अपघातातील, दंगलीतील किंवा गुन्ह्य़ातील अनेक मृतदेह ओळख न पटल्याने किंवा अन्य कारणाने बेवारस राहतात. त्यांच्यावर त्यांच्या त्यांच्या धार्मिक इतमामाने अंत्यसंस्कार करणं हे पुण्यकर्म मानणाऱ्या ज्योती घिया यांनी आज वयाच्या पंचाहत्तरीतही हे काम चालू ठेवलं आहे. त्यांच्या विषयी..
माझ्या आयुष्याची ७५ वर्षे पूर्ण झाली. पण मला अजूनही मी स्वीकारलेल्या कामाचा कंटाळा नाही की थकवा नाही. उलट मी समाधानीच आहे. आजही विविध ठिकाणांहून आमच्याकडे येणाऱ्या बेवारशी मृतदेहांवर मी अंत्यसंस्कार करते, मला हे पुण्यकर्मच वाटते.
५२ वर्षांपूर्वी माझं लग्न झालं. तेव्हा माझे सासरे त्रिकमजी जीवराज घिया (त्यांना ‘घिया मास्तर’ म्हणत) हे सामाजिक क्षेत्रात काम करणारे आहेत, एवढंच माहीत होतं. मुंबईच्या मुळजी जेठा मार्केटमध्ये त्यांचं कापडाचं दुकान होतं, व्यवसाय छान चालत होता, पण मळलेल्या वाटांवरून चालण्यापेक्षा अनवट वाटा शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवलियांपैकी माझे सासरे एक होते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून मी आणि माझे पती नरेंद्र घिया वाटचाल करीत आलो.
व्यापारी आणि त्यातून गुजराती, म्हणजे पैशांच्या मागे धावणारा, या सर्वमान्य समजाला माझ्या सासऱ्यांनी छेद दिला. ब्रिटिश राजवटीच्या काळात त्यांच्या कार्याची सुरुवात झाली. त्यावेळी मुंबईत धार्मिक दंगली उसळल्या होत्या. रस्त्यारस्त्यांवर, गल्लीबोळात मृतदेह पडलेले होते. अधेमधे कुठे जखमी माणसं विव्हळत पडली होती. त्यांना मदत करावी अशी भावना मनात असणारे काहीजण होते, पण भीती होती; याच वेळी घिया मास्तर धैर्याने, निर्भयपणे पुढे झाले. जखमींना औषधोपचार आणि प्रेतांची व्यवस्था करणं आवश्यक होतं. सरकारी यंत्रणा तरी किती करणार या विचारातून घिया मास्तरांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन दंगलपीडितांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पोचविले नि त्याचबरोबर मृतदेहांवर (अर्थातच सरकारी परवानगीने) अंत्यसंस्कार केले. तेव्हापासून बेवारशी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे हे त्यांचं कार्यक्षेत्र बनलं.
या घटनेतून त्यांच्या पुढील कार्याची दिशा ठरली आणि मग १९२६ साली ‘हिंदू रिलीफ कमिटी’ या संस्थेची स्थापना झाली. (स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणून हिंदू) या संस्थेच्या नावात जरी ‘हिंदू’ हा शब्द असला तरी या संस्थेमार्फत सर्वच जातीधर्माच्या बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात.
नैसर्गिक आपत्ती किंवा अपघात यातील जखमींना वैद्यकीय मदत आणि बेवारस (Unclaimed bodies) प्रेतांवर अंत्यसंस्कार हे प्रमुख उद्देश या संस्थेने ठेवले होते. असं असलं तरी गरीब रुग्णांना खाणे, औषधे पुरविणे व इतरही मदत आवर्जून केली जाते. या कामातील एक महत्त्वाचा कायदा Antomy Act rzuz १९४९ साली तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी त्या कायद्याचा मसुदा स्वत: लिहून पास करून घेतला. असा कायदा व्हावा यासाठी घिया मास्तर १९३४ पासून प्रयत्नशील होते. १९५१ मध्ये मुंबई महापालिकेने बेवारशी प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी ‘हिंदू रिलीफ कमिटी’ला दिले.
एखाद्या दुर्घटनेत जेव्हा काही जणांचा मृत्यू होतो, तेव्हा पंचनामा करून असे मृतदेह शवागारात ठेवले जातात. काही माहिती मिळाली तर पोलिसांकडून मृतांच्या नातेवाईकांना कळविले जाते. परंतु बऱ्याचशा प्रेतांचा स्वीकार केला जात नाही. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कॉरोनर कोर्टाकडून संबंधित पोलीस ठाण्याला अशा न स्वीकारलेल्या प्रेतांची विल्हेवाट लावण्याचा आदेश दिला जातो. मग अशा प्रेतांचे अंत्यसंस्कार (दहन किंवा दफन ) ‘हिंदू रिलीफ कमिटी’ करते.
आमच्या संस्थेच्या इतिहासातील (मी येण्यापूर्वी व आल्यानंतर) काही महत्त्वपूर्ण घटना सांगता येतील. १९४४ साली मुंबई गोदीत खूप मोठा स्फोट झाला. त्यात अनेक माणसे मृत्युमुखी पडली. जवळपास ४०० प्रेते ओळखण्यापलीकडची होती. या सर्व प्रेतांवर ‘कमिटी’ने अंत्यसंस्कार केले. त्यानंतर १९४८ साली मुंबई बंदरात रामदास बोट बुडाली, त्या दुर्घटनेतील न ओळखता येणाऱ्या सर्व मृतदेहांवरील अंत्यविधी ‘कमिटी’नेच केले. १९५६ सालच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील काही अनाम हुतात्म्यांवर अंत्यसंस्कार केले. १९७४ साली मुंबईतील मुसळधार पावसामुळे झालेली जीवितहानी १९६६ आणि १९७५ साली झालेल्या रेल्वे अपघातांमधील अनोळखी मृतदेहांवर कमिटीनेच अंत्यविधी केले.
१९७६ साली मुंबई विमानतळावर झालेल्या विमान अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कार करताना कमिटीने विमानतळावरील सरकारी यंत्रणेला केलेल्या जीवतोड मदतीची समाजातील प्रत्येक घटकाने प्रशंसा केली. पण या संस्थेचा याहून अधिक महत्त्वपूर्ण सहभाग अधोरेखित झाला १९७९ साली; ज्या वेळेस आणखीन एक विमान पनवेलजवळील डोंगरावर कोसळले. सर्वच प्रवासी मरण पावले. डोंगर, जंगलाचा प्रदेश, रात्रीची वेळ अशा कठीण परिस्थितीतून तिथून मृतदेह खाली आणणं अवघड होतं. एअरपोर्ट अधिकारी जेमतेम चार मृतदेह खाली आणू शकले. माझे पती नरेंद्र यांनी जवळपासच्या गावकऱ्यांना बोलावले, त्या प्रदेशाची माहिती घेतली, जंगलातील लाकूडतोडय़ांच्या मदतीने डोली बनवून ३८ मृतदेह त्यांच्या सामानासह खाली आणले. पुढे हे मृतदेह लाकडी पेटय़ांतून आणि गुरं वाहून नेणाऱ्या लॉऱ्यांमधून जे. जे.मधल्या कॉरोनर कोर्टापर्यंत आणले. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्या सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंगावर काटे आणताना आणखीन एक प्रसंग सांगते. काही वर्षांपूर्वी मुंबईजवळील समुद्रात एअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. त्यातील सर्व प्रवासी दगावले. त्यापैकी १०३ प्रेते
ससून डॉकपर्यंत वाहत आली. सर्व मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होती. काही प्रेतांवर तर ६/६, ८/८ इंच लांबीच्या अळ्या वळवळत होत्या. दरुगधी येत होती. जवळ जाणं
तर खूप कठीण वाटत होतं.मृतदेह अक्षरश: सडलेल्या अवस्थेत होते. पण अशा परिस्थितीतही मी आणि माझे सहकारी यांनी ती सर्व प्रेते समुद्राबाहेर काढली. यातला एकही देह ओळखता येण्यासारखा नव्हता. म्हणून अंत्यसंस्कारांच्या वेळेस हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम आदी पाच धर्माच्या धर्मगुरूंना बोलावून सर्व धर्माच्या प्रार्थना, धार्मिक विधी झाल्यावर सामूहिक दहन करण्यात आले.
अगदी अशाच प्रकारची कामगिरी गुजरातमधील मोरवी धरण फुटले तेव्हा केली. आम्ही जेव्हा तेथे पोहोचलो तेव्हा तेथे केवळ विटामातींचा ढिगारा होता, चिखल होता. त्या ढिगाऱ्याखालून जवळपास ५०० प्रेते बाहेर काढली आणि सामूहिक अंत्यविधी केला.
अपघात किंवा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करावे लागते. एकदा कॉरोनर कोर्टातील कर्मचारी संपावर होते आणि अपघातील देहांचे विच्छेदन करायचं होतं. त्यावेळचे पोलीस सर्जन डॉ. फतनानी आणि डॉ. फ्रॅकलिन यांनी शवविच्छेदन केले, पण पुन्हा प्रेते शिवण्यास मी स्वत: मदत केली. वाईट अवस्थेतील, कुजलेली अशी अनेक प्रेते मी हाताळली, पण शवागारातील (मॉच्र्युरी) वातावरण अधिक भीतिदायक असतं. शवागारातील थंडगार वातावरण, औषधांचा वास, जीवघेणी शांतता या असल्या वातावरणात ड्रावरमध्ये किंवा कठडय़ांवर ठेवलेली प्रेते ओळखायची आणि बाहेर आणायची, पण मला या कामाची आता खूप सवय झालीय आणि भीती तर केव्हाच संपली आहे. समोर फक्त कर्तव्य उभं ठाकलेलं असतं.
१९७३ मध्ये त्रिकमजी घिया मास्तर यांचे निधन झाले. कॉरोनर कोर्ट, शेरीफ या सर्वानी श्रद्धांजली वाहिली. ‘सोरठी संदेश’ या गुजराती मासिकाने विशेषांक काढला. त्यात एका कवीने आपल्या भावना अशा व्यक्त करताना म्हटले, प्रेताच्याही डोळ्यात आज अश्रू उभे राहिले असतील.
सासऱ्यांच्या (त्रिकमजी घिया मास्तर) निधनानंतर माझे पती नरेंद्र घिया यांनी कमिटीची, आणि कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तेही १९९३ मध्ये वारले. त्यानंतर आजतागायत मी माझ्या सहकाऱ्यांसह माझ्या परीने काम करीत आहे.
त्याचं काम मी पुढे नेते आहे त्याचा मला अभिमान आहे. आमच्या संस्थेच्या कार्याची दखल सर्वत्र घेतली गेली. अनेक मानसन्मान, पुरस्कार मिळाले. गौरव झाला.
 इंटरनॅशनल लायन्स क्लब, रोटरी क्लब यांच्याकडून सन्मानपत्र, ‘आजीवन सेवाधारी त्यागमूर्ती’ ‘मानवतेचा सच्चा पुजारी’, ‘लोकभूषण’, ‘मानवी सेवांचा सम्राट’ अशा अनेक शब्दांनी गौरविलेल्या त्रिकमजी घिया मास्तरांची मी सून, मलाही ‘शूर महिला’ म्हणून गौरविण्यात आले.
   नरेंद्र घिया यांच्या नावाने रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आल्या. ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ या संस्थेच्या आशादान आश्रम (सांताक्रूझ) आणि शांतीदान आश्रम (गोराई) या संस्थेतर्फे सत्कार झाला, एअर इंडियाकडून कृतज्ञतेचं पत्र, तसेच सुप्रसिद्ध गांधीवादी नेत्या उषा मेहता यांच्या हस्ते सत्कार झाला. माझ्या नावातील ‘ज्योती’ हा शब्द घेऊन खारघर येथे ‘जीवनज्योती’ आश्रम सुरू करण्यात आला.
आमच्या या कार्यात अनेकांचे निरपेक्ष सहकार्य आहे. काही निवडक नावे म्हणजे, यमुनाजी ट्रेडिंग कं. मस्जिद, अरुणभाई आटावाला यांच्याकडून ग्रोसरीची मदत होते, महेशभाई (दामोदर चक्कूभाई) यांची खूप मदत होते. याशिवाय माझे इतर सहकारी या सर्वाच्या मदतीचा हा जगन्नाथाचा रथ चालू आहे.  आणि तो यापुढेही असाच चालू रहाणार याची मला खात्री आहे.    
शब्दांकन – सुरेश देशपांडे
संपर्क- ज्योती घिया
पत्ता- हिंदू रिलीफ कमिटी, c/o अजित सिंग आणि कंपनी, २४३, मंगलदास मार्केट, ६ वी गल्ली, मुंबई- ४००००२.
दूरध्वनी-०२२-२३७२९९३९