palak-balakघरात बाबांची जागा नुसते पसे मिळवून सिद्ध होणार नाही तर आपल्या मुला- माणसांवर प्रेम करणं, संसारातल्या जबाबदाऱ्या समजणं, आत्मकेंद्रित न राहणं यातून घरं पूर्ण होतील. मुलांना आई आणि वडील ही ‘संपूर्ण माणसं’ पालक म्हणून मिळूदेत. हा पालकत्वातला महत्त्वाचा धडा आहे.

शा ळेत पालकसभांना, पालक शिक्षणाच्या वर्गाना स्त्रियांची संख्या जास्त असते. पुरुष पालक त्यामानाने कमी येतात. पालकत्वाबद्दल ऐकलं की स्त्रिया म्हणतात, ‘आम्हाला सगळं कळलं; आता जरा मुलांच्या बाबांना हे शिकवा.’ प्रश्न असा असतो की बरेचसे बाबा काही शिकायला तयार नसतात. हे अगदी गरीब वर्गातही तसंच आहे, मध्यम वर्गातही आहे आणि उच्च वर्गातही.
 मुलांना एकदा शाळेत विचारलं होतं, ‘आई घरात काय काम करते?’ मुलांनी भली मोठी यादी लिहिली आणि वडील काय काम करतात? असं विचारल्यावर काहीच काम सुचेना. बऱ्याच वेळाने एक मुलगा म्हणाला, ‘पेपर वाचतात.’ बाईंनी म्हटलं, ‘आणखी काहीच नाही काम करत? आठवून बघा.’ तेव्हा आणखी एका मुलीने सांगितलं, ‘‘बाबा झोपून पेपर वाचतात.’’ असंच एकदा व्यायामाबद्दल गप्पा चालू होत्या. कोणाकोणाचे आईबाबा व्यायाम करतात असं विचारल्यावर एका मुलीने सांगितलं, ‘आईला वेळच नसतो. बाबा बोटांचे फक्त तीन व्यायाम करतात. एक पसे मोजतात. दोन चेकवर सही करतात. तीन टी. व्ही.चा रिमोट वापरतात.’ ही मुलांची उत्तरे आहेत ती सत्य परिस्थिती सांगणारीच आहेत.
अलीकडे असा प्रश्न पडावा की, ‘बाबांना बायको, घर, मुलं ‘आपली’ वाटतच नाहीत का?’ अशी परिस्थिती आहे. त्यांच्याबद्दलची कर्तव्यं त्यांना कळत नाहीत का? व्यसनांच्या आहारी जाणारे बाबा (मग ते व्यसन पसे मिळवण्याचं असो, दारूचं असो, छानछोकीचं असो, बायकोच्या जीवावर जगण्याचं असो.), बाहेरख्याली बाबा, मारहाण करणारे बाबा, घरात पसे न देणारे बाबा, बेजबाबदार बाबा, पहिली मुलगी झाली म्हणून बायकोला माहेरी पाठवणारे बाबा, जेवण मनासारखं नाही म्हणून ताट भिरकावणारे बाबा, घरी न फिरकणारे बाबा किती म्हणून गुण वर्णावेत? इतरांना न दिसणारी आणखी एक महत्त्वाची भूमिका काही बाबा पार पाडत असतात ती म्हणजे सेक्सवरून बायकोला हैराण करणं. आम्ही मागणी केली की तुम्ही ती पुरवलीच पाहिजे असा त्यांचा खाक्या असतो. काही याउलटही वागून बायकोला त्रास देतात.
 पालकत्वाच्या शिक्षणात असं म्हणतात की, ‘तुमच्या मुलांसाठी तुम्हाला काही करावंसं वाटत असेल तर मुलांच्या आईवर मनापासून प्रेम करा.’ बाबांचं आईवर खरंखुरं प्रेम असलं तर घरात शांती राहील, वातावरण चांगलं राहील, मुलं सुखानं वाढतील.
बाबांची भूमिका घरात राक्षसाची नाही, बागुलबुवाची नाही तर प्रेमळ वडिलांची आहे. गिजुभाई बधेका शिक्षणतज्ञ होते. त्यांना मोठय़ा मिशा होत्या. ते फार प्रेमळ होते म्हणून त्यांना ‘मूँछोवाली माँ’ म्हणायचे. आज घराघरात मूँछोवाली माँची गरज आहे. बायकोला, मुलांना मारू नका, त्यांचा अपमान करू नका हा पहिला धडा आहे. घरातली आपली अरेरावी करणारा बाबा अशी आहे की जबाबदार, घर सुखाचं करणारे बाबा अशी आहे? एकदा ‘बालभवन’चे एक बाबा पालक माझ्याकडे आले. ते म्हणाले, ‘‘ताई, तुम्ही नेहमी म्हणता ना, मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देत जा. परवा मी त्याच्या प्रश्नांना सगळी उत्तरं दिली ते तुम्हाला सांगायचंय.’’ इतकं जागरूक बाबा बघून मला तर फार आनंद झाला. मी विचारलं, ‘‘काय विचारत होता अनीश?’’ ते म्हणाले, तो मला म्हणाला, ‘‘बाबा तुम्ही मरणार का?’’ मी दचकलोच. पण शांतपणे म्हटलं, ‘‘हो मरणार.’’ मग म्हणाला, ‘‘आई पण मरणार का?’’ मी म्हटलं, ‘‘हो.’’ त्याचं थांबेचना. आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी, आत्या, मावशा सगळे मरणार का. असं विचारत होता. शेवटी मी म्हटलं, ‘‘हे बघ, जो जो जीव जन्माला येतो तो मरतोच.’’ लगेच तो म्हणाला, ‘‘मग ज्यांचे सगळे लोक मारून जातात, त्या मुलांनी कुठे राहायचं?’’ मी म्हटलं, ‘‘असते एक जागा, तिला अनाथाश्रम म्हणतात.’’ तो लगेच विचारतो कसा, ‘‘आपण अनाथाश्रमात जाऊयात का?’’ मी माहिती काढली. त्याला घेऊन गेलो. अनाथाश्रम बघून तो कोणते प्रश्न विचारेल असं मला वाटलं होतं, त्याचा धुव्वा उडवत म्हणाला, ‘‘इथे सर्वाना अंघोळी कोण घालतं?’’ त्यावर मी म्हटलं, ‘‘माझ्याइतकं कोणी चांगलं नाही घालत, पण जेमतेम घालतात कोणी तरी.’’ तो म्हणाला, ‘‘बाबा, तुम्ही या लोकांना पैसे देऊन ठेवा ना, म्हणजे मी आलो कधी तर ते मला सांभाळतील.’’ मी तर थक्कच झालो. पण ताई, मला तुम्हाला असं विचारायचं होतं, की मी उत्तरं बरोबर दिली की नाही?
मीदेखील थक्क झाले होते. मी त्यांना म्हटलं, ‘‘त्याने विचारलेल्या सर्व प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिलीत, पण त्याने जो प्रश्न विचारलाच नाही त्याबद्दल तुम्ही काहीच म्हणाला नाहीत. तो जेव्हा सगळे मरणार का म्हणाला, तेव्हा भीतीने त्याला ताब्यात घेतलं होतं. तेव्हा तुम्ही त्याला पोटाशी घेऊन म्हणायला हवं होतं, ‘‘अरे, मी, तुझी आई एवढे मोठे आहोत तरी आमचे आई-बाबा आहेत की नाही अजून. तू काही काळजी करू नकोस. तू पण मोठा होईपर्यंत आम्ही सगळे असू.’’ मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देणं म्हणजे पेपर सोडवणं थोडंच असतं? त्यातलं लॉजिक, त्याचं बौद्धिक उत्तरं मुलांना हवं असतं? ते मूल मनात काय विचार करतंय ते आपल्याला कळायला हवं. मुलांशी एवढं बोलणारे बाबाही दुर्मीळच म्हणायचे!
घरात शुद्ध अिहसेचं वातावरण असलं तरच सर्वाना स्वातंत्र्य अनुभवता येतं. घराबाबत आणि समाजाबाबतही हे खरं आहे. अगदी सुशिक्षित, उच्चशिक्षित बाबांनाही हे कळत नाही. बऱ्याच वर्षांपूर्वी पालकत्वाबद्दल माझं ‘आपली मुलं’ हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा आमचा एक पत्रकार मित्र म्हणाला होता, ‘मूल वाढवण्यात मजा असते हे माझ्या पहिल्यांदाच लक्षात आलं, तुझं पुस्तक वाचून. नाहीतर मी आपला मुलीला डॉक्टरकडे जायचं असलं तरी नुसता बायकोबरोबर जायचो. आता मला मुलीची काळजी वाटते, तिला सांभाळण्यातला आनंद कळतो.’  मला फार बरं वाटलं होतं.
घरात िहसक वडील असले तर मुलगे असं शिकतात की असंच वागायचं असतं आणि मुली मनात खूणगाठ बांधतात की नवरा हा प्राणी असा त्रासदायक असतो. आपण लग्नच नाही करायचं. केलं तर नवऱ्याशी प्रेमाने नाही वागायचं. मग हा सिलसिला पिढय़ान् पिढय़ा चालू राहतो. परिणामी समाज अस्वस्थ राहतो.
‘वन मिनिट फादर’ नावाचं एक पुस्तक आहे. खूप सुंदर लिहिलं आहे. त्यात सांगितलंय की, बाबांना वेळ नसतो तर मध्येच एखादं मिनिट मुलांशी बोला. मूल काही छान करीत असेल तर जवळ जा. पाठीवरून प्रेमानं हात फिरवा. म्हणा की, हे तू फार छान करतो आहेस बरं का. मुलाला आनंद होईल वडील कौतुक करतात म्हणून. कधी मूल चांगलं वागत नसेल, तर तेवढय़ा प्रेमाने त्याच्याजवळ जा, पाठीवर हात ठेवा, प्रेमळपणे म्हणा, ‘‘हे मात्र तुझं मला आवडत नाही बरं का. असं कोणीच करायचं नसतं.’’ त्याला कळेल की बाबा आपल्याकडे लक्ष देतात, प्रेमळपणे बोलतात आणि बाबांशी त्याची मैत्री वाढत जाईल. बाबांनाही कळेल की मुलांचा सहवास छान वाटतो. एकच मिनिट का? पुढच्या वेळी १५ मिनिटं मुलाशी गप्पा मारू. आणखी मैत्री करू. अशी मैत्री वाढत जाते.  विशेषत: घरात न बोलणाऱ्या, संवाद टाळणाऱ्या तरुण मुलांशी असा एका मिनिटांत संवाद साधायला हवा. त्याच्या कशाला तरी चांगलं म्हणा. बघा काय जादू होते!
माधुरी पुरंदरे यांना नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांच्या पुस्तकामधला बाबा मुलांना अंघोळ घालतो, सुटीच्या दिवशी मुलांना टेकडीवर नेतो. पक्षी, दगड, फुलपाखरं, सरडे दाखवतो. घरात आईला मदत करतो. गणपतीची आरास करतो. भिंतींवर सुंदर चित्रं काढतो. कधी मुलांना जुने फोटो दाखवत बसतो. मुलीच्या शाळेचा वर्ग रंगवून देतो. भुताच्या गोष्टी सांगतो. मुखवटे घालतो. मुलांना असा बाबा किती प्रिय असेल!
माझे वडील आमच्या लहानपणी सर्वानी एकत्र बसून रात्री जेवावं असा आग्रह धरत. (त्याकाळी टी. व्ही. नव्हते.) आणि जेवताना आम्हाला प्रश्न विचारत. विचारात पाडत. एकदा ते म्हणाले,  ‘ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली तेव्हा निवृत्तीनाथांनी कुठे दगड ठेवला?’’ हा काय प्रश्न! उत्तर साधं आहे. म्हणून भाऊ म्हणाला, ‘‘अर्थातच समाधीच्या दारावर.’’ आम्ही काहीतरी उत्तर दिलं. त्यावर ते म्हणाले, ‘‘ निवृत्तीनाथांनी स्वतच्या हृदयावर तो दगड ठेवला.’’ याचा अर्थ समजण्याचं तेव्हा माझं वय नव्हतं पण मी अजूनही त्या वाक्याचा विचार करत असते. फार मोठय़ा संवेदनक्षमतेचं बीज वडिलांनी आमच्या मनात पेरलं होतं, कुठलंही भाषण न देता. हीदेखील वडिलांची भूमिका असते.
‘‘आईने मुलाला कुशीत घ्यावं आणि जग किती प्रेमळ आहे ते त्याला दाखवावं. तर वडिलांनी मुलाला उंच टेकडीवर न्यावं आणि जग किती मोठं आहे ते त्याला दाखवावं. मुलाला लहानपणी मिळालेलं प्रेम त्याला संवेदनक्षम बनवतं आणि त्यानं मोठं जग पाहिलेलं असलं तर तो विशाल हृदयाचा होतो.’’
अलीकडे काही बाबा घरात कामं करू लागलेत त्यामुळे मुलगे कामं करू लागतील आणि बायका किती कामं करत असतात हे कळून त्यांच्यातली माणुसकी जागृत राहील. घरात बाबांची जागा नुसते पसे मिळवून सिद्ध होणार नाही तर आपल्या मुला- माणसांवर प्रेम करणं, संसारातल्या जबाबदाऱ्या समजणं, आत्मकेंद्रित न राहणं, सतत स्वतच्याच सुखाकडे न पाहणं यातून घरं पूर्ण होतील.
मुलांना आई आणि वडील ही ‘संपूर्ण माणसं’ पालक म्हणून मिळूदेत. हा पालकत्वातला महत्त्वाचा धडा आहे. मुलांना सतत शिकवण्याची बाबांना सवय असते, ती विसरायला हवी. मुलांना खूप कळत असतं. एकदा एका श्रीमंत वडिलांना वाटलं की, आपल्या मुलाला गरिबीचं एक्सपोजर मिळावं. ते त्याला घेऊन एका खेडय़ात, शेतावर राहायला गेले. धनगराचं घर होतं. मेंढय़ा होत्या. मुलगा खूश होता. तो नदीत डुंबला, रात्री उघडय़ावर झोपला. कोकरांशी खेळला आणि मग ते चार दिवसांनी घरी परत जायला गाडीत बसले. वडील मुलाला म्हणाले, ‘‘आता तुला कळलं का, की गरिबी कशी असते?’’ मुलगा म्हणाला, ‘‘हो बाबा. मला चांगलं कळलं आहे. बघा ना, आपल्याकडे एकच कुत्रा आहे, त्यांच्याकडे चार कुत्रे आहेत. आपला स्विमिंग पूल किती लहान आहे. त्यांच्या घरापासून किती तरी अंतरापर्यंत नदी वाहते आहे. आपण आपल्या बागेत वीसच दिवे लावलेत. त्याचं सगळं आकाश रात्री चांदण्यांनी चमकत असतं. बाबा, आता मला चांगलं कळलं, आपण किती गरीब आहोत!’’
शोभा भागवत – shobhabhagwat@gmail.com

International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Laxman Dhoble is in the Pawar group and son abhijit dhoble in opposition role
मोहोळमध्ये ढोबळे पिता-पुत्राचे निराळे सूर!
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…