एकवेळ वजन कमी करणं सोपं, पण कमी केलेलं राखणं.. महाकर्मकठीण. डॉक्टर धुरंधरांच्या एका श्रीमंत स्त्री पेशंटनं पुढे ४७ र्वष कमी केलेलं वजन कायम राखून त्यांच्या तज्ज्ञतेवर यशाची मोहोरच उमटवली. स्थूलपणा वा लठ्ठपणाविरुद्ध लढाई लढणाऱ्या डॉक्टर धुरंधर कुटुंबाविषयी..
‘‘तुम्हाला कोणा व्यक्तीच्या लठ्ठपणावर सल्ला हवा असेल तर माझ्या वडिलांना (डॉ. विनोद धुरंधर) भेटा. तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढय़ांच्या लठ्ठपणाची काळजी असेल तर मी तुमच्याशी बोलतो. तुम्हाला तुमची जात-जमात, शहर-देश यांना लठ्ठपणापासून दूर ठेवण्याचं कार्य हाती घ्यायचं असेल तर माझी सून डॉ. एमिली तुम्हाला मदत करेल.’’ मी ऐकून चाटच पडले. चकाकत्या डोळय़ांनी मिस्कीलपणे डॉ. निखिल धुरंधर माझी प्रतिक्रिया न्याहाळत होते. भानावर आल्यावर माझ्या लक्षात आलं की, माझ्यासमोर उभा असलेला हा तरुण डॉक्टर केवळ ओबेसिटीविषयक कॉन्फरन्ससाठी अमेरिकेतून आला असला तरी स्थूलपणा-लठ्ठपणाविरुद्ध लढाई ही त्यांच्या घराण्यात चालत आलेली आहे. या तिघांनी मिळून पुढच्या अनेक पिढय़ांसाठी फार मोलाचं काम करून ठेवलं आहे. अजूनही करतच आहेत.
१९६२ चा काळ. तेव्हा बार्बी डॉल किंवा करीना कपूरसारखं झीरो फिगरचं फॅड नव्हतं, की लोक सतत वजन-वजनवाढ, आहार याविषयी बोलत नव्हते. त्या काळात वजन आटोक्यात ठेवण्यासाठी काही विशेष विचार आवश्यक आहे असं सांगत, पाल्र्याच्या डॉ. विनोद धुरंधर यांनी आपली प्रॅक्टिस याच विषयावर केंद्रित केली. तरुणपणीच त्यांना स्वत:च्या वाढलेल्या वजनाचा त्रास होत होता. ते वजन कमी करण्यासाठी त्यांनी घरातच आहारविषयक प्रयोग केले. चालणं वाढवलं आणि त्यातूनच एक यशस्वी फॉम्र्युला सिद्ध केला. या साऱ्यात त्यांच्या सुविद्य पत्नीचा- अनुराधाचा मोठाच वाटा होता. तेलासकट-तेलावाचून फक्त भाज्या, फक्त प्रोटिन्स, कबरेदकांवर बहिष्कार. एक ना अनेक. पण अनुराधाताईंच्या साऱ्या धडपडीला यश आलं. डॉ. विनोद धुरंधरांचं वजन कमी  झालंच, पण ते याच विषयातले तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध पावले. अनेक सेलिब्रिटीज त्यांच्याकडे नियमित येऊ लागल्या. त्या काळाविषयी डॉ. विनोद धुरंधर सांगतात, ‘‘भारतासारख्या विकसनशील, गरीब देशात लठ्ठपणा ही समस्या असूच शकत नाही असं लोकांचं मत असायचं. पण लठ्ठपणाशी लढणं हे केवळ फॅड नाही, ती गरज आहे. लठ्ठपणा एक रोग आहे आणि तो अनेक रोगांना आमंत्रण देतो, हे पटवून देणं हे खरंच अवघड होतं.’’
त्यासाठी सतत लिहीत राहणं, व्याख्यानं देणं, मुलाखती देणं हे व्रतच अंगीकारलं त्यांनी. एकवेळ वजन कमी करणं सोपं, पण केलेलं कमी राखणं.. महाकर्मकठीण. डॉक्टरसाहेबांच्या एका श्रीमंत स्त्री पेशंटनं पुढे ४७ र्वष कमी केलेलं वजन कायम राखून त्यांच्या तज्ज्ञतेवर यशाची मोहोरच उमटवली जणू!
डॉ. विनोद धुरंधरांचा नावलौकिक वाढत असतानाच १९८३ मध्ये डॉ. निखिल वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्या वडिलांसोबत काम करू लागले. घरात या वातावरणाचा, प्रयोगांचा आणि चर्चेचा संस्कार होताच. अल्पावधीत त्यांची प्रॅक्टिसही छान चालायला लागली. पण मन संतुष्ट नव्हतं. या विषयासाठी केवळ डॉक्टरकीचं ज्ञान पुरेसं नाही, असं म्हणत त्यांनी आहारशास्त्रात (न्यूट्रिशन) एम. एस. करायचं ठरवलं आणि आपल्याला हवे असलेले विषय देणारं विद्यापीठ निवडलं. ते होतं अमेरिकेतील फार्गो विद्यापीठ. वर्षांतून सहा महिने गोठवणारी थंडी. तीन वर्षांचा मुलगा अन् शिक्षणतज्ज्ञ म्हणून काम करणारी पत्नी अमृता यांना घेऊन अमेरिकेला पोहोचल्यावर या अडचणी ध्यानात आल्या. पण जेव्हा सारं कुटुंबच एखाद्या विषयाचा ध्यास घेतं, तेव्हा कोणतीच अडचण वाट अडवू शकत नाही. अमृतानं प्रसंगी कॉफी शॉपमध्ये नोकरी केली, तर कधी पतीची टायपिस्ट-असिस्टंट बनली. अवघ्या ११ महिन्यांत आपलं संशोधन पूर्ण करून पदवी घेऊन डॉ. निखिल भारतात परतले. घरची प्रॅक्टिस होतीच. त्यात नव्या ज्ञानाची भर पडली. व्याख्यानं, मुलाखती. यंग इन्व्हेस्टिगेटर अ‍ॅवॉर्ड.. यश म्हणजे दुसरं काय? पण काहीतरी खुपत होतं.
आहारनियमन, भरपूर व्यायाम, जीवनशैलीत बदल, वजन कमी करण्याची तीव्र प्रेरणा कायम ठेवणं असे सर्व मार्ग चोखाळले तरीही काही पेशंट्सचं वजन हलायला तयार नव्हतं. अशा वेळी पेशंटला दोष न देता डॉ. निखिलनं स्वत:मधला संशोधक जागा केला. काहीतरी वेगळं कारण आहे, जे आपल्याला सापडत नाहीये. अशा तळमळीत ओढ लागली ती उपचारपद्धतीत सुधारणा करण्याची किंवा वेगळं काही कारण तर नाही दडलं या अपयशामागे..ते शोधून काढण्याची. आणि अचानक ‘एक सफरचंद झाडावरून खाली पडलं’. त्याचं झालं असं- ख्यातनाम पशुरोगतज्ज्ञ डॉ. एस. एम. अजिंक्य यांनी कोंबडय़ांना होणाऱ्या साथीच्या रोगाचा विषाणू शोधला होता. तो त्यांच्याच नावानं, म्हणजे  SMAM-1 ओळखला जायचा. एका संध्याकाळी गप्पांच्या ओघात त्यांनी उल्लेख केला, की या विषाणूग्रस्त कोंबडय़ांच्या पोटातल्या अवयवांभोवती अतिरिक्त चरबी आढळते. युरेका- डॉ. निखिलच्या मनात आलं, की हा व्हायरस आपल्या यजमानाला लठ्ठ बनवतो की काय?
अन् सुरू झाला संशोधन प्रयोगांचा एक अथक प्रवास. माणसांना तर व्हायरस (विषाणू) टोचता येत नाही. पण काही लठ्ठ माणसांच्या रक्ततपासणीत SMAM-1ची प्रतिजैविकं सापडली. सोबत वजन अधिक आणि कोलेस्टेरोल ट्रायग्लिसरॉइड्सची पातळी कमी. म्हणजे ताळमेळ जमला. कधीतरी या व्हायरसची बाधा होऊनच ही मंडळी अतिलठ्ठ झाली तर. या प्रकाराला नाव दिलं गेलं इन्फेक्ट ओबिसिटी. पण ही फक्त संगती होती. सिद्धान्त नव्हता. संशोधनाच्या सोयीसाठी मग पुन्हा अमेरिका. तिथल्या संशोधनात आणखी एक शत्रू सापडला. अ‍ॅडिनोव्हायरस. AD36. या दोन्ही व्हायरसेसमुळे इन्फेक्ट ओबिसिटीच्या सिद्धान्तावर शिक्कामोर्तब झालं. ‘अमेरिकाज् बेस्ट अँड ब्राईटेस्ट ट्वेंटी माइंड्स’ या मालिकेत डॉ. निखिलचं नाव झळकलं. त्या वेळी अमेरिकेत डॉ. निखिल धुरंधर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव झाला. वडिलांनी सुरू केलेल्या लढाईतलं हे पुढचं महत्त्वाचं पाऊल होतं. त्या वेळी एका पेट्राटून टीव्ही चॅनेलवरून एका प्रेमळ आजीनं त्यांना म्हटलं, ‘‘माझा नातू दहा वर्षांचा आहे. वजन आहे १८४ पौंड. तो खूप पोहतो, सायकलिंग करतो, पण वजन कमी होत नाही. तू तर देवदूतच आहेस. तू आता त्याचं वजन कमी कर.’’
त्या वेळी डॉ. निखिलना फार असहाय्य वाटलं. कारण १९९२ मधलं संशोधन फक्त व्हायरस सापडला एवढंच होतं. त्यातून पुढे व्हॅक्सिन विकसित करणं हा फार लांबचा पल्ला होता. पण एका दडलेल्या शत्रूचं अस्तित्व तरी जगानं मान्य केलं. लठ्ठ माणसांच्या अगतिकतेचा फायदा घेणारी दुकानं एव्हाना चांगली चालू लागली होती. वैदूंपासून पॉश क्लिनिकपर्यंत आणि अंगाऱ्याधुपाऱ्यांपासून मसाज-वाफाऱ्यांपर्यंत. सारेजण या लठ्ठ माणसांना लुटत आलेत. ते थांबवायला हवं हाच ध्यास. धुरंधर कुटुंबाचा!
इकडे मुंबईत त्यासाठी डॉ. विनोद धुरंधर यांनी समविचारी लोकांना एकत्र करून ‘ऑल इंडिया असोसिएशन फॉर अ‍ॅडव्हान्स्ड रीसर्च इन ओबेसिटी’ या संस्थेची स्थापना केली. तिकडे अमेरिकेत या लढाईत आणखी एक संशोधक शिलेदार सामील झाला. डॉ. निखिल यांची सून डॉ. एमिली. तीही याच क्षेत्रात संशोधन करीत होती.
अमेरिकेतल्या लठ्ठपणाचं खापर सरसकट तिथल्या जीवनशैलीवर फोडलं जात असे. पण डॉ. एमिलीचं निरीक्षण असं, की एकाच घरात राहून तिचे वडील अगदी सडपातळ आणि आई डायबेटिक असून लठ्ठपणाची शिकार. तिचं लठ्ठपणाची १२ कारणं आणि त्यांची मीमांसा करणारं पुस्तक गाजलं ते याच निरीक्षणामुळे. तिला रस होता की हा लठ्ठपणाचा व्हायरस जर रक्तातली साखरेची पातळी, कोलेस्टेरोल आणि इतर द्रव्यं नियंत्रित करू शकत असेल तर याच संशोधनातून पुढे डायबेटिसला विरोध करता येईल. आज व्हायरसमधला तो जीन वेगळा करण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. उद्या औषध बनवण्यातही येईल, नाही का?
डॉ. एमिली सध्या बर्मिगहॅम (अलाबामा) येथे राहून लठ्ठपणा-आनुवंशिकता, प्रादेशिकता, परिसर, पर्यावरण, विशिष्ट जाती-जमातीचं वैशिष्टय़ या साऱ्यांवर एका विशाल दृष्टिकोनातून काम करीत आहे. तिचे सासरे तिचे थेट गाईड नाहीत, पण मार्गदर्शक आहेतच. डॉ. विनोद यांचं या लढय़ाचं रूप किती विस्तारत गेलंय. अनुराधाताईंनी एक गंमत सांगितली. डॉ. विनोदना संशोधक व्हायचं होतं. ते झाले डॉक्टर. डॉ. निखिलला लेखक, नाटककार व्हायचं होतं ते झाले संशोधक. अन् त्यांचा मुलगा रोहन झालाय लेखक, स्क्रीन प्ले रायटर. सून मात्र लठ्ठपणाच्या क्षेत्रातच डॉक्टरेट मिळवून तळमळीनं काम करतेय. एक वर्तुळ असं पूर्ण झालंय.
बॅटन रुज (लुईझाना) इथं राहून डॉ. निखिल अमेरिकेतील संशोधन केंद्रांमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहेत. अनेक विद्यापीठांमध्ये ते शिकवत आहेत. अमेरिकन ओबेसिटी सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत. आज जगात लठ्ठपणाला कारणीभूत ठरणारे १२ व्हायरस शोधले गेलेत. डॉ. निखिलच्या संशोधनाचं फलित काय? ते केव्हा आपल्यापर्यंत पोहोचणार? कारण संशोधनाचं क्षेत्र म्हणजे चकवे-भूल घालणारं. कुठून निघालात, कुठे पोहोचलात, हे नेमकं सांगणं अवघड. हां, एवढं मात्र नक्की की असं व्हॅक्सिन आता दृष्टिपथात आहे. व्हायरसच्या प्रोटीनमधून अँटिडायबेटिक जीनसुद्धा वेगळा काढला आहे. पुढच्या चार-पाच वर्षांत हे व्हॅक्सिन साऱ्या लठ्ठ माणसांपर्यंत पोहोचू दे. धुरंधरांच्या या लढाईचं यश साऱ्या मानवजातीला मानवू दे. साऱ्यांना निरामय आरोग्य आणि आनंदी हलकेपणा लाभू दे, अशाच शुभेच्छा आपणच आपल्याला देऊन ही तीन पिढय़ांची कहाणी सुफळ संपूर्ण करू या!
५ं२ंल्ल३्र५ं१३ं‘@ॠें्र’.ूे

Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Arjun Bijlanis Wife Neha Swami make 14 kg Weight Loss
Arjun Bijlani’s Wife : पत्नी नेहा स्वामीने १४ किलो वजन कसे कमी केले? अर्जुन बिजलानीने सांगितले सीक्रेट; म्हणाला, “तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करत असाल…”
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
vidya balan reveals her weight loss struggle in one interview
विद्या बालनने कसं घटवलं वजन? अनुभव सांगत म्हणाली, “मी जितका व्यायाम केला तितकी जास्त जाड…”
Marathi actress Aishwarya Narkar fan asks her weight
“तुमचं वजन किती?” विचारणाऱ्या चाहत्याला ऐश्वर्या नारकरांनी दिलं भन्नाट उत्तर, म्हणाल्या…
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…