मुलांशी शांतपणे आणि ठामपणे बोलता यायला हवं, त्यातला निश्चय न रागावता मुलांपर्यंत पोचायला हवा. नाही तर काही पालक इतकं उडत-उडत बोलतात की ते मुलांपर्यंत पोचतच नाही. मुलं त्यांचं काहीच ऐकत नाहीत. अशा पालकांना ‘इनइफेक्टिव्ह पेरेंट’ म्हणतात. कोणत्याही प्रश्नाला हमखास असं एकच उत्तर नसतं. दहा उत्तरं, शक्यता असू शकतात, हे आपल्याला कळायला हवं..
पालक सभेत, कार्यशाळेत पालक अनेक प्रश्न विचारतात. त्या-त्या वेळी ते प्रश्नांनी खरंच हैराण झालेले असतात. त्यांना मी सांगते की, तुमचं मूल मला माहीत नाही, तुमचा स्वभाव माहीत नाही, घरातलं वातावरण ओळखीचं नाही, त्यामुळे माझ्या उत्तराला खूप मर्यादा पडतात. सर्वसाधारण तत्त्व, सूत्र मी सांगू शकते, पण पुढचा विचार, ठरवल्याप्रमाणे आचार तुम्हीच करायचा आहे.
प्रश्न नीट समजून घ्या. मुलाची अडचण समजून घ्या आणि बहुतेक प्रश्नांचं असंच असतं. समजा आपल्याला घरातला दिवा बंद करायचा आहे तर दिव्यावर काठी मारून काही होईल का? त्या दिव्याचं बटण शोधून काढायला हवं आणि ते बंद केलं की दिवा बंद होणारच ना? मुलाच्या प्रत्यक्ष वागण्यावर टीका करून, कधी त्याला फटके देऊन प्रश्न मिटेल का? नाही. एक उदाहरण घेऊ या. लहान मूल अंगठा चोखतं, कधी मधली दोन बोटं चोखतं. किती सांगितलं तरी ऐकतच नाही. मुलांना तलफच येते बोटे चोखायची. मग आई वैतागते. ती हातावर फटके देते, मुलाला उभं करून ठेवते, शिक्षा म्हणून बोटाला चिकटपट्टी लावून देते. एखादी आई मुलाच्या बोटाला औषधाची कडू गोळी उगाळून लावते तर कुणी एखादी सरळ तिखट लावते. एखाद्या मुलाचं त्यामुळे बोट तोंडात घालणं बंद होतं, पण बऱ्याच मुलांमध्ये काही फरक पडत नाही.
एका तीन-साडेतीन वर्षांच्या मुलीला आम्ही सांगितलं होतं, ‘‘आज एकदा भरपूर अंगठा चोखून घे आणि नंतर मात्र ठरव की मुळीच अंगठा चोखायचा नाही. चोखला तर दात वेडेवाकडे होतात. हाताला फोड येतो. सोडशील ना अंगठा चोखणं? तू ठरवलंस तर ते होईल. जेव्हा असं खूप अंगठा चोखावा असं वाटेल, तेव्हा तो पाठीमागे धरायचा.’’ ती म्हणाली, ‘‘हो मी असंच करीन’’ आणि नंतर तिने कधीही अंगठा चोखला नाही. एकदा ती सांगत होती, ‘‘कधी कधी मला खूप अंगठा चोखावा असं वाटतं पण मी लगेच तो मागे धरून ठेवते आणि खेळायला जाते. मग विसरते.’’ या मुलीकडे ही आतली ऊर्जा होती. असा मनाशी झगडा करायला ही ऊर्जा लागते. ती काही मुलांकडे असते. पण एवढं खरं की धाकदपटशाहीने काम होत नाही. प्रेमानं समजावून होतं बऱ्याचदा.
मुलं हट्टीपणा करतात तेव्हा काय करायचं? हट्टीपणाला सगळेच पालक तोंड देत असतात. मुलांना एखादी गोष्ट हवी असली की ती चिवटपणे आपला पिच्छा पुरवतात. रस्त्यात लोळण घ्यायलाही कमी करत नाहीत. आई-वडिलांना लाज आणण्याचा हा उद्योग ठरावीक वयात असतोच. मग तुम्हीच म्हटलं की घेऊ या चल ते खेळणं तर मुलाला हट्ट केला की वस्तू मिळते हा धडा मिळतो. काय केलं की आई-बाबांना लाज वाटते याची समीकरणं मनात पक्की होतात. घरातून निघताना हे बोलणं व्हायला हवं की, ‘‘आज आपण काहीही घेणार नाही आहोत. तू रस्त्यात लोळायला लागलास तर मी निघून येईन.’’
शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक म्हणत की, मुलाला ताप आला तर तुम्ही त्याला झोपवून ठेवता. त्याच्याजवळ बसता. कपाळावर मिठाच्या पाण्याची घडी ठेवता. तुला मोसंबीचा रस देऊ का? विचारता. शरीराच्या तापावर जर असे उपचार आपण करतो तर मनाच्या तापावरही इलाज असणारच. हट्ट हा मनाचा ताप असतो. मूल जेव्हा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं अशा वेळी त्याला मारू नये. मनाचा ताप आणखी वाढेल. मुलाला हे कळायला हवं की आपली मागणी चुकीची असेल तर आई-बाबा ती मागणी पुरी करणार नाहीत. म्हणूनच मूल रात्री जेव्हा झोपत असतं तेव्हा शांतपणे त्याच्याजवळ बसून या गोष्टी समजावून सांगाव्यात. असं म्हणावं की, मला फार वाईट वाटलं तू रस्त्यात लोळायला लागलास तेव्हा. रस्त्यात कोण लोळतं? डुकरं लोळतात, त्याने कपडे खराब होतात. फाटतात. आपल्याकडे पसे आहेत, पण ते इतर गोष्टींसाठी ठेवलेत. तुझ्या वाढदिवसाला आपण छान पुस्तकं आणणार आहोत. तेव्हा तू दुकानातून पुस्तक शोध.’’
काही पालकांचा प्रश्न असतो, दुधाची बाटली सुटत नाही. पाच वर्षांचं मूलही बाटलीने दूध पितं तेव्हा काय करायचं? तेव्हाही मुलाच्या विचारशक्तीलाच आवाहन करावं लागतं. त्याला कोणत्या मार्गानं पटेल की आपण आता मोठे आहोत. कुणीच मोठं मूल बाटलीने दूध पीत नाही. तेव्हाच ते बाटली सोडतं. त्याला रागावणं, इतरांना सांगून त्याची फजिती करणं असे प्रयत्न करू नयेत.
बालभवनात एकदा ज्योत्स्नाताईंनी प्रयोग केला होता. सगळी मुलं गोल बसली होती. सगळी मुलं अशीच पाच-सहा वर्षांची होती. त्या मुलांना म्हणाल्या, ‘‘माझी एक वेगळी कपबशी आहे. मी नेहमी कपाने चहा पिते. तुम्ही कशाने दूध पिता?’’ मुलं सांगू लागली, माझा चांदीचा पेला आहे, त्यातून मी दूध पितो. माझा स्ट्रॉचा ग्लास आहे. माझा निळा मग आहे. जो मुलगा बाटलीने दूध प्यायचा त्याला सांगायची वेळ आली. तो उठला आणि म्हणाला, ‘मी तुमच्या कानात सांगतो.’ त्याने सांगितलं, ताईंनी ते कोणालाही सांगितलं नाही. शेवटी त्या म्हणाल्या ‘‘तुम्ही मोठी मुलं आहात आता. तुम्ही कपाने, ग्लासने, मगनेच दूध पिता हे छान आहे. शाब्बास.’’ तो बाटलीने दूध पिणारा घरी गेला आणि आईला म्हणाला, ‘‘माझी बाटली तू आता कचऱ्यात टाकून दे. मी मोठा मुलगा आहे. मी आता मगने दूध पिणार.’’ म्हणूनच प्रश्न समोर आला की रागावण्या-मारण्यापेक्षा मुलाला विचार करायला लावायचं. त्यासाठी आपण शांत राहावं लागतं.
मुलं टी.व्ही. बघतात हाही घरातला मोठाच प्रश्न असतो. आजी-आजोबा टी.व्ही बघतात, त्यांच्या शेजारी मुलं जाऊन बसतात. मुलांना टी.व्ही. आवडतो असं नसतं, पण बाकी काही चांगलं करायला नसतं. टी.व्ही.च्या वेळात मूल खरं तर दोन तास ग्राऊंडवर हवं. मोकळय़ा हवेत खेळणं, नवीन-नवीन गोष्टी शिकणं यात हा वेळ जायला हवा. यासाठी सगळीकडे मदानं हवीत. मूल शाळेतून आलं, त्यांनी खाऊ खाल्ला की मदानावर ते पाच मिनिटांत पोचायला हवं. जिथे मदानावर जाणं शक्य नसेल तिथे एखादी बाग, गच्ची, शाळेचं ग्राऊंड अशा ठिकाणी मुलाला खेळता येईल का बघावं. व्यायाम, खेळ, चित्रकला, हस्तकला, गोष्टी, गाणी, नृत्य, अभिनय अशा अनेक कलांचा अनुभव मुलाला मिळायला हवा. त्याच्या हातांना काम मिळायला हवं. मग टी.व्ही. समोर निष्क्रियपणे बसणं त्याला आवडणार नाही.
रविवारी थोडा वेळ घरातल्या सर्वानी एकत्र बसून जर टी.व्ही.चं वेळापत्रक तयार केलं तर मुलाला कळेल की आपण किती वेळ टी.व्ही. बघायचा आहे. तेवढाच टी.व्ही. पाहायचा हे त्याला सांगावं लागेल. मोठय़ांच्या मालिका बघायच्या नाहीत हेही ठरवावं लागेल.
संध्याकाळी आईच्या मागे स्वयंपाक असतो. लहान मुलं तिला मदत करू शकतील. त्या निमित्तानं त्यांचा चांगला संवादही होईल. अगदी थोडा वेळ होईल, पण तो महत्त्वाचा असेल. मुलांशी शांतपणे आणि ठामपणे बोलता यायला हवं, त्यातला निश्चय न रागावता मुलांपर्यंत पोचायला हवा. नाहीतर काही पालक इतकं उडत-उडत बोलतात की ते मुलांपर्यंत पोचतच नाही. मुलं त्यांचं काहीच ऐकत नाहीत. अशा पालकांना ‘इनइफेक्टिव्ह पेरेंट’ म्हणतात.
आपण हेही समजून घ्यायला हवं की आपला प्रश्न आपल्यालाच सोडवावा लागतो. उदाहरणार्थ मी काही प्रश्नांची उत्तरं दिली तरी मला तुम्ही माहीत नाही, तुमचं मूल माहीत नाही, तुमचं घर माहीत नाही. म्हणूनच माझं उत्तर तुमच्यासाठी परिपूर्ण नसणारच. एका प्रश्नाला एकच हमखास उत्तर असं नसतं. दहा उत्तरं, शक्यता असू शकतात, हे आपल्याला कळायला हवं.आणि वळायलाही हवं.
नववीतला मुलगा परीक्षेत नापास होतो तर तो सगळा त्याचा दोष नसतो. त्याच्या प्रश्नाला दहा बाजू असतात. त्याची प्रकृती ठीक आहे ना? एकाग्रता कमी झाली नाही ना? शाळेत सर्व शिक्षकांशी त्याचं नातं चांगलं आहे का? त्याचे मित्र-मत्रिणी कसे आहेत? आई-वडिलांकडून अभ्यासाचा ताण येतो आहे का? कुणा भावंडाशी तुलना होते आहे का? त्याचं हे वय वयात येण्याचं आहे, त्यामुळे तो अस्वस्थ असतो का? त्याला काही चुकीच्या सवयी आहेत का? असा सर्व बाजूंनी विचार करावा लागतो. त्याला विश्वास वाटेल अशीच आपली वागणूक हवी. तो नापास झाला म्हणून लगेच त्याला शिक्षा करू नये. घालून-पाडून बोलू नये. तुला आता आमच्या कष्टांची किंमत नाही असं म्हणू नये. आता पुन्हा अपयश नको बाबा एवढंच सांगावं. त्याच्या त्या दृष्टीने काय योजना आहेत हे विचारावं.
लहानपणापासून मुलांशी चांगला संवाद असणं आवश्यकच आहे. चांगल्या संवादाने, विश्वासाने, पालकांच्या प्रेमळ वागणुकीने मुलं प्रश्नातून बाहेर येऊ शकतात. मुलांचा विश्वास जिंकणं हे जमायला हवं. ते कठीण नाही, पण अगदी सोप्पंही नाही.
> shobhabhagwat@gmail.com