मॅक्सिन बर्नसन ऊर्फ मॅक्सिन मावशी.. आज वय वर्षे एकोणऐंशी. मायभूमी अमेरिका सोडून कायमच्या भारतात आल्या त्या मराठीच्या प्रेमापोटी. फलटणमध्ये ‘कमलाताई निंबकर बालभवन’ सुरू केल्यानंतर दलित मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवासात आणण्यासाठी नगरपालिकेच्या शाळांमध्ये त्यांना भरती करण्याचं काम हाती घेतलं. मोठय़ा मुलांसाठी रात्रीचे वर्ग सुरू केले. शाळा सोडलेल्या मुली, स्त्रियांसाठी साक्षरतेबरोबर शिवणवर्ग चालू केले. पीडितांसाठी समुपदेशन व वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली. वयाच्या  ५५व्या वर्षी रिक्षा शिकलेल्या मॅक्सिन मावशी आज ‘टीआयएसएस’च्या हैदराबाद शाखेत प्राध्यापक या नात्याने भाषाविषयक कौशल्ये शिकवत आहेत. त्यांच्याविषयी..

का ही दिवसांपूर्वीची गोष्ट. टी.व्ही.च्या एका वाहिनीवर यंदाच्या वर्षीचा सन्मान पुरस्कारांचा सोहळा सुरू होता. सन्मानमूर्तीतील एका परदेशी वयोवृद्ध स्त्रीवर कॅमेरा स्थिरावला आणि निवेदिका सांगू लागली, ‘या डॉ. मॅक्सिन बर्नसन ऊर्फ मॅक्सिन मावशी.. वय वर्षे एकोणऐंशी. मूळच्या अमेरिकेच्या, पण आता तनामनाने संपूर्ण भारतीय झालेल्या एक भाषातज्ज्ञ. लहानग्या मुलामुलींना शाळेत यावंसं वाटायला हवं यासाठी त्यांनी फलटणला कमलाताई निंबकर बालभवन (क.निं.बा.) ही मराठी माध्यमाची प्रयोगशील शाळा सुरू केली, जिच्याकडे शिक्षणातील एक दीपस्तंभ म्हणून पाहिलं जातं.. छोटय़ा मुलांना मराठी वाचायला लिहायला सोपं जावं म्हणून त्यांनी एक खास पद्धत शोधून काढलीय.. शिक्षणविषयक कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.. सातारा येथील साहित्य संमेलनात (१९९२) त्यांना गौरवण्यात आलंय.. ‘डॉटर्स ऑफ महाराष्ट्र’ या प्रसिद्ध पुस्तकात त्यांचा समावेश आहे. ‘ए चान्स टू ड्रीम’ नावाचा माहितीपटही त्यांच्यावर तयार केलाय.. वगैरे वगैरे. सत्कारानंतर त्यांनी अस्खलित मराठीत भाषण केलं. त्यांना भेटावंच असं ठरवलं आणि त्यांचा फोन मिळवून मी लावलादेखील. दुसऱ्याच क्षणाला अतिशय मृदू आवाजात शब्द आले, ‘हॅलो, मी मॅक्सिन, मॅक्सिन मावशी- कोण बोलतंय?’ काहीतरी जुजबी बोलून मी फोन ठेवला. मात्र त्यानंतर झपाटल्यासारखी त्यांची माहिती मिळवण्यामागे लागले. त्यांची पुस्तकं वाचली, त्यांच्यावरची फिल्म बघितली. (त्या सध्या हैदराबादला राहात असल्याने) त्यांच्याशी व क.निं.बा.च्या संचालिका डॉ. मंजूताई निंबकर  यांच्याशी फोनवरून बोलले आणि अंती मॅक्सिन मावशींच्या प्रेमात आकंठ बुडाले.
अमेरिकेतील एस्कनाबा मिशिगन येथे मॅक्सिनचा जन्म झाला. वडील  लोहखनिज बोटीवर भरण्याचं काम करत तर आई गृहिणी. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची. मॅक्सिन लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. बारावीत असताना तिने जॉन म्यूल या पत्रकाराचं व्याख्यान ऐकलं. त्याने केलेला भारताचा अभ्यास ऐकतानाच तिने इकडे यायचं ठरवून टाकलं. महाविद्यालयीन वयातच ‘ग्रामीण भारताच्या समस्या’ या विषयावर तिने पहिला छोटासा शोधनिबंध लिहिला.
