ch22आयुष्याच्या वाटेवर अनेक चांगली माणसे भेटली. माझा खरा खजिना म्हणजे माझे मित्र. तिच माझी सर्वात मोठी संपत्ती. खरी माणसे, खोटी माणसे, साहित्यिक, नाटय़क्षेत्रातील तसेच राजकीय क्षेत्रातील एकापेक्षा एक अशा दिग्गजांशी संबध आले. मी मित्रांमध्ये..मैफलीत रमणारा माणूस..नाटकाच्या वेडापायी रात्र रात्र जागवल्या आहेत. पाच दशकांचा केईएम नावाच्या मंदिरातून उभा राहिलेला हा जीवनपट कितीही उलगडला तरी कमी ठरावा..अगदी द्रौपदीच्या अक्षय थाळीसारखा..कधीच न संपणारा!

एखाद्याच्या जीवनाला वेगळे वळण लावायचे नियतीने ठरवले असेल तर त्याची कारणमीमांसा आपल्याला कोणत्याच शास्त्राच्या आधारे करता येत नाही. माझ्या जीवनात आलेली वळणे कधी गरजेतून तर कधी नाइलाजाने आलेली आहेत. वयाच्या पंधरा वर्षांपर्यत अशी अनेक वळणे येऊन गेली. त्यानंतर मात्र आयुष्याची वाटचाल करताना विचारपूर्वक केली. यात सामाजिक बांधिलकी, रुग्णसेवा आणि संशोधन यालाच केवळ प्राधान्य दिले. लौकिकार्थाने व्यावहारिक यश म्हणजे पैशाच्या व प्रसिद्धीच्या मागे धावणे कटाक्षाने टाळले. आज मागे वळून पाहताना वर्तमानातील स्थिर व सुरक्षित बांधिलकीलाच महत्त्व देणाऱ्या समाजाला काय वाटत असेल असा विचार सहजच मनात येऊन जातो.
खरे तर मला सैन्यात जायचे होते, परंतु काही कारणामुळे सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊनही मला जाता आले नाही. आई-वडील दोघेही डॉक्टर. त्यांचा समृद्ध वारसा, मावशीचे यजमान बापूराव लेले आणि अण्णा रेड्डींसारख्या गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वांमुळे आयुष्याची दिशा गवसली. जीवन जगण्यामागची प्रेरणा सापडली. विचार चांगले असले की आचारही चांगला घडतो. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला तेव्हाच रुग्णसेवेचे व्रत स्वीकारले होते. आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी उपचार करायचे ठरवले. कोणत्याही परिस्थितीत खासगी प्रॅक्टिस करायची नाही असा निश्चय केला होता. तो पार पाडू शकलो याचे एक आगळेच ch21समाधान आहे. गेली ५४ वर्षे वैद्यकीय व्यवसायात आहे. या काळात मला जे काही जाणवले, समजले ते म्हणजे ‘जीवनात कर्म हे महत्त्वाचे असतेच पण त्याला नियतीची साथही हवी.’ नियतीनेही मला भरभरून दिले. माझ्या ७३ वर्षांच्या वाटचालीत वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य माणसे मला भेटली. खरी माणसे, खोटी माणसे, गुन्हेगार, साहित्यिक, नाटय़ क्षेत्रातील तसेच राजकीय क्षेत्रातील एकापेक्षा एक अशा दिग्गजांशी संबध आले. यातील अनेकांबरोबर ऋणानुबंधाच्या गाठी जुळल्या. यात संगीतकार सी. रामचंद्र, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, सोपानदेव चौधरी, कवी सुरेश भट, काशिनाथ घाणेकर, दादा कोंडके किती म्हणून नावं सांगू.. श्रीकांत सिनकरसारखी वल्लीही केईएममध्येच भेटली. राजकारण्यांचे व माझे सूरही असेच जुळले. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, कॉम्रेड डांगे यांच्यापासून ते लालबाग-परळमधील वामनराव महाडिक यांच्यापासून मोहन रावलेपर्यंत अनेकांशी संबंध आले आणि आयुष्यभर टिकले. खरे तर मी मित्रांमध्ये.. मैफलीत रमणारा माणूस.. नाटकाच्या वेडापायी रात्र रात्र जागवल्या आहेत. पाच दशकांचा केईएम नावाच्या मंदिरातून उभा राहिलेला हा जीवनपट कितीही उलगडला तरी कमी ठरावा.. अगदी द्रौपदीच्या अक्षय थाळीसारखा.. कधीच न संपणारा!
जन्म पुण्याचा असला तरी मी तसा मध्य प्रांतातला. वडील सिव्हिल सर्जन त्यामुळे अकरावीपर्यंत वेगवेगळ्या शहरांमधून सात शाळांमधून मराठी व हिंदीत शिक्षण घ्यावे लागले. लहानपणी मध्य प्रांतात बालेघाटला असताना तेथे मराठी शाळा नव्हती. परंतु शिक्षण मराठीतूनच झाले पाहिजे हा आई-वडिलांचा आग्रह असल्यामुळे मराठी शिक्षक नेमून शिकविण्यात आले. पाथ्रीकर नावाचे शिक्षक बोरूने अक्षरे घोटवून घ्यायचे. त्यामुळेच लहानपणापासून माझे अक्षर सुंदर झाले. पुढे शिक्षणासाठी पुण्याला आजोबांकडे आलो. आजोबा मोठे कडक शिस्तीचे. भल्या पहाटे ‘राम प्रहरी’ उठवून अभ्यास करावा लागे आणि सायंकाळी दिवेलागणीच्यावेळी परवचा म्हणावीच लागे. रामरक्षा, गीतेचा बारावा व पंधरावा अध्याय म्हणावाच लागे. आजोबा केवळ गीता म्हणायला सांगत नसत तर श्लोकांचे अर्थही समजावून देत.
आयुष्याच्या वाटेवर अनेक चांगली माणसे भेटली. माझा खरा खजिना म्हणजे माझे मित्र. तीच माझी सर्वात मोठी संपत्ती. वडिलांच्या सततच्या बदल्या लक्षात घेऊन माझी मावशी तारामती व तिचे यजमान उपेंद्रकृष्ण पटवर्धन यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. आई-वडिलांपासून सहाशे मैल दूर मुंबईत यावे लागले. जीवनात एक नवा संघर्ष निर्माण झाला. या काळात डॉ. आर. ए. कुळकर्णी सरांसारखी प्रेमळ माणसे भेटली. रुईयामधून प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्यामुळे परळच्या सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व केईएम रुग्णालयात १९५९ साली ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळाला. तेव्हापासून आजपर्यंत या मंदिरातच अखंड वास करून आहे. पन्नास वर्षांहून अधिक काळ मी या संस्थेशी इतका एकरूप झालो आहे की ‘केईएम’ नावाचे मंदिर माझ्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग बनून गेले आहे. माझा एक मित्र तर म्हणतो, ‘रवीचे रक्त कधीही तपासा त्याच्या धमन्यांमधून फक्त ‘केईएम’ वाहात असतं!’ एमबीबीएसला असताना एक दिवस शल्यकौशल्यात निपुण असलेल्या डॉ. सी. एस. व्होरा यांच्याकडे गेलो. मी त्यांना विचारले, ‘मी काय करू’. उत्तर आले ‘गेट युवर एमएस’. पण सर, सर्वजण म्हणतात ‘एफआरसीएस’ केले पाहिजे. त्यावर सर म्हणाले, ‘भेंडीबाजारात शंभर दाढय़ा करणारा हजाम हा ताजमहालमध्ये सहा दाढय़ा करणाऱ्या हजामापेक्षा चांगला की वाईट?’ त्यांनी समजावून सांगितले की, पाश्चात्त्यांपेक्षा आपल्याकडचे सर्जन अधिक चांगले आहेत. सर्जन म्हणजे ज्याने शस्त्रक्रिया करण्याचा जास्तीत जास्त अनुभव घेतला आहे तो.. त्यामुळे आधी ‘एमएस’ कर. डॉ. व्होरा सरांची आज्ञा प्रमाण मानून भारतातच राहिलो. याच काळात डॉ. वसंत शेठ यांच्या हाताखाली शस्त्रक्रिया शिकलो. हा माणूस प्रयोगशील पण शिवराळ.. त्यांच्या हाताखाली काम करणे म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे होते. माझे भवितव्य शल्यचिकित्सक म्हणून नुसते त्यांनी घडवले नाही तर माझ्या पुढच्या आयुष्याला वैचारिक दिशा दिली. अन्ननलिका, यकृत, पित्ताशय, पित्तनलिका, स्वादुपिंड आणि मोठे आतडे या शस्त्रक्रियांमध्ये मी केलेल्या प्रगतीचे मूळ हे डॉ. वसंत शेठ यांच्या हाताखाली केलेले काम आहे. यातून पुढे जठरांत्र शल्यचिकित्सेत प्रावीण्य मिळविण्याचे मी ठरवले. पुढे १९७५ साली कॉमनवेल्थ फेलोशिप मिळाली व ग्लसगोला ‘रॉयल अनफरमरी’मध्ये डॉ. लेस्ली ब्लूमगार्ट यांच्याकडे जठरांत्र शल्यचिकित्साचे उच्चशिक्षण घेतले. त्यांची शिकवण, सहवास व स्नेह यामुळे माझ्या जीवनाला एक वेगळीच दिशा मिळाली. संशोधनात्मक दृष्टिकोन मी त्यांच्याकडून शिकलो. तेथून परत आल्यानंतर केईएममध्ये प्रचंड काम करू शकलो.
स्वतंत्र जठरांत्र विभाग असावा हे माझे स्वप्न पुढे २८ वर्षांनी साकारले. माझ्या पन्नास वर्षांच्या केईएममधील अध्यापनात अनेक दिग्गज घडले किंवा त्यांना शिकविण्याचे भाग्य मला लाभले. यामध्ये डॉ. सुलतान प्रधान, डॉ. शरदिनी डहाणुकर, डॉ. निवृत्ती पाटील, डॉ. राजन बडवे, डॉ. अविनाश सुपे, डॉ. शशांक शिंदे, डॉ. वसंत पवार तसेच डॉ. नीतू मांडके अशी किती तरी उदाहरणे देता येतील. गमतीचा भाग म्हणजे आज केईएम, शीव आणि नायर तसेच टाटा कॅन्सर रुग्णालय अशा मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या रुग्णालयाचे अधिष्ठाते व संचालक हे माझे विद्यार्थी आहेत. अनेकदा मला विचारले जाते की तुम्ही केईएमचे डिन का बनला नाहीत. उत्तर सोपे आहे, मी शस्त्रक्रियेत व अध्यापनात रमणारा माणूस आहे. डॉ. शरदिनी डहाणूकर या माझ्या विद्यार्थी होत्या, पुढे सहकारी बनल्या व नंतर आयुर्वेद संशोधनात मी त्यांचा साहाय्यक बनलो. आयुर्वेद संशोधन हा माझ्या अत्यंत आवडीचा विषय. आपल्या पूर्वजांनी या क्षेत्रात खूप काही करून ठेवले आहे. त्याचा अभ्यास डॉ. शरदिनी व मी केला. पाश्चात्त्य शिक्षण घेऊनही आम्ही दोघांनी अ‍ॅलोपथी महाविद्यालयात आयुर्वेद संशोधन केंद्र सुरू केले. देशाच्या इतिहासात असे प्रथमच घडले. आयुर्वेद संशोधनाकडे मी जास्त लक्ष देऊ लागल्यामुळे सहकाऱ्यांमध्ये काही काळ चेष्टेचा विषयही बनलो. परंतु पुढे आमच्या संशोधनाचे सर्वानीच कौतुक केले. कुठलेही शास्त्र हे समाजाला व समाजहिताला पूरक नसेल तर ते टिकूच शकत नाही. काळाच्या कसोटीवर उतरत आयुर्वेद गेली दोन हजार वर्षे लोकमान्य होता व आजही आहे. आता तर पाश्चिमात्य देशांमध्येही आयुर्वेदावर तसेच त्यातील वनस्पतींवर मोठय़ा प्रमाणात संशोधन सुरू आहे.
