काणे घराण्यात कीर्तन परंपरा १७६ पेक्षा अधिक वर्षे चालू आहे. आजवर १५ हजार कीर्तने करणाऱ्या ह.भ.प. नारायणबुवांनी पठडीतील कीर्तनपरंपरा जपली, पण त्याला आधुनिक दृष्टीची, काळाच्या गरजेची जोड दिली. काणे यांच्या कुटुंबातल्या स्त्रियांनीदेखील स्त्रीकीर्तनकार म्हणून नावलौकिक मिळवला. ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ म्हणणाऱ्या काणे कुटुंबीयांविषयी..
१९ ६२-६३ साल असावं. आपल्या नवपरिणित पत्नीला पतीनं विचारलं, ‘‘नोकरी मिळते आहे! ज्ञानमार्गी लोकांकडे, सन्मानाने काम करता येईल दरमहा २०० रुपये पगार मिळेल. घ्यावी का, म्हणजे बिऱ्हाड पाठीवर घेऊन होणारी पायपीट आयुष्यभर तुझ्या वाटय़ाला यायला नको.’’ पत्नीचं उत्तर होतं, ‘‘मी लग्न करताना कीर्तनकाराशी केलं. कीर्तनातून, प्रवचनातून लोकांना आनंद देणाऱ्या अन् आदराचं स्थान मिळवलेल्या व्यक्तीशी केलं. पगार मिळेल नोकरीत, पण माझा ‘तो’ आनंद हिरावला जाईल.’’ त्यांनी सांगितलं अन् घरात कीर्तन परंपरा अखंड चालू राहिली. ‘कीर्तनकलाशेखर’ ‘कीर्तनभूषण’ ‘कीर्तनकौस्तुभमणी’ असे असंख्य पुरस्कार मिळवत ह.भ.प. नारायणबुवा श्रीपाद काणे गेली ५८ वर्ष कीर्तन करतच आहेत आणि केवळ संसारातच नव्हे तर कीर्तनातही विविध टाळ वाजवून पत्नी सुमती त्यांना सर्वार्थानं साथ करत आहेत.
कीर्तन परंपरेतलं हे ‘काणे’ घराणं कोकणातून ‘गणेशवाडीला’ आलं ते गणपतीच्या पूजेसाठी. कीर्तनपरंपरेतले त्यांच्या घराचे मूळ पुरुष चिमणाजी यांचा जन्म तिथेच झाला. चिमणाजी गणेशभक्त होते तसेच दत्तभक्तही होते. असं सांगतात की, एकदा चिमणाजी महाराज नरसोबाच्या वाडीला कीर्तन करत असताना प्रचंड पाऊस आला. जणू आभाळच फाटलं. कीर्तन अपुरं राहिलं, म्हणून चिमणाजी व्यथित झाले. जीवाची घालमेल होऊ लागली. अन् पहाटे त्यांना दृष्टांत झाला की दत्तगुरूंच्या सेवेसाठी चिमणानं नरसोबाच्या वाडीला यायची गरज नाही. मी तुझ्याच घरी आहे. गणेशवाडीतच माझी सेवा कर. योगायोगाने त्याच दिवशी जोशीबुवा नावाच्या दत्तभक्तांनी आपल्याजवळ असलेली श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती चिमणाजींकडे नेली आणि माझ्यानंतर ही पूजाअर्चा तुम्हीच करावी असं साकडं घातलं. अशा रीतीने एकाच घरात श्रीगणेश आणि श्रीदत्तात्रेय दोघांची उपासना सुरू झाली. चिमणाजींनी अश्विनवद्यद्वादशीला उत्सव सुरू केला तो आज १७६ वर्षे अखंड चालू आहे. काणे घराण्यात कीर्तन परंपराही १७६ पेक्षा अधिक वर्षे चालूच आहे. चिमणाजींचे सुपुत्र ह.भ.प. शिवरामबुवा हेही नामांकित कीर्तनकार होते. कीर्तनातलं गाणं उत्तम व्हावं म्हणून त्यांनी ग्वाल्हेरला जाऊन काही वर्ष अभिजात संगीताची साधना केली. धृपद-धमार ते अतिशय सुंदर गायचे. शिवरामबुवांचे सुपुत्र ह.भ.प. तात्याबुवाही उत्तम कीर्तनकार! सारंगी-मृदंगाबरोबरच ‘करताल’ वादनात ते प्रवीण होते. पंडित विष्णु दिगंबर पलुस्करांचा त्यांच्यावर विशेष लोभ होता. तात्याबुवा जर तबल्याच्या साथीला सापडले तर त्यांचं गायन विशेष खुलून येई.
ह.भ.प. हरिबुवा हे तात्याबुवांचे सुपुत्र. त्यांनी आपल्या घराण्यातल्या कीर्तन-वादन सर्व कला जोपासल्या. वृद्धिंगत केल्या. बालगंधर्वाची त्यांची चांगली मैत्री हरिबुवांनी अनेक स्वरचित कवने नाटय़गीतांच्या धर्तीवर आपल्या आख्यानांमधून गुंफली. त्यांच्या सरळ वाणीला या पदांची जोड मिळाल्यावर त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. काणे घराण्यातल्या या चौथ्या पिढीने कीर्तनपरंपरेनं संपूर्ण भारतभर आपल्या घराण्याचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या मुलांनी, धाकटय़ा बंधूंनी आणि पुतण्यांनीही ही कीर्तनपरंपरा कसोशीनं सांभाळली, पण आपापला व्यवसाय करून. ह.भ.प. नारायणबुवा काणेंनी मात्र कीर्तन हाच ध्यास आणि कीर्तनाचा घास मुखी घेईन असं व्रत घेतलं. आजवर ते पाळलं.
ह.भ.प. नारायणबुवांनी पठडीतील कीर्तनपरंपरा जपली, पण त्याला आधुनिक दृष्टीची, काळाच्या गरजेची जोड दिली. माणसाच्या दैनंदिन जीवनाशी जर कीर्तनातील सारांशाचा धागा जुळला नाही तर ते आख्यान ऐकायला कोण येईल? त्यामुळे बदलत्या जीवनाचे, संस्कृतीचे संदर्भ पेरत, स्वत:ची कवने वापरून त्यांनी परंपराही जोपासली. नारायणबुवांचे वडील श्रीपादराव स्वत: कीर्तनात फारसे रमले नाहीत. पण त्यांनी अखेपर्यंत नारायणबुवांना तबल्यावर साथ केली. ह.भ.प. नारायणबुवांची आज जवळजवळ पंधरा हजार कीर्तने झाली आहेत. गरिबीमुळे शिक्षण फक्त ८ वी. पण गायन, वादन, संस्कृत भाषेचा व्यासंग आणि अखंड वाचन ही त्यांची स्वकष्टाची कमाई आहे. औपचारिक शिक्षण न घेताही विद्वान म्हणून ते मान्यता पावले आहेत. कीर्तनपरंपरेबरोबरच त्यांनी स्वत: विचारपूर्वक अग्निहोत्राच्या प्रचार-प्रसाराचं व्रत हाती घेतलं आहे. सध्याच्या प्रदूषणावर तोच एक उतारा आहे, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. हवा, पाणी, विचार आणि आचार.. साऱ्याच प्रदूषणाचा ते विचार मांडतात आणि ‘जन्म मृत्यूचे दुर्गम कोडे, जाणतसे श्रीहरी
नामप्रभुचे घेई निरंतर, जोवर जिव्हा काम करी।।
अशा स्वत:च्या कवनांमधून सत्प्रवृत्तीची बीजं पेरत राहतात.
कीर्तनपरंपरेत स्त्रिया नाहीत असं नाही. पण एकूणच त्यातला व्यासंग आणि कष्टमय प्रवास, अनिश्चितता पाहता त्यात पेशा म्हणून स्त्रिया टिकल्या नाहीत. आता सुमतीताईंचेच उदाहरण घेऊ या. पतीचं ऐकून ऐकून त्या उत्तम कीर्तन करू लागल्या. एकदा नारायणबुवांनी एके ठिकाणचं आमंत्रण घेतलं आणि त्यांना पुणे आकाशवाणीचं निमंत्रण मिळालं. दोन्ही मंडळी आग्रही. मग काय गृहिणी सचिव सखी म्हणून सुमतीताईंनी पदर बांधला आणि एका कीर्तनाची जबाबदारी पार पाडली. काही र्वष त्यांनाही लोकप्रियता मिळाली, पण पुढे वाढत्या प्रपंचात त्यांनी कीर्तन सोडून दिलं.
नारायणबुवांच्या चुलत वहिनी.. म्हणजे ह.भ.प. हरिबुवांच्या सूनबाई मालती भालचंद्र काणे या मात्र आपल्या सासरेबुवांच्या मागे हट्ट धरून कीर्तन शिकल्या आणि तब्बल बेचाळीस वर्ष त्यांनी आपला प्रपंच कीर्तनावरच चालवला. प्रारंभी हरिबुवा सुनेला शिकवायला तयार नव्हते. तालासुराचं ज्ञान नाही, वाचन कमी अशा स्त्रिया काय कीर्तन करणार असं म्हणायचे ते. पण मालतीबाईंनी त्यांचा विश्वास संपादन केलाच, पण श्रीशंकराचार्याच्या मठाकडून विशेष सन्मानही मिळवला. २७ वर्ष रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्रावर त्यांनी विषयाच्या गरजेप्रमाणे सादरीकरण केले. त्यांचे पती कै. भालचंद्र काणे यांनी त्यांना नेहमी पेटीची साथ केली. मालतीबाई सांगतात, ‘अहो, माझा पहिलाच मुलगा फार आजारी होता. बाळाच्या औषधोपचाराचा खर्च १०० रुपये येईल डॉक्टरांनी सांगितलं. घरात एवढे पैसे नव्हते. मग काय रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात ३ दिवस कीर्तन होईल असा बोर्ड लावला. तिथे सासऱ्यांच्या नावाचा खूप दबदबा होता. मी असं करणं धाडसाचंच होतं, पण कीर्तन उत्तम रंगले आणि पुढे आमंत्रणं येत गेली.’ पुढे मुलं-सुनांनीही साथ केली. पुतणेही कीर्तन करतात. मालतीबाईंची सहावी पिढी आजही कीर्तन करत आहे. तसंच त्यांचे मोठे दीर दत्तात्रेय काणे हे ८१ वर्षांचे असून आजही कीर्तन करतात.
कीर्तनावर प्रपंच चालवणाऱ्या स्त्रीकीर्तनकार म्हणून मालतीबाईंनी खूप लोकप्रियता मिळवली, पण त्यांच्या सुना उच्चविद्याविभूषित असून परंपरा जपण्यासाठी कीर्तन करतात. ह.भ.प. नारायणबुवांच्या दोन्ही कन्या उत्तम कीर्तनकार आहेत, पण हौशी. एक मुलगी गाण्याचे क्लासेस घेते. १९९२ पासून बुवांनी स्वखर्चाने दरवर्षी १५ मुलांना प्रशिक्षित करण्याचं व्रत घेतलं आहे. त्यांच्या विद्यार्थिनी नारद मंदिराच्या कीर्तनपरीक्षेत प्रथम येत असतात.
काण्यांची सातवी पिढी म्हणजे नारायणबुवांची नात सायली हिने कीर्तनपरीक्षेत आणि वक्तृत्वस्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळवले आहेत. ती सध्या इंजिनीयरिंगचं शिक्षण घेते आहे. कीर्तन करणार का, या प्रश्नाला सायलीचं उत्तर ‘हो’ असतं. ‘परंपरा जपणारच आम्हाला त्याचा अभिमान आहे.’ पण फक्त कीर्तनावर अवलंबून न राहता तिनं उच्चशिक्षणाचं ध्येय ठेवलं आहे.
खरं तर बदलत्या काळाच्या अनेक गरजा कीर्तन भागवू शकतं. संस्कारवर्ग, व्यक्तिमत्त्व विकासवर्ग, सांस्कृतिक विकास, संभाषण -कला वर्ग, समुदाय संवाद कौशल्य.. हे सारं सारं एका कीर्तनकलेत सामावलेलं आहे. त्यामुळे आधुनिक रूपातलं कीर्तन ही काळाची आजची गरजच आहे. मन:शांतीसाठी तो एक प्रभावी उपाय आहे. तणावमुक्ती मिळवून देणारा प्रभावी उपचार आहे. फक्त आपण त्याचा फायदा करून घ्यायला हवा आणि म्हणायला हवं..
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी हीच माझी सर्वजोडी
न लगे मुक्तीधनसंपदा कीर्तनानंद देई सदा
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी
कीर्तनानंद
काणे घराण्यात कीर्तन परंपरा १७६ पेक्षा अधिक वर्षे चालू आहे. आजवर १५ हजार कीर्तने करणाऱ्या ह.भ.प. नारायणबुवांनी पठडीतील कीर्तनपरंपरा जपली, पण त्याला आधुनिक दृष्टीची, काळाच्या गरजेची जोड दिली. काणे यांच्या कुटुंबातल्या स्त्रियांनीदेखील स्त्रीकीर्तनकार म्हणून नावलौकिक मिळवला. ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ म्हणणाऱ्या काणे कुटुंबीयांविषयी..
आणखी वाचा
First published on: 18-05-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व कुटुंब रंगलंय... बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirtankar narayan buwa kane and 176 year kirtan tradition in kanes family