शंभरातील एखादी व्यक्ती स्वतमधील निश्चयशक्तीचा कधीतरी अनुभव घेते आणि त्या क्षणापासून तिचा दृष्टिकोनच बदलून जातो. त्या माणसातला हा बदल पाहणाऱ्या अनेकांना स्वततील या सुप्त क्षमतेची जाणीव होऊ पाहतो.
फाळणीच्या जखमा मनात वागवत, उद्ध्वस्त-खंडित पंजाबमधून आलेला एक कोवळा मुलगा. निर्वासितांच्या छावणीत मोठा झालेला, काहीसा उडाणटप्पू-कलंदर ! पण कुणाच्या तरी एका वाक्यानं ठिणगी पडते आणि ‘कुछ बन दिखाने के लिए’ तो सन्यात दाखल होतो. त्याच्या पायांतली जादू त्याच्या वरिष्ठाला जाणवते आणि पाहता पाहता भारताला ऑिलपिकमध्ये पदक मिळवून देणारा मिल्खासिंग जन्माला येतो.
संगीताची अनावर ओढ त्या किशोर वयातल्या मुलाला वेड लावत असते. घरच्यांशी वाद झाल्यावर काय वाट्टेल ते झालं तरी मी संगीतच शिकणार, असं म्हणून घरून पळालेला तो मुलगा गुरूगृही पडलेले सगळे कष्ट झेलून, कानावर पडणारा एकेक बोल/अंतरा/ आलाप मनात साठवत, रियाज करत राहतो. सुरवंटाचं फुलपाखरू होऊन आपल्या रंगांनी जगाला मुग्ध करतं तसं आपल्या सुरांनी अवघ्या हिंदुस्थानाला झपाटून टाकतो- तो पुढे भीमसेन होतो.
पतिनिधनांतर नातलगांनी झिडकारलेली, आपल्या कोवळ्या मुलीला छातीशी घेऊन वणवण भटकणारी, स्मशानातल्या प्रसादावर दिवस काढणारी, आत्महत्याच करावी असं मनात धरणारी ती एका अनाथ लेकराचं रडणं ऐकून इतकी बदलते, की आपली वेदना विसरून त्याला मायेच्या पदराखाली घेते आणि बघता बघता कित्येक आईबापाविना लेकरांची माय होते- ती सिंधुताई सपकाळ!
बघता बघता आयुष्यात एक प्रचंड परिवर्तन घडलेली ही तीन फक्त प्रातिनिधिक उदाहरणं. पण साऱ्यांचा सूर एकच. बदल ‘मला’ घडवायचाय! हा दृढनिश्चय. स्वतच स्वतला दिलेला शब्द-केलेला करार! एका नुसत्या ‘ठरवण्यामुळे’ झालेला हा दिपवणारा प्रवास! त्यात काय कमी अडथळे आले असतील का? कायम पाठीवर शाबासकीचीच थाप पडली असेल का? पुढची वाट अंधारातच असणार हे कळलं नसेल का? पण तरी चिकटपणे, वर्षांनुवष्रे ठरवलेल्या मार्गावर चालायला जर कुठली शिदोरी या सर्वानी वापरली असेल तर तरी दृढनिश्चयाची!
एखाद्या रॉकेटला उड्डाण घेण्यासाठी जो जोरदार धक्का द्यावा लागतो तो म्हणजे आपल्यासाठी आपली निश्चय शक्ती. ही शक्ती आपल्याला फक्त कृती करायची प्रेरणा देते असं नाही तर ज्या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत ती दिशाही हरवू देत नाही. मग ती कृती अगदी छोटी, रोजच्या व्यवहारातील करायची गोष्ट असो किंवा पूर्ण आयुष्याला व्यापून उरणारं ‘लाइफ मिशन’असो. ही निश्चयशक्ती ही काय ‘बिना बियांच’ काही जणांच्याच मनात आपोआप उगवून येते काय? ती आपल्या प्रत्येकात असते. राखेनं झाकलेल्या निखाऱ्यासारखी. कसोटीच्या, गरजेच्या वेळी ती आपल्याला चेतवता येते. (पण जाणीव असेल तरच.) त्यातून फक्त कृतीप्रवणताच येते असं नाही तर एखाद्याचं व्यक्तिमत्त्वही मोठय़ा प्रमाणात बदलू शकतं. ‘वक्तृत्व कला’ ही एक अवघड गोष्ट आहे. डेमॉस्थेनिस हा जगप्रसिद्ध वक्ता मुळात अगदी तोतरं बोलणारा होता. त्यामुळे त्याला प्रचंड न्यूनगंड होता. लोकांसमोर बोलण्याची कल्पनाही तो सहन करू शकत नसे. पण एका टप्प्यावर त्यानं स्वतची ही कमतरता दूर करण्याचा निश्चय केला. तोंडात खडे ठेवून उच्चार सुधारण्यापासून ते जवळच्या टेकडीवर चढून समोर शेकडो श्रोते आहेत असे समजून खडय़ा आवाजात (ध्वनिक्षेपक नव्हते ना!) बोलण्याचा अखंड सराव त्यानं केला. त्याचा परिणाम म्हणजे त्यानं मिळवलेला अद्वितीय वक्त्याचा शिरपेच! आपल्यातही असे कितीतरी डेमॉस्थेनिस दडून बसलेले असतील- खरं आहे ना?
‘आपला दिवस छान गेला’ असं केव्हा वाटतं? जेव्हा मनात ठरविलेली एखादी गोष्ट पूर्ण झालेली अनुभवतो तेव्हा! पण त्यासाठी हे ठरवणं खूप गरजेचं आहे, आणि त्याहीपेक्षा कशाचा निश्चय करायची आपली गरज आहे हे ओळखणं त्याहून अधिक गरजेचं आहे. दुसरं कुणीतरी काहीतरी करतंय, ते फार आकर्षक/ प्रभावी/ भारी वाटलं म्हणून कसंतरी करण्यापेक्षा आपले growth areas  ओळखून त्यावर काम केलं तर कितीतरी जास्त आनंद मिळू शकतो.
अतिशय चांगली बुद्धिमत्ता असलेली पण केवळ आळस आणि चुकीच्या सवयी-दृष्टिकोन यामुळे कधीच मनासारखं यश न मिळवू शकणारी नृपा मला आठवते. प्रीलिममध्ये ५० टक्क्याच्या आसपास रेंगाळणाऱ्या नृपाला तिच्यापेक्षा थोडय़ाच मोठय़ा असलेल्या तिच्या मत्रिणींनं जेव्हा तिची खरी क्षमता पटवून दिली तेव्हा नृपाला वेगळाच साक्षात्कार झाला. तिनं संपूर्ण वर्गासमोर अंतिम परीक्षेत ८० टक्क्यांच्या वर गुण मिळवण्याचा निश्चय बोलून दाखवला. एवढंच नाही तर खरोखर स्वतच्या क्षमता पूर्ण ताणून (अतिचिंता न करता) अतिशय सुनियोजितपणे, वाहून घेऊन पुढचे चार आठवडे अभ्यास केला. खरोखरच त्या परीक्षेत तिला ८९ टक्के गुण मिळाले. या आकडय़ांच्या यशापेक्षाही आपण निश्चय करून एखादी गोष्ट पूर्ण सामर्थ्यांनिशी करू शकतो यावरच तिचा विश्वास वाढला हे महत्त्वाचं. कारण हीच निश्चयशक्ती पुढे अनेक व्यावहारिक अनुभवांत तिच्या मदतीला आली.
निश्चयशक्ती परिणामकारकपणे वापरली न जाण्याची दोन मुख्य कारणं असतात. एक म्हणजे ‘काय उपयोग आहे ठरवून? मी ठरवलेलं कधीच काही मनासारखं होत नाही’ हा स्वतलाच निरुत्साही करणारा विचार किंवा निश्चय म्हणजे उगीचच घेतलेलं नतिक ओझं असा विचार!
‘काय उपयोग?’ विचाराची मुळं असतात ती स्वतला कुठल्याही जोखमीपासून लांब ठेवण्याच्या प्रयत्नात! निश्चय केला तर स्वतत काही तरी बदल करायला हवा, म्हणजेच काहीतरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किंमत मोजायला हवी. ती कोण मोजणार? ‘खोटं बोलायचं नाही, सबबी सांगायच्या नाहीत, नात्यात पारदर्शीपणा ठेवायचा असा निश्चय करायचा म्हणजे दुसऱ्याच्या अज्ञानाचा/विश्वासाचा गरफायदा घेऊन आपला कार्यभाग साधण्याचा सुख-अवकाश (comfort zone) सोडून जीव दुखात लोटायचा. कुणी सांगितलंय? मग नकोच काही ठरवायला. नाही तरी मला ते झेपणारच नाही.’ शंभरातील ५० निश्चय या विचारामुळे केलेच जात नाहीत. उरलेल्यातील एकोणपन्नासांना ‘ठरवणं’ म्हणजे बांधून घेणं वाटतं. आपल्या ‘मुक्त’ व्यक्तिमत्त्वावर, स्वातंत्र्यावर गदा आल्यासारखं वाटतं. अगदी ‘स्वतचा’ निश्चयसुद्धा आपल्या वेगवेगळ्या पर्यायांना थांबवणारा वाटतो. ‘आयुष्य कसं? वळेल तसं वळावं, वाहील तसं वाहू द्यावं, उगाच ठरवून कशाला दडपण ओढवून घ्यायचं’ असं वाटतं. या सर्वातून निश्चय करण्याची इच्छा झाली तरी केलेला निश्चय दीर्घकाळ पाळणं याकरताही मनाची मोठी ऊर्जा लागते. सर्वसाधारणपणे एक जानेवारीला केलेला व्यायामाचा निश्चय पाच जानेवारीला संपुष्टात येतो असं दिसतं. आपलं ‘धावरं’ मन इतकं चतुर असतं की त्या मागची भरभक्कम कारणंही ते तयार ठेवतं. कधी कंटाळा, कधी अनवधान, कधी फुसकं निमित्त आपले छोटे निश्चयसुद्धा मोडायला कारण ठरतात. तरीही शंभरातील एखादी व्यक्ती स्वतमधील निश्चयशक्तीचा कधीतरी अनुभव घेते आणि त्या क्षणापासून तिचा दृष्टिकोनच बदलून जातो. काही निश्चय तर अक्षरश आयुष्यभराचा लाभ करून देतात. इतकंच नाही तर त्या माणसातला हा बदल पाहणाऱ्या अनेकांना स्वततील या सुप्त क्षमतेची जाणीव होऊ पाहते. ज्ञान प्रबोधिनीच्या एका शैक्षणिक उपक्रमातून येऊन कामात सहभागी झालेली एक युवती निर्धारपूर्वक स्पर्धा परीक्षांना सामोरी गेली. तिच्या पूर्वीच्या आयुष्यात तिनं असंख्य अडचणींना, निराश करू शकणाऱ्या अनुभवांना तोंड दिलं होतं. ‘मी अधिकारी होणारच’ या निर्धारानं स्वतच्या आयुष्याला तर तिनं वळण दिलंच, पण असं करू इच्छिणाऱ्या अनेक मुलींनाही त्यातून ‘डरता कशाला? व्हा पुढे!’ ही प्रेरणा दिली.
निर्धाराची हीच गंमत आहे. एखाद्याच्या आयुष्यात निश्चयपूर्वक घडवलेला बदल अनेकांना प्रोत्साहित करून जातो. किती छोटय़ा छोटय़ा संकल्पापासून सुरुवात करता येते! ‘इंग्लिश विंग्लिश’मधली वयाच्या पंचेचाळिशीत इंग्रजी शिकण्याची इच्छा निर्धारात बदलणारी ‘शशी गोडबोले’आठवते ना? विशेषत वाढत्या वयातच जर विचारांना, मनाला ही सवय लागली तर ती दूरचा लाभ देणारी ठरते. मला आठवतं, आठवीत असताना ज्ञान प्रबोधिनीत आम्हा मुलींनाही विद्याव्रत संस्कार (पारंपरिक उपनयन) अनुभवता आला. स्वविकासाच्या त्या वेगळ्या वाटेवरचं पहिलं पाऊल होतं ते संकल्पांचं! प्रत्येकीनं एकच छोटासा संकल्प करायचा होता. किमान पुढच्या वर्षांसाठीचा! कुणी रोज दैनंदिनी लिहायचं ठरवलं, कुणी वर्षभर रोज सूर्यनमस्कार घालण्याचा तर कुणी जेवणातला खूप दुर्मिळ असणारा एखादा पदार्थ न खाण्याचा निर्धार केला. अर्थातच काहीनी तो पूर्ण पाळला, काहींनी मध्ये सोडूनही दिला असेल, पण त्या निमित्ताने असं ‘ठरवायचं’ असतं हेही कळलं आणि  ठरवलेलं पाळता येते  (किमान काही काळ तरी) हेसुद्धा उमगलं.
 व्यक्तिगत आयुष्यात निश्चय करण्याची सवय आणि ओढ लागली की ते आपल्या सामाजिक आयुष्यातही डोकावतात. मग कुणी एखादा लाल दिवा असताना मागचे वाहनचालक कितीही ‘पॅपॅ’ करत असले तरी निर्धारानं इंचभरही पुढे जायचं नाकारतो. (बाजूचे काही जण जाताना दिसले तरी!) रस्त्यावरून चालताना चघळलेल्या चॉकलेटची चांदी तिथेच न टाकता जपून नेऊन घरच्या कचरापेटीमध्येच टाकतो, हे सगळं निश्चयी वृत्तीला खतपाणी घालतो. निश्चयी वृत्तीचं हे रूप हळूहळू मोठमोठी रूपं धारण करू शकतं! आपली निवड काय आहे, निश्चय करायचा का टाळायचा? यावर आपल्यातल्या या क्षमतेला आपण किती वाव देतो आणि दूरवरचा फायदा मिळवतो हे अवलंबून आहे.     
अनघा लवळेकर -anagha.lavalekar@jnanaprabodhini.org

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Young girl harassed foreign tourist for a reel dancing in public place video viral on social media
रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र