मुलं आणि पालक यांच्यात रोजच्या रोज होणारा संवाद कोणत्या पातळीवरचा आहे. गुणात्मक आहे, उत्साहवर्धक आहे की मुलांचा आत्मविश्वास गमावणारा आहे हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे, विशेषत: नोकरदार पालकांसाठी. त्यासाठी काही मुद्दे..
आजकाल बहुतेक घरांमध्ये आई-वडील दोघेही नोकरी करणारे असतात. कामाच्या विचित्र वेळा, प्रवासातला वेळ आणि कार्यालयीन कामं वेळेत पूर्ण करण्याची धडपड या चक्रात ते अडकलेले असतात. नेमक्या या परिस्थितीत पालक म्हणून आपली भूमिका निभावणे म्हणजे एक आव्हानच असते. हा सगळा व्याप सांभाळून आपल्या किशोरवयीन मुलांचे पालनपोषण करणे, त्यांना हवं-नको ते पाहणे म्हणजे एक रोमांचक अनुभव असतो. हा अनुभव अधिक सुखकर करण्यासाठी ही काही सूचनावजा माहिती.
घरातील किशोरवयीन मुलांना एक प्रौढ व्यक्ती म्हणूनच वागवणे गरजेचे आहे. कुटुंबातील सगळ्या सदस्यांचा मिळून एक गट बनतो. या गटातील प्रत्येकाला संघटित ठेवणे आणि येणाऱ्या समस्या एकत्रितपणे सोडवणे हे या कुटुंब नावाच्या गटाचे मुख्य काम असते. या गटात घरातील किशोरवयीन मुलांनाही सामील करून घेतले पाहिजे; त्यांना लहान न मानता एक प्रौढ व्यक्ती म्हणून वागवले गेले तर नात्यातील दरी कमी होते आणि आता आपणही या घराचा अविभाज्य भाग आहोत ही जाणीव उत्साह वाढवते. घरासाठी लागणारे सामान आणणे असो किंवा कौटुंबिक पातळीवर घेतले जाणारे छोटे-मोठे निर्णय असो, या प्रत्येक प्रक्रियेत जर किशोरवयीन मुलांना सहभागी करून घेतले तर नात्यांचे बंध अधिक दृढ होतात. जी मुले घरातील वडीलधाऱ्यांच्या अनुपस्थितीत घरगुती कामं करतात ती मुले इतर मुलांच्या तुलनेत अधिक शांत, आनंदी, समाधानी दिसून येतात. भाज्या कापून-निवडून ठेवणे, गृहपयोगी वस्तूंची खरेदी करणे, सगळ्यांनी मिळून घराची साफसफाई करणे अशा रोजच्या घरगुती कामांमध्ये नोकरदार पालकांनी आपल्या किशोरवयीन मुलांना सहभागी करून घेतले तर फारच चांगले, कारण या छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून मुलांचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो आणि रोजच्या आयुष्यातील कसब ते अंगिकारतात. मुलांच्या सर्वागीण विकासाला या गोष्टी पूरक ठरतात.
दुसरी गोष्ट संभाषण वा संवाद. संवाद ही एक कला आहे असे आपण म्हणतो. घरातील संवाद आणि कार्यालयीन संवाद या दोन्ही ठिकाणी ही कला साधता आली पाहिजे. बरेचदा पालक आपल्या मुलांशी फोनवर बोलताना एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात. अभ्यास केला का, टीव्ही लावला नाही ना किंवा मग जेवलास-जेवलीस का असे प्रश्न विचारतात. संभाषणात तोचतोपणा आला की एकतर ते कंटाळवाणे होते आणि दुसरे म्हणजे दोन व्यक्तींमध्ये अंतर निर्माण करते. अशा संवादातून कुणी उलट तपासणी घेत असल्याचा भास होतो. त्यापेक्षा गप्पा मारल्या तर? त्याच्या पातळीवर जाऊन थोडे हसून, चेष्टा करत बोलले तर? मुलांनाही आपले आई-वडील पोलीस वाटत नाहीत. फोनवरून प्रश्नांची सरबत्ती करण्यापेक्षा दिवसभरातील गमती-जमती, ऑफिसमधील गोष्टीं किंवा मग अवांतर विषयांवर साध्या गप्पा जरी मारल्या तरी ते बोलणे आनंददायी होते आणि आपल्यालाही ताजेतवाने करते. मग मुलांनाही फोनवर आपण आपल्या आई-वडिलांशीच बोलत असल्यासारखे वाटते. मुलांनाही त्यांच्या विश्वातील घडामोडी सांगाव्याशा वाटतात. यातून दोन व्यक्तींमधील अंतर कमी होते आणि गप्पांचा ओघ दोन्हींकडून वाहू लागतो. जेव्हा असे होते तेव्हा त्या गप्पांमध्ये एक नैसर्गिक सहजता येते आणि त्या अधिक आनंददायी होतात. आपल्याला हेच तर हवे असते. गप्पांचे विषय अनेक असू शकतात. त्यात जेवढे वैविध्य असेल तेवढय़ा त्या अधिक रंजक होतात. मग सकाळी ऑफिसला जाताना आईने पुस्तकात ठेवलेली एखादी लहानशी चिठ्ठीसुद्धा मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवते आणि ही अनपेक्षित गोष्ट पुन्हा गप्पांचे कारण बनते. ऑफिसमध्ये काम करीत असताना पालकांनी मध्ये थोडा वेळ ब्रेक घ्यावा आणि त्या वेळेत प्राणायाम किंवा थोडी विश्रांती घ्यावी किंवा मग ताण हलका करणाऱ्या आणि विरंगुळा देणाऱ्या काही इतर गोष्टी कराव्यात.
