हजारो वर्षांपासून मिळालेला कर्ता असण्याचा आणि नकाराधिकार हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी ठाम समजूत सर्वच पुरुष जातीत असते. आणि तो मी मिळवणारच असं तो स्वत:ला बजावून सांगत राहतो. खरी समस्या त्याच्या या स्वगतात दडलेली आहे. आणि त्यातून बाहेर पडायचं असेल तर प्रत्येक पुरुषाने स्वत:ला प्रश्न विचारावा, या बदलासाठी मी तयार आहे का?..
तू तयार आहेस का, बदलायला? माझ्यासमोर बसलेल्या श्रीनिवासनला हा प्रश्न विचारत म्हणालो, ‘श्रीनी, तुझ्या वयातल्या जवळजवळ सगळ्याच पुरुषांना तुझ्यासारखीच समस्या कमी-अधिक प्रमाणात आहे. आपल्याकडे एक मोठ्ठा घोटाळा आहे. आपण जगतोय २०१४ मध्ये, पण आपली विचारसरणी जशी पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची होती तशीच आहे. आपल्याला भौतिक गोष्टींशी थोडेफार जुळवून घेता येतं. थोडय़ा कष्टाने आपण स्मार्ट-फोन वापरतो, कॉम्प्युटर शिकणं नोकरी टिकवण्यासाठी आवश्यक होतं म्हणून वापरतो खरा, पण एखादी अगदी क्षुल्लक अडचण आली तर ज्युनिअरला विचारावं लागतं. घरी जरी किमती टीव्ही बसवला तरी कार्यक्रम रेकॉर्ड करणं वगरे कामं आपली नाहीतच असं वाटतं. काय पटतंय का?’’
श्रीनी होकारार्थी मुंडी हलवत म्हणाला, ‘‘प्रसाद, तू कमाल माणूस आहेस. खूप वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखतो. म्हणून म्हटलं यावं तुझ्याकडे. तर तू विषय भलतीकडेच नेतो आहेस. मित्रा, गेले वर्षभर आमच्या घराची युद्धभूमी झाली आहे. दोन्ही मुली आणि बायको एका बाजूला आणि मी दुसऱ्या! त्यांची मेजॉरिटी. एक दिवस शांततेत जात नाही. अप्पांसमोर डोळ्यात डोळा घालून बोलणं आम्हा भावंडांना जमायचं नाही. इथं तर मुली थयथय नाचतात माझ्या डोक्यावर. बरं, हे सांगायचं कोणाला? लक्ष्मी त्या दोघींना सामील. आता मी तुझ्याकडे या अपेक्षेने आलोय, की लक्ष्मीला तरी तू समजावून सांगशील की नवऱ्याशी कसं वागायचं ते. आणि तू म्हणतोस, ‘बदलायला तू तयार आहेस का?’ बदलायला तर तिने पाहिजे ना?’
पंचेचाळिशी-पन्नाशीतली अशी अनेक माणसं भेटतात की त्यांना या परिस्थितीशी जुळवून घ्यायचं म्हणजे नेमकं काय, तेच समजत नाही. ‘आपलं म्हणणं बायका-मुलं ऐकत नाहीत,’ यासारखं सर्वदूर पसरलेलं पुरुषमंडळीचं दु:ख दुसरं कुठलंही नाही. पण ही समस्या इतरांची नसून ती आपलीच आहे हे स्वत:ला पटवून घ्यायला मन तयार होत नाही आणि मित्र-मंडळींत हा विषय निघालाच तरी एकतर हसण्यावारी नेला जातो किंवा जनरेशन गॅप असं लेबल लावून सोडून दिला जातो. त्यामुळे होतं काय, की हे असंच चालणार आता, अशी हतबलता दिसून येते किंवा चिडचिड, भांडणं, अबोला या गोष्टी घडतात. परंतु ही समस्या आपली प्रथम आहे आणि इतरांची नंतर आहे (असलीच तर) हे फारच थोडे पुरुष मान्य करतात. नाहीतर एकमेकांकडे बोट दाखवत रहाटगाडगं चालू राहतं.
मला अगदी मान्य आहे की, कोणत्याही समस्येत माझा जो काही वाटा असेल तो आधी सोडवावा आणि बाकीची गुंतागुंत नंतर सोडवावी, हे लहानपणापासून आपल्याला शिकवलेलंच नाहीये. घरातील सर्व निर्णय घरातील कर्त्यां पुरुषाचेच असतात. (काही घरांत त्या विषयावर चर्चा होत असेलसुद्धा) आणि नकाराधिकार कर्त्यां पुरुषाकडेच असतो. आपल्या इन्कम टॅक्स कायद्यातसुद्धा अविभक्त कुटुंबातील कर्ता अशी एक वर्गवारी आहे. त्यामुळे हजारो वर्षांपासून मिळालेला कर्ता असण्याचा आणि नकाराधिकार हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी ठाम समजूत सर्वच पुरुष जातीत असते. आणि तो मी मिळवणारच असं तो स्वत:ला बजावून सांगत राहतो. खरी समस्या त्याच्या या स्वगतात दडलेली आहे. आणि त्यातून बाहेर पडायचं असेल तर प्रत्येक पुरुषाने स्वत:ला प्रश्न विचारावा, या बदलासाठी मी तयार आहे का?
आणि पहिलं उत्तर प्रश्न बनून येतं – मीच का?
अशा वेळी तमाम पुरुष जमातीला मला माझे काही विचार सांगावेसे वाटतात. पहिल्यांदा नेमकी समस्या काय आहे ते निश्चित करावं आणि त्यातला सर्वात त्रासदायक भाग कोणता ते हुडकून काढून पाहावं आणि मग जाणवेल माझी खरी समस्या एका वाक्यात संपते. ‘मी पुरुष आहे म्हणून.’ मग स्वत:ला पुन्हा एकदा प्रश्न विचारावा, ‘मी पुरुष असण्यात माझा सहभाग किती?’ ती तर आई-वडिलांच्या निर्णयाची आणि गुणसूत्रांची किमया! कदाचित आई-वडिलांच्या मालमत्तेत प्रचलित कायद्यानुसार मालमत्तेचा जन्मसिद्ध हक्क असू शकतो. पण इतर कोणताही हक्क आपल्याला पुरुष म्हणून वेगळा असूच शकत नाही. मान्य आहे ही गोष्ट सहजासहजी कोणत्याही पुरुषाला चटकन स्वीकार करण्यासारखी नाही. मला खात्री आहे की, माझ्या जमातीतील बहुसंख्य मंडळी मनोमनी या गोष्टीचा स्वीकार करतील. पण पुढे काय?
पुरुष मंडळी लग्न करताना बायको आपल्यापेक्षा वयाने, शिक्षणाने, उंचीने आणि पगाराने कमी असलेलीच निवडतात (अनेकदा हेही वर्षांनुर्वष चालत आलंय म्हणून निवडली जाते). त्यामुळे ‘वयाची वडीलकी’ हा एक नवा हक्क प्राप्त होतो. ‘मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले असल्याने तू सदैव माझ्यापुढे नमतं घ्यायला हवंस.’ असे हक्क दर्शवणारे विचार नकळतपणे पुरुषांच्या मनात रुजतात आणि त्यातूनच पुरुषी अहंकार जन्माला येतो. आणि जेव्हा जेव्हा, जिथं जिथं संधी असेल तेव्हा तो व्यक्त होतो. केवळ पुरुष असण्याचा अधिकार, तोही खरं तर आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या/ घेतलेल्या संधीने प्राप्त झालेला. तो पुरुष म्हणून अहंकार असण्यात त्या पुरुषाचं कर्तृत्व शून्य. तरी म्हणायचे मेल इगो. हा एखाद्या माणसाने कष्टाने किंवा सर्जनशीलतेने यश मिळवले असेल तर त्या गोष्टीचा अभिमान जरूर असावा. अनेकदा ती संधी स्त्रीला केवळ स्त्री म्हणून मिळाली नसेल तर त्यात पुरुषी अहंकार असण्याचं कारण काय? वर्चस्व, स्वामित्वाची मनोसामाजिक प्रेरणा. तीही प्रत्येक पुरुषाकडे असेलच याची शाश्वती देणे अवघड. म्हणूनच आपल्याकडे पुरुष असण्याचा अहंकार असेल तर ती सर्वात मोठी समस्या मानवी लागेल आणि ती उगाचच बाळगल्याने आपणच आपल्या त्रासाला निमंत्रण देत राहू.