माझ्या या प्रवासात अनेक पुरस्कार मिळाले. अनेक सामाजिक संस्थांनी गौरव केला. निवृत्तीनंतर ‘हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळा’चा अध्यक्ष, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसेच महात्मा गांधी मिशन आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून काम पाहिले. ‘हाफकीन’मध्ये असताना आपल्या व्हॅक्सिनना जागतिक मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न केले. सनदी अधिकारी मेधा गाडगीळ यांनी साथ दिल्यामुळे पोलिओ व्हॅक्सिनला अमेरिकचे अ‍ॅक्रिडेशन मिळाले. यातूनच ‘हाफकीन’चा व्यवसायही वाढला. आरोग्य विद्यापीठाचा कुलगुरूम्हणून बारकोडिंगसह अनेक सुधारणा केल्या. खासगी वैद्यकीय दुकानदारीला चाप लावून खऱ्या अर्थाने वैद्यकीय शिक्षण मिळावे यासाठी आग्रह धरला व पाठपुरावाही केला.
वयाच्या सत्तराव्या वर्षी या सगळ्यातून बाहेर पडायचे मी ठरवले व त्याप्रमाणे केले. मात्र केईएमची नाळ कधीही सोडू शकणार नाही. आजही मी केईएममध्ये जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात सन्माननीय प्राध्यापक (इमेरिटस) म्हणून ‘एमएस’च्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करत आहे.
महाविद्यालयीन जीवनात मार्डचा संप केला. विद्यार्थ्यांना विद्यावेतन वाढवून दिले. त्यानंतर अध्यापनाच्या काळात अनेक थोरामोठय़ांच्या ओळखी झाल्या. मार्क्‍सवादाचा अभ्यास जसा केला तसा नाटकातही रमलो. खरे सांगू आज जर देशात कोणी सामाजिक बांधीलकी मानून काम करत असतील तर ते म्हणजे कम्युनिस्ट आणि आरएसएसचे लोक. घरादाराचा विचार न करता प्रामणिकपणे संघटना सांगेल त्या कामात झोकून देणारे लोक मिळवणे हे मोठे आव्हान आहे. परंतु ‘आरएसएस’ ते आजही यशस्वीपणे पेलताना दिसते.
बाळासाहेब ठाकरे हेही अफलातून व्यक्तिमत्त्व. शिवसनेचे मोहन रावले यांना अपघात झाला. केईएममध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली तेव्हा बाळासाहेब मोहनला पाहायला येणार होते. त्यांनी मला फोन केला तेव्हा मी म्हटले, तुम्ही आला नाहीत तर जास्त बरे.. तुमच्याबरोबर ताफा येणार यातून आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांना जंतुसंसर्ग होऊ शकतो तेव्हा कधी यायचे ते कळवीन. बाळासाहेबांनी शब्दाचा मान ठेवला. कोणताही गाजावाजा न करता त्यांनी अनेकांना मदत केलेली मी पाहिली आहे. दुसरे आमचे शरदराव. मला आठवते १९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाले. केईएममध्ये जखमी आणि मृतांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड गर्दी.. हृदय पिळवटून टाकणारा नातेवाईकांचा आक्रोश.. तशातच मुख्यमंत्री शरद पवार रुग्णांना भेटण्यासाठी येत असल्याचा निरोप अधिष्ठात्री डॉ. प्रज्ञा पै यांना मिळाला. त्यांनी मला बोलावून घेतले. मुख्यमंत्र्यांच्या येण्याने उपचारावर परिणाम झाला असता हे लक्षात घेऊन मी शरद पवार यांना न येण्याची विनंती केली तसेच नातेवाईकांना मृतदेह ताबडतोब मिळण्याकरता पोस्टमार्टेमसाठी पोलीस व अधिकारी नियुक्त करण्याची विनंती केली. विनंतीला मान देऊन ते स्वत: आले नाहीत तसेच तात्काळ पंचनाम्यासाठी पोलिसांची व्यवस्था करून मृतदेह नातेवाईकांना लगेचच मिळतील याची काळजी घेतली. पवारसाहेबांचे मोठे मन यातून दिसले. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. माझ्या अनुभवांचा खजिना मी मित्रांच्या मैफलीत मांडत असे. अनेकदा पुस्तक लिहिण्याचा आग्रह मित्रांकडून झाला. यातूनच ‘वॉर्ड नंबर पाच, केईएम’, ‘स्वास्थ्यवेध’ आणि ‘पोस्टमार्टेम’ ही पुस्तके आकारास आली.
गेल्या पन्नास वर्षांत वैद्यकीय शिक्षण आणि उपचारामध्येही मोठे अंतर निर्माण झाले आहे. काही चांगले तर काही वाईट.. वैद्यकीय शिक्षणाच्या खासगीकरणातून शिक्षणाचा बाजार निर्माण झाला. एकीकडे शिकवायला डॉक्टर नाहीत तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना रुग्ण पाहायला मिळत नाहीत असे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील चित्र आहे. आज वैद्यकीय व्यवसाय व शिक्षण ज्या दिशेने चालले आहे त्याचे वर्णन शास्त्रीय प्रगती आणि शैक्षणिक व व्यावसायिक अधोगती असेच करावे लागेल. किती रुग्णांवर उपचार केले यापेक्षा डॉक्टर जेव्हा मला किती फी मिळणार याचा अंदाज घेतात तेव्हा चिंता वाटते. वैद्यकीय शिक्षण हे ‘अत्यवस्थ’ बनले आहे. चांगले शिक्षक मिळणे कठीण बनले आहे. अनेक खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पन्नास टक्केअध्यापक नसल्याचे कुलगुरू असताना दिसून आले होते. केवळ पंधरा ते वीस टक्के खासगी महाविद्यालये चांगली आहेत. बाकी आनंदच.. सार्वजनिक रुग्णालयांची वाटचालही अशीच अधोगतीकडे चालली आहे. ही रुग्णालये वाढली पाहिजे. त्यासाठी लोकचळवळ उभी राहण्याची गरज आहे. गोरगरिबांना मोठय़ा रुग्णालयात उपचार घेणे अशक्य आहे. अशा वेळी महापालिका व शासकीय रुग्णालये तसेच त्यांच्या वैद्यकीय शिक्षण संस्था भक्कम होण्याची गरज आहे. दुर्दैवाने मंत्रालय व पालिकेतील हस्तीदंती मनोऱ्यात बसलेले ‘बाबू’ लोक वैद्यकीय महाविद्यालये चालविणे हे पालिकेची कर्तव्य नसल्याचे मानतात.
आरोग्य व्यवस्थेवर अर्थसंकल्पातील दोन टक्केही रक्कम खर्च होत नाही हे दुर्दैव आहे. मुंबईसारख्या शहरात जेथे साठ लाख लोक झोपडपट्टीमध्ये राहतात तेथे महापालिका व शासनाने आरोग्य यंत्रणा अत्यंत बळकट करणे गरजेचे आहे. खासगी व्यवस्थेतही कट प्रॅक्टिस बोकाळली आहे. महागडी औषधे व अनावश्यक चाचण्या लिहून देताना डॉक्टरांचे हात थरथरत नाहीत.. वैद्यकीय सेवेचा आज व्यवसाय न राहता आता केवळ धंदा बनला आहे. हे चित्र बदलण्याची राजकीय इच्छाशक्ती आज कोणाकडे दिसत नाही. जेनेरिक औषधांचा वापर मोठय़ा प्रमाणात झाला पाहिजे, परंतु मग डॉक्टरांचे सहकुटुंब परदेश प्रवास कसे होणार? लक्ष्मी दर्शनाचा हव्यास कसा पूर्ण होणार? उपचारापेक्षा डॉक्टर फी किती घेतो यावर मोठेपणा मिरवला जाताना दिसतो. आता तर वैद्यकीय व्यवसायात जाहिरातबाजी घुसली आहे. अनेक रुग्णालये व डॉक्टर स्वत:च्या प्रसिद्धीसाठी पीआर एजन्सी नेमताना दिसतात. ‘धंदा’ खेचण्यासाठी साम-दाम-दंड सारे प्रकार अवलंबिले जातात. या साऱ्यात शासकीय व महापालिका या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची घुसमट होत आहे. हे सारे बदलले पाहिजे. डॉक्टर व शिक्षक यांच्याकडे समाजाच्या अपेक्षा आहेत. अजूनही डॉक्टरांना लोक देव मानतात. दुर्दैवाने शिक्षण व वैद्यकीय सेवेचे बाजारीकरण वाढत आहे. याला वेळीच पायबंद घालण्याची गरज जशी आहे तशीच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट क रणे आवश्यक असून राजकारणी जर हे काम करणार नसतील तर लोकांनीच यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
डॉ. रवी बापट
शब्दांकन- संदीप आचार्य