‘‘नीहारचा अर्थ आहे दवबिंदू. दवबिंदू जसा कमळाच्या पानावर पडला की चमकतो नाही तर मातीमोल होतो तसंच या मुलांचं आहे. नीहारच्या सुरक्षित विकासाला पोषक वातावरणात वेश्यांचीही ही मुलं दवबिंदूसारखीच चमकतात. आज नीहारमधून एकूण ६७ मुलामुलींचं यशस्वी पुनर्वसन झालंय. मुलं उच्चशिक्षण घेत आहेत. स्वत:च्या पायावर उभं राहताहेत.’’ सांगताहेत ‘नीहार’च्या माध्यमातून वेश्यांच्या मुलांना दवबिंदूंसारखं चमकवणाऱ्या सुनीता जोगळेकर.
ए स.एन.डी.टी. महाविद्यालयाच्या प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागात काम करत असताना वस्तीपातळीवर मुलांचे मेळावे घेण्याच्या निमित्ताने ‘जाणीव’ या संघटनेशी माझा परिचय झाला. ‘जाणीव’ची मूल्यं पटली. माझं महाविद्यालयातलं काम होतं, वस्तीपातळीवरील महिला, त्यांचे बचतगट यांच्या संदर्भात. पण मला मुलांसाठी काम करण्यात रस होता. पदवीसाठी विशेष प्रावीण्याचा माझा विषय होता, ‘चाइल्ड डेव्हलपमेंट’. शिवाय ‘कम्युनिकेशन मीडिया फॉर चिल्ड्रेन’ हा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाही मी केला होता. त्याच सुमारास माझी मैत्रीण वंदना हिने माझ्यापुढे एक प्रस्ताव ठेवला. ‘मुलांच्या मासिकाचे काम करण्यात रस आहे का? असेल तर तू विलास चाफेकर सरांना भेट.’
सरांची भेट घेतली आणि ‘रानवारा’ मासिकात सहसंपादक म्हणून काम करायचे ठरले आणि संस्थेच्या विविध कामांची ओळख झाली. वेश्यांच्या मुलांच्या पुनर्वसनाला वाहिलेले केंद्र ‘नीहार’चे काम लोहगावला चालते असे कळले. जाणीव व वंचित विकास या संस्थेच्या मुशीतून उभ्या राहिलेल्या ‘नीहार’वर  शनिवार आणि रविवारी जाऊ लागले. मुलांशी गप्पा मारणे, खेळ, गाणी, गोष्टी, हस्तकला अशा कार्यक्रमांत मी रस घ्यायला सुरुवात केली. थोडय़ाच दिवसांत चाफेकर सरांनी, विजयाताईंना (विजया लवाटे) ‘नीहार’च्या रोजच्या कामात मदत करशील का, असे विचारले. मी ‘हो’ म्हटले. ‘रानवारा’चा दिवाळी अंक पूर्ण झाला आणि सरांनी नीहारची पूर्ण जबाबदारी माझ्यावर दिली. १ जानेवारी १९९१ पासूून मी संस्थेच्या कामी खऱ्या अर्थाने रुजू झाले. त्या वेळी ‘नीहार’वर कार्यकर्तेही फारसे नव्हते आणि साधारण ३५-४० मुले-मुली होत्या. बऱ्याचदा तिथे मुक्कामही करावा लागायचा. पहिले तीन वर्षे तर वीजही नव्हती. ‘नीहार’ आणि शेजारचे शेतकरी यांच्यात सामाईक विहीर होती. त्यामुळे अनेकदा प्यायलाच पाणी पुरत नसे.
लालबत्ती वस्तीपासून दूर नेले तरच या वेश्यांच्या मुलांचे चांगले पुनर्वसन करणे शक्य होईल, या भूमिकेतून ५ जुलै १९८९ रोजी पंधरा मुले-मुली घेऊन ‘नीहार’ सुरू झाले. काही गुंडांचा त्रास, काहींनी जाणीवपूर्वक पसरविलेले समज-गैरसमज, कामासाठी माणसे न टिकणे, ‘अशी मुले’ म्हणून जागा बदलावी लागणे अशा अनंत अडचणींना तोंड देत सर आणि ताईंनी लोहगाव-वडगाव शिंदे रस्त्यावर काकडे वस्ती, शिंदे वस्तीतील खोल्या भाडेतत्त्वावर घेऊन कामाला प्रारंभ केला. पहिल्या वर्षांत तीन वेळा जागा बदलावी लागली. हा ससेमिरा काही वर्षे सुरूच होता. लोहगाव त्या वेळी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्हते. तरीही लष्कर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बारापात्रे यांनी खूप सहकार्य दिले. आम्हाला टँकरने मोफत पाणीपुरवठा व्हावा म्हणून त्यांनी स्थायी समितीमध्ये ठराव मंजूर करून घेतला. त्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांनीही वेळोवेळी सहकार्यच केले.
‘नीहार’वर कामांची जंत्री सुरूच असे. पिण्याचे पाणी झाले की आंघोळी, झाडांना पाणी त्यानंतर स्वयंपाक, मग भांडी, कपडे असा झपाटा असे. कार्यकर्त्यांना इतक्या जणांचा स्वयंपाक कसा करायचा हेही शिकवावे लागायचे. एवढे मोठे पातेले आपल्याला तरी उचलता येईल का? चव कशी असेल याची धास्ती असायची. पण त्यांना मी तसे जाणवू देत नसे. पोळी, भाकरी मात्र मला कधी करावी लागली नाही. ‘नीहार’वर येणाऱ्या परिचयाच्या लोकांकडून, त्यांच्या शिधापत्रिकेवर संबंधित दुकानांमधून रॉकेल गोळा करायचे व सोय लावायची, असे चालायचे. धान्यासाठी डिमांड नोट काढावी लागे. शिवाजीनगर गोडाऊनमधून ते आणावे लागे. तेही वेळेवर मिळायचे नाही. निकृष्ट दर्जाचे असायचे. कधी निम्मेच मिळायचे. अन्नधान्य आणण्यासाठी वाहनखर्चच अधिक होई. पण ते दिवस शिकण्याचे होते, घडण्याचे होते. सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे बळ आपोआप मिळत गेले.
एक दिवस ‘जाणीव’चा कार्यकर्ता सतीश शहा यांच्याबरोबर नारायण चांडक यांनी वह्य़ा देण्याच्या निमित्ताने ‘नीहार’ला प्रथमच भेट दिली. संस्थेच्या कामाने ते भारावून गेले. दरमहा त्यांच्या दुकानातून धान्य घेण्याचं त्यांनी सुचविले. आता ‘नीहार’ची किराणा यादी गेली की त्यातील काही सामान देणगीत मिळते.
नीहार ते लोहगाव हे अंतर साडेतीन किमी आहे. सुरुवातीच्या काळात वाहनाचीही चांगली सोय नव्हती. तेव्हा बऱ्याचदा पायी तर कधी लोहगावमधून सायकल भाडय़ाने घेऊन मी जात असे. आता या रस्त्यावर अनेक बंगले, फार्म हाऊसेस, हॉटेल्स, महाविद्यालये सुरू झाली त्यामुळे शेअर रिक्षा व स्वतंत्र रिक्षा मिळू लागल्या आहेत. पाऊस नसेल तेव्हा संध्याकाळच्या वेळी आजही कधी कधी चालत येते. पण आधी आपण रोजच असे चालत यायचो, याचे आश्चर्य वाटते.
त्या वेळी ‘नीहार’मधील मुले हायस्कूलसाठी लोहगावच्या शाळेत येत. पहिल्या दोन मुली पाचवीत गेल्या तेव्हा शाळेने त्यांना प्रवेश नाकारला. मग कै. रामकृष्ण मोरे यांची पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांना संस्थेचे काम सांगितले. त्यांनी तिथूनच संबधित शाळेत फोन केला. मुलींना प्रवेश मिळाला. त्यानंतर या शाळेने कधीही विकासनिधी, फी अशा कारणांसाठी प्रवेश नाकारले नाहीत. ‘नीहार’च्या मुलांना गावातल्या लोकांनी स्वीकारल्याचा खूप आनंद वाटला.
एकदा दादा अर्थात मधुकर परांजपे ‘नीहार’वर राहावयास आले आणि ‘नीहार’वरील शैक्षणिक वातावरणनिर्मितीला सुरुवात झाली. इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे विषय म्हणजे दादांचा हातखंडा. दादांचा दिवस पहाटे साडे तीन चार वाजता सुरू होई. ते स्वत:च मुलांना उठवत व साडे नऊ पर्यंत इयत्तेप्रमाणे मुलांचा अभ्यास घेत. संध्याकाळीही तसेच चाले. बरं वाटत नाही, कंटाळा आला अशी कारणं दादांना चालायचीच नाहीत. त्यांच्यामुळे मुलांना अभ्यासाची गोडी लागली. अभ्यास करण्यासाठी जी बैठक लागते त्याची हळूहळू सवय झाली. दादा ‘नीहार’वर सलग पाच वर्षे राहिले. शैलाताई मालुसरे याही लोहगावमधून जवळजवळ १९९५पासून मुलांचा अभ्यास घेण्यासाठी येतात. जयश्री शिंदे अर्थात दीदीही छोटय़ा मुलांचा अभ्यास घेई. विविध कॉलेजमधून येणारे विद्यार्थी, कार्यकर्तेही ‘नीहार’वर येतात. त्यांच्यामधील दीपाली गाडगीळ, श्रीकांत धिवरे, अमीत, अभिजित भांडारकर यांचा उल्लेख नक्कीच करायला हवा. ज्ञानप्रबोधिनी युवा गटाचे कौस्तुभ देशपांडे, मैथिली पेंडसे व इतर सदस्य सलग तीन वर्षे येत होते. या सर्वाचा एक सकारात्मक परिणाम मुलांच्या वागण्या-बोलण्यात, स्वत:च्या करिअरचा विचार करण्यात झालेला दिसतो.
‘नीहार’वरची मोकळी हवा, चांगला आहार यामुळे मुलांचे आरोग्य लवकरच सुधारायचे. पण मुले यायची त्या वेळी ती अशक्त असायची. कातडीचे आजार, कान-नाक-घसा अशा आजारांनी ते पछाडलेले असायचे. पण लवकरच त्यांच्यात सुधारणा व्हायची. नीहारवर त्यांना एक स्वस्थ, आनंदी, मोकळं वातावरण अनुभवायला मिळायचं. त्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर दिसायचा. डॉ. विद्या पाटील यांना घेऊन पुण्यातून मी शनिवारी किंवा रविवारी जात असे. मात्र दरवर्षी एक-दोघा जणांना असे काही आजार उद्भवतात की त्याचे मूळ गर्भावस्थेतच असते आणि ते विकार मुलांच्या दहाव्या वर्षांनंतर प्रकट होतात असे एक निरीक्षण आहे.
‘नीहार’वर वीज नव्हती तेव्हाचा एक प्रसंग. बालवाडीतला चार-साडेचार वर्षांचा मुलगा रात्री अचानक रडू लागला. त्याला सांभाळणाऱ्या ताईला काय करावे समजेना. मलाही कारण कळेना. मग लक्षात आले की, त्याचं अंग एका ठिकाणी लाल झाले होते व त्याला ते सांगता येत नव्हते. त्याला कसेबसे शांत केले आणि काहीतरी चावले असेल अशी शंका आल्याने औषधाची (एव्हिलची) पाव गोळी दिली. थोडय़ाच वेळात तो झोपला. मी मात्र जागी. मला सुचेना आपण बरोबर औषध दिले ना? तेव्हा फोन नव्हते, कुणाशी बोलणार? शेवटी रात्री दीड वाजता मी भारतवैद्यक पुस्तक काढून त्यातून मी दिलेली गोळी बरोबर असल्याची खात्री करून घेतली. तेव्हा कुठे मला बरं वाटलं.
 ‘नीहार’चं व्यवस्थापन आता थोडं कळू लागलंय. आजही तसेच होते. फरक एवढाच की हल्ली अमूक एक प्रश्न नेमका कसा सोडवायचा? त्याचे काय पर्याय असतील हे थोडंथोडं कळायला लागलं आहे. अर्थात चाफेकर सर, माझी सहकारी मीनाताई, नीहारवरील निवासी कार्यकर्ते, सर्व सहकारी आणि ‘नीहार’ला सहकार्य करणाऱ्या सर्व सहृदयांमुळे मला मी काही काम करते असं वाटतंच नाही. यात माझ्या घरच्यांचा पाठिंबाही खूप मोलाचा वाटतो. एकदा ‘नीहार’मधील तीन मुलांचे टॉन्सिल्सचे ऑपरेशन एकाच दिवशी होते. मी सकाळी सहा वाजल्यापासून कमला नेहरू हॉस्पिटलला होते. प्रत्यक्षात ऑपरेशन सुरू झाले दुपारी. ते होईपर्यंत मी ऑपरेशन थिएटरबाहेर काही न खाता-पिता येरझारा घालत होते. मुलांना पूर्ण भूल दिलेली होती. बाहेर आणल्यावर भूल उतरताना तीन-तीन मुलांकडे लक्ष देणं खूप अवघड गेले. एका मुलाची आई होती पण मुलगा शुद्धीवर का येत नाही म्हणून तिचं रडणं सुरू होतं. त्याही अवस्थेत मी तिला धीर देत होते.
एका मुलीला तर अक्षरश: हातावर उचलून अख्खं ससून हॉस्पिटल फिरायला लागलं. तोपर्यंत माझ्यावर जनरल हॉस्पिटलमध्ये जायची कधी वेळच आली नव्हती. त्या वेळी संस्थेकडे रिक्षा होती. शिवाजी रिक्षा चालवत असे. त्यानेही खूप मदत केली. तेव्हा कुठे संध्याकाळी सहा वाजता तिला वॉर्डमध्ये प्रवेश मिळाला. तिला रुमॅटिक अंथ्रायटीस झाला होता. तिचे सर्व उपचार ‘नीहार’वर असतानाच पूर्ण केले. आज ती तिशीतील एकदम तंदुरुस्त गृहिणी आहे, नोकरीही करते.  
‘नीहार’ला आता पंचवीस वर्षे पूर्ण झालीत, त्यानिमित्ताने  चाफेकर सरांनी ‘नीहार’ नावाचंच पुस्तकही लिहिलंय. नीहारचा अर्थ आहे दवबिंदू? दवबिंदू जसा कमळाच्या पानावर पडला की चमकतो नाही तर मातीमोल होतो तसंच या मुलांचं आहे. ‘नीहार’च्या सुरक्षित विकासाला पोषक वातावरणातही मुलं दवबिंदूसारखीच चमकतात. आज ‘नीहार’मधून एकूण ६७ मुलामुलींचं यशस्वी पुनर्वसन झालंय. मुली आता आपल्या आईला घेऊन राहतात किंवा आईला मदत करतात. आज ‘नीहार’मधून पुनर्वसित झालेली मुले सध्या ‘नीहार’मध्ये असलेल्या मुलांसमोरचा खराखुरा आदर्श ठरत आहेत.
१९९०च्या अखेरीस ‘नीहार’च्या तीन खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले. जाणीवच्या अनेक कार्यकर्त्यांनी यासाठी श्रमदान केले. मुलांच्या खोल्यांसाठी कविवर्य कै. विंदा करंदीकर, पु. ल. देशपांडे फाऊंडेशन, आकुताई कल्याणी ट्रस्ट, कै. दादा वैद्य यांनी आर्थिक मदत दिली. अनेकांच्या मदतीने आत्ताचे सुस्थितीतील ‘नीहार’ उभे राहिले आहे. आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत.
‘नीहार’ सुरू झाले १९८९मध्ये, मात्र शासनाची मान्यता ऑक्टोबर १९९७ मध्ये मिळाली. या वस्तीतील मुलींची जबाबदारी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा त्यांचं भविष्य काय? आईच्याच व्यवसायात या मुली येण्याची भीती जास्त आहे म्हणून ‘नीहार’मध्ये मुलींना प्राधान्याने प्रवेश दिला जातो. महिन्यातून एकदा तेही दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मुलांना भेटायची आईला परवानगी असते.
लालबत्ती विभागात काम करत असल्याने आईला गरजेच्या वेळी औषधपाणी करणे, प्रसंगी रुग्णालयात दाखल करणे, एवढेच नाही तर अंतिम क्रियाकर्म करण्याची वेळही इथल्या मुलांवर येते. आई आजारी असताना आई-मुलांची शेवटची भेट घालून द्यायचे अवघड प्रसंगही माझ्यावर आले. एक अनुभव तर कायमचा मनात कोरला गेला. एका मुलाची आई ससूनमध्ये होती. तिला मी म्हटले, तुझ्या मुलाला उद्या भेटायला घेऊन येते. ती म्हणाली, ‘‘ताई, त्याला आणू नका. माझ्या मुलाने मला अशा अवस्थेत पाहिले तर मला नाही आवडणार. माझ्याबद्दलच्या त्याच्या मनात चांगल्याच आठवणी राहाव्यात अशी माझी इच्छा आहे.’’ मुलाच्या सुखाची काळजी त्याही अवस्थेत तिला होती. त्यानंतर चार दिवसांतच ती गेली.
मुलांमध्ये सर्जनशीलता खूप असते. फक्त त्याला वाव देणारं पोषक वातावरण निर्माण करणं एवढंच आपल्याला करायचं असतं. सांस्कृतिक कार्यक्रमात विशेषत: नृत्यात तर ही मुले एकदम अव्वल आहेत. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात याची एक झलक दिसते. दरवर्षी मुले काही ना काही नवीन करतात. जसे की ‘दवबिंदू दैनिक’, ‘प्राजक्ता’ हे हस्तलिखित तयार करतात. मागील वर्षी मुलांनीच लिहिलेला व सहभाग असलेला कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रावर बालोद्यानमध्ये प्रसारित झाला.
‘नीहार’ सुरू केले त्या वेळी या मुलांना सामावून घेणाऱ्या आणि लालबत्ती विभागात यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थाही नव्हत्या. पण कटाक्षाने या मुलांना आजूबाजूच्या वस्तीतील मुले ज्या स्थानिक शाळेत जातात तिथेच घालायचे असे ठरविले होते. मुलांमधील गुण जसजसे दिसू लागले तसतसे शाळेनेही या मुलांना स्वीकारले. २००४ साली ‘नीहार’मधील पाच जण दहावीची परीक्षा फर्स्ट क्लास मिळवून पास झाली आणि तेथून पुढे मुलांनी प्रगतीच केली. पण यासाठी १५-१८ वर्षे जावी लागली. आता मुली स्वत:च्या आवडीचा, करिअरचा विचार करू लागल्या आहेत. कुणी आर्ट टीचर डिप्लोमा केलाय, कुणी नर्सिग, हॉस्पिटल असिस्टंट, ग्राफिक डिझायनिंग, एम.ए. अशा पदव्या घेतल्या आहेत. एक मुलगा तर आता पीएच.डी. करतोय. पण कुणीही ‘नीहार’ला विसरलेले नाही. आजपर्यंत ‘नीहार’वरील ३९ मुली लग्न करून सुखाचा संसार करताहेत .
या मुलांना सांभाळताना एक गोष्ट सतत जाणवते. आज ती लहान आहेत म्हणून त्यांचं सगळं करायचं आहे, त्यांचं बोट धरून शिकवायचं आहे. पण एक दिवस आपल्याला हे बोट सोडायचं आहे. प्रत्येक मुलीला स्वतंत्र, स्वाभिमानाने जगण्याची संधी उपलब्ध करून द्यायची आहे. अशा अनेक मुलांची आयुष्यं उभी करण्याचं, फुलवण्याचं, आनंदाचं काम ‘नीहार’मुळे साध्य होतंय. समाजाने या मुलांना स्वीकारले आहे. मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. आता त्यांची ‘अशा आईची मुले’ म्हणून अवहेलना होत नाही. उलट सगळीकडे त्यांच्या गुणांमुळे कौतुक होतेय, हे पाहून समाधान वाटते.    
संपर्क – सुनीता जोगळेकर
पत्ता- ४०५/ ९, नारायण पेठ, मोदी गणपतीच्या मागे, पुणे ४११ ०३०
दूरध्वनी – (०२०) suuvuwvy, suuytqvq
इ-मेल- sunitajoglekar@rediffmail.com
वेबसाइट-www.vanchitvikas.egoonies.com