१९७१ मध्ये लग्न होऊन मी जोशी यांच्या घरात आले. एकत्र कुटुंब, सासू-सासरे, दीर-नणंद, आम्ही दोघे असा सगळा परिवार. सासरे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले. दिराचे-नणंदेचे शिक्षण, लग्न या जबाबदाऱ्या कुटुंबातील एकमेव कर्ता, कमावता पुरुष असलेल्या माझ्या यजमानांवर होत्या. शिवाय आमचा संसारही वाढणारच होता ना! या सगळय़ा जबाबदाऱ्या अन् औरंगाबादसारख्या शहरात राहायचे म्हणून मी पण नोकरी करायचे ठरवले. घरच्या मंडळींनीसुद्धा त्याला प्रोत्साहन दिले. एम.एस्सी. (जीवरसायनशास्त्र) असल्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात मला नोकरी मिळाली. नोकरी स्वीकारतानाच मला या गोष्टीची कल्पना होती, की पीएच.डी. केल्याशिवाय मला पुढची बढती मिळणार नाही. यथावकाश पीएच.डी. करू हे मी ठरवले अन् मी नोकरीवर रुजू झाले.
संसार फुलला, दिराचे-नणंदेचे शिक्षण, दोघांची लग्ने झाली. एकेका जबाबदारीतून मुक्त होत होतो. त्यामुळे पीएच.डी.चा विचार करायला सवडच मिळाली नाही. माझ्याबरोबर नोकरीस लागलेल्या सर्वानी पीएच.डी. पूर्ण केले आणि ते पुढच्या प्रमोशनसाठी पात्र झाले.
  आमचे लग्न झाले तेव्हा हे बी.कॉम. होते. कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना पुढे शिकता आले नव्हते. स्थिर-स्थावर झाल्यावर त्यांनी त्यांच्या पुढील शिक्षणाचा विचार माझ्यापुढे मांडला. अनुभवाबरोबर पदव्युत्तर शिक्षणामुळे पदोन्नतीसाठी त्यांना त्याचा उपयोग होणार होता. हे पाहता, माझ्या पीएच.डी.चा विषय अन् पर्यायाने मिळणारे प्रमोशन मला बाजूलाच ठेवावे लागले. त्यांनी नोकरी करीत करीत पुढे बऱ्याच पदव्या मिळवल्या. अर्थातच त्यांना वरचेवर पदोन्नती मिळाली. कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला. माझ्या पीएच.डी.मुळेही हे होणार होते. पण माझ्या शिक्षण काळात कुटुंबाला बराच त्रास (शारीरिक, मानसिक, आर्थिक) सोसावा लागणार होता. हे माझ्या ध्यानात आले. म्हणून मी माझे उच्च शिक्षण मागे ठेवले. जाणीवपूर्वक माझ्या इच्छेचा त्याग केला व यांच्या शिक्षणाला दुजोरा दिला.
 या निर्णयाचा पश्चात्ताप नाहीच, कारण माझा आणि कुटुंबाचा त्यामुळे दुहेरी फायदा झाला. हे पुढे शिकू शकले, आर्थिक बाजू भक्कम झाली. शिवाय मी कुटुंबाकडे, विशेषत: माझ्या मुलींच्या जडणघडणीच्या काळात त्यांच्याकडे लक्ष देऊ शकले. आज दिराला, नणंदेला त्यांच्या संसारात स्थिर-स्थावर झालेले पाहताना माझ्या त्यागाची त्यांच्या आनंदात झालेली परिणती मी अनुभवते. पर्यायाने मलाही समाधान लाभते. समाजात माझ्या स्वतंत्र प्रतिष्ठेबरोबर यजमानांची सहचारिणी म्हणून झालेली माझी ओळख मला खूप आनंद देऊन जाते. आनंददायी जीवन जगण्यासाठी नुसते प्रेम असून भागत नाही. प्रेम अनुभवण्यासाठी त्यागही आवश्यक असतो. आजच्या भाषेत बोलायचे झाले तर प्रेमाचा पासवर्ड त्याग हाच टाकावा लागतो.  
निर्मला जोशी, औरंगाबाद