रिकामी घरे म्हणजे सैतानाची कोठडी असते. दिवसभर घरात मुले एकटीच असतात. मुलांवर अति लक्ष ठेवणे जसे अयोग्य तसेच अशा वेळी मुलांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणेही अयोग्यच. त्यांच्या चुकीच्या सवयींकडे दुर्लक्ष करण्याची सवय संकटाला आमंत्रण देते. मुलांवर पूर्ण विश्वास टाका पण डोळे झाकून नाही तर उघडय़ा डोळ्यांनी असे आम्ही नेहमी सांगतो. बरेचदा पालकांमधील व्यसनाधीनता हीदेखील मुलांच्या संगोपनात मारक ठरते. मग घरात एकटी असताना मुले या व्यसनांकडे वळू शकतात. पालकांची जीवनशैली जर निकोप, निरोगी, निरामय नसेल तर मुलांना घरात सतत एका सशक्त, निरोगी वातावरणाची पोकळी जाणवत राहते. दारू, ड्रग्स, सिगरेट याचा जसा आरोग्यावर वाईट परिणाम होतो तसाच नात्यांवरही होतो. संभाषणातून विश्वास आणि प्रेम दोन्ही प्रतीत होत असतात. उदा. ‘ऑफिसमध्ये तुझ्या विचाराने माझ्या मनावर ताण येतो.’ हे सांगण्यातून काळजी दिसून येते, पण त्याऐवजी ‘तुझ्यावर माझा विश्वास आहे’ यातून आश्वासक सूर जाणवतो. वागण्या-बोलण्यात पारदर्शकता असेल तर ते वातावरण नात्यास पोषक ठरते आणि नाते अधिक चांगले फुलून येते. घरात कुणी नसताना आपल्याला काय वाटते किंवा मनात काय काय विचार येतात हे एकमेकांसमोर अगदी खुलेपणाने मांडणे हे चांगल्या संवादाचे उदाहरण आहे. मनात येणाऱ्या विचारांना वाट मोकळी करून दिल्याने मनावरचा ताण हलका होतो आणि अनेक प्रश्नांची उत्तरेही सापडतात. मग एकटेपणा जाणवत नाही. पालकांनी आणि मुलांनी सकाळी घरातून निघताना दिवसभराचा आपापला कार्यक्रम परस्परांना सांगितला तर त्यातून संवादाची देवाणघेवाण होत राहाते आणि ते चांगले लक्षण आहे. संवादातील खरेपणा आणि स्वभावातील प्रेमळपणा यातून नात्याची भक्कम इमारत उभी रहाते. अशा नात्यांमध्ये मग सैतानाच्या हवेलीला जागा नसते.
चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑफिसनंतरच्या गप्पा बहुतेक पालकांना आपण आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ  शकत नाही याची खंत वाटत असते. पण तुम्ही किती वेळ देता यापेक्षा ज्यावेळी पालक आणि मुले घरात एकत्र असतात त्यावेळी किती उत्कटतेने चर्चा, गप्पा होतात ते महत्त्वाचे आहे. मुलांबरोबर वेळ घालवावा हे वाटण्यातील तीव्रता महत्त्वाची असते. स्वयंपाकघरात, बेडरूममध्ये किंवा टीव्ही पाहताना पालकांच्या आजूबाजूला मुले घुटमळत असतात त्यावेळीसुद्धा मुलांशी अगदी खोलवर गप्पा मारता येतात. असे क्षण म्हणजे हितगुज करण्याची योग्य वेळ असते, पण पुन्हा मुद्दा येतो तो संवाद कौशल्याचा. हे संवाद उपदेशात्मक किंवा अविश्वास दाखविणारे नसावे तर भावनांची कदर करणारे असावेत. उदा. ‘तू कधीच नीट अभ्यास करीत नाहीस किंवा तू फुकट गेला आहेस, तुझा काही उपयोग नाही’ असे बोलणे टाळलेलेच चांगले. त्यापेक्षा,‘ तू परीक्षेकडे दुर्लक्ष केलेस त्याचे मला फार वाईट वाटले’ किंवा ‘मला बरे नसताना तू माझी काळजी घेतलीस मला खूप भरून आले आणि विश्वास वाटला.’ अशा पद्धतीने बोलले गेले तर ते संवाद सुबोध होतो. मुलांचे म्हणणेसुद्धा नीट आणि शांतपणे ऐकून घेतले पाहिजे. दिवसातून किती वेळा गप्पा मारता यापेक्षा तुमच्या गप्पा किती आनंददायी आणि मुलांसाठी स्फूíतदायक ठरतात. त्यांना पुढे जायला मदत करतात हे महत्त्वाचे आहे. त्या गप्पांचा सारांश लक्षात राहिला तर मुलांना बाजूला घेऊन वेगळे समजावयाची गरज भासत नाही, गप्पांमधून पुरेसा संदेश पोहचतो.
