माझ्या प्रत्येक गुरूंबरोबरच्या प्रवासात सुरुवातीला माझ्या प्रत्येक गुरूनं माझ्याकडे द्रोणाचार्यानी अर्जुनाकडे दिलं असेल तसं लक्ष दिलं आहे. त्या त्या कलेत मी थोडी पुढे आल्यावर मला थोडं एकटं सोडलं आहे, कधी परिस्थितीमुळे, कधी मी शिकावं म्हणून जाणूनबुजून. त्या एकटेपणापुढे हतबल होण्याऐवजी एकलव्य काही वेगळं शिकवू पाहतो आहे ते मला शिकायचं आहे.  मी माझ्या नकळत ते केलंही आहे..
एकलव्याची गोष्ट लहान असताना पहिल्यांदा ऐकली तेव्हा वेगळ्याच कारणासाठी मनात राहिली. एकलव्याला द्रोणाचार्याकडून धनुर्विद्या शिकायची फार इच्छा होती, पण तो क्षत्रिय नाही, या कारणासाठी द्रोणाचार्यानी त्याला शिकवायला नकार दिला. मग द्रोणाचार्याची एक प्रतिमा त्यानं तयार केली आणि तिच्याबरोबर आपली आपणच धनुर्विद्येची साधना सुरू केली. काही काळ असाच गेला. एके दिवशी काय झालं, कोणी एक कुत्रा कुठल्याशा कारणानं भुंकायला लागला. भुंकतच राहिला. त्याचं भुकणं संपेचना. तेव्हा कुठूनसा एक बाण सरसरत आला आणि अशा नजाकतीनं त्या कुत्र्याच्या तोंडात बसला की त्याचा आवाज तर बंद झाला, पण त्याला यत्किंचितही इजा झाली नाही. त्याच अवस्थेत तो कुत्रा द्रोणाचार्याच्या आश्रमात शिरला. त्याची अवस्था पाहून द्रोणाचार्य चकित झाले. त्या काळातले सवरेत्कृष्ट गुरू ते. त्यांच्या पारखी नजरेनं हेरलं, हे काम कुणा साध्या योद्धय़ाचे नव्हे. त्या योद्धय़ाचा शोध घेताच तो बाण एकलव्याने मारल्याचे निष्पन्न झाले. द्रोणाचार्याचा सर्वश्रेष्ठ शिष्य अर्जुन. त्याच्या आसपास त्याला आव्हान ठरेल असा कुणीही प्रतिस्पर्धी त्यांना नको होता. द्रोणाचार्याना पाहून विनम्र होऊन एकलव्य त्यांना म्हणाला, ‘तुम्हीच माझे गुरू आहात!’ यावर द्रोणाचार्य उत्तरले, ‘मला गुरू मानतोस तर मग गुरुदक्षिणा दे..’ तो क्षणात म्हणाला, ‘काय हवं ते मागा, तुम्हाला दक्षिणा देणं हे माझं भाग्यच!’ आणि द्रोणाचार्यानी चक्क त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून मागितला. त्या अंगठय़ाशिवाय त्याला धनुष्याला बाण जोडताच येणार नाही. एका अर्थानं त्यांनी त्याची इतक्या दिवसांची साधना, कला, त्याचा प्राण असलेली त्याची धनुर्विद्याच त्याच्याकडे मागितली आणि त्यानेही क्षणाचा विलंब न करता तो अंगठा, त्याची कला स्वत:पासून विलग करून त्यांच्या पायाशी ठेवली.
       लहान असताना त्याचं हे अंगठा कापून देणं फार त्रास देऊन गेलं होतं. द्रोणाचायार्ंचं वागणं अन्यायकारक वाटलं होतं आणि या कारणासाठी गोष्ट मनात रुतून बसली होती. पण आता जसजशी मोठी होते आहे तसतसं या गोष्टीतलं वेगळंच काहीसं मला आकर्षित करू लागलं आहे, जवळ बोलावू लागलं आहे, ते म्हणजे, एकलव्यानं द्रोणाचायार्र्ची प्रतिमा बनवून त्यासमोर साधना केली तो काळ.. ही साधना त्यानं कशी केली असेल याची मन पुनपुन्हा कल्पना करू पाहतं आहे. तो एकटा. समोर फक्त आचार्याची प्रतिमा. त्यानं कुठून आणि कशी सुरुवात केली असेल? कसा शिकत पुढे गेला असेल? त्याला शिकण्याच्या वाटेवर पुढे जाण्याची ऊर्जा कुणी दिली असेल? त्या समोरच्या निर्जीव प्रतिमेनं? त्यानं स्वत:च धनुर्विद्येचे डावपेच शोधले का, उपजत शहाणपणाच्या जोरावर? मी एका फार मोठय़ा इंग्रजी लेखकाविषयी वाचलं होतं, की त्याला म्हणे, शाळेत नेऊन शिकवलंच नाही. त्याच्या आजोबांचं एक भलंमोठं वाचनालय होतं. त्यात लहान वयातच त्याचे आजोबा त्याला मोकाट सोडायचे. तो कुठेही जाऊन कुठलंही पुस्तक उघडायचा. त्यातली अक्षरंही सुरुवातीला त्याच्यासाठी केवळ चित्रं होती. मग कधीमधी आजोबा त्याला एखादी गोष्ट मोठय़ानं वाचून दाखवायचे. अनेक वाचून दाखवलेल्या गोष्टींपैकी एखादी त्याला विशेष आवडायची. इतकी, की तो पुनपुन्हा तीच वाचून दाखवायला लावी नि ती त्याला तोंडपाठ होऊन जाई. मग त्या गोष्टीचं पुस्तक डोळ्यासमोर धरून तो ती पाठ असलेली गोष्ट धडाधडा म्हणत असे. अंदाजपंचे पानं उलटत, तो उच्चारत असलेल्या शब्दांची समोर दिसणाऱ्या छापील चित्ररूपी अक्षरांशी सांगड घालत. करता करता एके दिवशी सगळ्यांच्या लक्षात आलं की अशा अनेक तोंडपाठ गोष्टींची समोरच्या चित्रांशी सांगड घालता घालता आता तो कुठलंही पुस्तक धडाधडा वाचू शकतो आहे. ती सांगड त्याच्या डोक्यात पक्की होत होत तो चक्क वाचायला शिकला आहे. त्याच्या त्याच्या स्वत:च्या पद्धतीनं! त्यानंही स्वत:ची स्वत: करून घेतलेली अक्षरओळख माझं कुतूहल नेहमी वाढवते.
   एबीसीडीची मळलेली पायवाट न चालता त्यानं त्याच्या पद्धतीनं लिहिणं, वाचणं आत्मसात केलं आणि तो फार मोठा लेखक झाला (तसा तो होऊ शकला कारण शिक्षण झाल्यावर त्याचा अंगठा मागणारा कुणी गुरू सुदैवानं त्याच्या आयुष्यात आला नाही. नाही तर लेखनासाठी लेखणी कशी उचलणार होता तो बापडा! लेखन असो वा धनुर्विद्या, हा अंगठा स्वत:चं माहात्म्य तेवढंच टिकवून आहे! असो) तर या लेखकाची शिकण्याची पद्धत बघता, एकलव्यानं धनुर्विद्या तशीच शिकली असेल का असे वाटत राहिले. स्वत:ची स्वत:? तो अर्जुन आणि द्रोणाचार्याचे धडे चोरून ऐकायचा असा कुठलाच उल्लेख मी आजवर ऐकलेल्या गोष्टीत नाही. त्याच्या साधनेत त्याच्यासमोर फक्त ती प्रतिमा. महाभारतातल्या काळात अनेक अशक्य गोष्टी व्हायच्या, तो चमत्कारांचाच काळ होता, त्यानुसार ती प्रतिमाही बोलू शकते, पण तसाही काही उल्लेख माझ्या कानाडोळ्यावर नाही. याचा अर्थ, हा एकलव्य नावाचा हुशार मुलगा स्वत:च त्याच्या मनातला एखादा प्रश्न त्या प्रतिमेसमोर उपस्थित करत असणार आणि स्वत:च स्वत:चं उपजत शहाणपण पणाला लावून त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असणार. पण मग ती प्रतिमा समोर कशासाठी? आणि जर ती प्रतिमा एकदाही बोललेली नाही, तर कुठल्या न्यायाने एकलव्य द्रोणाचार्याना, ‘तुम्ही माझे गुरू,’ असं म्हणाला, कुठल्या बांधीलकीची त्यांनी मागितलेली दुष्ट दक्षिणा क्षणात त्यांना देऊन बसला? या सगळ्यामागे काय आहे? फक्त एकलव्याचा भाबडेपणा आणि द्रोणाचार्याचं धूर्त धोरणी राजकारण की अजून काही?
 माझ्या आयुष्यात भाग्यानं मला खूप थोर गुरू लाभले. त्यांच्यापैकी कुणीच द्रोणाचार्यानी एकलव्याला अव्हेरलं तसं मला अव्हेरलं नाही. भरभरून शिकवलं, पण ते माझे गुरू होते तशीच ती माणसंही होती. या काळातली माणसं, जी मर्त्य आहेत, व्यग्र आहेत. त्यांच्यापैकी कुणीच प्रत्येकन् प्रत्येक क्षणी माझ्या आसपास असणं शक्य नव्हतं, नाही. आपण या गोष्टीच्या चष्म्यातून या सगळ्याकडे पाहताना जाणवतं, माझ्या प्रत्येक गुरूंबरोबरच्या प्रवासात सुरुवातीला माझ्या प्रत्येक गुरूनं माझ्याकडे द्रोणाचार्यानी अर्जुनाकडे दिलं असेल तसं लक्ष दिलं आहे. त्या त्या कलेत मी थोडी पुढे आल्यावर मला थोडं एकटं सोडलं आहे, कधी परिस्थितीमुळे, कधी मी शिकावं म्हणून जाणूनबुजून. त्या एकटेपणापुढे हतबल होण्याऐवजी एकलव्य काही वेगळं शिकवू पाहतो आहे जे मला शिकायचं आहे. ते मी माझ्या नकळत केलंही आहे. म्हणजे आता माझे अभिनयातले सर्वश्रेष्ठ गुरू सत्यदेव दुबे. मी शाळेत असताना त्यांच्या शिबिराला गेले तेव्हा त्यांनी खरोखर द्रोणाचार्यानी अर्जुनाला जितक्या समरसतेनं शिकवलं असेल तितक्या समरसतेनं माझ्याकडे लक्ष दिलं. मला शिकवलं. माझा आवाज, बोलण्याची लय, उच्चारण पद्धत, बोलण्याचा सूर, रंगमंचावर उभं राहण्याची, वळण्याची, चालण्याची पद्धत, इतकंच नाही तर माझी कल्पनाशक्ती, कल्पनेतल्या भूमिकेवर विश्वास ठेवण्याची, वाढवण्याची शक्ती, माझ्या क्षेत्रातल्या स्पर्धेत मी कसं सामोरं जायला हवं, नुसतं आवड असून चालणार नाही, आत्मविश्वास कसा महत्त्वाचा अशा अगणित गोष्टी ते मला शिकवत राहिले. मी त्यांना दुसऱ्या कुठल्या कामासाठी फोन केला असला तरी ते म्हणायचे, ‘बोलने का स्पीड कम करो. एक सूर नीचे बोलो. बीचमें साँस लो, नही तो अंत का शब्द ठीक से सुनाई नही देता, गिर जाता है..’ तो फोनसुद्धा माझी पाठशाळा असायची. पण काही गोष्टींची उत्तरं मात्र दुबेजी द्यायचे नाहीत. कुसुमाग्रजांच्या कवितांवर एक कार्यक्रम त्यांनी दिग्दर्शित केला होता. त्यात मी ‘सातवा चमचा’ ही कविता म्हणायचे. मी लहान होते, त्याचा अर्थ लागत नव्हता. दुबेजींना विचारायला गेले तर म्हणाले, ‘अपने आप ढूँढ लो’ मला रागच आला, पण मग त्यांच्या अनेक शिबिरांमधून बाहेर पडून जेव्हा त्यांनी शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवून आमचे आम्हीच जेव्हा निरनिराळ्या भूमिकांना सामोरं जायला लागलो तेव्हा त्यांचं ‘अपने आप ढूँढ लो’ पुन्हा आठवलं. सुरुवाती सुरुवातीला स्वत:चं स्वत: नाही सापडायचं उत्तर..
 तेव्हा माझ्या नकळत मीही एकलव्याचा रस्ता चालले आहे. मी दुबेजींची एक प्रतिमा मनात बसवायची. माझी शंका त्या प्रतिमेला विचारायची. मग दुबेजी काय म्हणतील याची कल्पना करत त्या प्रश्नापाशी बसून राहायची. मग मनातले दुबेजी कधी तरी उत्तर द्यायचे. इतरही क्षेत्रांत मला हे कामी आलं आहे. जीममध्ये परुळेकर सर नसतील तरी त्यांची प्रतिमा माझ्याबरोबर असते. ती मध्येच ‘मॅडम व्यायाम व्यवस्थित जाणवतोय ना?’ अशी मोलाची आठवण करून देते. नसीरुद्दीन शहांची प्रतिमासुद्धा मला शिकवते. कधी कुठल्या प्रयोगात प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे उत्तेजित होऊन वरचा स्वर लागला तर नसीर सरांची प्रतिमा रागानं धुमसताना दिसते. मग मी क्षणात ताळ्यावर येते. योग्य सूर पकडते. आता अशा अनेक प्रतिमांसमोर साधना करत असताना एकलव्याची गोष्ट नव्याने कळते आहे. जाणवतं आहे, गुरूइतकीच गुरुप्रतिमाही ताकदीची असते, का? माझ्या मते दोन कारणांनी- कुठलीही कला ही व्यक्तीपेक्षा मोठी असते. ती आपली आपण शिकतानासुद्धा आपल्यापेक्षा मोठं कुणीसं कल्पनेत का होईना आपल्याकडे पाहतं आहे, ही भावना शिष्याला ऋजू बनवते. ऋजुता शरण जायला मदत करते. शरण जाण्यातलं ज्ञान हाती गवसतं.. वरवर पाहता माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी मीच शोधावं असं वाटलं तरी त्या उत्तराला माझ्यासमोर प्रगटायला लावणारी अंत:ऋजुता मला माझ्या गुरुजींनीच दिलेली असते. दुसरं, शिकताना, नवं शोधताना आपण आपल्याबाहेर येऊ शकणं फार गरजेचं असतं. जे चालतं आहे ते तटस्थतेनं पाहू शकणं अनेक नव्या उतारांकडे घेऊन जातं. हे गुरुप्रतिमा करते. माझ्यातून मला बाहेर काढणं. प्रश्नापासून मला अशा अंतरावर उभं करणं जिथून उत्तर आपसूक दिसेल. शिकण्याचा पूर्ण एकटा एकाकी रस्ता प्रामाणिकपणे चाललेल्या एकलव्याला हे सगळं त्याच्या अनुभवानं शिकवलं होतं. त्या अर्थानं त्याला गुरुप्रतिमेचं माहात्म्य पूर्ण आकळलं होतं. आता त्याच्याकडे पाहताना वाटतं, तो भाबडा नव्हता, तो काय करतो आहे हे त्याला पूर्ण माहीत होतं.
आता या टप्प्यावर दुबेजींसारखे मोलाचे गुरू या जगात नसताना, आता कधीच खरेखुरे भेटण्याची शक्यता नसताना एकलव्याची दिलेली गुरुप्रतिमेची शिकवण मला खूप काही मोलाचं देते आहे. त्याच्या माझ्यातला एक मोठा फरक, असा सुरुवातीला का होईना खराखुरा गुरू लाभला, एकलव्याला तोही नाही लाभला. हा फरक मला शक्ती देतो आहे, गुरुप्रतिमेतनं बळ शोधण्यासाठी पुढं जाऊन आपणच आपला गुरू व्हायची. एकलव्यनं त्याचा अंगठा कापून दिल्यानं त्याची धनुर्विद्या शिकणं भले आहे तिथेच खुंटलं असेल, भले तो सर्वोच्च धनुर्धर म्हणून शिकलेल्या प्रसिद्धीपासून वंचित झाला असेल, पण माझ्यासाठी तो नेहमीच स्वत:च्या बळावर स्वत: शिकलेला या जगातला सर्वश्रेष्ठ शिष्य राहील. त्यानं कुत्र्याच्या तोंडात नजाकतीनं मारलेला बाण त्याच्या स्वत:च्या प्रयोगाची, स्वतंत्र विचाराची साक्ष देतो. मीही एकलव्य व्हायची मनापासून धडपड करते आहे. वरवर पाहता माझ्या कुठल्याच गुरूने माझ्याकडून कसलीच दक्षिणा मागितली नाही. कुणीही शिकवण्यासाठी एक पैही घेतली नाही. पण आता या सगळ्यानंतर जेव्हा दुबेजींचं ‘अपने आप ढूँढ लो’ आठवतं तेव्हा जाणवतं, हे वाक्य म्हणजे दुबेजींनी माझ्याकडून मागितलेली एक प्रकारची गुरुदक्षिणाच आहे आणि ती मी त्यांना द्यायला बांधील आहे. त्यांनाच नाही तर सर्व क्षेत्रांतल्या माझ्या सर्व गुरूंना मलाही दक्षिणा द्यायची आहे, स्वत:चे नवे प्रश्न उपस्थित करण्याची आणि उघडय़ा डोळ्यांनी, स्वत: त्यांची उत्तरं शोधू पाहण्याची! त्यासाठी आता मी माझ्या आत स्वत:चीच एक प्रतिमा बांधायला घेतली आहे!!