‘उद्याच्या ‘फादर्स डे’च्या निमित्तानं बाबांचं हरवणं पचवून जगू पाहणाऱ्या सिद्धीसारख्या अनेक वडिलांवेगळय़ा मुलींना सांगायचं आहे. ‘निसर्गानं बोलावलं, बाबा गेले. या सगळय़ात आपली काय चूक? मग आपल्याला का कुणी हसेल? आणि माझ्या अनुभवावरून आयुष्याच्या वतीनं एक वचन देते तुला, गेलेले बाबा परत मिळवता येतात. शोधले की नक्की सापडतात..’

माझ्याशेजारी सिद्धी नावाची एक छोटीशी गोड मुलगी राहते. ती स्वत: तर बाहुलीसारखी आहेच, पण तिची आईसुद्धा एक छोटीशी बाहुलीच वाटते मला. सिद्धी, तिची आई आणि तिचे पप्पा हे मी पाहिलेल्या सर्वात आनंदी कुटुंबापैकी एक असतील. सिद्धीसाठी तिचे पप्पा ही जगातील सवरेत्कृष्ट गोष्ट.. बाकी सब पामर! रोज सकाळी दहाच्या सुमारास सिद्धीचा किनरा, गोड, किलबिलता आवाज ऐकू यायचा ‘पप्पा, टाटा’. ऑफिसला निघालेले पप्पा नरजेआड होईपर्यंत सिद्धी एकटक त्यांच्याकडेच पाहात राहायची. आईच्या कडेवरून वाकून वाकून. ते दिसेनासे झाल्यावर तिला जग संपल्यासारखं वाटायचं. काही वेळ ती सैरभैर, कसनुशी होऊन जायची. मला ते बघवायचं नाही. मग नेमकी त्याच वेळी मी पटकन् सिद्धीला फ्रीजमधून कॅडबरी आणून द्यायचे. मग पुन्हा ती किलबिलायला लागायची. एखाद दिवशी मी कॅडबरी दिली नाही की ती विचारायची, ‘मला काई नाई आनलं?’ कॅडबरी मिळताक्षणी तिचं माझ्यातलं लक्ष उडायचं आणि पप्पा गेले त्या वाटेकडे डोळे लावून ती तन्मयतेनं ती कॅडबरी संपवायची. दुपारची झोप संपली की उन्हं पडताना पुन्हा एकदा सिद्धीची किलबिल सुरू व्हायची. परतणाऱ्या पप्पांचे वेध तिला वेळेआधीच लागलेले असायचे. तिच्या आईलासुद्धा.. आई सिद्धीला छान फ्रॉक घालायची, पावडरही लावायची. आई स्वत:सुद्धा सुंदर साडी नेसायची. तिच्या लांबसडक केसांचा भरघोस अंबाडा मानेवर घालून, कानात झुलणारे डूल सावरत, गळय़ातल्या मंगळसूत्राशी चाळा करत खाली पाहात राहायची. सिद्धीचे डोळे कधीच पप्पांच्या वाटेकडे लागलेले असायचे. पप्पा आलेले आम्हाला सिद्धीच्या चेहऱ्यावरच दिसायचे. ते झपकन चालत वर यायचे. बॅग घरी ठेवून, थोडय़ाच वेळात नव्या उत्साहाने सिद्धीला आणि तिच्या आईला घेऊन फिरायला बाहेर पडायचे. जाताना आम्हाला सगळय़ांना टाटा करण्याचा कार्यक्रम! रविवारी तर सिद्धी एक क्षणही पप्पांना एकटं सोडायची नाही. दिवसभर पप्पांच्या कडेवर गॅलरीत. जगभरातल्या गोष्टी आपल्या किनऱ्या आवाजात त्यांना ऐकवत असायची. पप्पासुद्धा ट्रॉफीसारखी तिला मिरवत असायचे! या सगळय़ानंतर अचानक तो दिवस आला. तो दिवस.. उगवताना नेहमीच्या किलबिलाटातच उगवला. मावळतानाही त्याच आनंदात मावळेल या निर्धास्तीने सगळे बेसावध असताना ऑफिसमधून घरी आल्यावर सिद्धीच्या तरण्याबांड पप्पांना हार्ट अॅटॅक आला आणि काही मिनिटांतच सगळं होत्याचं नव्हतं झालं. सिद्धीच्या आयुष्यातलं इतकं जिवाभावाचं काही तरी तिचा असा अकस्मात निरोप घेत असताना सिद्धी बाहेर खेळत होती. त्या कल्लोळात तिला बोलवायचं सुचायलाही वेळ लागला. कुणी तरी जबरदस्ती तिचं डोकं तिच्या गेलेल्या पप्पांच्या पायावर ठेवलं. सिद्धी काहीच न कळून कुंकू पुसलेल्या, कानागळय़ात काहीच नसलेल्या सुकलेल्या आईकडे पाहात राहिली. पप्पांना न्यायला लागल्यावर ‘पप्पा कुठे गेले?’ विचारायला लागली आणि पप्पांना नेल्यावर सिद्धीच्या आईनं ‘परत या हो’ असा फोडलेला टाहो ऐकून, ‘आई का रडते’ म्हणून सिद्धीनंही भोकांड पसरलं.
त्यापुढचे काही दिवस नातेवाईकांची गर्दी, पप्पांचे दिवस यात झरझर निघून गेले. मग सगळे निघून गेल्यानंतरचा तो एकटा दुष्ट दिवस उगवला. त्या दिवशी तो काळा खर्च लिहायची सुरुवात होते मनातल्या मनात. माणूस गेला म्हणजे नक्की काय काय गेलं. आज सकाळचा डबा करायची गडबड नाही. तो उठण्याआधी लगबगीनं अंघोळ करून छान दिसून त्याला उठवायची मनातली हुरहुर नाही. किती किती काय काय नाही. सिद्धीच्या मनात मात्र अजून हे ‘आता नाही’ घुसलं नव्हतं. ती सतत ‘पप्पा कदी येनाल’चा धोशा लावून होती. त्या दिवशी संध्याकाळी पप्पा ऑफिसमधून यायच्या वेळी सिद्धीची आई आणि तिच्या कडेवरची सिद्धी गॅलरीत दिसल्यावर मला गलबललं. त्या वेळी माझे बाबा होते. मला बाबा आहेत आणि सिद्धीला नाहीत याची लाजच वाटली. काही न सुचून मी फ्रीजमधलं एकाऐवजी दोन कॅडबऱ्या काढल्या आणि गॅलरीतल्या सिद्धीच्या हातात ठेवल्या. त्या पाहून सिद्धीच्या डोळय़ांत एक गूढ आश्चर्य पसरलं. त्या कॅडबऱ्या हातात घट्ट धरून ती माझ्या डोळय़ांत पाहायला लागली. काही तरी शोधल्यासारखी. त्या एका क्षणात मला सिद्धी एकदम मोठय़ा माणसासारखी वाटली. तिच्या त्या बघण्यानं कसनुशी होऊन मी एकदम घरात आले. त्या दोन कॅडबऱ्यांनी माझ्याकडे असलेलं आणि तिचं हिरावलं गेलेलं इतकं सगळं कसं साधणार होते मी? त्यानंतर काही र्वष गेली. त्या वर्षांनी सिद्धीला ‘आता पप्पा कधीच असणार नाहीत?’ हे शिकवलं. सिद्धी वयापेक्षा जास्तच समजूतदार झाली. ती थोडी मोठी झाल्यावर तिला अजून दोन दोस्त मिळाले. मोंटू नावाचा मुलगा आणि सिद्रा नावाची मुलगी. सिद्धी त्यांची ताई झाली. सिद्धी पाच, सिद्रा चार आणि मोंटू तीन र्वष वय. ही तिघंही माझी आणि माझ्या नवऱ्याचीच पोरं असल्यासारखी आहेत, अजूनही. हवं तेव्हा दार वाजवून घरात येतात आणि आपापली खेळतात. मोंटूचे आई-पप्पा कधी मोंटूला घेऊन फिरायला जाणार असतील तर सिद्धीला आवर्जून बरोबर घेऊन जातात. रविवारी मोंटू आणि सिद्रा कधी कधी त्यांच्या त्यांच्या आई पप्पांबरोबर फिरायला जातात तेव्हा बऱ्याचदा सिद्धी एकटीच आमच्याकडे खेळायला येते. मेकॅनोचा खेळ एकटीच खेळत राहते. घर बांधते, मोडते, पुन्हा बांधते. तिची आई, आजी जेवायला बोलावतात तरी जातच नाही. रात्री उशिरा नाइलाज झाल्यासारखी घरी जाते. परवा तिची आई सांगत होती, सिद्धी अजूनही कधी कधी ‘मला का नाहीत पप्पा’ म्हणून त्रागा करत रडते आणि आईला मारते.
माझे बाबा गेले तेव्हा मी पुण्याला गेले. खूप दिवसांनी मुंबईला परत आले. तेव्हा मोंटूने विचारलं, ‘‘आप इतने दिन क्यों गये थे पूना?’’ म्हटलं, ‘कुछ काम था’ यावर सिद्धी म्हणाली, ‘मला माहितीये तू का गेलीवतीस’ थोडय़ा वेळाने त्या पोरांना आयांनी जेवायला बोलावलं तशी मोंटू आणि सिद्रा गेले. सिद्धी घुटमळल्यासारखी मागेच राहिली. आम्ही दोघीच उरलो. मी त्या पाच वर्षांच्या बाहुलीला जवळ ओढत लहान मुलांसारखं विचारलं, ‘मी का गेलेवते पुण्याला, सांग?’ ती शांतपणे माझ्या डोळय़ांत थेट बघत म्हणाली, ‘तुझे पप्पा गेले ना?’ मी नुसतीच मान हलवली. मला अचानक मी आणि सिद्धी एका पार्टीत असल्यासारखं वाटायला लागलं, वडिलांवेगळय़ा मुलींच्या. कानेको मिसुज या जपानी कवयित्रीची एक कविता आठवली. त्या कवितेचं नावंच होतं-
नक्कल
(एका वडिलांवेगळय़ा मुलीची कविता)’
‘बाबा या ना, मला सांगा ना प्लीज’
ती मुलगी काकुळतीनं म्हणाली.
त्या दोघांना सोडून मागच्या गल्लीतून
माझ्या घरी जाताना मी हलक्या आवाजात तिची नक्कल करतेय.
‘बाबा प्लीज.’
कुणाचंच माझ्याकडे लक्ष नसलं तरी
मला उगीचच लाजल्यासारखं होतंय.
कुंपणातलं पांढरं जास्वंदीचं फूल
मला हसतंय का?
मी ही कविता पहिल्यांदाच वाचली तेव्हा मला त्याचा अर्थ मुळीच कळला नाही. बाबा गेले तेव्हा तो कळायला सुरुवात झाली असं वाटतं आणि आता बाबा गेल्यावर इतकी र्वष झाली असताना तो पूर्ण कळतोय. सिद्धीला तो माझ्याआधीच कळला असणार. मी कविता अगदी पहिल्यांदा वाचली तेव्हा बाबा होते. त्यामुळं कवितेतली मुलगी बाबांना हाक मारणाऱ्या दुसऱ्या मुलीची नक्कल का करते आहे हेच कळलं नाही. मी दिवसातनं दहा वेळा हे शब्द सारखे म्हणत होते, ‘बाबा प्लीज’. त्यात काय एवढं विशेष? असं वाटण्याएवढे गृहीत होते ते शब्द माझ्यासाठी. आता बाबा गेल्याला इतके दिवस झाल्यावर जाणवलं, मी किती दिवसांत हे शब्द उच्चारलेच नाहीत, ‘बाबा प्लीज.’ माणूस जातं, त्यातूनही बाबा जातात तेव्हा त्यांच्याबरोबरच त्यांना मारलेली ‘बाबा’ ही हाकही निघून जाते. ती हाक, ते असताना लाखो वेळा मारलेली, कधी हसून, कधी चिडून, पण हक्कानं. ते असताना इतकी स्वस्त असलेली ती हाक आज किती महाग होऊन बसली आहे. बाबा गेल्यानंतर पहिले काही दिवस आसपास कुणी स्वत:च्या बाबांना हाक मारली तरी आत टोचल्यासारखं व्हायचं. एकदा तर मी लहान मुलासारखं एका मैत्रिणीला म्हटलं, ‘तुझी मजा आहे. तुला बाबा आहेत!’ ती बिचारी कसनुशी झाली. या सगळय़ातनं गेल्यावर आता कवितेतल्या मुलीला दुसऱ्या मुलीला तिच्या बाबांशी बोलताना पाहून तिची नक्कल करावीशी वाटण्यातली दुखरी असोशी जाणवते आहे. कवितेच्या शेवटच्या ओळीपाशी तर सारखं थांबायला होतं आहे. ‘कुंपणावरचं पांढरं जास्वंदीचं फूल आपल्याला हसतं आहे,’ असं कवितेतल्या वडिलांवेगळय़ा चिमुरडीला वाटतं. जास्वंदीचं फूल लालही असतं पण त्या छोटूला हसणारं फूल पांढऱ्या रंगाचं आहे. पांढरा रंग-मृत्यू जाणणारा. इतरांना माहीत असेल-नसेल, पण त्या पांढऱ्या जास्वंदीच्या फुलाला नक्कीच माहीत आहे, ‘बाबा प्लीज?’ अशी नक्कल करणाऱ्या या मुलीला बाबाच नाहीत. नियतीनं केलेलं हे भीषण टुकटुक. ‘बाबा प्लीज’ म्हणून, नुसती नक्कल करून काय होणार आहे? बाबा येणार आहेत? त्या छोटूला त्या छोटय़ा वयात वाटतं आपल्याला खरोखरच या नकलेचा पण अधिकार नाही. तिच्या नकलेला ते फूल हसतं आहे, असं तिला वाटतं.. म्हणजे माणसंच नाही तर फुलासारखं इतकं नाजूक आणि निरुपद्रवी काहीच सुद्धा आपल्याला हसू शकतं, असं वाटण्याइतकं तिचं मन दुखरं झालं आहे. काही हरवण्यानंतर काही हरवायलाच उरत नाही, त्यापैकी हे एक..असं असलं तरीही उद्याच्या दिवसाच्या निमित्तानं ते हरवणं पचवून जगू पाहणाऱ्या सिद्धीसारख्या आणि कवितेतल्या चिमुरडीसारख्या अनेक वडिलांवेगळय़ा मुलींना सांगायचं आहे. ‘‘निसर्गानं बोलावलं, बाबा गेले. या सगळय़ात आपली काय चूक? मग आपल्याला का कुणी हसेल? जास्वंदीचं फूल तुला हसत नाही बाळा. तुला कुण्णी हसत नाही, कुणीच नाही. आणि माझ्या अनुभवावरून आयुष्याच्या वतीनं एक वचन देते तुला, गेलेले बाबा परत मिळवता येतात. शोधले की नक्की सापडतात. मला किती जणांनी बाबांची पाखर दिली ते गेल्यानंतर. अजूनही देत आहेत. वयानं मोठे, लहान किती तरी जीव. अशा सगळय़ांचा प्रेमाचा हात डोक्यावर आहे. तो जाणवू दे, माझ्यासारखाच तुलाही. त्यांच्यापैकी कुणालाही न घाबरता साद घाल, ‘बाबा, या नं प्लीज?’’
ते नक्की येतील. येतात. नक्की!’