सुक्या मेव्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून काजूची गणना होऊ शकते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काजू सर्वानाच आवडतो. खाण्यास अतिशय सोपा व कुठल्याही मेव्यासोबत खाल्ल्यास त्याची रुची व पौष्टिकता अजूनच वाढवतो. इंग्रजीमध्ये कॅश्यूनट तर शास्त्रीय भाषेमध्ये अॅनाकाíडयम ऑक्सिडेंटल म्हणून प्रसिद्ध असलेले काजू अनाकाíडसी कुळातील आहे. दक्षिण भारतात समुद्रकिनारी तर गोवा, तामिळनाडू, केरळ, ओरिसा व महाराष्ट्रातील कोकणामध्ये काजूची झाडे आढळून येतात.
काजू वृक्ष साधारणत: ३०-४० फूट उंचीचा असतो. त्याची पाने लंबवर्तुळाकार असून वरच्या बाजूने चकचकीत असतात व त्याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो. हे फळ पिकल्यावर पिवळ्या व लाल रंगाचे होते. या पिवळ्या लाल, गोड, लोभस, व देखण्या फळाच्या पोटाशी त्याची बी चिकटलेली असते. ही बी फोडल्यानंतर आत काजू गर निघतो व हा काजूगर म्हणजेच काजू! हा काजू फळाच्या पूर्णत: बाहेर असतो. काजू फळही सुवासिक, रसाळ व पातळ सालीचे असते. आरोग्याच्या दृष्टीने तेही खाण्यास उत्तम आहे. याच्या रसाचे सरबतदेखील करतात.
औषधी गुणधर्म :
सुकलेले काजू चवीला अत्यंत गोड, किंचित कषाय, मधूर विपाकी, उष्ण वीर्यात्मक व पित्तकर आहेत. तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, जीवनसत्व, तंतूमय, पिष्टमय पदार्थ , खनिजे, मेद अशी सर्व घटकद्रव्ये त्यात असतात.
उपयोग :
० रोज पहाटे उपाशीपोटी ४ काजू मधासोबत खावे. स्मरणशक्ती व बुद्धी वाढण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
० काजूचे पिकलेले फळ, सुंठ, मिरे व संधव घालून खाल्ल्यास पोटदुखी कमी होते. तसेच पोटात गुब्बारा धरणे, शौचास साफ न होणे ही लक्षणे कमी होतात.
० भिजविलेल्या मनुक्यासह ४-५ काजू रोज सकाळी खाल्ल्यास मलावरोध दूर होतो.
० काखेमध्ये एखादी गाठ झाली असेल ती पिकण्यासाठी काजुच्या कच्च्या फळांचा गर उगाळून काखेतील गाठीवर लावावा. यामुळे ती गाठ लवकर पिकून फुटते व त्वरीत आराम मिळतो.
० पायांना भेगा पडल्या असतील तर काजूचे तेल लावून पायात मोजे घालावेत, काही दिवसातच भेगा नाहीशा होतात.
० काजू पित्तकर असल्याने तो नेहमी अंजीर, बदाम व मनुका या सोबत खाल्ल्याने उष्णतेचे विकार होत नाहीत.
० काजूमध्ये ‘ब’ जीवनसत्व जास्त प्रमाणात असल्याने भूक मंद झाली असेल तर रोज सकाळी अर्धा कप दुधातून ४-५ काजू बारीक करून घ्यावेत. यामुळे अग्नी प्रदिप्त होऊन भूक लागते.
० थकवा व नराश्य आल्यास नियमित काजू सेवन करावे यामुळे मज्जासंस्था उत्तेजित होऊन शरीर कार्यक्षम बनते.
० रक्ताची कमतरता झाली असेल तर रोज ४ ते ५ काजूचे सेवन करावे. यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याने रक्त वाढण्यास मदत होते.
० वृद्धत्व टाळून चिरतारुण्य टिकविण्यासाठी व शरीर काटक व प्रमाणबद्ध करण्यासाठी काजूचे सेवन नियमितपणे करावे.
सावधानता :
काजू हे उष्णगुणात्मक असल्याने ते अगदी (४ ते ५) प्रमाणातच खावेत. जास्त प्रमाणात खाल्ल्यास उष्णतेचे विकार होण्याची शक्यता असते. तसेच त्यात मेदाम्ले आधिक असल्याने अति प्रमाणात खाल्ल्यास अपचन होऊन वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. म्हणून मधुमेह, हदयविकार, रक्तदाब, आंत्रव्रण, आम्लपित्त या तक्रारी असलेल्यांनी काजू जास्त प्रमाणात खाऊ नयेत.
sharda.mahandule@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2015 रोजी प्रकाशित
काजू
सुक्या मेव्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून काजूची गणना होऊ शकते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काजू सर्वानाच आवडतो.

First published on: 22-08-2015 at 01:05 IST
मराठीतील सर्व अन्नसंकर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaju