आल्टरनेटिव्ह उपचार पद्धती विकसित केली, ज्यात ओंकार उच्चारण्याच्या ६४ पद्धती आहेत. ओंकार साधनेचा प्रसार हेच जीवनध्येय बनलेल्या
डॉ. जयंत करंदीकरांविषयी..
म न कोणी दाखवू शकत नाही तरी मनाचं अस्तित्व आपण मानतो, त्याच्या स्वास्थ्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाकडे जातो. मग भारतीय अध्यात्मशास्त्रात नादचैतन्य ‘ॐ’ हाच जीवात्मा आहे व तोच परमात्मा आहे, असं ठामपणे म्हटलं असताना आत्म्याचं अस्तित्व का नाकारायचं? हा प्रश्न विचारणारा कुणी ऐरागैरा नाही, तर डॉ. जयंत करंदीकर नावाच्या एका प्रथितयश डॉक्टरचा हा प्रश्न आहे; पण ते नुसता प्रश्न विचारून थांबले नाहीत, तर ‘ओंकार इति इदं सर्वम्’ हा वेदान्तातील सिद्धान्त त्यांनी वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध करून दाखवलाय.
७० वर्षांच्या या अहमदनगरस्थित ज्ञानयोग्याने गेली १५-१६ वर्षे प्रचंड संशोधन करून ‘ॐ शक्ती व्हाइस एनर्जी थेरपी’ ही जगातील होलिस्टिक अाल्टरनेटिव्ह उपचार पद्धती विकसित केलीय, ज्यात ओंकार उच्चारण्याच्या ६४ पद्धती आहेत. शिवाय श्वासपटलावर आधारित श्वसनाचे २० प्रकार, ध्यानाच्या विविध क्रिया असं बरंच काही त्यात आहे. आजवर हजारो गरजवंतांनी या उपचार पद्धतीचा लाभ घेतलाय. वैद्यकीय उपचाराबरोबर ५००च्या वर शिबिरं, अगणित व्याख्यानं, असंख्य मुलाखती अशा सर्व माध्यमांतून ओंकार साधनेचा प्रसार हेच आता डॉक्टरांच्या आयुष्याचे ध्येय बनलंय.
विस्मित करणारी गोष्ट म्हणजे हृदयाची कार्यक्षमता समजण्यासाठी ज्याप्रमाणे आपण ईसीजी काढतो त्याप्रमाणे आलेल्या साधकाच्या वा रुग्णाच्या प्राणशक्तीचं व जीवशक्तीचं बल मोजण्यासाठी डॉक्टर ई.व्ही.ई.जी. (इलेक्ट्रो व्हॉइस एनर्जी ग्राफ) काढतात. यासाठी त्यांनीच शोधलेल्या उपकरणाद्वारे त्या व्यक्तीचं बल कळलं, की इतर कोणत्याही तपासण्या न करता सरळ ओंकार उच्चारण उपचार सुरू. अशा प्रकारे व्याधीमुक्त झालेल्या अनेक रुग्णांचे अनुभव त्यांच्यापाशी आहेत.
या अभ्यासामागची डॉक्टरांची प्रेरणा म्हणजे ज्ञानेश्वरीतील ओव्या. या ओव्यांनाच ते सद्गुरूस्थानी मानतात. खरं तर ओंकार साधनेकडे वळण्यापूर्वी म्हणजे वयाच्या ५०-५२ पर्यंत ते आपलं हॉस्पिटल व गायनाचा छंद या दोन गोष्टींतच गुरफटले होते. संगीत विशारद व पुणे आकाशवाणीचा ‘अ’ श्रेणीचा गायक अशी दोन बिरुदं नावापुढे लागली होती. गाण्याचे कार्यक्रम करत असताना ज्ञानेश्वरीतील ओव्यांना संगीत देण्याची कल्पना त्यांना सुचली आणि ‘ज्ञानेश्वरी अमृतगंगा’ या नावाने ज्ञानेश्वरीतील काही निवडक ओव्या निरूपणासह सादर करायला त्यांनी सुरुवात केली. ज्ञानेश्वरी लिहून ७०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टरांनी हा कार्यक्रम ठिकठिकाणी केला. पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईच्या चरणाशी आपली कला रुजू करण्याचं भाग्यही त्यांना लाभलं. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे ज्ञानेश्वरांना समाधी घेऊन ७०० वर्षे झाली, त्या वर्षी ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्याचं अप्रतिम वर्णन करणारे नामदेवांचे १४४ अभंग त्यांच्या हाती आले. त्यातील १६ अभंग घेऊन ‘संजीवन समाधी ज्ञानेशाची’ हा नवा कार्यक्रम निरूपणासह बसवला. त्याचेही अनेक प्रयोग झाले. संतांच्या या ओव्या-अभंगांतून त्यांचा ओंकाराशी संबंध आला तरी नाळ मात्र जुळली नव्हती. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ यावी लागते, असे म्हणतात. इथंही तसंच झालं.
तुम्ही गायलेल्या ओव्यांची कॅसेट काढाच, असा आग्रह लोकांनी धरल्याने डॉक्टर एकदा रेकॉर्डिगसाठी एका स्टुडियोत गेले; पण अकस्मातपणे त्यांचा गळा त्यांना साथ देईना. एका कसलेल्या गायकासाठी हा धक्का सहन करण्यापलीकडचा होता. त्या बेचैन मन:स्थितीत, ‘एक डॉक्टर असून स्वत:च्या खराब गळ्यावरचा उपाय तुला माहीत नाही?’ हे रेकॉर्डिग करणाऱ्या मित्राचे शब्द त्यांच्या जिव्हारी लागले. या घटनेवर अंतर्मुख होऊन विचार करताना एकाएकी ज्ञानेश्वरीतील एक श्लोक त्यांच्यासमोर प्रकटला.
कष्टले संसार शीणे।
जे देवो येती गाऱ्हाणे
तथा ओ नावे देणे। तो संकेतु
म्हणजे या विश्वात जे दु:खी, कष्टी, पीडित आहेत, त्यांच्या हाकेला जो ओ देतो तो हा ओंकार. यापुढे जाऊन त्यातील गर्भितार्थ डॉक्टरांनी शोधला तो असा की, ओंकार प्रतिसाद देईल; पण केव्हा? जेव्हा त्याला अचूक शब्दात साद घालू तेव्हाच. म्हणजेच त्याचं योग्य उच्चारण केलं तरच तो मदतीला धावून येईल.
ही खूणगाठ मनाशी पक्की झाल्यावर ओंकार उच्चारणाच्या मार्गदर्शनासाठी डॉक्टरांनी अनेक साधुसंतांची भेट घेतली. ओंकार-माहात्म्य सर्व जाणत होते; पण शास्त्रशुद्ध उच्चार कसा करावा याबद्दल कोणीही ठामपणे सांगू शकलं नाही. मग त्यांनी स्वत:च अभ्यास सुरू केला. गीता, उपनिषदं, संतसाहित्य वाचून काढलं. आधुनिक आवाजशास्त्र व वाणीशास्त्र यांचा अभ्यास केला. अशा पुऱ्या ३ वर्षांच्या संशोधनातून अखेर त्यांना आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ते म्हणजे ओंकार उच्चारताना ओनंतर बिंदूमात्रा यायला हवी व नंतर ती यकाराच्या गुंजनात मिसळली पाहिजे. हे ग्राह्य़ जाणल्यावर त्यांनी बिंदूमात्रा जाणवेल अशा प्रकारे साडेतीन मात्रांच्या ओंकाराचा उच्चार बसवला आणि त्याला नाव दिलं तरंग ओंकार. एकूण ७ सेकंदांच्या या ओंकार उच्चारणात ‘ओ’ चार सेकंद, ‘ओं’ एक सेकंद व ‘म’ २ सेकंद अशी ही विभागणी आहे.