न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून एम.ए. (इंग्रजी) करताना तिची गुरगुंटा-सेहगल या विदुषीशी भेट झाली. मॅक्सिनची भारतभेटीची तळमळ पाहून गुरगुंटाबाईंनी तिचा हैदराबादच्या विवेकवर्धिनी कॉलेजचे प्राचार्य सातवळेकर यांच्याशी संपर्क साधून दिला. त्यांनी मॅक्सिनला आपल्या महाविद्यालयात शिकवण्यासाठी पाचारणही केलं, पण पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी तिने आयोव्हामधील एका कॉलेजात २ वर्षे प्राध्यापकी केली आणि त्यानंतर १९६१ मध्ये ती भारतात आली.
हैदराबादमध्ये मॅक्सिन सातवळेकरांच्याच घरी राहिली. हे घर तिचं दुसरं माहेर झालं. देवपूजेसाठी फुलं गोळा कर, सकाळी बंब पेटव, भाजी चीर.. अशी छोटी-मोठी कामं आपणहून करत तिने सातवळेकर आई-भाऊंचं मन जिकलं. या घराशी तिचे सूर एवढे जुळले की दोन वर्षांनी अमेरिकेला परत गेल्यावर या आईवडिलांच्या आठवणीने ती चक्क ‘होमसिक’ झाली होती. मॅक्सिनची मराठी भाषेची, मराठी संस्कृतीशी, तसंच रामायण-महाभारतासारख्या महाकाव्यांशी याच घरी ओळख झाली. मराठी भाषा शिकताना आपला अनुभव डॉ. मॅक्सिन यांनी ‘जीव घाबरा करणारी भाषा’ या लेखात खूपच गमतीशीरपणे मांडलाय. त्यांनी लिहलंय, ‘इकडे येण्याआधी हा देश शांतताप्रेमी व अहिंसावादी आहे, अशी माझी ठाम समजूत होती. पण माझा मराठीचा अभ्यास सुरू झाला अन् माझ्या कल्पनांना सुरुंग लागला. अगदी पहिल्याच दिवशी आमचे मराठीचे शिक्षक म्हणाले, ‘मारामारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्य़ातून मी आलोय. ‘मी तुला मारीन’ या वाक्यासाठी मराठीत अनेक वाक् प्रचार आहेत. मी तुला तुडवीन.. मी तुला वाजवीन. तुझं नरडं दाबीन.. तुझ्या नरडय़ावर पाय ठेवीन.. इ. त्या म्हणतात की प्रथम मला वाटलं फक्त साताऱ्यापुरती ही भाषा असावी. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की ही वृत्ती मराठी भाषेतच भिनली आहे. अक्षरांचे पाय मोडणे, पोट फोडणे आणि पुढे तर ‘ध चा मा’ करून काय झाले ते इतिहासात शिकवले जाते. मराठी माणसं काय काय खातात याची एक धमाल यादीच त्यांनी या लेखात दिलीय, ती अशी.. ही माणसे बोलणी खातात, डोकं खातात, वेळ खातात, मार खातात, अक्षरं खातात, पैसे खातात अणि कधी कधी तर शेणही खातात. त्यांचा हा लेख वाचताना वाटतं की आपल्या भाषेचा या अंगाने खचितच कोणी विचार केला असावा.
   मराठीची गोडी लागल्यावर मात्र त्यांनी या भाषेचा एवढा सखोल अभ्यास केला की पुढे स्नेही जाई निंबकर  यांच्यासमवेत अमराठी प्रौढांना मराठी शिकण्यासाठी उपयुक्त पडतील अशी तब्बल ९ पुस्तकं लिहिली. त्यात एक व्याकरणसंदर्भ पुस्तक व एक शब्दकोश यांचा समावेश आहे.
हैदराबादच्या कॉलेजमध्ये २ वर्षे शिकवल्यावर त्यांनी भारताच्या भाषिक प्रश्नांवर अधिक अभ्यास करायचं ठरवलं आणि त्या दृष्टीने तयारी करण्यासाठी त्या पुन्हा मायदेशी गेल्या. सातवळेकर आईंमुळे त्यांची इरावती कर्वे यांच्याशी ओळख झाली होती. त्यांनी मॅक्सिनना अभ्यासाकरता ‘फलटण’ हे गाव सुचवलं. तिथे राहणारी त्यांची मुलगी जाई निंबकर सर्व मदत करेल, असंही सांगितलं. त्यानुसार १९६६ मध्ये त्यांनी फलटणमध्ये पहिलं पाऊल टाकलं. पुढे तीच त्यांची कर्मभूमी झाली. त्यांच्या पीएच.डी.चा विषय होता, ‘फलटण शहरातील मराठी बोलीमधील सामाजिक विविधता’ या अभ्यासासाठी भारतात येऊन संशोधन करण्याकरता त्यांना ‘फुलब्राइट’ फेलोशिप मिळाली.