पाचवा मुद्दा म्हणजे आणीबाणीचे प्रसंग हाताळणे – घरात आणीबाणीचे प्रसंग येणे हा जीवनाचाच एक भाग आहे आणि अशी परिस्थिती म्हणजे बदल घडवून आणण्याची एक उत्तम संधी असते. गर्ल फ्रेंड किंवा बॉय फ्रेंडशी झालेला ब्रेकअप असो किंवा इतर काही समस्या असो, अशा वेळी मुलांपासून दूर न जाता त्यांना जवळ घ्या आणि त्यांच्याशी बोलत राहा. त्यांना एकटे टाकू नका किंवा ‘तुझे तू निस्तर, आम्ही येणार नाही’ असा आविर्भाव नको. या वयात मुले शाळा-कॉलेजला वरचेवर दांडी मारतात, परीक्षेत नापास होतात, पैसे पळवतात, कुठेतरी मित्रांबरोबर भांडण करतात आणि पालकांना त्या गोष्टी फार उशिरा कळतात. ज्या घरांमध्ये वागण्या-बोलण्यात मोकळेपणा आणि पारदर्शकता असते त्या घरांमध्ये अशा समस्या हुशारीने हाताळल्या जातात. पालकांनी  त्यांच्या आजूबाजूला घडलेल्या किंवा त्यांच्या  बाबतीत घडलेल्या चुकीच्या गोष्टी, वाईट प्रसंग यावर घरात मुलांसमोर खुलेपणाने चर्चा केली पाहिजे आणि त्या त्या प्रसंगांमध्ये काय चुका झाल्या, त्या कशा सुधारल्या याचीही अनौपचारिक चर्चा केली जावी. मुले जेव्हा अशा गोष्टी ऐकतात  तेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यात घडत असलेले काही बरे-वाईट प्रसंग पालकांशी शेअर करावेसे वाटतात. आणि मग मुले स्वत:हून चुकीची कबुली देतात. जसे की, मी कॉपी करताना पकडला गेलो, मी आज सिगरेट ओढून पहिली वगैरे..चुकीची कबुली जितक्या लवकर दिली जाते तितक्या लवकर सुधारणा घडवून आणता येते. पण जेव्हा मुले प्रमाणाच्या बाहेर झोपत असतील किंवा रात्र रात्र जागरण करीत असतील, उदास बसत असतील, आत्मविश्वास गमावून बसली असतील तर पालकांनी ताबडतोब समुपदेशकाची मदत घ्यायला हवी.  जीवनशैलीचे व्यवस्थापन हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा-नोकरदार पालकांनी प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमांना, कौटुंबिक समारंभांना उपस्थित राहण्याचे बंधन आपल्यावर घालून घेऊ  नये. वर्षांतील काही सुट्टय़ा या फक्त आपल्या मुलांबरोबर वेळ देण्यासाठीच राखून ठेवल्या पाहिजेत, सुट्टय़ांचे नियोजन मुलांना करू द्यावे. भीती, अश्रू आणि राग घालविण्याचे सोपे उपाय म्हणजे शांत झोप, योग्य आहार आणि एकत्र केलेला व्यायाम. विशेषत: सर्व आयांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्या काही कुणी जादूच्या बाहुल्या नाहीत, तेव्हा त्यांनीसुद्धा स्वत:च्या सकस आहारावर आणि शांत झोपेवर लक्ष ठेवले पाहिजे. कामाचा ताण सगळ्या चांगल्या गोष्टींची विल्हेवाट लावतो म्हणून तो ताण वेळीच दूर केला पहिजे तरच घरात प्रसन्न वातावरण नांदू शकेल आणि ते मुलांमधेही झिरपेल.
डॉ. हरीश श़ेट्टी -harish139@yahoo.com
शब्दांकन-मनीषा नित्सुरे-जोशी

good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास