पसायदानात एक ओळ आहे, ‘भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ हे दोन जीवांचे मैत्र लक्ष्मीनं मला दिलं, शिकवलं. फक्त माणसा-माणसातलंच नातं जाणवणाऱ्या आणि प्राण्यांना घाबरून असणाऱ्या मला लक्ष्मीनं आयुष्यात पहिल्यांदा एका आदीम मैत्रीची ओळख करून दिली, अनुभव दिला. हे मैत्र म्हणजे दोन जीवांचं मैत्रं, मग ते दोन जीव म्हणजे दोन माणसं असतील किंवा माणूस आणि हत्ती असेल किंवा माणूस आणि आणखी कुणी..
माझ्या आसपास मी अशी अनेक माणसं पाहिलीत ज्यांच्यासाठी त्यांनी पाळलेला प्राणी म्हणजे पोटचं पोर असतं. मग तो कुत्रा असेल, मांजर, वाघ, सिंह किंवा सापसुद्धा.. पास्कल नावाच्या विचारवंताचं एक वाक्य आहे- ‘द मोअर पीपल आय मीट, द मोअर आय लव्ह माय डॉग.’ अगदी आता आतापर्यंत ही गोष्ट माझ्या समजुतीच्या बाहेरचीच होती, कारण लहानपणापासून मला कुठल्याही प्राण्याची फक्त भीतीच वाटलेली आहे. आपण ज्या गोष्टीला घाबरतो ती जास्तच आपला पिच्छा पुरविते, या न्यायानं माझ्या आयुष्यात गेल्या वर्षांपर्यंत प्राण्यांकडून घाबरवून घ्यायचेच प्रसंग फार आले.
 लहानपणी शेतातल्या घरी एक कुत्रं मागं लागलं होतं. हा प्रसंग बघणाऱ्यांनी मला सांगितलं. ते खरं तर माझ्याशी खेळत होतं, पण मी घाबरून पळायला लागल्यानं तेही माझ्या मागे पळायला लागलं. एकदा आमच्या साताऱ्याच्या घरी मी कुंडीतल्या झाडाला पाणी घालायला गेले, तर त्या कुंडीत एक साप वेटोळं घालून बसला होता. त्याला बघून जागच्या जागी थिजूनच गेले. एवढंच काय, मैत्रिणीचं बघून मीही एक मांजराचं पिल्लू पाळलं, पण मीच त्याला इतकी घाबरायचे, की ते चक्क कंटाळून घर सोडून निघून गेलं! त्यानंतर मी अभिनयाच्या क्षेत्रात आल्यानंतर एका टूरबरोबर परदेशात गेले होते. तिथे एक फार छान प्राणिसंग्रहालय होतं. काही प्राणी पिंजऱ्यात होते, पण काही छोटे निरुपद्रवी प्राणी त्यांना सांभाळणाऱ्या माणसांबरोबर मोकळेच फिरत होते. त्यात एक मध्यम आकाराचा गोड चिंपाझी होता. सगळी लहान मुलं त्याच्याबरोबर फोटो काढत होती. काही मोठी माणसंही त्यात सामील होती. मीही त्याच्याबरोबर फोटो काढावा असा माझ्याबरोबरच्यांनी आग्रह धरला. खरं तर मला भीती वाटत होती, पण दाखवणार कसं म्हणून मी कसंनुसं हसत सुरक्षित अंतर राखून त्या चिंपाझीशेजारी उभी राहिले, तर तो गधडा चक्क माझ्याजवळ सरकला आणि त्यानं माझ्या गळ्यात हातच टाकला. यावर समोरचे सगळे हसायला लागल्यावर तो अजूनच चेकाळला आणि त्याने चक्क माझ्या गालाची पापी घेतली! मी घाबरून गार आणि शरमून लाल! तर तो मवाली चिंपाझी चक्क दात विचकत हसत होता!
 त्याच दरम्यान आमच्या घरात अचानक उंदीर पर्व सुरू झालं. कधी साधी पालही न दिसणाऱ्या माझ्या घरात एके दिवशी मी कुलूप उघडून आत शिरले, दिवा लावला आणि कुणीसं तुरुतुरु पळालं. धडकी भरली. घरात मी एकटीच. नवरा येईपर्यंत बाहेरच्या खोलीत सोफ्यावर पाय वर घेऊन बसून राहिले. नवरा आल्यावर त्यानं काठय़ा आपटून त्या उंदराला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो गायब! नंतरही बऱ्याचदा असं व्हायचं. मी एकटी असले की, कुणीसं तुरतुरत असायचं घरभर. त्या तुरतुरणाऱ्यालाही कळलं असणार, माझा नवरा त्याला मारील, पण मी त्याला पुरती घाबरते. त्यामुळे नवरा घरी नसताना तर तो माजत, गर्वानं भरभर फिरायचा. माझ्याच घरात मीच कानकोंडली. एके दिवशी मी घाईघाईनं बाहेर निघालेली असताना ते पिटुकलं काळुंद्र अचानक समोर आलं. मी नेहमीप्रमाणे थिजून गेले. त्यानं बाहेरच्या खोलीत धूम ठोकली. ते काळुंद्र बाहेरच्या खोलीत आहे म्हटल्यावर माझी बाहेर जायची हिंमत होईना. हतबल व्हायला झालं. शेवटी मी मधल्या खोलीतल्या कॉटवर पाय वर घेऊन बसले. आर्त स्वरात मोठय़ांदा त्या काळुंद्रय़ाला ऐकू जाईल, अशा आवाजात म्हणाले, ‘‘हे बघ, इथे हे घर बांधलं जाण्याआधी कदाचित या जमिनीतच तुझं बीळ असेल. ते आमच्या घरांमुळे उखडलं गेलं असेल. तुला त्यामुळे घरच उरलं नसेल. तरीही हे साकडं, तुला या घरात फिरायचं तर फिर एक वेळ, पण कृपा कर आणि मला काही केल्या दिसू नकोस. मला तुझी भीती वाटते. कृपया काही झालं तरी माझ्या समोर येऊ नकोस!’’ त्या पिटुकल्याला मराठी कळत असावं. त्या काटर्य़ाबरोबर मी हा अलिखित करार केला आणि त्यानं तो चक्क पाळला! सफरचंदाला घेतलेले चावे, बटाटय़ांवरचे दात यातनं तो आसपास आहे किंवा येऊन गेला हे कळायचं, पण तो पठ्ठा त्यानंतर कधीही माझ्यासमोर आला नाही, पण त्यानं माझ्या इतक्या भाज्या-फळं नासवली की, माझ्या नवऱ्यानं कसकसले उपाय करून घर उंदीरमुक्तच करून टाकलं.
उंदरांच्या कचाटय़ातून सुटते तोच एका सिनेमाच्या चित्रीकरणासाठी म्हशीवर बसण्याची वेळ आली. चित्रीकरणासाठी मिळालेली म्हैस पोटुशी होती. मी तिच्या पाठीवर बसायला गेले तेव्हा साहाय्यक दिग्दर्शकांनी तिला पकडून ठेवली होती. मी तिच्यावर बसताच आमचा दिग्दर्शक ओरडला, ‘अ‍ॅक्शन!’ तत्क्षणी ती उधळली आणि कोण हाहाकार माजला! समोर तळं होतं त्या तळ्याच्या दिशेनं तिनं धाव घेतली. मी तीनताड उडून खाली पडले. चित्रीकरण गावात होतं, तिथले जमलेले गावकरी हसले. माझा दिग्दर्शक रडायच्या बेताला आला. खाली पडलेल्या मला उचलायचे सोडून एक गावकरी उद्गारला, ‘‘ताई, हितं जमिनीवर कशाला पडली तू? ती म्हस पान्यात पडली तशी तू बी पान्यातच पडायचं ना, मंजी ढुंगान शेकलं नसतं!’’ म्हणजे त्याचं म्हणणं मी म्हशीवरून पडताना विचार करायचा का, आता इथं नको पडायला त्यापेक्षा पाण्यात पडलं तर इष्ट होईल, असा?? त्या सिनेमात म्हैस माझी जवळची मैत्रीण दाखवली होती. तिनं मला पाडल्याच्या दुसऱ्याच दिवशी मी घर सोडून पळून जाते आणि जाण्याआधी तिच्या गळ्यात पडून रडते, असा प्रसंग चित्रित करायचा होता. मला ब्रह्मांड आठवलं. त्या वेळी उंदराबरोबरचा अनुभव कामी आला, ‘सुसंवाद’! मी तिच्यासमोर चक्क हात जोडून उभी राहिले. म्हटलं, ‘‘बाई गं, कृपा कर, मी तुझ्या गळ्यात पडल्यावर मला शिंगांनी उडवू नकोस. मी शरण येते तुला,’’ म्हणून साष्टांग नमस्कार घातला. कॅमेरा रोल झाल्यावर देवाचं नाव घेऊन तिच्या गळ्यात पडले. उंदरासारखंच हिलाही  मराठी येत असावं. कारण माझ्या विनंतीला मान देऊन ती दिग्दर्शकाचं ‘कट’ म्हणेपर्यंत शांत उभी होती! या सगळ्यानंतर अखेर एका चित्रपटानिमित्तानं माझ्या आयुष्यात ‘लक्ष्मी’ नावाची हत्तीण आली. गेल्याच वर्षी. माझी भूमिका हत्तिणीच्या माहुताच्या बायकोची होती. एका प्रसंगात मला ‘लक्ष्मी’ला आंघोळ घालायची होती. त्या प्रसंगाची आणि एकूणच भूमिकेची तयारी म्हणून माझं ‘लक्ष्मी’बरोबर ट्रेनिंग होतं. तिला पहिल्यांदा भेटायला गेले तेव्हाच तिचा माहूत मला म्हणाला, ‘‘सबसे इंपरटट बात दीदी, आप घबराओ मत। हाथी को सब पता चलता है। हाथी क्या कोई भी जानवर ले लो आप। अगर आप मन में घबराये हैं तब आप भले कुछ बोलो ना, सिर्फ उसको हाथ लगाओगे तभी उसको पता चल जाएगा, फिर लक्ष्मी भी घबराएगी। फिर घबराके वो गुस्सा हो जाती है। फिर उसको संभालना मुस्कील हो जाता है।’’ त्या माहुतानं हे फार शांतपणे आणि छान समजावलं. मी ते लक्ष देऊन ऐकलं. एक खोल श्वास घेतला आणि तिच्या सोंडेला हात लावला. वर तिच्या डोळ्यात पाहिलं. ती शांत वाटली. तिची खरबरीत सोंड मी हळूच कुरवाळली तर तिनं ती हळूच उचलून माझ्या डोक्यावरून फिरवली. आशीर्वादासारखी. तत्क्षणी माझ्या आत काहीसं हललं आणि मी तिच्या प्रेमातच पडले. तिच्या समजूतदारपणात माझं घाबरणं, क्षणात विरघळलं. तिचा माहूत म्हणाला होता तसं माझं घाबरणं जसं तिला न सांगता कळलं असतं तसंच माझं प्रेमही तिला तत्क्षणी कळलं. न सांगता. त्या क्षणापासून पुढचे चित्रीकरणाचे सगळे दिवस तिनं माझ्यावर आणि माहुताची भूमिका करणाऱ्या नचिकेतवर निस्सीम प्रेम केलं. नचिकेत तिच्या सोंडेवरून पाठीवर चढतो त्या प्रसंगात तो पडू नये म्हणून ती तिच्या मानेची दिशा बरोबर हलवून त्याला सांभाळून घ्यायची. नंतर तर तिचं आमचं नातं इतकं गहीरलं की सिनेमात आमच्यावर संकट येतं आणि आम्ही घाईघाईनं चंबुगबाळं आवरून पळून जातो, असा प्रसंग चित्रित होत असताना मी त्या प्रसंगाचा भाग म्हणून आरडाओरडा करायला लागले तर चालू प्रसंगात लक्ष्मी चक्क तिच्या सोंडेनं माझ्या पाठीवर थोपटवल्यासारखं करायला लागली! ‘काय झालं? शांत हो!’ अशा अर्थानं. तेव्हा तर मला तिच्या चांगुलपणानं गलबलून आलं. लक्ष्मीनं तिच्या प्रेमानं माझ्यातलं काहीतरी आमूलाग्र बदललं होतं. माझ्यातलं मलाच माहीत नसलेलं ‘काहीसं’ जागं केलं होतं. ते नेमकं काय होतं हे मला तिच्याबरोबर असताना आकळलं नाही. ते मला जाणवलं, परवा, साऊथ आफ्रिकेत! तिथे आम्ही सहलीला गेलो होतो, अशा जंगलात जिथे आपण बंद गाडीतनं फिरायचं आणि आपल्या आसपास सिंह, चित्ते मोकळे फिरत असतात. तिथे सरपटणाऱ्या प्राण्यांना मात्र एका वेगळ्या मोठय़ा खोलीत बंद काचांमागे ठेवलं होतं. आम्ही या खोलीत शिरलो. तिथले हिरवे साप, विषारी फूत्कारणारे नाग आम्ही पाहत असताना ज्यानं आम्हाला साऊथ आफ्रिकेला बोलावलं होतं तो आमचा मित्र राजीव तेरवाडकर मला म्हणाला, ‘‘अजगर हातात घेणार का?’’ क्षणात तोंडून ‘‘नको’’ बाहेर पडलं. तो म्हणाला, ‘‘प्रयत्न तर कर, सगळं जमेल.’’ तो शांतपणे अजगराच्या काचेपाशी गेला. तिथल्या कृष्णवर्णीय रक्षकाला म्हणाला, ‘‘त्या माझ्या आतल्या मित्राला बाहेर काढ!’’ तो ‘मित्र’ म्हणून एका सगळ्यात मोठय़ा अजगराकडे बोट दाखवत होता. तो रक्षक म्हणाला, ‘‘तो मोठा आहे खूप, या छोटय़ाला काढतो बाहेर.’’ असं म्हणून तो काचेच्या दरवाजाचं लॉक काढून आत गेला. ‘छोटं’ म्हणून त्यानं जे अजगर बाहेर आणलं तेही महाकाय होतं. राजीव जुना मित्र भेटल्यासारखा त्या अजगराकडे झेपावला. आणि त्यानं त्याला गळ्यात टाकलं. अजगरानंही त्याला मिठी मारल्यासारखा हलका विळखा घातला. त्या सगळ्यात इतकं प्रेम होतं की, माझ्याही नकळत मी पुढे झाले आणि शांतपणे त्या अजगराच्या शेपटीकडचा भाग काढून माझ्या गळ्यात टाकला. त्यानं मला उजव्या खांद्यापासून पुढे शांत विळखा घातला. त्या विळख्यात जिवंत जीवाचा गरमपणा होता. तो खूप प्रेमळ वाटत होता. माझ्या आतलं काहीसं वितळत चाललं आहे असं वाटलं आणि मी अलगद त्या अजगराचा तोंडाकडचा भागही राजीवच्या गळ्यातून काढून माझ्या गळ्यात टाकला. डाव्या हातानं अलगद त्याच्या मानेकडचा भाग धरला. त्यानं वळून माझ्याकडे पाहिलं. त्याची काळी जीभ बाहेर काढली. माझं लक्ष त्याच्या डोळ्यांकडे होतं. माझा श्वास शांत होता. मला माहीत होतं, त्याच्या शेपटीचा विळखा माझ्या हृदयाजवळून गेला होता त्यामुळे माझा शांत श्वास, माझी धडधड त्याला जाणवत होती. मी थोडी जरी विचलित झाले तरी ते माझ्याआधी त्याला कळेल. त्याची शेपटी माझ्या पाठीवरून फिरत असताना एका क्षणी मला वाटलं, तो माझ्याशी बोलतो आहे. एकदम लक्ष्मी आठवली. ती माझ्या शेजारून चालताना कधी कधी तिची सोंड माझ्या पाठीवरून फिरवत माझ्याशी बोलायची. त्या अजगराची शेपटी आणि लक्ष्मीची पाठीवर आपटणारी सोंड यात धागा आहे, असं जाणवायला लागलं. तिनं तिच्या प्रेमानं माझ्यात जागवलेला शांत विश्वास त्या दिवशी पुन्हा एकदा माझ्या आत जागा झाला. त्या शांत विश्वासानं मी त्या अजगराच्या पुन:पुन्हा माझ्याकडे वळणाऱ्या चेहऱ्याकडे पाहत असतानाच्या त्या दैवी क्षणी मला आकळलं लक्ष्मीनं माझ्या आत नेमकं काय मोलाचं जागवलं आहे. पसायदानात एक ओळ आहे, ‘भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ हे दोन जीवांचे मैत्र लक्ष्मीनं मला दिलं, शिकवलं. फक्त माणसा-माणसातलंच नातं जाणणाऱ्या आणि प्राण्यांना घाबरून असणाऱ्या मला लक्ष्मीनं आयुष्यात पहिल्यांदा एका आदीम मैत्रीची ओळख करून दिली, अनुभव दिला. हे मैत्र म्हणजे दोन जीवांचं मैत्रं, मग ते दोन जीव म्हणजे दोन माणसं असतील किंवा माणूस आणि हत्ती असेल किंवा माणूस आणि आणखी कुणी.. लक्ष्मी आयुष्यात आल्यानंतर मी सुरुवातीला उल्लेख केलेल्या पास्कलच्या वाक्याचा मला नव्यानं विचार करावासा वाटतो. त्याच्या विधानाचा सारासार अर्थ लावायचा तर तो म्हणतो, त्याचा माणसापेक्षा त्याच्या कुत्र्यावर जास्त विश्वास आहे. माणूस हाही एक प्राणीच. माझ्या आयुष्यात आलेल्या समस्त प्राण्यांबाबत एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवली, मी जेव्हा जेव्हा त्यांना सांगितलं मला तुमची भीती वाटते तेव्हा तेव्हा त्यांनी भीतीचा आदर केला. तसा माझ्या भीतीचा आदर प्रत्येक माणूसप्राणी करेल का? भुकेला कुठलाच प्राणी घाबरलेल्या सावजाची तमा बाळगत नाही हे मी जाणते. पण पोट भरलेल्या प्राण्यानं कधी कुणावर हल्ला केल्याचं ऐकिवात नाही. माणूस प्राण्याबाबत आपण ही खात्री देऊ शकतो का?