त्यानंतर सतत अभ्यास करून डॉक्टरांनी ओंकार उच्चारणाच्या अनेक पद्धती शोधून काढल्या. हा विषय जाहीरपणे मांडण्यासाठी त्यांना १९९९ साली पहिली संधी मिळाली. नाशिकच्या गांधर्व महाविद्यालयातर्फे अखिल भारतीय गानशिक्षक परिषद घेण्यात आली होती. त्यात ‘आवाजशास्त्र ओंकारशास्त्र’ या विषयावर बोलण्यासाठी त्यांना अर्धा तास देण्यात आला होता; पण प्रत्यक्षात ते बोलायला उभे राहिले आणि समोरच्या ५०० तज्ज्ञ गायकांनी त्यांना थांबूच दिलं नाही. सलग अडीच तास ते बोलतच राहिले. या अभूतपूर्व प्रतिसादानंतर डॉक्टरांनी गायकांची शिबिरं घेण्यास सुरुवात केली. त्याबरोबर आपल्या रुग्णांना वैद्यकीय उपचारांबरोबर ओंकार थेरपीची जोड देणं त्यांनी चालू केलं. यातून अविश्वसनीय परिणाम मिळू लागले. त्यांचा स्वत:चा गळा तर ३ महिन्यांतच पूर्वीपेक्षाही सुरेल झाला आणि आजही तो तितकाच श्रवणीय आहे.
ओंकाराची महती पटल्याने आजवर अनेक मोठे गायक डॉक्टरांकडे उपचारासाठी वा मार्गदर्शनासाठी येऊन गेले आहेत. त्यातील काही नावं अशी- पं. फिरोज दस्तूर, यशवंत देव, सोनाली राठोड, सुनिधी चौहान, रवींद्र साठे, मिलिंद इंगळे, अनुराधा मराठे असे अनेक. एवढंच नव्हे, तर गोवा सरकारच्या सांस्कृतिक खात्याने तिथल्या गायकांसाठी डॉक्टरांचं अडीच दिवसांचं एक शिबीरही पणजीत आयोजलं.
ओंकाराच्या सुयोग्य उच्चारणाने वाणीदोष १०० टक्के नाहीसे होतात, असं ठाम प्रतिपादन करताना डॉक्टर म्हणाले की, ज्याप्रमाणे मोबाइल एकदा संपूर्णपणे चार्ज केला, की बराच काळ कार्यक्षम राहतो, त्याप्रमाणे रोज सकाळी २० मिनिटांची डॉक्टरांनी विकसित केलेली ओंकार साधना केली, की पुढचे २४ तास तुम्ही उत्साही व ताजेतवाने राहू शकता.
ओंकार उच्चारणातील शास्त्रदेखील त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, साधनेची सुरुवात कधीही भरपूर श्वास घेऊन करायची नाही. श्वास नेहमी बोलल्यासारखा सहज आला पाहिजे. त्याचबरोबर दोन ओंकार उच्चारणामधील श्वास सप्तांगाने (तोंडाने, कंठाने, पोटाने, सहज, लयबद्ध, फुप्फुसांच्या मागच्या भागातून व खालच्या दिशेने) घेतला पाहिजे. त्यांच्या संशोधनानुसार ओंकार उच्चार सहज, लयबद्ध, नादमय, तेजोमय, मंदिराच्या गाभाऱ्यातून आल्याप्रमाणे, घंटानादासारखा व तेलाच्या धारेसारखा यायला हवा. त्याने साधकाचं मन प्रसन्न व्हायला हवं. दमछाक होता कामा नये आणि तो पुन:पुन्हा उच्चारायची ओढ लागायला हवी.
‘खुले आकाश, प्रकृती झकास’ हे या थेरपीसाठी डॉक्टरांनी शोधलेलं घोषवाक्य. कंठाचं आरोग्य खुललं तरच पेशींचं आरोग्यही फुलतं. परिणामी शरीरातील रोम रोम कार्यरत होतात. हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना ते म्हणाले की, ओंकाराच्या साडेतीन मात्रा मनुष्याच्या शरीरातील षट्चक्रांवर स्थित असल्यामुळे ओंकार साधनेमुळे सूक्ष्म नाद चैतन्याची मोहळं असलेल्या षट्चक्रांची शुद्धी होते व त्यांच्या कार्यात समतोल राहतो.