 सुरुवातीला त्यांना वाटलं की फक्त डॉक्टरेट करण्यापुरताच आपला या गावाशी संबंध आहे. पण हे गाव, इथली माणसं त्यांना इतकी आवडली की मातृभाषेतून शिक्षण देणारी शाळा काढण्याचं आपलं स्वप्न त्यांनी फलटणमध्येच राहून पूर्ण करण्याचं ठरवलं. डॉ. मॅक्सिन म्हणाल्या की निबंकर कुटुंबानं त्यांना प्रेमाने बांधून ठेवलं नसतं तर आज त्यांचा पत्ता मु.पो. अमेरिका हाच असता. फलटणमध्ये राहण्याचा निश्चय झाल्यावर इथल्या मातीशी सर्वार्थाने एकरूप होण्यासाठी प्रथम त्यांनी आपलं अमेरिकी नागरिकत्व रद्द केलं व १९७८ पासून त्या भारतीय नागरिक बनल्या. त्याच वर्षांपासून त्यांनी फलटणच्या दलित वस्तीतील शालाबाह्य़ मुलांना अनौपचारिकरीत्या शिकवायला सुरुवात केली. याच कामाची परिणती पुढे प्रगत शिक्षण संस्थेच्या स्थापनेत झाली.
‘कमलाताई निंबकर बालभवन’ सुरू करण्यासाठी कारणीभूत ठरली ती मंजूताई निंबकर  यांची ४ वर्षांची छोटी लेक समीरा! शाळेतील चौकटीबद्ध शिक्षण घेण्यास नकार देणाऱ्या समीराला मॅक्सिन मावशीचं शिकवणं जेव्हा पसंत पडलं तेव्हाच त्यांना प्रकर्षांने जाणवलं की केवळ दलित मुलांनाच नव्हे तर पांढरपेशा घरातील मुलांनाही हसत-खेळत शिकवण्याची गरज आहे. आपली शाळा सुरू करतानाच ती पूर्णपणे निधर्मी असेल हेही त्यांनी ठरवून टाकलं होतं. १९८६ ला सुरू झालेल्या त्यांच्या शाळेची पहिली तुकडी १९९७मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाली.
सुरुवातीला दलित मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवासात आणण्यासाठी डॉ. मॅक्सिन यांनी अनंत अडथळे पार करत त्यांना नगरपालिकेच्या शाळांमध्ये भरती करण्याचं काम हाती घेतलं. दिवसा कामावर जाणाऱ्या मोठय़ा मुलांसाठी रात्रीचे वर्ग सुरू केले. शाळा सोडलेल्या मोठय़ा मुली व निरक्षर महिलांसाठी साक्षरतेबरोबर शिवणवर्ग चालू केले. फलटणमधील मंगळवार पेठ या दलित वस्तीत क्षय रोगाचं प्रमाण खूप होतं. घराघरात दारू होती. अशा पीडितांसाठी संस्थेमार्फत समुपदेशन व वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली. एव्हाना सायकलवरून फिरणारी ही गोरी बाई सर्वाच्या परिचयाची झाली होती. लोक तिला प्रेमाने ‘मॅक्सिन मावशी’ म्हणू लागले.
मुलांचे अनुभव, त्यांची भाषा शाळेत आणण्यासंदर्भातील एक अनुभव मॅक्सिन मावशींनी सांगितला. त्या म्हणाल्या, ‘एकदा आमच्या शाळेतील एक बाई मुलांना गोठा दाखवायला घेऊन गेल्या. तिथून आल्यावर मुलांनी गाईगुरांची चित्रं काढली आणि त्यानंतर मुलांनी सांगितली तशी वाक्यं बाईंनी फळ्यावर लिहिली. एका मुलीने सांगितलं, ‘गाय वासराला चाटतिया.’ हे वाक्य तसंच फळ्यावर लिहिलं गेलं, अशा प्रकारे नेहमीच मुलांची भाषा स्वीकारली गेली. ती शुद्ध नाही, असं कोणी म्हणू नये याची काळजी घेतली.
आपली शाळा फलटण तालुक्यातील इतर शाळांसाठी एक साधन केंद्र असावी, हे डॉ. मॅक्सिन यांचं स्वप्न होतं,आहे. म्हणूनच १९९० मध्ये ‘अशोका फाउंडेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून मदत मिळाल्यावर त्यांनी प्रगत शिक्षण संस्थेतर्फे तालुक्यातील इतर शाळांसाठी एक प्रोग्रॅम सुरू केला. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमधून संस्थेचे वाचनलेखन प्रकल्प, स्लाइड शोज व विज्ञानजत्रा हे उपक्रम सुरू झाले. मंजूताई निंबकरांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाला पूर्णविराम देऊन शाळेसाठी पूर्णवेळ (बिनपगारी) मुख्याध्यापकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तर मावशींच्या शाळा व शाळाबाह्य़ उपक्रमांनी चांगलंच बाळसं धरलं. २००५ मध्ये रतन टाटा ट्रस्टकडून भरघोस मदत मिळाल्यावर संस्थेतर्फे भाषा, साक्षरता व शिक्षणसंदर्भात एक केंद्र सुरू झालं आणि त्यानंतर मॅक्सिन मावशींनी आपलं संपूर्ण लक्ष या प्रकल्पावर केंद्रित केलं. त्या म्हणतात, ‘‘जोपर्यंत माझ्या देशात शिक्षणापासून वंचित मुलं आहेत, तोपर्यंत माझं काम चालूच राहणार.’’
उषाताई मोडक या सामाजिक कार्यकर्तीने आपल्या फाऊंडेशनतर्फे प्रगत शिक्षण संस्थेला, मॅक्सिन मावशींच्या तालुक्यातील संचारासाठी एक रिक्षा भेट दिली. त्या वेळी म्हणजे वयाच्या ५५ व्या वर्षी त्या रिक्षा चालवायला शिकल्या. रिक्षात बसवून मुलांना इकडून-तिकडे नेणारी, येणाऱ्या-जाणाऱ्यांची थांबून विचारपूस करणारी ही मावशी फलटणकरांच्या आदराचा विषय न बनली तरच नवल!
एक भाषातज्ज्ञ या नात्याने मुलांनी मातृभाषेतूनच शिक्षण घ्यावं हा त्यांचा आग्रह आहे. सत्तरच्या दशकाच्या मध्यापासून त्यांनी या संदर्भात अनेक लेख इंग्रजी व मराठी वृत्तपत्रांतून लिहिले. १९९९ पर्यंत त्या एक वर्षांआड अमेरिकेत असोसिएटेड कॉलेज ऑफ मिडवेस्टमध्ये विद्यार्थ्यांना स्प्रिंग ओरिएंटेशन कोर्सअंतर्गत मराठी शिकवायला जात होत्या. डॉ. मॅक्सिन यांचे आपल्या नातेवाईकांशी आजही पूर्वीइतकेच जिव्हाळ्याचे नाते आहे.
मराठी अभ्यास परिषदेच्या संस्थापक सदस्यांपैकी त्या एक आहेत. २००४ पासून टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) मुंबई येथे एम.ए. एज्युकेशन हा अभ्यासक्रम शिकवायला त्यांनी सुरुवात केली. २०१२मध्ये त्यांनी फलटण सोडलं व टीआयएसएसच्या हैदराबाद येथील नव्या शाखेत प्राध्यापक म्हणून त्या रुजू झाल्या. आजही त्या तिथे भाषाविषयक कौशल्ये शिकवत आहेत. त्या म्हणतात, ‘बहुभाषिक चौफेर कौशल्य, श्रवण, संभाषण, वाचन व लेखन संपादन करून वैचारिक देवघेवीसाठी वापरणे ही काळाची गरज आहे.’
 ध्येयापोटी आयुष्यभर एकटय़ाच राहणाऱ्या    डॉ.मॅक्सिन यांचं वास्तव्य सध्या हैदराबादला असलं तरी त्यांचं फलटणमधील घर आजही जसंच्या तसं आहे. फलटणमधील त्यांच्या घरात दासबोध, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी अशा गं्रथांपासून गौरी देशपांडेंच्या कवितासंग्रहापर्यंत सर्व प्रकारची पुस्तकं आहेत. यापैकी लक्ष्मीबाई टिळकांचं ‘स्मृतिचित्रे’ हे त्यांचं आवडतं पुस्तक व श्री. ना. पेंडसे हे लाडके लेखक. मराठी बाण्याच्या खुणा त्यांच्या घरी जागोजाग दिसतात. ‘गोड बोला पण मराठीत,’ ‘शिव्या दिल्यात तरी त्याही मराठीत..’ आदी जागोजागी लिहिलेलं आढळतं.  लिहिण्यावाचण्यासाठी, ‘मांडी व समोर बैठं टेबल’ अशी भारतीय बैठकच त्यांना पसंत आहे. आवडणाऱ्या मराठमोळ्या पदार्थाची त्यांची यादी थालीपीठ, खिचडी-कढी, शेंगदाण्याची चटणी, पालकाची पातळभाजी, आमरस-पुरी अशी न संपणारी आहे. एकूणच हा आधारवड आता इथल्या मातीत मुळं घट्ट धरून उभा आहे.    n
 sampadawagle@gmail.com
 मॅक्सिन बर्नसन
maxinebentsen@gmail.com

Bangladeshi nationals residing in Pimpri issued passports from Goa Pune news
पिंपरीत वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांनी गोव्यातून काढले पासपोर्ट
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Story img Loader