ज्योती सुभाष

‘आकाशवाणी.. नीला उमराणी आपल्याला बातम्या देत आहे..’ माझ्या जाणत्या वयात माझ्या कानावर पडलेलं हे तिचं पहिलं वाक्य. त्या काळात मी नुकतीच लग्न करून नवऱ्याबरोबर महाराष्ट्रातल्या छोटय़ा-मोठय़ा गावी फिरत होते. रेडिओ आणि फार तर टेपरेकॉर्डर एवढय़ाच गोष्टी उपलब्ध होत्या तेव्हा. तर.. हे ‘नीला उमराणी’ नाव ऐकलं आणि लहानपणाच्या सेवादल कलापथकाच्या  आठवणी जाग्या झाल्या. आबाबेन देशपांडे- सेवादल कलापथकाची पुण्यातली मोठी कार्यकर्ती आणि माझी काकू. तिच्याकडे भेटली होती ही हसऱ्या, बुद्धिमान चेहऱ्याची मुलगी- नीला उमराणी.

मी यथावकाश मुलांच्या शाळांचे प्रवेश, राहायला घर वगैरे  उरकत पुण्यात एकदाची स्थायिक झाले. त्या काळात सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा ‘बाई’ हा लघुपट पाहाण्यात आला आणि अर्थातच त्यांचा दृष्टिकोन, त्यांचं काम याविषयी खूप कुतूहल निर्माण झालं.

दरम्यानच्या काळात डॉ. सुनंदा अवचट आणि ‘मुक्तांगण’चं काम याविषयी माहितीपट करण्याचं त्यांनी ठरवलं. पण सुनंदाचं म्हणणं पडलं, की ते शूटिंग वगैरे मला जमणार नाही. मग तिच्या भूमिके साठी कोण?.. असा शोध घेत सुमित्रा आणि सुनील माझ्याकडे आले. मधल्या काही वर्षांत अजिबातच भेटगाठ नसल्यानं एकमेकांना ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. दोघांनी माहितीपटाची कल्पना माझ्यापुढे मांडली. मला अर्थातच ती खूपच आवडली. बोलणं झाल्यावर ती दोघं उठली आणि कसं कोण जाणे मी तिला विचारलं, ‘‘तू नीला उमराणी का?’’ यावर आम्ही चाट होऊन काही क्षण एकमेकींकडे पाहातच राहिलो. आणि मग काही नवलाईचे उद्गार, हास्यस्फोट वगैरे घडले. आणि माझ्यासाठी त्या दिवशी नीला उमराणी ‘सुमित्रा’ झाली..

सुमित्रा, आज तुझे श्वास अक्षरश: संपले.. थोडा विचार केला आणि मनात आलं, साहजिकच होतं हे.. किती गोष्टी एका दमात संपवण्याची तुझी आयुष्यभराची सवय. सवय नव्हे ध्यास. स्वत:चं मन-विचार-भावना यांचं अविरत आकलन करत राहाण्याचा ध्यास असतो अनेकांना. त्यात असा ध्यास लाभलेले लोक प्रतिभावान असतील तर त्यांच्या ध्यासातून अनेक मनांना भिडणारं असं काही तरी निर्माण होत राहातं. ‘मुक्ती’ हा लघुपट ‘मुक्तांगण’साठी  करायचं ठरलं आणि तुझ्याबरोबरचा प्रवास नव्यानं सुरू झाला. खरं तर हा प्रवास फक्त तुझ्याबरोबर नव्हताच. तुझ्या प्रत्येक प्रकल्पात सुनील (सुकथनकर) सर्व शक्तिनिशी सहभागी होता. शिवाय  तुझ्या माहेरचा सगळा गोतावळा तुझ्या संगती होताच. खरोखर.. इतकं अनोखं कुटुंब मी यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. आणि पुढे मग छोटय़ा-मोठय़ा प्रकल्पांचा सिलसिलाच सुरू झाला. समाज विज्ञानाची तू मिळविलेली पदवी आणि सुरुवातीच्या राष्ट्र सेवा दलाच्या कामाचा अनुभव यातून तीव्र सामाजिक भान आणि एक चैतन्यमयी निर्मितीक्षम मन यांच्या संयोगातून अनेक लहानमोठय़ा सामाजिक कामांचे प्रकल्प चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू लागले.

हळूहळू माझ्या लक्षात आलं, की ही कायमची, अव्याहत चालणारी कार्यशाळा आहे. आपल्याला जे समजतं, लोकांना सांगावंसं वाटतं, ते आपण अव्याहतपणे त्यांना समजेल अशा स्वरूपात सांगत राहिलं पाहिजे, अशी तिची धारणा होती. यातून भारतात कदाचित पहिल्यांदाच ग्रामीण भागातील लोकांना भावतील, काही नव्या जाणिवा देतील असे लघुपट बनू लागले. बरं.. फिल्म्स बनवून ही मंडळी थांबली का? तर नाही. गावोगावी जाऊन लघुपट दाखवले, त्यांच्याशी चर्चा केल्या, मैत्री केली. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं.. त्यातून नवे विषय मिळत गेले. नंतरच्या काळात या सर्व कामांसोबतच सुमित्रा अ‍ॅण्ड कंपनी मनोरंजनाच्या क्षेत्राकडे, फीचर फिल्म्सकडे वळली. तिथेही मानवी जगण्यातील साधीच, पण अलौकिक मूल्यं ती लोकांसमोर मांडत राहिली. शिवाय तांत्रिक बाबींबरोबरच संवाद, गाणी या ‘क्रिएटिव्ह’ विभागातही सुनीलचा सहभाग मिळत गेला. एकापेक्षा एक चित्रपट बनत गेले. या सर्व कालखंडात एक कलावंत म्हणून मी अनेक अमूल्य क्षणांची साक्षीदार होऊ शकले हे माझं मोठंच भाग्य.

आणखी काय म्हणू तुझ्याविषयी?.. तुझ्यासारखी अनेक माणसं या खचत चाललेल्या जगाला मिळत राहोत.. ही एक आत्यंतिक मनापासून केलेली प्रार्थना.

Story img Loader