‘‘ आपण अनेक वर्ष काही बघत असतो, वाचत असतो, अनुभवत असतो. काहीतरी निमित्त होतं आणि तोच अनुभव आकस्मिकपणे एक सुबक, सुघड आकार घेऊन आपल्यासमोर उभा राहतो.. रोजचा अनुभव नित्य-नूतन. लेखन असो वा दिग्दर्शन- आपलीच आपल्याशी ओळख करून देत असतो. हेच त्याचं रेझाँ-द-एत्र – अस्तित्वाचं कारण आहे, त्याची इतिकर्तव्यता आहे.’’ सांगताहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, लेखिका, पटकथाकार प्रतिमा कुलकर्णी.
माझं एक आवडीचं वाक्य आहे, ‘मी लिहीत नाही, माझं पेन लिहितं.’ हे फक्त एक चमकदार वाक्य नाही, तर वस्तुस्थिती आहे. आयुष्यातला पहिला दूरचित्रवाणीसाठीचा एपिसोड लिहितानाच जाणवलं की आपण असं काहीतरी लिहितोय जे आपण ठरवलेलं नाही. खूप मजा वाटली होती तेव्हा. त्यानंतर प्रत्येक वेळी तसंच होत गेलं आणि माझ्या लक्षात आलं की लेखन हा एक आत्मशोध आहे. ‘कुठून येतं हे सगळं?’, ‘कसं सुचतं?’ हे प्रश्न सगळ्या लेखकांना विचारले जातात, आणि बहुतेकांचं उत्तर एकच असतं, ‘माहीत नाही!’ एखाद्या डोंगराच्या माथ्यावर वर्षांनुर्वष पाऊस पडत राहतो, ते पाणी तिथल्या दगडांत, खडकात मुरत जातं, आणि अचानक कुठेतरी वेगळीकडेच एखाद्या दगडाला पाझर फुटतो आणि त्याचा झरा होतो. आपण अनेक वर्ष काही बघत असतो, वाचत असतो, अनुभवत असतो. काहीतरी निमित्त होतं आणि तोच अनुभव आकस्मिकपणे एक सुबक, सुघड आकार घेऊन आपल्यासमोर उभा राहतो आणि आपण स्तिमित होतो. त्यासाठी अनुभव घेणं, त्याच्या सगळ्या अंगांनी तो आपल्यापर्यंत येऊ देणं आणि तटस्थपणे पण तरीही आपलेपणाने तो स्वीकारणं, त्याला आपल्या अंतरंगात सामावून घेणं हेच लेखकाचं काम आहे आणि हीच त्याची सृजनशीलता आहे. मग बाकी जे उरतं ती विद्या-कुशलता. ती शिकून कमावता येते पण दृष्टी आणि एम्पथी, ही शिकता येत नाही, ती मूळचीच अंगी असावी लागते. माझं पहिलं मोठं लिखाण ‘लाइफलाइन-२’ ही मालिका. त्याचं दिग्दर्शन मी करणार होते म्हणून मी भरपूर रिसर्च केला, खूप डॉक्टर्सना भेटले, त्यांचं काम जवळून बघितलं, त्यांचे विचार समजून घेतले. एक गलेलट्ठ फाइल तयार झाली त्या सगळ्याची. आता हे सगळं बाड कुणातरी लेखकाला द्यायचं, मग तो लिहिणार.. हे सगळं किचकट आहे असं वाटून मीच लिहायला बसले आणि खूप सहजपणे एपिसोड्स ‘फ्लो’ व्हायला लागले. एके ठिकाणी अचानक तो प्रवाह थांबला. थोडं तपशिलात सांगते. सचिन खेडेकर त्यात एक प्रखर सामाजिक जाणीव असलेला काíडआक सर्जन होता- तो एका गुंडाचा-गणेश यादव- जीव वाचवतो, मग त्याला धमक्या येतात, हॉस्पिटलचे डीन त्याच्या बाजूने उभे राहात नाहीत आणि पत्रकार सचिनच्या विरुद्ध लिहितात, तो राजीनामा द्यायचा ठरवतो- असा त्या व्यक्तिरेखेचा प्रवास होता. बाकी इतर पेशंट्सही होतेच. एका स्टेजला जाऊन माझ्या लक्षात आलं की ‘या व्यक्तिरेखेचा प्रवास फार निराशाजनक होतोय, त्याला या ट्रॅपमधून लवकर बाहेर काढायला हवं, नाहीतर तो पुढे कसा जाणार.’ इथे मी अडले आणि थांबले. बऱ्याच वेळानंतर आणि तगमगीनंतर माझ्या लक्षात आलं की तो एक आदर्शवादी डॉक्टर तर आहेच, पण त्याला आपल्या कामाचा अभिमान आहे, त्या कामावर त्याचं प्रेम आहे. समाजाची सेवा करायची या एकाच भावनेने त्याने पब्लिक हॉस्पिटलमध्ये काम करायचा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे या अशा गोष्टी त्याच्यासाठी दुय्यम आहेत. त्यासाठी मग एक युक्ती केली. त्याचीच एक पंधरा वर्षांची पेशंट असते, तिला त्याच्यामुळे एक नवीन आयुष्य मिळालेलं असतं, आणि ती डिस्चार्ज मिळून आपल्या गावाला निघून गेलेली असते. तिचं त्याला एक पत्र येतं, आधी एका १५ वर्षांच्या मुलीसारखं बरंच काही लिहून नंतर ती म्हणते- ‘मी निश्चय केलाय डॉक्टर, मी मोठेपणी तुमच्यासारखी डॉक्टर होणार! लोकांना मदत करणार!’ आपण राजीनामा देणार होतो ही गोष्ट पूर्णपणे विसरून खूप आनंदात तो ते पत्र त्याच्या बरोबरच्या डॉक्टरला नंदू माधवला दाखवतो. हे असं आणि काही वेळा झाल्यावर मी एक गोष्ट शिकले- काही सुचेनासं झालं, कुठेतरी अडायला झालं, याचा अर्थ दिशा बदलण्याची वेळ आलेली आहे. फेर हवा- जसं बिरबलाच्या गुरूंनी त्याला विचारलं- की तीन प्रश्नांचं एक उत्तर दे- घोडम अडम क्यों, पान सडम क्यों, रोटी जली क्यों- आणि त्याने उत्तर दिलं-‘गुरुजी, फेर नहीं!’ कथा, व्यक्तिरेखा दोन्हीला फेर हवा, वाढ हवी. मग याचा अर्थ आपण लिहितो, तरीही आपण लिहीत नाही असाच आहे. फेर हवा, ही त्या व्यक्तिरेखेचीच मागणी असते. एकदा ते लक्षात आल्यावर परत आपण स्वत:ला त्या पात्रांबरोबर झोकून द्यायचं असतं. त्यांच्याशी समरस होऊन त्यांचं बोट धरून चालायचं असतं. लिहायला बसेपर्यंत विचार चालू असतो, जो सतत, २४ तास चालूच असतो, त्याच्यापासून सुटकाच नसते. पण लिहायला बसलं की पेन, किंवा आता टाइप करणारी बोटं आपापलं काम करतात. माझ्या सगळ्यांत उत्तम सीन्सचे संवाद मी लाइटिंग चालूं असताना लिहिले आहेत. सीन त्या दिवशी करायचा ठरलं आहे, काय घडणार आहे, कुणामधे, सगळं ठरलं आहे, कलाकार मंडळी तयार होऊन बसलेयत, संवादांची वाट पाहतायत, सीनसाठी लाइटिंग चाललंय आणि मी कोपऱ्यात बसून संवाद लिहितेय.. ‘प्रपंच’ मालिकेचा शेवटचा सीन- जो कित्येकांची मनं हेलावून गेला. त्या मालिकेतलं प्रमुख पात्र होतं समुद्राकाठी असलेलं ते कौलारू घर- सीन असा होता- घरावर रोषणाई केलेली आहे, अंगणात एक ७५ वातींची पितळी समई लावलेली आहे. घरातली सगळी माणसं नटून-सजून घरासमोर उभी आहेत, जे घर उद्या पाडलं जाणार आहे, त्या घराशी अण्णा बोलतात, ‘वास्तुदेवते- या दगडविटांवर घाव पडणार आहेत, थोडा काळ दूर जा, परत नव्या दिमाखात, नव्या झोकात नवी वास्तु उभी राहील, तेव्हा सन्मानाने परत ये.. असं काहीतरी, मला नेमकं आठवत नाही. मालिकेचा शेवट या सीनने होणार आहे, हे मला पहिला भाग लिहिला तेव्हापासून माहीत होतं, तरीही सीन हातून लिहून होत नव्हता. हेच आणिक कित्येक सीनबाबतीत झालेलं आहे. मला त्याचाही उलगडा झाला, जे सीन्स भावनिकदृष्टय़ा माझ्याकडून खूप काही मागतात, डिमांड करतात, त्यांना मी घाबरते, शक्य तितकं टाळते. शेवटी नाइलाज झाला की मगच लिहायला घेते. कारण लिहिताना ती पात्रं अंगात संचारावी लागतात, त्यांचे सगळे भावनिक विभ्रम, कल्लोळ आपल्याला अनुभवावे लागतात, सोसावे लागतात. हे खूप सुंदर असलं तरी थकवणारं असतं. दूरचित्रवाणीसाठी लिहिताना जर तुमची व्यक्तिरेखा भक्कम असेल, त्याचा पाया खोल असेल, तुम्ही खूप काळ तिच्यात गुंतून तिला समजून घेतलं असेल तर ती व्यक्तिरेखा जिवंत होते. मग त्या व्यक्तिरेखेला कुठेही टाकलंत तरी ती स्वत:सारखीच वागते. ते खोदून काढण्यासाठी तुम्हाला स्वत:ला खूप त्रास करून घ्यावा लागला तरी जे समोर येतं ते अस्सलच असतं. ते बेतीव, हिशेबी म्हणजेच खोटं कधीच नसतं. ते करत असताना कधी कधी फार महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात, अनेक र्वष पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आकस्मिकपणे मिळून जातात. दुर्दैवाने मालिका ही तात्कालिक असते. न त्याचा मॅटिनी, न कुणाकडे त्याचा संग्रह. पण मला मिळालेली ही उत्तरं कायम माझा ठेवा राहतील. तरीही मला मालिकेचं लेखन आवडतं याचं कारण खूप फुरसतीत सगळ्या व्यक्तिरेखा शोधता येतात. कुणाच्या आयुष्यात काय घडलं हे मला फारसं महत्त्वाचं वाटत नाही, जे घडलं त्याच्यावर तो कसा रिअ‍ॅक्ट झाला, हे महत्त्वाचं. माणसाच्या आयुष्यात जेवढं नाटय़ घडतं, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्याच्या मनात घडतं असा माझा विश्वास आहे, आणि ते नाटय़ पकडण्यासाठी त्याच्या आयुष्यातले कितीतरी छोटे-मोठे क्षण, प्रसंग शोधावे लागतात, त्यासाठी कथेचा जो कालावधी लागतो, तो फक्त मालिकेतच मिळतो. नाटक किंवा सिनेमात नाही. कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न मी केला, पण त्यात ना मला माझा आवाज ऐकू आला, ना माझ्या वाचकाचा चेहरा दिसला. मग माझ्या लक्षात आलं की मी पात्रांच्या तोंडून, त्यांच्या आवाजात बोलू शकते, स्वत:चा आवाज मला नाही, असलाच तर शोधावा लागेल. शिवाय अर्ध पान लिहून होतंय न होतंय तोच कॅमऱ्यात हे कसं दिसेल, आता काय दिसेल असेच विचार मनात येतात. जे मला दिसतं ते दृश्य रूपात पकडून ते लोकांसमोर ठेवावं असं प्रकर्षांने वाटतं- मग मी कादंबरीचा नाद सोडून देते! कदाचित लेखकाच्या आधी मी दिग्दर्शक आहे हे त्याचं कारण असेल. हे लेख जरी मी लेखक म्हणून लिहीत असले तरी मी स्वत:ला लेखक मानत नाही. कारण वर्षांनुवर्षांचे संस्कार- माझं काहीच पुस्तक रूपात प्रसिद्ध झालेलं नाही! माझं दूरचित्रवाणीचं दिग्दर्शन बहुतांशी मी लिहिलेल्या संहितांचंच होतं. त्यामुळे त्यात मी नव्यानं काही फार केलं नाही. दूरचित्रवाणीच्या कामाची जी पद्धत असते त्यात मला हे फार सोयीचं होतं. तिथे ठराविक वेळात ठराविक काम करावंच लागतं. तुमचा जितका विचार आधी झालेला असेल, तितका सेटवरचा वेळ वाचेल. नाटक करताना मात्र एकेक व्यक्तिरेखा समजून घ्यायला, तिचा शोध घ्यायला भरपूर वेळ असतो. ते करतानाही दिग्दर्शकाची स्वत:ची जीवनदृष्टी, world-view फार महत्त्वाचा असतो. त्यावरून ठरतं तुम्ही त्या पात्रांकडे कसं बघता. मला नेहमीच असं वाटतं की माणसं स्वत:ला ओळखत नाहीत, त्याहीपेक्षा माणसाचं मन इतकं गुंतागुंतीचं असतं की त्याचं पूर्णपणे आकलन कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे मला अभिनयामध्ये फार ठामपणा असलेला आवडत नाही. अभिनयातसुद्धा शोध हवा. विजयाबाई नेहमी म्हणायच्या की स्टेटमेंट्समध्ये बोलू नका. ही एक गोष्ट मी कटाक्षाने पाळत आलेले आहे. स्वत:च्या भावनांबद्दल बोलण्यापेक्षा त्या भावना त्यांच्या उठण्या-बसण्यातून, वावरण्यातून दिसल्या पाहिजेत. दिग्दर्शकाने इतर घटकांमधून त्या व्यक्त होतील हे पाहिलं पाहिजे. पात्रांच्या हालचाली, त्यांचं एकमेकांबरोबर असलेलं दृश्य रूप- म्हणजेच कॉम्पोझिशन, प्रकाशयोजना, संगीत, प्रसंगाची लय- हे सगळं एकाच दिशेनं, एकाच प्रवाहात वाहिले पाहिजेत. अजूनही आपल्याकडे अनेक गोष्टी संवादांतूनच दाखवायची सवय आहे. आपल्याकडे नाटकाची जी दीर्घ परंपरा आहे, त्यातून ते होत असेल. पण संवादांच्या मधल्या जागांमध्ये ती पात्रं जे वागतात ते त्यांच्या बोलण्याला अनेकदा छेद देऊन जातं. प्रेक्षकही संवादांना जास्त दाद देतात. पण तरीही त्यांच्या मनावर त्या संपूर्ण दृश्याचा परिणाम होतच असतो. जेव्हा सगळ्या अंगांनी नाटक त्यांना घेरून टाकतं, तेव्हा ते त्यात तल्लीन होतात, पात्रांच्या सुखदु:खांशी समरस होतात. अशा प्रयोगाला ‘रंगलेला’ प्रयोग म्हणतात. ‘उंच माझा झोका गं’ या नाटकाचा प्रत्येक प्रयोग तसा होत असे. रसिका जोशी, स्मिता तळवलकर, अविनाश मसुरेकर असलेल्या या नाटकात एक मनस्वीपणा होता, पॅशन होती. एक कनिष्ठ मध्यमवर्गीय मुलगी-मनी- जिला खूप काही करण्याची इच्छा आहे, आपली ओळख बनवण्याची महत्त्वाकांक्षा