भावनिक मेंदू / अॅमीग्डिला हा वैचारिक मेंदूपेक्षा कितीतरी पटीने प्रबळ ठरतो. भावनिक मेंदूतून तब्बल आठपटीने जास्त संदेश हे वैचारिक मेंदूकडे जात असतात. म्हणजे वैचारिक मेंदूशी बोलून संवाद करण्याऐवजी जर थेट भावनिक मेंदूशी संवाद साधू शकलो तर ही पद्धत अधिक शक्तिशाली ठरेल.‘हृदयाची भाषा’ हेच साधते. म्हणजे जितका वेळ हृदयाचा हा तालबद्धपणा वाढवाल तितका वेळ एक शक्तिशाली संदेश तुम्ही मेंदूकडे पाठवत असता की ‘ऑल इज वेल’. यामुळे मेंदूच्या विचारांची दिशाच बदलते..
मागील लेखात (११ ऑक्टोबर) भावनिक मेंदू, अॅमीग्डिला वगरे याबद्दल माहिती होती. आता हृदय कशा रीतीने त्यांना संदेश पाठवते हे पाहू या. जर तुम्ही स्वत:च्या नाडीचे ठोके, नाडीवर बोटे ठेवून मोजायला सुरुवात केलीत तर असे वाटेल की ते लयबद्ध आणि विशिष्ट कालांतरानेच (नियमित) येतात; पण जर आपण ईसीजी काढला तर लक्षात येईल की प्रत्येक ठोक्याच्या अंतरात सूक्ष्म फरक आहे. हा फरक काही मिली सेकंदांमधला असल्यामुळे आपण बोटाने नाडी पाहतो तेव्हा तो जाणवत नाही. या ठोक्या-ठोक्यातील अंतरामधील होणाऱ्या फरकाला हार्ट रेट वेरिअॅबिलिटी (HRV) असे म्हणतात. हा जो फरक होतो तो उगाच (रँडम) होत नसून एका विशिष्ट कारणामुळे होतो. शिवाय या होणाऱ्या फरकामुळे संदेश भावनिक मेंदूकडे जातात. कसे? हे पुढील उदाहरणांद्वारे जाणून घेऊयात.
समजा, एखादी व्यक्ती तुम्हाला खूप आवडते. अथवा तिच्याबद्दल प्रचंड आदर तुमच्या मनात आहे. यच्चयावत मराठी माणसाला बहुतेक शिवाजी महाराज भावतात. कल्पना करा की, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही बसले असता खुद्द शिवाजी महाराज तुमच्यासमोर आले आणि म्हणाले, ‘तुझी स्तुती ऐकली आणि बघायला आलो!’ केवढा आनंद होईल आपल्याला आणि हृदयाची गती नक्कीच वाढेल. आता एखादी व्यक्ती तुम्हाला अजिबात आवडत नाही, अगदी डोक्यात जाते, समजा ही व्यक्ती सर्वासमक्ष तुम्हाला काही अधिकउणे बोलली, किती राग येईल तुम्हाला? आणि राग आला की हृदयाचे ठोके परत वाढतील. म्हणजे आनंद झाला काय किंवा राग आला काय आणि भीती वाटली काय, सगळ्या परिस्थितीमध्ये हृदयाची गती वाढते.
पण जर हार्ट रेट वेरिअॅबिलिटी (ऌफश्) कडे नजर टाकलीत तर केवढा फरक लक्षात येईल. पुढील आकृतीकडे पाहिल्यास लगेच लक्षात येईल की सकारात्मक भावना (जसे आदर, आनंद) आली की हा ग्राफ किती तालबद्ध (ऱ्हिदमिक) दिसतो. याउलट, नकारात्मक भावना (जसे भीती, द्वेष, राग) आली की हाच ग्राफ एखाद्या भूकंपाच्या आलेखासारखा दिसतो. थोडक्यात, हा तालबद्धपणा कमीजास्त प्रमाणात आपल्या भावनिक मेंदूला संदेश पाठवत असतो. आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील ‘आल इज वेल’ ही ओळ आठवा. हे सत्य आहे.
याची कल्पना ‘मॅक्रेटी’च्या संशोधनामुळे मिळाली. योगशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना ही काही नवीन कल्पना नाही. षट्चक्रांमध्ये मेंदूला सहस्रार चक्र, तर हृदयाला अनाहत चक्र असे मानले गेले आहे. म्हणजे हृदयाचादेखील निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत भाग असतो हे योग्यांनी ताडले होते. मॅक्रेटीच्या संशोधनाचे महत्त्व असे की, आधुनिक तंत्रज्ञानाचा (हार्ट रेट वेरिअॅबिलिटीचा) वापर करून सर्वसामान्य जनतेला हृदयाची भाषा जाणण्याची क्लृप्ती प्राप्त करून दिली. अगोदरच्या लेखामध्ये ती वैचारिक मेंदू (रॅशनल ब्रेन) म्हणजे मेंदूचा सर्वात पुढील भाग (प्रीफ्रंटल लोब) याबद्दल लिहिले होते. या भागाशी संवाद करण्यासाठी आपली मौखिक (बोली) भाषा आहे. आपल्या सगळ्यांचा हा अनुभव आहे की, एखाद्याला त्याच्या हिताची गोष्ट समजावण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होतोच असे नाही. याउलट, भावनेला हात घातला तर जास्त यश मिळते. किंबहुना तीव्र भावना जागृत झाली की विचारशक्ती लटकी पडते, असा आपला सर्वाचा अनुभव आहे. याला कारण भावनिक मेंदू / अॅमीग्डिला ही वैचारिक मेंदूपेक्षा कितीतरी पटीने प्रबळ ठरतो. भावनिक मेंदूतून तब्बल आठपटीने जास्त संदेश हे वैचारिक मेंदूकडे जात असतात. म्हणजे वैचारिक मेंदूशी बोलून संवाद करण्याऐवजी जर थेट भावनिक मेंदूशी संवाद साधू शकलो तर ही पद्धत अधिक शक्तिशाली ठरेल. ‘हृदयाची भाषा’ हेच साधते.
अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जितका वेळ तुम्ही हा तालबद्धपणा वाढवाल तितका वेळ एक शक्तिशाली संदेश तुम्ही मेंदूकडे पाठवत असता की ‘आल इज वेल’. यामुळे मेंदूच्या विचारांची दिशाच बदलते. ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा? यात नकारात्मक विचार नेहमी रिकाम्या भागाकडे धावतात. तसेच आपण कितीही समजावले की, आयुष्यात काय मिळाले ते बघा आणि मिळाले नाही त्यावर लक्ष देऊ नका, तरी या कोरडय़ा आणि शाब्दिक सल्ल्याने कोणाचेही विचार बदलत नाहीत. ‘हार्टमॅथ्स’ने ते शक्य होऊ शकते.
जर का तालबद्धपणा वाढवण्याची कला (स्किल) आपण शिकलो तर काय मजा येईल! कुठलीही कला अथवा स्किल शिकायचे असेल तर हा लेख वाचून अथवा एखादे लेक्चर ऐकून ते येणार नाही. उदा. सायकलवर बॅलन्स करत चालवणे हे एक कौशल्य आहे. त्याकरिता ‘पायडल असे मार, हॅन्डल असे पकड’ असे सांगून कोणी सायकल शिकत नाही. त्याकरिता सायकलवर बसावे लागते. आपल्या लहानपणी सायकल शिकताना पाठीमागे आई, बाबा, दादा, ताई यापकी कुणीतरी आधाराला उभे असायचे आणि ‘अरे पडला पडला, किंवा बरोबर, चूक’ अशा सूचना म्हणजे फिडबॅक द्यायचे. असे करताना एक दिवस आपण बॅलन्स करायला शिक लो. कसे ते शब्दबद्ध करता येत नाही, कारण हे शिक्षण जाणिवेतून नेणिवेत झाले आहे. त्याचप्रमाणे आपल्यालाही हुकमी तालबद्धता शिकायला ‘फिड बॅक’ची गरज असते. नेमके इथे आधुनिक तंत्रज्ञान आपल्या मदतीला येते. नाडीचे ठोके मोजणारी घडय़ाळे, बोटाला लावून रक्तातील ऑक्सिजन तसेच गती मोजणारे ‘प्रोब्ज’ अनेकांनी बघितले असतील. ‘हार्टमॅथ्स’ या तंत्रज्ञानात कानाच्या पाळीला लावायचा असाच एक प्रोब (चिमटा) असतो, जो नाडीची गती अचूकपणे कम्प्युटरकडे पाठवतो. कम्प्युटरमधील सॉफ्टवेअर क्षणार्धात या गतीचे विश्लेषण करून यात किती तालबद्धता (ऱ्हिदमिसिटी) आहे याची अंकात्मक माहिती देते.
जितकी तालबद्धता जास्त (आपले उद्दिष्ट) तितकी हिरवी पट्टी वाढते आणि जितके बेताल ठोके तितकी लाल पट्टी वाढते. अशा रीतीने आपले ध्येय अगदी सोपे केले जाते. फिडबॅक देण्याकरिता तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) जास्त फलदायी ठरते. एकतर कम्प्युटरला खूश ठेवणे, लालूच दाखवणे इत्यादी प्रकार करावे लागत नाहीत. दुसरे असे की, दर सेकंदाला अचूक फिडबॅक देण्यामुळे एखादा विद्यार्थी खासगी शिकवणीमुळे लवकर प्रगती करतो तशीच परिस्थिती होते.
तिसरे असे की, आपली प्रगती कशी होते आहे हे सॉफ्टवेअर अंकांनी/ टक्केवारीने सांगते. सगळ्या शास्त्रांमध्ये गणित/ आकडे हे एकमेव ऑब्जेक्टिव्ह असल्याने आपल्या प्रगतीचे मूल्यांकन तुम्हाला स्वत:च करता येते.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमची कुवत ओळखून काठिण्याची पातळी (लेव्हल ऑफ डिफीकल्टी) कमीजास्त करणे हे सॉफ्टवेअरने सहजशक्य होते. एका उदाहरणाने हे महत्त्व दाखवून देतो. समजा, तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच व्यायामशाळेत गेलात. तिथल्या ट्रेनरने तुम्हाला एकदम शंभर पाऊंडच्या वजनाने बेंच प्रेस करायला सांगितले तर ते जमणार नाहीच, पण इजा होईल. ‘व्यायाम आपल्याकरिता नाही’ असा न्यूनगंड निर्माण होईल आणि परत कधीही तुम्ही त्या व्यायामशाळेच्या वाटेला जाणार नाही! याउलट, तुमची क्षमता समजा वीस पाऊंड उचलण्याइतकी आहे आणि ट्रेनरने तुम्हाला फक्त दोन पाऊंड उचलायला दिले, तर त्यानेदेखील काही व्यायाम होणार नाही. तसं या सॉफ्टवेअरमुळे तुमची वैयक्तिक कुवत लक्षात घेऊन कठीणपणाची पातळी कमीजास्त करता येते.
‘हार्टमॅथ्स’मध्ये जास्तीतजास्त ‘हिरवे’पण मिळवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. विशिष्ट प्रकारचे श्वसन, उज्जायी प्राणायाम, काही विशेष आठवणी इत्यादींचा वापर केला जातो. हार्टमॅथ्समध्ये जी तालबद्धता मोजली जाते त्याला ‘कोहेरन्स’ असे म्हणतात. अनेक शास्त्रीय चाचण्यांमध्ये वाढलेल्या कोहेरन्सचे महत्त्व प्रस्थापित झाले आहे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे, ब्लडप्रेशर कमी होणे इत्यादी शारीरिक फायदे तर विचारांची अचूकता आणि निर्णयक्षमता वाढणे हे मानसिक फायदे कोहेरन्स वाढल्याने दिसतात. एखाद्या ट्रीटमेंटने हा कोहेरन्स वाढलेला दिसला तर ती फायदेशीर आहे असे आपण छातीठोकपणे समजू शकतो. गेल्या वर्षी ‘टाओ आनंद’ या ठाण्यातील संस्थेबरोबर आम्ही क्रिया योगावर संशोधन केले. त्या वेळेला बहुतांश साधकांच्या कोहेरन्समध्ये लक्षणीय फरक आढळला. थोडक्यात, वैद्यकशास्त्रात संगीत, योग, अरोमाथेरपी वगरे औषधांव्यतिरिक्त उपचारांची उपयुक्तता पडताळून पाहायची एक चाचणी उपलब्ध झाली आहे.
पुढच्या लेखात ‘हार्टमॅथ्स’चा उपयोग झोप सुधारण्याकरिता कसा होतो याबद्दल..
contact@iiss.asia