतीचे संकलन करणारे मराठीतील अभिनव मासिक!
 १९७५ नंतर स्त्री मुक्ती आंदोलनाच्या काळात नियतकालिकांच्या शीर्षकात व उपशीर्षकात काळानुरूप पडलेला फरक स्पष्टपणे दिसून येतो. ‘बायजा- स्त्रियांच्या प्रश्नांवर समाजाचे प्रबोधन करणारे एकमेव मासिक’ ‘महिला आंदोलन पत्रिका,’ ‘एकमेका साह्य़ करू!’ वा ‘समाजवाद साकार करू’, ‘मिळून साऱ्या जणी!’- स्वत:शी नव्याने संवाद करणारे मासिक!
१९ व्या शतकातील प्रबोधन काळात ज्ञानदान व वैचारिक उद्बोधन ही युग संवेदना होती. या संवेदनेभोवतीच नियतकालिकांचे आशय, विषय केंद्रित झाले. ‘सुमित्र’, ‘स्त्री-भूषण’, ‘अबला मित्र’, ‘गृहिणी’, ‘आर्यभगिनी’ इत्यादी नियतकालिकांचे मध्यवर्ती सूत्र एकच घेते. काळाची स्पंदने, समाज वास्तवाचे चित्रही मासिकांतून प्रतिबिंबित झालेले दिसायचे. स्त्रियांची संवेदनशीलता विकसित होऊ लागली. भोवतालचे सांस्कृतिक पर्यावरण बदलू लागले. त्यामुळे स्त्रियांची पावले संक्रमणाच्या दिशेने पडू लागली.
१९०० नंतर स्त्रीशिक्षणाला प्रारंभी असणारा विरोध ओसरला. स्त्रीशिक्षण समाजात रुळले. समाजात स्त्रियांचा वावर वाढला. साधारपणे १८८५ च्या आसपास सुरू झालेल्या स्त्रियांच्या लेखन, संपादन कार्याने वेग घेतला. समाजाचा, स्त्रियांचा प्रतिसाद बदलू लागला. स्त्रियांच्या मासिकांच्या अंतरंगातील रंग पालटू लागले. उद्बोधन, प्रबोधनातून स्त्रियांची मासिके ‘व्यासपीठ’ म्हणून आकार घेऊ लागली. आदर्शाची नवीन रूपे समोर येऊ लागली होतीच. अहिल्या, द्रौपदी, सीता यांची जागा डॉ. आनंदीबाई जोशी, रखमाबाई केळवकर यांनी केव्हाच घेतली होती. स्त्रियांच्या संघटित कार्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळू लागली. १९०४ मध्ये मुंबईला पहिली अखिल भारतीय महिला परिषद भरली. आपोआपच स्त्रीमनाशी होणाऱ्या संवादाची लय बदलली. स्त्रियांना संक्रमणाच्या दिशेने नेणारी लय बनली.
१९३० नंतर सर्वागीण वेगवान संक्रमणाचा टप्पा आला. काळाचे भान आणि स्त्रीमनाची गरज ओळखून ‘स्त्री’च्या रूपाने नवे पर्व सुरू झाले. त्याआधी १९२७ पाशीच काळानुरूप संवादाचे पडसाद ‘गृहलक्ष्मीत’ उमटण्यास सुरुवात झाली होतीच. शंकरराव किलरेस्कर यांनी ‘स्त्री’च्या रूपाने नवीन व्यासपीठ निर्माण केले. संक्रमण काळातील स्त्रीमनाची गरज ओळखून स्त्रीमनाचे प्रबोधन, संवर्धन तसेच स्त्रियांना काळाचे भान येण्यासाठी संवादाचा कायापालट घडवला. स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतचा संक्रमणाचा काळ बहुआयामी होता. स्त्री- शिक्षणाचे क्षेत्र विस्तृत झाले होते. स्त्रियांच्या कर्तृत्वाला नवा बहर येत होता. म. गांधीजींच्या आवाहनाने स्त्रिया स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होत होत्या. स्त्रीविषयक सामाजिक कार्याच्या ओढीने स्त्री संस्था, महिला मंडळे इत्यादींतून स्त्रिया कार्यरत होत होत्या. प्रसंगी धाडसी उपक्रम आयोजित करायच्या. स्त्री परिषदांचा प्रभाव वाढला होता. क्षेत्र विस्ताराचा टप्पा होता. साहजिकच या काळातील संवादाचे विषय नवे होते. भाषा नवीन होती. समयोचित संवेदनेने संवादाने कोरसचे रूप घेतले. ‘स्त्री’च्या आवाजात ‘महिला’, ‘नवी गृहलक्ष्मी’, ‘भगिनी’, ‘वनिता विश्व’ इत्यादींनी आपापले सूर मिसळले. काळाबरोबर पुढे आलेल्या एका पिढीने नवीन पिढीचे मानसिक संवर्धन केले. परिसंवाद, लेख, चर्चा, आदर्श महिला, लेखमाला, परिषदांचे वृत्तांत, पत्रव्यवहार जोडीला कथा, कविता इत्यादी धाग्यांच्या गुंफणातून संक्रमण काळातील संवादाची भाषा आपोआप तयार झाली.
१९७५च्या महिला वर्षांच्या टर्निग पॉइंटपाशी (परिवर्तन बिंदू) स्त्रीमनाबरोबरच्या संवादाचे नवे पर्व सुरू झाले. स्त्री मुक्ती आंदोलनाच्या पर्वकाळात स्त्रियांच्या नियतकालिकांचा नवीन आविष्कार घडला. १९५० ते १९७५ च्या काळात ‘स्त्री’ ने ‘एकला चलो रे’ न्यायाने केलेल्या संवादाला नव्या रूपात पुढे नेणारे व्यासपीठ निर्माण झाले. स्त्रीवादी, स्त्रीकेंद्री विचारांच्या काळात संवादाची लय, अंत:स्वर बदलून गेला. ‘ऐलोमा पैलोमा’ म्हणत जणू हातात हात घालून परस्परसंवादी स्वरूपात स्त्री-जागराचे रणशिंग संपादक, लेखिकांनी फुंकले.
‘एक रंग’ अनेक रूपात आविष्कृत घेऊ लागला. महत्त्वाचे म्हणजे हा सर्व संवाद स्त्रियांनीच स्त्रियांशी केला. आता ‘आमच्यासाठी’ दुसऱ्या कोणी आवाज उठवण्याची गरज केव्हाच संपली होती. सन्माननीय अपवाद काहीसा ‘स्त्री’ संपादक मुकुंदराव किलरेस्करांचा होता, नाही असे नाही.
स्त्रियांच्या नियतकालिकांनी स्त्रीमनाशी वेगवेगळय़ा स्वरूपात केलेला प्रदीर्घ संवाद अतिशय महत्त्वाचा आहे. उद्बोधक आहे. स्त्री-जीवनाच्या विकासाचा इतिहास आहे. सांस्कृतिक बदलांचा साक्षीदार आहे. स्त्रियांच्या लेखन संपादन कार्याचा आलेख आहे. हा आलेख, इतिहास विविध स्वरूपात एकाच वेळी साकार झाला. अनेकांचे हातभार लागले. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर समयोचित बदल करीत प्रबोधन- उद्बोधनाच्या संवादाला पुढे नेणारे जाणते संपादक, लेखक, लेखिका पुढे आल्या. ‘सुमित्र’ (गुड फ्रेंड) ते ‘मिळून साऱ्याजणी’ यातूनच सर्व प्रवास सूचित होतो. या प्रवासाला, संवादालाच आपल्याला जाणून घ्यायचे आहे. मागे वळून बघणेसुद्धा अनेकदा आनंददायी असते. तेच दर पंधरा दिवसांनी आपण करू या. नियतकालिकांच्या इतिहासात डोकावू या.    
डॉ. स्वाती कर्वे

Story img Loader