आहे, पण काय करायचं ते तिला कळत नाही. तिला जे समजतं ते ती करते, घर सोडून निघून जाते, त्यात फसते, आणि त्याच्यातून मार्ग काढता काढता तिला तिचं स्वत्त्व सापडतं. कदाचित इतर कुणी दिग्दर्शकाने तिच्या घर सोडून जाण्याला महत्त्व दिलं असतं. एक बंडखोर नाटक असं लेबल त्याला लागलं असतं. मला त्यात रस नव्हता. तिचं पॅशन, मनस्वीपणा आणि त्याहीपेक्षा ते सगळं न कळणाऱ्या घरात जन्माला आल्याने तिची होणारी तगमग मला जास्त महत्त्वाची वाटली. त्यामुळे मी त्या गोष्टी जास्त हायलाइट केल्या. तिच्यावर आत्यंतिक रागावून तिला घरातून जा म्हणणाऱ्या साध्या, रांगडय़ा वडिलांच्या मनातलं प्रेम मला जास्त महत्त्वाचं वाटलं. कारण भावना अनेक पदरी असतात. आपण फक्त वरचा, दृश्य पदर पाहिला तर फसू शकतो. एक एक पापुद्रा उलगडत गेलो की असं काहीतरी समोर येतं की ज्याने आपण थक्क होतो. मला बरेच वेळा वाटतं की शास्त्रीय संगीताची जी एस्थेटिक्स आहेत ती सगळ्या इतर कलांना लागू होतात. प्रत्येक रागाचा एक आकृतिबंध असतो, त्यात काही स्वर वज्र्य असतात, वादी-संवादी असतात. त्याची एक बढत असते, लय असते. तसंच- हे नाटक नक्की काय आहे, त्यात वज्र्य काय आहे, हा विचार स्पष्ट हवा. हे जसं पूर्ण नाटकाला लागू होतं, तसंच प्रत्येक व्यक्तिरेखेलाही लागू होतं. प्रत्येक गोष्टीचा सूर बरोब्बर लागला पाहिजे. ‘सूर्याची पिल्ले’च्या एका प्रयोगात एक फार मजेशीर गोष्ट लक्षात आली. अपघातानेच. नाटकाचा पडदा उघडतो तेव्हा पुष्कर श्रोत्री आणि आनंद इंगळे स्टेजवर आहेत, आतिशा नाईक आत-बाहेर करतेय आणि समरगीताची रेकॉर्ड लागली आहे. आनंद येरझाऱ्या घालत आहे, पण पुष्कर नुसताच उभा आहे. एका प्रयोगात पुष्करला म्हटलं, ‘तू एन्ट्री घे.’ त्या दिवशी पहिला अंक अतिशय डल झाला, नेहमीचा सूर काही लागला नाही. बराच वेळ मला कळत नव्हतं असं का झालं- नंतर लक्षात आलं. पुष्कर जेव्हा स्टेजवर उभा असायचा तेव्हा त्या सीनला पडदा उघडायच्या आधीच सुरुवात झालेली असायची आणि पडदा उघडेपर्यंत त्याचा सूर एका टप्प्यापर्यंत येऊन पोचलेला असायचा. पुष्करच्या एन्ट्रीमुळे तो सीन पडदा उघडल्यानंतर सुरू झाला आणि ज्या सुराला तो सुरू होतो त्या सुरापर्यंत तो सीन पोचलाच नाही! अशा अनंत गोष्टी. रोजचा अनुभव नित्य-नूतन. लेखन असो वा दिग्दर्शन- आपलीच आपल्याशी ओळख करून देत असतो. हेच त्याचं रेझाँ-द-एत्र- अस्तित्वाचं कारण आहे, त्याची इतिकर्तव्यता आहे. अशा या कलेला, ते देणाऱ्या रंगभूमीला माझा नम्र प्रणाम!

‘चतुरंग मैफल’ मध्ये पुढील
शनिवारी (२१ सप्टेंबर)
प्रसिद्ध कलादिग्दर्शक
नितीन चंद्रकांत देसाई

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader