आपण निवडलेल्या क्षेत्रात उत्तुंग आणि विधायक कार्यानं अमीट ठसा उमटवलेल्या, अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या नऊ ‘दुर्गा’च्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारा ‘लोकसत्ता’चा ‘दुर्गा पुरस्कार’ हा उपक्रम यंदाच्या अभूतपूर्व परिस्थितीत दूरस्थ पद्धतीने, पण तितकाच मनापासून साजरा करण्यात आला.

अडचणींवर मात करत पुढे जाण्यासाठी लागणारा खंबीरपणा आणि आपल्याबरोबर इतरांना पुढे नेण्याची सहृदयता यांचा अनोखा संगम आपल्या ठायी बाळगणाऱ्या नऊ असामान्य स्त्रियांचा सन्मान करणारा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२०’ हा कार्यक्रम ११ डिसेंबर रोजी ‘ऑनलाइन’ माध्यमातून साजरा झाला. सर्वसामान्य स्त्रियांनी  केलेल्या संघर्षांच्या आणि घेतलेल्या ध्यासाच्या प्रेरणादायी कहाण्या यानिमित्ताने रसिकांनी जाणून घेतल्या आणि शेकडोंच्या संख्येने या कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी घेऊन या ‘दुर्गा’चे कौतुकही केले. या सोहळ्याचा हा संक्षिप्त वृत्तांत.

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’तर्फे राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात वाचकांकडून त्यांच्या परिसरातील असामान्य कार्य करणाऱ्या सामान्य स्त्रियांची माहिती मागवली जाते आणि या माहितीतून विविध निकषांच्या आधारे, अभ्यासू परीक्षकांकडून नऊ दुर्गाची निवड के ली जाते. या दुर्गाची माहिती नवरात्रीचे नऊ दिवस वाचकांना ‘लोकसत्ता’मधून वाचायला मिळाली. त्यांचा कौतुक सोहळा ११ डिसेंबर रोजी ‘ऑनलाइन’ माध्यमातून साजरा झाला. याच उपक्रमाचा एक भाग असलेला ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्कार या वेळी मुंबईत झालेल्या एका छोटेखानी समारंभात ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेत्री देविका दफ्तरदार, इरावती हर्षे, मधुरा वेलणकर, पर्ण पेठे आणि प्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांच्या हस्ते भावे यांना हा पुरस्कार कृतज्ञतापूर्वक देण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कु बेर, साहाय्यक संपादक मुकुं द संगोराम या वेळी उपस्थित होते. शेकडो रसिक या पुरस्कार सोहळ्यात ऑनलाइन सहभागी झाले होते. संपादक गिरीश कु बेर यांनी स्वागतपर भाषणात सांगितले, की समाजात मोठय़ा प्रमाणावर माहीत असलेल्या आणि माध्यमांमधून सातत्याने दिसणाऱ्या विविध क्षेत्रांतील स्त्रियांव्यतिरिक्तही अनेक जणी सामाजिक स्तरावर कार्यरत असतात. एखादा विषय सातत्याने लावून धरून त्यासाठी आयुष्य वाहत असतात. अशा उत्तम काम करणाऱ्या स्त्रियांना समाजासमोर आणणे हा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारां’चा उद्देश आहे. गेली सहा वर्षे नऊ जणींना असा पुरस्कार दिला जात असल्याने आत्तापर्यंत ५० पेक्षाही जास्त ‘दुर्गा’चा सत्कार के ला गेला असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

‘लोकसत्ता चतुरंग’ पुरवणीच्या संपादक आरती कदम यांनी सोहळ्याच्या प्रास्ताविकात ‘दुर्गा’ पुरस्काराला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘दर वर्षी ‘दुर्गा पुरस्कार’ सोहळा प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आणि मोठय़ा थाटामाटात साजरा के ला जातो. यंदाच्या परिस्थितीत तो तसा करता आला नाही याची खंत असली तरी  स्त्रीशक्तीचा जागर यंदा सातव्या वर्षीही अखंड चालू राहिला याचा आनंद मोठा आहे. ‘करोना’च्या काळातही वाचकांकडून या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुरस्कारासाठी ३५० हून अधिक नामांकने मिळाली होती. या सर्वच स्त्रियांचे काम त्यांच्या क्षेत्रात वाखाणण्याजोगेच असल्यामुळे त्यांच्यातून  के वळ नऊ कर्तृत्ववान स्त्रियांची पुरस्कारासाठी निवड करणे अतिशय अवघड होते. ज्येष्ठ वैद्यकतज्ज्ञ डॉ. स्नेहलता देशमुख, ज्येष्ठ नेत्या व स्त्री चळवळींच्या अभ्यासक डॉ. नीलम गोऱ्हे आणि प्रसिद्ध दिग्दर्शिका, अभिनेत्री व पटकथालेखिका प्रतिमा कु लकर्णी यांनी चिकित्सक नजरेने, सखोल चर्चेतून नऊ ‘दुर्गा’ची निवड के ली.’’

ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रेक्षकांना यंदाच्या नऊ दुर्गा पुरस्कारार्थीच्या कामाची ओळख अभिनेत्री देविका दफ्तरदार, मधुरा वेलणकर आणि पर्ण पेठे यांनी आपल्या खुमासदार शैलीत या वेळी करून दिली. या वेळी या ‘दुर्गा’च्या कामावर आधारित फोटोंची व्हिडीओ क्लिपही दाखवण्यात आली. यवतमाळमधील पांढरकवडा येथे गेली २६ र्वष चळवळी आणि आंदोलनांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या दुर्गा डॉ. लीला भेले यांनी लैंगिक शोषण झालेल्या आदिवासी कुमारी मातांच्या प्रश्नात हस्तक्षेप करण्यास सरकारला भाग पाडले. यवतमाळच्या एका टोकाला, तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या झरी जामणी आणि केळापूर या आदिवासीबहुल तालुक्यांतील कुमारी माता आणि त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी काम के ले.

सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन या आपल्याकडे नेहमीच दुर्लक्षित राहणाऱ्या विषयात दुर्गा पुरस्कारार्थी कलासंवर्धक मधुरा जोशी-शेळके यांनी अतिशय महत्त्वाचे काम के ले आहे. देशभरातील ठिकठिकाणच्या पुरातन वारशाची जपणूक त्यांनी के ली आहे. निराधार आजी-आजोबांना आपलं मानून त्यांचा प्रेमानं सांभाळ करणाऱ्या दुर्गा डॉ. अपर्णा देशमुख यांनी दहा वर्षांपूर्वी के वळ २७ वर्षांच्या असताना या कामास सुरुवात के ली. त्यांनी पुण्यात सिंहगड रस्त्यावर ‘आभाळमाया’ वृद्धाश्रम सुरू के ला असून तिथे सध्या ७० आजी-आजोबा राहतात. अविवाहित राहण्याचा निर्णय घेऊन अपर्णा यांनी आपलं पूर्ण लक्ष वृद्धांच्या कल्याणावर केंद्रित के ले आहे. दुर्गा प्रांजल पाटील यांनी नेत्रहीन असण्याचा न्यूनगंड न बाळगता उच्च शिक्षणासाठी प्रचंड संघर्ष केला. सर्वच तरुणांना प्रेरणादायी ठरतील अशा प्रांजल यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन त्या सहाय्यक जिल्हाधिकारी झाल्या. दिल्लीत ‘करोना’च्या कठीण काळातही त्यांनी उत्तम काम करून दाखवले आहे.

स्त्रीरोग व प्रसूती विषयातील तज्ज्ञ आणि दुर्गा पुरस्कारार्थी डॉ. शुभांगी अहंकारी या मुंबईतील शहरी जीवन सोडून उस्मानाबादमधील अणदूर येथे स्थायिक झाल्या आणि १९८३ मध्ये त्यांनी तिथे एक लहान रुग्णालय सुरू के ले. व्यवसायाच्या पुढे जाऊन सामाजिक कार्य उभे करणाऱ्या शुभांगी यांचे ग्रामीण आरोग्याच्या क्षेत्रातील काम मोठे आहे.

दुर्गा पुरस्कारार्थी आदिती देवधर यांनी झाडांच्या गळालेल्या पानांची योग्य विल्हेवाट लावली जावी यासाठी २०१६ मध्ये ‘ब्राऊन लीफ’ हे व्यासपीठ सुरू केले. ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आणि ‘फे सबुक’सारख्या समाजमाध्यमांचा उत्तम उपयोग करणाऱ्या या व्यासपीठातून समविचारी लोकांचा एक गटच तयार झाला आणि या गटाने २०१९ पर्यंत ५० हजार पोती वाळलेली पाने जाळली जाण्यापासून वाचवली.

दुर्गा चित्रगंधा सुतार यांनी वारली आदिवासी समाजाची चित्रशैली जपली आणि त्यांच्या जीवनाचे वास्तव आपल्या चित्रांमधून साकारले. उत्तम कलाविषयक गुणवत्ता असलेल्या आदिवासी मुलांचे केवळ योग्य मार्गदर्शनाअभावी नुकसान होऊ नये, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न के ले.

‘शरीरसौष्ठव’ या पुरुषप्रधान खेळात भाग घेऊन उत्तम कामगिरी के लेल्या दुर्गा स्नेहा कोकणेपाटील यांनी आपल्या यशातून क्रीडापटू मुलींना वेगळी प्रेरणा दिली. पीळदार शरीरासह आणि संकोच न बाळगता त्या स्त्रियांच्या शरीरसौष्ठव स्पर्धामध्ये उतरल्या आणि ‘नाशिक श्री’, ‘महाराष्ट्र श्री’, ‘भारत श्री’ या किताबांसह आंतरराष्ट्रीय (आशियायी) डायमंड कप स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक मिळवले.

दुर्गा रंजना करंदीकर यांनी कर्जत, जव्हार आणि नंदुरबारमधील आदिवासी पाडे स्वत: फिरून पालथे घातले आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून १८ हजारांहून अधिक कुपोषित मुलांना वाचवण्यात पुढाकार घेतला. आदिवासींचे जगणे सुधारण्यासाठी त्या ४० वर्षे कार्यरत आहेत. आपला ध्यास आणि जिद्द न सोडणाऱ्या यातील प्रत्येक दुर्गेची कहाणी एखाद्या चित्रपटाचा ऐवज व्हावा इतकी रोचक आणि प्रेरणादायी आहे.

‘ जीवनगौरव पुरस्कार’ सोहळ्यात ‘लोकसत्ता’चे सहाय्यक संपादक मुकु ंद संगोराम यांनी चित्रपटसृष्टीतील सुमित्रा भावे यांच्या भव्य योगदानाची ओळख करून दिली. त्यांनी सांगितले, की मनोरंजन या एकाच हेतूने निर्माण के लेल्या चित्रपटांमध्ये न दिसणारे विषय हाताळत त्यांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे हे भावे यांच्या चित्रपटांत दिसते. त्यांनी स्वत:ची एक चित्रभाषा तयार के ली आहे. तरल आणि संवेदनशीलपणे त्या आपला संदेश चित्रपटांमधून पोहोचवतात, हेच त्यांचे वेगळेपण ठरते.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर झालेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त करताना भावे यांनी सांगितले, की माझ्या चित्रपटांची दखल घेतल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार मानावेसे वाटतात. ‘लोकसत्ता’विषयी आपल्याला प्रेम आणि आदर आहे. प्रेम यासाठी आहे, की ते खूप संवेदनक्षम पद्धतीने अनेक विषयांची मांडणी करतात आणि आदर यासाठी आहे, की त्यात खूप सखोल विचार असतो. आजच्या काळात अशा पत्रकारितेची आपल्याला गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

कु णाल रेगे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के ले. कार्यक्रमाचे संहितालेखन चिन्मय पाटणकर आणि संपदा सोवनी यांनी केले होते. ‘ग्रॅव्हिटस फाऊंडेशन’ प्रस्तुत ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ सोहळ्याचे सहप्रायोजक होते ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ’, पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘यश कार्स’ आणि ‘राष्ट्रीय के मिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड’. दुर्गा पुरस्कारांचे हे सातवे वर्ष होते, तर त्याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ‘जीवनगौरव पुरस्कारा’चे हे तिसरे वर्ष होते.

एखाद्या स्त्रीने मनात आणले तर ती  कितीतरी मोठे कार्य उभे करू शकते, सोबतीला अनेकांना घेत त्याला व्यापकत्व देते आणि आलेल्या संकटांवर मात करत समाजासाठी उत्तम उदाहरण उभे करते, याची जिवंत उदाहरणेच या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा समाजासमोर आली.

सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने हा ‘दुर्गा पुरस्कार सोहळा’ आयोजित केला, यासाठी ‘ग्रॅव्हिटस फाऊंडेशन’ची अध्यक्ष या नात्याने मी ‘लोकसत्ता’चे अभिनंदन करते. अतिशय अवघड, पण महत्त्वपूर्ण विषयांवर सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य, कला या विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या ‘दुर्गा’चा सन्मान या सोहळ्यात करण्यात येतो. या उपक्रमाशी मी गेल्या वर्षांपासून ‘लोकसत्ता’बरोबर जोडली गेलेली आहे. दरवर्षी नवरात्रीच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या नऊ कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव ‘दुर्गा’ या नावाने केला जातो, हे मला विशेषत्वाने आवडले. नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर. बुद्धी, शक्ती व कला यांचा अनोखा संगम. त्यामुळे, ‘दुर्गा’ हे नाव समर्पक वाटते. या प्रत्येकीचे कार्य प्रेरणादायी आहे. ज्येष्ठ दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या सुमित्रा भावे यांना यंदाचा  ‘दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, याचा मला विशेष आनंद होत आहे. सुमित्रा भावे यांचे अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या कलाकृती आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असतात. या सर्वाचे मन:पूर्वक अभिनंदन.

– उषा काकडे, ग्रॅव्हिटस फाऊंडेशन

भारतीय संस्कृतीत दुर्गा ही स्त्रीच्या शक्तीचे प्रतीक आहे. कला, पर्यावरण, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवून समाजाला स्त्रीशक्तीची क्षमता दाखवणाऱ्या ‘दुर्गा’चा नवरात्रोत्सवानिमित्त सन्मान करणारा ‘लोकसत्ता’चा उपक्रम औचित्यपूर्ण व कौतुकास्पद आहे. या सोहळ्यात सहभागी होणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.

– डॉ. पी. अनबलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

‘लोकसत्ता दुर्गा’ सन्मान म्हणजे स्त्रीशक्तीचा सन्मान. विविध क्षेत्रांत काम करत असताना प्रत्येक आव्हानांना तोंड देऊन यश संपादित करणाऱ्या यशस्वितेचा सन्मान.  ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमात गेली कित्येक वर्षे ‘आरसीएफ’चा सहभाग असल्याचा अभिमान नक्कीच आहे, कारण ‘आरसीएफ’ व्यवस्थापन नेहमीच आपल्या आस्थापनांमध्ये स्त्री समानतेला महत्त्व देत आले आहे.

– उमेश डोंगरे, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड

‘इंडियन ऑइल’ कायमच व्यवसायाच्या पलीकडे जाऊन काम करत आले आहे. ‘पहले  इंडियन फिर ऑइल’  हे आमचे ब्रीदवाक्य ‘लोकसत्ता’च्या कार्यातून प्रतिबिंबित होताना दिसते. समाजासाठी विलक्षण कामगिरी करणाऱ्या या स्त्रियांचा सन्मान करणे हे  समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार आणि ऊर्जा आम्हालाही प्रेरित करून जातात.

– अंजली भावे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.

महाराष्ट्रातील तरुणांसाठी ‘लोकसत्ता’ आयोजित ‘दुर्गा पुरस्कार’ सोहळा अत्यंत प्रेरणादायी आणि मनोबल वाढवणारा आहे. आपली स्वप्ने तसेच ध्येयासाठी वेडे असाल तर कोणतेही काम सहज होऊन जाते. मेहनत आणि प्रयत्नांच्या जोरावर आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आल्यास न डगमगता त्यास सामोरे जाण्याची शिकवण या सोहळ्याने दिली. ‘लोकसत्ता’च्या ‘दुर्गा पुरस्कार’ उपक्रमाशी जोडले गेल्याचा मनापासून आनंद होत आहे.

– कमलेश सिंग, यश कार्स

ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा / सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ / पॉवर्डबाय : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., यश कार्स, राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि.

Story img Loader