‘वळसा वयाला’ या सदराचा हा अंतिम लेख. गेले वर्षभर अल्लाउद्दिनची गुहा उघडावी तशी एक एक रत्नं माझ्यासमोर येत राहिली. आणि मी त्यांना वाचकांसमोर ठेवत गेले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पाठीवर थाप देणाऱ्या आणि यात प्रसिद्ध झालेल्या विविध संस्थांना लाखो रुपयांची मदत करणाऱ्या वाचकांचे आभार कोणत्या शब्दांत मानू? लिखाणाची ऊर्जा त्यांच्याच प्रोत्साहनातून तर मिळाली..

जा नेवारी २०१४ पासून सुरू झालेलं हे ‘वळसा वयाला’ हे सदर आता अगदी शेवटच्या लेखापर्यंत येऊन ठेपलं आहे. गेल्या वर्षभरात खूप आयुष्य जवळून पाहायला मिळाली. सुरुवातीला थोडी शंका होती; परंतु ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ ही समर्थाची उक्ती आठवली. पाऊल पुढे टाकलं आणि वर्षभर अल्लाउद्दिनची गुहा उघडावी तशी एक एक रत्नं माझ्यासमोर येत राहिली. आणि मी त्यांना वाचकांसमोर ठेवत गेले. त्यांच्या मुलाखती घेताना मला मिळालेला आनंद आणि काळजात पेटलेले असंख्य दिवे यांना शब्दात पकडण्याचा हा एक प्रयत्न..
या सुंदर प्रवासाची सुरुवातच धमाकेदार झाली. वयाच्या साठीनंतर सायकलने अवघड ट्रेक करणाऱ्या पुण्याच्या सुसाट निरुपमा भावे यांच्यावरील लेखाने अनेकांना प्रेरणा दिली. आलेले फोन/मेल साधारण अशा प्रकारचे- माझी मैत्रीण चौथ्या मजल्यावर राहाते. लिफ्ट नाही. त्यामुळे तिच्याशी नेहमी फोनवरूनच गप्पा होतात. पण आता ठरवलंय, मुद्दाम तिच्या घरी जाऊनच मैफल जमवायची. माझ्या पायाचं हाड मोडल्याने सध्या मी आडवी आहे. प्लॅस्टरचा पाय डॉक्टर टेकवायला सांगतायत् पण धीर होत नव्हता. निरुपमाताईंना वाचलं मात्र आणि लगोलग मनाचा निश्चय केला आणि घरभर फिरून आले. असे प्रतिसाद पाहून वाटलं, चला आपल्याही गाडीने रूळ पकडलेला दिसतोय.
८ महार रेजिमेंट, या बटालियनमार्फत देशसेवा केलेल्या मेजर सुभाष गावंड यांच्यावरील लेख वाचून देशाच्या कानाकोपऱ्यातील महार रेजिमेंटचे आजीमाजी सैनिक हेलावले. त्यांचे प्रतिसाद वाचताना सैनिकांना आपल्या बटालियनचा केवढा अभिमान असतो याचा प्रत्यय आला. ठाण्यातील सैनिकी शाळेविषयी वाचल्यावर काही संस्थाचालकांनी तशी शाळा सुरू करण्यासंबंधात मेजर गावंडांशी संपर्कदेखील साधला.
कुटुंबातील सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यावर आयुष्याची दुसरी इनिंग स्वत:ची कला जोपासून समृद्ध करणाऱ्या कीर्तनकार शैलाताई जोशी यांना कीर्तनासाठी अनेक आमंत्रणं येणं स्वाभाविक होतं. पण सज्जनगडावरून दासनवमीच्या दिवशी समर्थ रामदासांवर कीर्तन करण्यासाठी आलेलं निमंत्रण ‘याचसाठी केला होता अट्टहास..’ या प्रकारचं. कीर्तन झाल्यावर त्यांनी मला आठवणीने गडावरूनच फोन केला. त्या भारावलेल्या आणि मी हवेत.
संस्कृत भाषेतील अमूल्य खजिना, जीवापाड मेहनत करून मराठी/ इंग्रजी भाषेतून जगासमोर आणणाऱ्या वल्लींना वाचक कितपत प्रतिसाद देतील, ही माझी शंका सपशेल खोटी ठरली. सुमनताई महादेवकर व डॉ. प्रभाकर आपटे या प्रभृतींना प्रतिसादाचे असंख्य ई-मेल्स आले. राजा भोजाचं अष्टांग स्थापत्यशास्त्र जाणून घेण्यासाठी अनेक इंजिनीयर्स व आर्किटेक्टनी डॉ. आपटय़ांशी संपर्क साधला. ओशन व्हेव्ह करंटवर काम करणाऱ्या एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या संदर्भात राजा भोजाकडे काही उत्तर होतं का, अशी विचारणा केली. आता बोला!

Salman Khan denies association with The Great Indian Kapil Show
“कुठे थांबायचं याचा विसर…”, भावना दुखावल्याने कपिल शर्माच्या शोमुळे सलमान खानला कायदेशीर नोटीस? अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”

योगाचार्य अण्णा व्यवहारे यांचं कार्यकर्तृत्व जाणून घेतल्यावर ठाण्यात राहूनही जर मी त्या गंगौघात डुबकी मारली नसती (योगासनं शिकून घेतली नसती) तर हा लेख लिहिण्याचा मला हक्कच नसता..नव्हता.
२२०० आदिवासी मुलींच्या जीवनात शिक्षणाची पहिली पहाट उगवण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या स्मिता जोशी व त्यांच्या ‘बांधिलकी’ या संस्थेवर लिहायला मिळणं हीच माझ्यासाठी अप्राप्याची गोष्ट होती. या लेखातील आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि दहा लाख रुपयांवर रक्कम जमा झाली. स्मिताताई भारावून गेल्या आणि या सर्व दात्यांना आपली कर्मभूमी दाखवण्यासाठी त्यांनी २ ऑक्टोबरला एक कृतज्ञता सोहळा आयोजित केला. त्यात सहभागी होण्यासाठी मुंबई, पुणे, पनवेल अशा ठिकाणांहून अनेक वाचकदाते आपआपल्या वाहनांनी कर्जतजवळील कोंदिवडे या गावी दाखल झाले.           डॉ. विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या त्या कार्यक्रमाचं वर्णन करायला माझ्यापाशी शब्द नाहीत. एवढा सुंदर दिवस आयुष्यात आणल्याबद्दल परमेश्वराचे आणि या सदराचे शतश: आभार.
धुळ्यातील जलतज्ज्ञ मुकुंद धाराशिवकर यांचा विविध क्षेत्रातील सपाटा अचंबित करणारा. त्यांच्यावरील लेखात मी  म्हटलं होतं, ‘त्यांचं कामच एवढं प्रचंड आहे, की पत्रावर नुसतं मुकुंद धाराशिवकर, धुळे एवढंच लिहिलं तरी पत्र सुखरूप पोहचेल.’ हे वाचून की काय नकळे पैठणच्या अशोकराव रेवाजी शिंदे यांनी तेवढाच पत्ता लिहिला आणि त्या विधानाचा खणखणीत पुरावा हाती आला. त्यांचा लेख वाचून अमेरिकेतूनही ई-मेल आले, पण विशेष म्हणजे पाकिस्तानातील एक वाचक राजनाना महम्मद मुसा रामीमी यांनीही त्यांना शुभेच्छा पाठवल्या, हे आणखी एक आश्चर्य.
धाराशिवकरांची गोष्ट इथेच संपत नाही. त्यानंतर त्यांनी धुळ्याचं आमंत्रण दिलं आणि नमस्कारासाठीदेखील ज्यांच्या पायापर्यंत आपले हात पोहचू शकणार नाहीत अशा दोन ऋषितुल्य व्यक्तींशी म्हणजेच वैद्य नाना जोशी व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू एन. के. ठाकरे यांच्याशी माझी भेट घालून दिली. ठाकरे सरांना आलेल्या असंख्य पत्रात एक पत्र माजी मंत्री शिवाजीराव पाटील (स्मिता पाटीलचे वडील) यांचंही होतं. धाराशिवकर दाम्पत्याचा पाहुणचार आणि दोन लोकनायकांचा अमृततुल्य सहवास यामुळे धुळ्यामधील ते दोन दिवस ही माझ्या मर्मबंधातली ठेव ठरली.
९६ व्या वर्षीही संस्कृत शिकविण्यात व्यग्र असणाऱ्या पेणच्या तात्या कर्वेना जेव्हा भेटून आले, त्या रात्री मी झोपू शकले नाही. देशभक्ती इतकी पराकोटीची असू शकते? आपल्या तिरंग्याची जी शान आहे ती अशा सच्चा देशभक्तांमुळेच.
डॉ. लीला गोखले या ९७ वर्षीय विदुषीबरोबर जमलेला गप्पांचा अड्डा म्हणजे एक अविस्मरणीय मैफलच. त्या वेळी त्यांची बहीण सुलोचना जोशी, वय र्वष ९३, मुद्दाम तिथे आल्या होत्या. त्याही संस्कृत घेऊन एम. ए.! भूतकाळाच्या शिंपल्यातून एक एक टपोरा मोती काढून दोघी माझ्यापुढे ठेवत होत्या आणि हरखून जाणं म्हणजे काय याचा अनुभव मी घेत होते. लेख वाचून लीलाताईंना आलेले दूरध्वनी शंभरच्या आसपास आणि ई-मेल्सची संख्या पावणेदोनशे. वाचकांच्या अशा अभूतपूर्व प्रतिसादामुळे आता त्यांनी आपल्या ‘माझी गोष्ट’ या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती काढायचं ठरवलंय.
या सदरातील मॅक्सिन मावशी ही एकमेव अशी व्यक्ती, की जिला मी भेटू शकले नाही. दोन-चारदा फोनवर बोलणं झालं. त्याबरोबर त्यांची पुस्तकं, लांबलचक ई-मेल्स, त्यांच्यावर काढलेली शॉर्टफिल्म.. या सगळ्याचा मी एवढा अभ्यास केला की, मॅक्सिन बर्नसन या विषयावर मी कधीही लेख देऊ शकेन. विशिष्ट लयीत त्यांनी मारलेली ‘शंपदा ऽऽऽ’ ही हाक माझ्या कानात अजूनही रेंगाळतेय.
माझ्या सदरातील या आणि जागेअभावी उल्लेखता न आलेल्या सर्वच देवमाणसांची मी ऋणी आहे. या सदराचा आणखी एक फायदा म्हणजे संगणक हा आपला प्रांत नव्हे म्हणणारी मी बऱ्यापैकी कॉम्प्युटर-सॅव्ही झाले. बसल्या बैठकीला दहा-पंधरा ई-मेल्सना उत्तर देणं, फोटो इकडून तिकडे पाठविणं मला चांगलं जमू लागलं. प्रतिसादांनी ही वेस ओलांडली किंवा काही गुंतागुंतीचा मामला आला की निस्तरायला माझी सून, प्रिया तयार होतीच.
या लिखाणातून मिळालेल्या आनंदाच्या वाटेकऱ्यांत दोघा वाचकांचं नाव मी आवर्जून घेईन. एक म्हणजे पुण्याचे अरविंद दंडगे. या गृहस्थांनी प्रत्येक हस्तीवर एक कविता केली आणि लॅमिनेट करून ती ज्याला त्याला स्वखर्चाने पाठवली. माझा लेख प्रसिद्ध झाला की पुढचे ८ दिवस यांचं धुमशान सुरू. दुसरे ठाण्याचे शंकर आपटे. त्यांनी यापैकी काही व्यक्तींची संपूर्ण माहिती वेगवेगळ्या पुरस्कारांसाठी ठिकठिकाणी पोहोचविली.
माझं सदर ‘हटके’ व्हावं असं वाटणाऱ्यांपैकी एक म्हणजे माझी घट्ट मैत्रीण डॉ. भारती माटे. पुण्यातली रत्नं तिनेच तर दाखविली. शिवाय त्यांना भेटताना माझा डेरा तिच्याच घरी असायचा.  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पाठीवर थाप देणाऱ्या आणि यात प्रसिद्ध झालेल्या संस्थांना १५ लाख रुपयांपेक्षाही जास्त  मदत करणाऱ्या वाचकांचे आभार कोणत्या शब्दांत मानू? लिखाणाची ऊर्जा त्यांच्याच प्रोत्साहनातून तर मिळाली. शेवटी निरोप घेताना, ना. धों. महानोर म्हणतात तसं, मनात फक्त एकच कल्लोळ..
कोणती पुण्याई ये फळाला, जोंधळ्याला चांदणं लगडून आलं. (समाप्त)