आपली मनोसामाजिक गृहीतकं
वडील माणसांचं ऐकलंच पाहिजे, पत्नीने पतीशी बरोबरी करू नये, घरातील अंतिम निर्णय मीच घेणार आणि गृहिणी असणं म्हणजे कमावती नसणं ही चार गृहीतकं प्रत्येक पुरुषाच्या जीवनात समस्या निर्माण करणारी आहेत. आणि गंमत म्हणजे अजूनही अनेक स्त्रियांच्या मनातसुद्धा ही गृहीतकं आहेत. आणि त्यात दोघांनाही वावगं वाटत नाही हीच खरी समस्या आहे. या चार गृहीतकांमुळे पुरुषाच्या जीवनात विविध टप्प्यांवर अपमान, अनादर, कमीपणा, न्यूनगंड, इतरांना तुच्छ लेखायची वृत्ती, स्वामित्वाची- तसेच पराकोटीच्या मालकी हक्काची भावना अशा अयोग्य भावनांची मालिकाच तयार होते. आता सुरुवातीच्या उदाहरणातील श्रीनीचेच बघा ना. आम्ही आमच्या वडिलांचं सगळं म्हणणं ऐकायचो, त्यांचे निर्णय अंतिम असायचे हा त्याचा अनुभव तसेच पत्नीने ऐकावं, अपत्याने पालकांचा आदर करावा या सगळ्या गृहीतकांमुळे त्यांच्या घरात भांडणं आहेत. पण मी जेव्हा त्याला विचारलं की, ‘‘मुलींनी, लक्ष्मीने कसं वागावं याबद्दल तू त्यांना काही सांगितलंस का?’’ तो म्हणाला, ‘यात काय बोलून दाखवायचं. या काही सांगायच्या गोष्टी आहेत का?’’ मी विचारलं, ‘‘तुझ्या मनात नेमकं काय चाललं आहे, तुला त्यांच्या कोणत्या वागण्याचा, कसा आणि किती त्रास होतो हे त्यांनी कसं ओळखावं रे?’’ इथंच आपण सारे पुरुष चुकतो. आणि असाच गृहीतकांचा खेळ अनेक पुरुष एकमेकांबरोबर राहताना खेळत बसतात. भाऊ-भाऊ, वडील-मुलगा, वरिष्ठ-कनिष्ठ, सहकारी यांच्यामध्ये सुद्धा हा खेळ वर्षांनुर्वष चालत राहतो आणि पुरुषाच्या मनातल्या भावना दडपत जाऊन त्याचं परिवर्तन राग, घृणा, तिरस्कार अशा भावनांत होतं आणि त्या मुरलेल्या भावनांसह संबंध ठेवणं त्रासदायक होतं.
व्यक्त व्हा!
तय्यार राहा आपल्या स्वत:त बदल करण्यासाठी. त्याची सुरुवात पत्नी आणि जवळचा मित्र यांच्या सोबत करा. सौरभच्या घरातही फक्त वाद होते. संवादच संपला होता. त्याने कसे बदल केले ते सांगतो. कदाचित तुम्हाला उपयोगी ठरावेत. त्याचा पौगंडावस्थेतील- अकरावीतला मुलगा, त्याची अर्धवेळ शिक्षिका असणारी त्याची पत्नी सुधन्वा आणि तो स्वत: असं छोटं मध्यमवर्गीय कुटुंब. राहत एकाच घरात, पण तिघांची तोंडं तीन दिशांना. काय करावं हे न सुचून तो एका मनोविकारतज्ज्ञाकडे गेला. डॉक्टर म्हणाले, कुठलीही गोळी उपयोगी पडणार नाही. फक्त रोज सकाळची सुरुवात पत्नीशी अर्धा तास बोलून करायची. त्याप्रमाणे सकाळचा चहा एकत्र घ्यायचा. तेव्हा पेपर वाचायचा नाही, बोलणं निर्थक वाटलं तरी रस घ्यायचा, समोरच्या माणसाचं एखादं विधान पटलं नाही तरीही त्यावर लगेच काही बोलायचं नाही आणि गाडी भांडणाच्या दिशेने जात आहे असं वाटल्यास तिथंच थांबायचं. पण संवाद सुरू करायचा, हे नियम घालून घेतले आणि पंधरा दिवस सलग हा सोपा प्रयोग केल्यावर आपल्याला हलकं वाटतं आहे असं त्याला जाणवलं.
हा प्रयोग करून बघायला हरकत काय?
बदल हळूहळूच होणार. पहिला पूल महत्त्वाचा..