नगरपासून १५ कि.मी. अंतरावर डोंगरगण येथील ७ एकर जागेत डॉ. करंदीकरांचा ‘ओम् शक्ती व्हाइस एनर्जी थेरपी सेंटर’ हा ट्रस्ट वसलेला आहे. आरोग्य, अध्यात्म व संगीत अशा तीन पातळ्यांवर इथे काम चालतं. इथले उपचार सशुल्क आहेत; परंतु डॉक्टरांनी आपले काही शिष्य तयार केले आहेत. ते सर्वसाधारण व्यक्तींना निरोगी राहण्यासाठी ओंकाराचा मंत्र विनामूल्य शिकवतात. यातील एक नाव म्हणजे कल्याणचे श्रीकांत रानडे. आनंदाची गोष्ट म्हणजे आता लवकरच मुंबईतही श्रीकृपा चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने डॉ. करंदीकरांचं नवं केंद्र सुरू होणार आहे.
डॉक्टरांच्या घराला सामाजिक जाणिवांचा वारसा आहे. त्यांची आजी (आईची आई) जानकीबाई आपटे यांनी ७१ वर्षांपूर्वी म्हणजे १९४३ साली दलित मुलींच्या शिक्षणासाठी नगरमध्ये बालिकाश्रम हे वसतिगृह सुरू केलं. त्यांच्यानंतर डॉक्टरांच्या आई स्वातंत्र्यसैनिका माणिकताई करंदीकर यांनी त्याची जबाबदारी घेतली आणि आता गेली २५ र्वष डॉक्टर या संस्थेचे ट्रस्टी आहेत. त्यांचे वडीलही स्वातंत्र्यसैनिक होते. आयुर्वेदाचं शिक्षण घेतलेल्या त्यांच्या वडिलांनी म्हणजे करंदीकर गुरुजींनी आपलं आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी वाहून घेतलं. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉक्टरांनी १९७९ मध्ये कुष्ठरोग्यांच्या निरोगी मुलांसाठी बालसदन उभारलं. गेली ३५ वर्षे या ट्रस्टची धुराही डॉक्टरांच्या खांद्यावर आहे. ही सामाजिक दृष्टी म्हणजे डॉक्टरांच्या ओंकार साधनेतील कर्मयोगच म्हटला पाहिजे.
करंदीकरांचं घर म्हणजे डॉक्टरांचं एक पोळंच आहे. पत्नी गीता करंदीकर या स्त्री रोगतज्ज्ञ असून स्वत:चा पेशा सांभाळून त्या डॉक्टरांना ओंकार प्रसारात मदत करतात. मुलगा मानसोपचारतज्ज्ञ, मुलगी भूलतज्ज्ञ, जावई फिजिशियन, सून समुपदेशक असा सगळा परिवार एकमेकांना पूरक आहे.
डॉक्टरांची ओपीडी आता डोंगरगणला सेंटरवरच असते. वैद्यक विषयातील परिषदांमध्ये ते याच विषयावरचा पेपर वाचतात. ॐ जीवेश्वर तराणा ही शास्त्रीय संगीतातील नवी तराणा पद्धती त्यांनी विकसित केलीय. या कार्यक्रमाचे प्रयोगही सुरू असतात.
अवघं जीवनच ॐ मय झालेल्या डॉक्टरांचा ओसंडून वाहणारा उत्साह बघून मी सहज विचारलं, तुमचं वय किती हो? यावर ते म्हणाले, शरीराचं म्हणाल तर ७०, मनाचं २५ आणि आत्म्याचं १५. त्यांचं पुढचं वाक्य आपणा सर्वाना विचार करायला भाग पाडेल असं. ते म्हणाले, जर आपण सर्वानीच ही साधी, सोपी, बिनखर्चाची थेरपी अंगीकारली
तर काही वर्षांनी आपोआपच समस्त भारतीयांचं आत्मिक वय १५ असेल यात शंका नाही.
waglesampada@gmail.com
संपर्क – डॉ. जयंत करंदीकर
ई-मेल – omomkar@rediffmail.com
www.omshaktimusic.com
वळसा वयाला : अवघं ॐमय जीवन
‘ओंकार इति इदं सर्वम्’ हा वेदान्तातील सिद्धान्त प्रमाण मानत डॉ. जयंत करंदीकरांनी ‘ॐ शक्ती व्हाइस एनर्जी थेरपी’ ही जगातील होलिस्टिक
आणखी वाचा
First published on: 06-12-2014 at 01:29 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omkar sadhana workshop by dr jayant karandikar