सुनील सुकथनकर – sunilsukthankar@gmail.com
एक पुरुष म्हणून गेल्या पन्नास वर्षांत मला उमगलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमच्या मते जन्मल्यापासून मरेपर्यंत हा चित्रपट ‘आमचा’ आहे.. त्यात बायकाबियका आहेत (असायलाच हव्यात!) पण त्या सहाय्यक व्यक्तिरेखा आहेत. आम्ही काही इतर महापुरुषांच्या कथानकातली दुय्यम पात्रं असू, पण आमच्या एका चिरकुट उपकथानकाचे आम्ही नायक असणार आणि तुम्ही बायका आमचं कथानक चालवायला उपयुक्त अशा अवांतर व्यक्तिरेखा. जन्म देणं, पालनपोषण करणं, त्याग-बिग करणं या भूमिका तुम्ही नीट वठवायलाच हव्यात. पण स्वत:ला आमच्या कथानकातल्या गोष्टी घडवणाऱ्या वगैरे समजू नका!..
‘पुरुष हृदय बाई..’ या नाटय़संगीताच्या पंक्ती मनात घोळू लागताच ‘कठीण कठीण कठीण किती..’ या त्याआधीच्या चरणाची आठवण झाल्यावाचून राहात नाही. मला याची कल्पना आहे, की एका मध्यमवर्गीय, नाटय़संगीत आवडणाऱ्या, अशा एका छोटय़ाशा वर्गाचं प्रतिनिधित्व करणारं हे गीत आहे (तसंही, भारतीय किंवा अगदी मराठीदेखील, सर्व समाजाचा एकच एक ‘लसावि’ काढणार तरी कसा?). मुद्दा हा, की या गीतात ‘पुरुष हृदय’ हे कठीण आहे, त्याचा ठाव लागणं कठीण किंवा त्याला पाझर फुटणं अशक्य.. असं काहीसं लाडिकपणे म्हटलं गेलंय. आम्हा पुरुषांना ही ‘स्व-प्रतिमा’ खूप आवडते. आम्ही कठोर आहोत (मनातून मृदू असलो तरी), आमच्या भावना आम्ही व्यक्त करत नाही (तुम्हा बायकांसारखं त्याचं प्रदर्शन मांडत नाही), आम्हाला जगात निर्भीडपणे वावरायचं असतं (तुम्हा बायांसारखे आम्ही परावलंबी नाही), त्यामुळे आम्हाला शूरवीर असावंच लागतं (तुम्ही बाया बसा मुळुमुळु करत) असं आम्हा पुरुषांना मनापासून वाटतं!
एक पुरुष म्हणून मला गेल्या पन्नास वर्षांत उमगलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या मते ही सगळी (- म्हणजे हे आयुष्य वगैरे) ही मुळात ‘आमची गोष्ट’ चालली आहे. त्यात बायकाबियका आहेत (असायलाच हव्यात!) पण त्या सहाय्यक व्यक्तिरेखा आहेत. जन्मल्यापासून मरेपर्यंत ही कथा, हा चित्रपट ‘आमचा’ आहे. त्यात बायकांनी दुय्यम व्यक्तिरेखेत राहायला हवं (म्हणजे आता हेसुद्धा तुम्ही मान्य करणार नाही की काय? कमाल झाली!). आता हे खरं, की आम्ही काही इतर महापुरुषांच्या कथानकातली दुय्यम पात्रं असू. म्हणजे छप्पन्न इंची छातीचा नेता असो, की मोठय़ा उद्योगसमूहाचा प्रमुख. त्यांच्या एका महानाटय़ामध्ये आम्ही शिपुरडे असू. त्याला आमची हरकत नाही. पण त्यातल्या आमच्या आमच्या एका चिरकुट उपकथानकाचे आम्ही नायक असणार आणि तुम्ही बायका आमचं कथानक चालवायला उपयुक्त अशा अवांतर व्यक्तिरेखा.
तुम्हा बायकांचं महत्त्व कमी नाही. माता-भगिनी म्हणून जन्म देणं, पालनपोषण करणं, त्याग-बिग करणं या भूमिका तुम्ही नीट वठवायलाच हव्यात. त्याशिवाय ‘आमचं’ कथानक तयार कसं होणार? पण ते कथानक पुढे नेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तो फक्त आमच्यापेक्षा श्रेष्ठ अशा व्यवस्थेला (म्हणजे शासन, मायबाप सरकार, अमेरिका, देवादिक, नियती, वगैरे मंडळींना) आहे अर्थातच. पण त्यांनी लिहून दिलेलं कथानक आमच्या वकुबानुसार का होईना पण ‘आम्ही’ चालवू. तुम्ही स्वत:ला कथानकातल्या गोष्टी घडवणाऱ्या समजायला लागू नका, असं आम्हा पुरुषांना मनापासून वाटतं. त्यामुळेच स्त्री-मुक्ती वगैरे सगळं थोतांड आहे. काही रिकामटेकडय़ा, उपटसुंभ बायकांनी पन्नासएक वर्षांपूर्वी गोऱ्या लोकांकडून उसनवारी करून आणलेलं ते एक कुभांड आहे (आमच्या आयाबहिणींनी काय संसार केले नाहीत? त्यांच्या सोसण्यातून आमची कुटुंबं तगली, एकत्र राहिली. त्यांच्यात नाही ते हे असलं समानतेचं विष उतरलं?). आपली महान संस्कृती ही अहेवपणी मरण्याचं स्वप्न उरी बाळगणाऱ्या सुवासिनी (खरं तर सती जाणाऱ्याच म्हणायला हवं- पण ते तुमचे इंग्रजाळलेले राजा राममोहन रॉय का कुणी मध्येच आले), खस्ता खाऊन पोरासोरांची उस्तवार करणाऱ्या आया, यांनीच समृद्ध केली, असं आमचं प्रांजळ मत आहे. आणि आता तर ‘फेमिनिझम’ की काय तो शब्द कायद्यानं रद्द केला पाहिजे. संसाराची गरज म्हणून बायका नोकऱ्या-बिकऱ्यापण करायला लागल्या. त्यांना आमच्या बापा-भावांनी दिलीच की परवानगी. आता दोघं कमावते झाल्यामुळे आलेली सुबत्ता अनुभवायला लागल्यावर जर या बायका स्वत:ला पुरुषाच्या बरोबरीचं मानायला लागल्या असतील, एखाद्या हापिसात वरची जागा मिळाल्यामुळे पुरुषांपेक्षा वरचढ समजू लागल्या असतील, तर त्यांचा हा गैरसमज (अगदी सतत बलात्कार नव्हे, कधी कधी छेडछाड, कधी कुचेष्टा, कधी विकृत टोमणे, कधी चारित्र्यहनन, अशा मार्गानी, निदान घरगुती पाणउतारा करून) दूर करायला नको? उद्या त्या त्यांचंच कथानक सुरू करतील आणि आम्हा पुरुषांना दुय्यम व्यक्तिरेखा देतील. लक्षात ठेवा, आम्ही पुरुष मृत्यूपेक्षाही जर कशाला घाबरत असू, तर आम्हाला दुय्यम लेखलं जाण्याला!
भारतापुरतं बोलायचं तर त्या महात्मा जोतीबा फुलेंना उगाच काही सुचलं आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला शिकवलं. पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना तयार करताना वारसा हक्कापासून ते अनेक बाबतीत बायांना समान नागरिक मानण्याच्या दिशेनं अनेक कायदेही करून ठेवले. पण आम्ही पुरुष त्या भल्या थोर पुरुषांना फारसं मानत नाही. त्यांची थोरवी त्यांच्या जागी. स्टेजवर बोलताना वगैरे ठीक आहे. पण प्रत्यक्ष जगताना मात्र आम्हीच श्रेष्ठ आहोत हे आम्ही मनोमन जाणतो. आमच्या बाजूला खूपशा स्त्रियाही आहेत. कारण त्यांना ठाऊक आहे, की कुटुंब, समाज, राष्ट्र, खरं तर हे विश्वच- यांची घडी जर बिनतक्रार, बिनबोभाट चालायची असेल तर आम्हा पुरुषांना असणारं निसर्गदत्त प्रमुखत्व मान्य करण्यातच भलाई आहे.
आमचं प्रमुखत्व मान्य झाल्यावर मग आमच्यासारखं उदार, दिलदार कोणी नाही. वडील म्हणून आम्ही मुलग्यांपेक्षा थोडं कमी, पण बऱ्यापैकी प्रेम, माया, लेकींवरही करतोच की. पण त्या जर घर-दार, इज्जत-अब्रू यांना धक्का लावणार असतील, तर मात्र त्या आमच्या प्रेमाला पारख्या होणार हे निश्चित. भाऊ म्हणून आम्ही काय कमी काळजी घेतो बहिणींची? (रक्षाबंधन हा पवित्र सण कशासाठी आहे मग?) पण आमच्या कथानकामध्ये न बसणारं वर्तन जर आमच्या बहिणी करू लागल्या- जसं जोडीदाराची निवड स्वत:च करणं, जाती-धर्माबाहेर प्रेमप्रकरण करणं, अगदी आम्हाला न पटणारे कपडे घालणं, केसबिस कापणं, इत्यादी.. तर मग आमच्यासारखा वाईट कोणी नाही. एकूणच ‘माझ्यासारखं वाईट कोणी नाही’ हे वाक्य हा आमचा एक आवडता ‘डायलॉग’ आहे. म्हणूनच प्रेमात नकार वगैरे आम्हाला आवडत नाही. मग उगीच चेहरे विद्रूप करणारं द्रव्य फेकलं म्हणून तक्रार करू नका. उभा समाज आमच्या तशा वर्तनाला ‘एकतर्फी प्रेम’ म्हणून गौरवतो, हे लक्षात असू द्या.
अनेक महर्षी कर्वे वगैरे समाजसुधारक पुरुषांनी केलेल्या कार्यातून बायकांचा उद्धार करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली. पण त्याचा गैरफायदा घेऊन आम्हा पुरुषांची बरोबरी करण्याचा प्रयत्न बायका करू लागल्या, इथे खरी पंचाईत झाली. आम्हा पुरुषांच्या मते ‘स्त्री-पुरुष समानता’ हा शब्द ‘ओव्हररेटेड’ आहे, नातेसंबंधांचा अनावश्यक कीस पडणारा आहे, घराघरातील शांती भंग करणारा आहे. त्यामुळे त्याचा उल्लेखही आमच्या हृदयात कळ उठवणारा ठरतो. घरगुती हिंसा हा आमच्या जन्मसिद्ध हक्कांपैकी एक आहे आणि खरं तर कायद्यानं हे मान्य व्हायला हवं. पुरुषाला समाजात इतक्या तणावपूर्ण घटनांना सामोरं जावं लागतं! त्याचा त्रास होऊन उठला त्याचा हात तर किती कांगावा? ज्याचा हात उठत नाही त्यालाही आतून वाटतच असतं, की ‘नशीब समजा, माझा हात उठत नाही!’.
मुख्य म्हणजे येऊन जाऊन सगळा विषय त्या घरकामाशी येऊन पोहोचतो. मागे एक अशीच ‘उठवळ’ तरुणी तिच्या जोडीदाराला स्वयंपाकघरातली काडी इकडची तिकडे करता येत नाही म्हणून तक्रार करत होती. मग काय? आमच्यापैकी एका बाणेदार पुरुषानं ठणकावून उत्तर दिलं, ‘‘मग ‘स्विगी’ नाही तर ‘झोमॅटो’वरून मागवून घे.’’ खरंच आहे, उगीच ‘फेमिनिझम’चा किडा आम्हा पुरुषांवर सोडशील तर खबरदार. आम्ही मरेस्तोवर आमच्या आईच्या स्वयंपाकाचे गोडवे गाणार. तुम्हाला तसं कौतुक हवं असेल तर घाला मुलगे जन्माला (मुलींचा उपयोग नाही. त्या स्वत: स्वयंपाक शिकतात आणि आईशीच स्पर्धा करतात!). ते मुलगे मग जन्मभर बायकोच्या हातचं खाऊन त्याला आईच्या हाताची सर नाही म्हणत आईला अजरामर करतील. कारण आम्हा पुरुषांच्या कथानकातलं पहिलं आणि शेवटचं महत्त्वाचं स्त्री-पात्र म्हणजे आई. तिला आम्ही प्रसंगी घालूनपाडूनही बोलू. मुद्दा तो नाही. ती ते निमूटपणे ऐकून घेते याचा आम्हाला मोठा अभिमान वाटतो. तसं न वागणारी, ‘अरे ला कारे’ करणारी बायको, मैत्रीण ही आम्हाला संतापजनक वाटते. मग आईच तिचं परस्पर मुस्क्या बांधते तेव्हा तिची चांगली जिरते. आम्ही पुरुष अशा बाया-बायांच्या मूर्ख भांडणात पडत नाही. अगदीच अंगावर आलंच तर ‘बाईच बाईची वैरी’ असल्यामुळे चाललेल्या या राजकारणात आम्हीच कसे बळी आहोत, या दु:खात बुडून जातो.
मग ‘बुडायला’ कधी कधी मादक द्रव्याचीही गरज भासते. आता काही उर्मट बायका ‘आम्ही काय दमत नाही?, आम्हाला नाही का दारू लागत?’ असा प्रतिवाद करतात. पण दारू पिणाऱ्या बाईकडे समाज वाकडय़ा नजरेनं पाहातो आणि पिणाऱ्या पुरुषाकडे सहानुभूतीनं, हे काय यांना सांगून कळणार आहे थोडंच?
आता टाळेबंदीचाच काळ घ्या. देशावर एवढं मोठं संकट गुदरलेलं. त्या काळात सर्वाना घरी राहाण्याची सक्ती झालेली. यातही स्त्री-पुरुष समानतेचं खुसपट काढणाऱ्यांना देशद्रोहीच म्हणायला हवं. आमच्या सर्व ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुप्सवर आम्ही भांडी घासणाऱ्या, केर काढणाऱ्या पुरुषांच्या विनोदांच्या मालिका चालवल्या आणि खूप हसलो. खरं तर घरातले पुरुष- बाप, नवरे, मुलगे हे कडेकडेनं मदत करताहेत याविषयी उपकृत राहाण्याऐवजी आणखी अपेक्षा करणं, मुळात घरकाम हे स्त्री-पुरुष सर्वाचं आहे, अशी बकवास करणं हे कृतघ्नपणाचंच नव्हे काय?
आम्हा पुरुषांना याची नम्र जाणीव आहे, की आमच्यातले काही फुटीर स्त्रियांशी मनाचे नाजूक भावबंध गुंफणं, बरोबरीनं जगण्यातून आनंद निर्माण करणं अशा कुटील कारवायांत गुंग होत आहेत. आम्ही त्यांची यथेच्छ चेष्टा करतो. युद्ध, सैन्याचं आक्रमण, परराष्ट्राबद्दल दु:स्वास, आक्रमक नेतृत्वाबद्दल शेपूट हलवत कौतुक, क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट, शाळेतल्या मैत्रीइतकं ग्रेट काही नाही असं स्मरणरंजन, इत्यादींबद्दलचे मेसेजेस, बायकांवरचे विनोद, कितीही वय झालं तरी उघडय़ा-वाघडय़ा तरुणींचे व्हिडीओ, या
आणि अशा गोष्टींनी भरलेल्या आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुप्सवरून आम्ही त्यांना उडवून लावतो. ‘बायल्या’ म्हणतो. त्यांच्या ‘पुरुषत्वा’विषयी शंका घेतो. तरीही काही नालायक बधत नाहीत. पण त्याला इलाज नाही. ते नक्कीच संख्येनं कमी असणार हीच त्यातल्या त्यात समाधानाची बाब.
‘तर पुरुष हृदय कसे आहे बाई’ याचा हा एक विनम्र शोध. हा लेख उपहासानं लिहिला आहे, असं काही स्त्रियांना वाटेलही. पण जर एखाद्या पुरुषाला तसं वाटलं, तर मात्र त्याच्याशी
गट्टी-फू..! त्याला आम्ही आमच्यात नाही घेणार खेळायला!