नुसत्या तीर्थयात्रा, नुसते उपवास आणि नुसता ठरावीक दानधर्म करून ईश्वराचं प्रेम पुरेसं मिळत नाही, पण वाचनानं, श्रवणानं, चिंतनानं आणि हृदयातल्या गाढ भक्तीनं त्याची कृपा भरभरून मिळू शकते, असे सांगत गुरू नानकांनी भक्तिहीन कर्मकांडाला स्पष्टपणे दूर सारलं आणि शुद्ध कर्माचा आग्रह धरला.
लाहोरला १८९७ साली झालेल्या प्रकट भाषणात स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ‘इथे, याच भूमीत सौम्य आणि शांत गंभीर नानकांनी या विश्वाविषयीच्या आपल्या अद्भुत प्रेमाचा उपदेश केला. इथेच त्यांनी आपलं विशाल हृदय खुलं केलं आणि संपूर्ण जगाला कवेत घेण्यासाठी हात पसरले. केवळ हिंदूच नव्हे तर मुसलमान जगासाठीही त्यांनी ते बाहू पसरले होते.’
विसाव्या शतकाच्या उंबरठय़ाशी उभे राहिलेले विवेकानंद तेव्हा पाचशे वर्षांपूर्वीच्या लाहोरचा परिसर आपल्या धर्मज्ञ दृष्टीनं न्याहाळत होते. त्यांना कदाचित घनदाट वृक्षांनी वेढलेलं ते नानकांचं जन्मगाव दिसत असेल. तलवंडी नावाचं ते लहानसं गाव होतं. लाहोरपासून तीस मैलांवरचं गाव. नानक तिथे जन्मले. ते १४६९ साल होतं. त्यांची मोठी बहीण  कालूचंद आणि तृप्ता, या जोडप्याची पहिली मुलगी आपल्या आजोळी- नाना-नानीच्या घरी जन्मली म्हणून ती नानकी आणि नानकीनंतर जन्माला आलेला तिचा धाकटा भाऊ तो नानक.
शाळकरी वयापासून असाधारण प्रज्ञेची झलक दाखवणारा तो मुलगा पुढे व्यवसाय करू लागला. लग्न होऊन दोन मुलग्यांचा बाप झाला, पण लौकिकात रमला नाही. तो रमला धर्मचिंतनात. घरदार सोडून तो ईश्वर संकीर्तनात रमला. हळूहळू धर्मगुरू म्हणून त्याचा लौकिक झाला. नानकांना ईश्वर भेटला तो निळ्या आभाळाखाली. विस्तीर्ण पसरलेली भूमी, तिच्यावर उभारलेले पर्वत, खळाळणाऱ्या नद्या, गर्द घनदाट जंगलं- तीन दिवस, तीन रात्री नानक त्या विलक्षण अनुभवात बुडून गेले. मग सुरू झालं देशभ्रमण.
उत्तर आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम- सारा देश ते हिंडले. ते जसे काशीला गेले होते, तसे काबूललाही गेले. मदुरा-रामेश्वरला गेले होते तसे मक्का-मदिनेलाही गेले. त्यांचा वेश अजब होता. त्यांचे विचार, त्यांचं तत्त्वज्ञान त्या वेशामधूनही प्रकट करत होते ते. डोक्याला मुसलमानी कलंदरांची टोपी, कपाळावर हिंदूंसारखा केशरी टिळा आणि गळ्यात शाक्त कापालिकांसारखी एक हाडांची माळ. अंगात एक लाल किंवा पिवळं जाकीट आणि खांद्यावर शुभ्र चादर. त्यांना कोण म्हणायचं? हिंदू की मुसलमान? लोकांना प्रश्न पडायचा.
पण नानक ना हिंदू होते, ना मुसलमान. त्यांचे विचार दोन्हींमधले भेद मिटवत दोघांनाही सामावून घेत त्यापलीकडे जाणारे होते. कधी ते शेख फरीदसारख्या माहात्म्याला भेटायला जात होते, तर कधी सिंहल द्विपातल्या राजा शिवनामाला भेटत होते.
‘जपुजी’ ही गुरुनानकांची मुख्य रचना. नानकांनी प्रवर्तित केलेल्या शीख धर्माचा तो मुख्य ग्रंथ आहे. ‘असा दी बार’, ‘रहिरास’, ‘सोहिला’ अशा त्यांच्या इतर रचनाही प्रसिद्ध आहेत. शिवाय ‘गुरुग्रंथसाहिबा’त त्यांच्या इतर स्फुट रचना समाविष्ट झाल्या आहेत. संगीताचं उत्तम ज्ञान नानकदेवांना असलं पाहिजे. वेगवेगळ्या रागांमधल्या या रचना हृदयस्पर्शी प्रांजळपणानं भरून आहेत.
नानकांचं तत्त्वज्ञान अगदी सरळ, साधं आणि प्रवाही शब्दांतलं आहे. माणसाच्या शुद्ध चारित्र्याची घडण त्यांनी महत्त्वाची मानली आहे. ते म्हणतात,
 ‘देवाचं नाव तर प्रत्येक जण घेतो
पण नामोच्चारानं घडत नाही साक्षात्कार
त्यासाठी वळावे लागते स्वत:च्याच अंतरात
कर्मेसुफलित करणाऱ्या प्रकाशासाठी उघडावे लागते हृदयद्वार’
त्यांनी प्रत्येकाला आपलं जे काम आहे, त्या कामातच ईश्वर पाहण्याचा संदेश दिला आहे. कधी शेतकऱ्याचं तर कधी लोहाराचं, कधी व्यापार उदिमाचं, तर कधी सेवाचाकरीचं रूपक ते ईश्वर भक्तीच्या संदर्भात वापरतात आणि सर्वसामान्य माणसाच्या एकदम जवळचेच होऊन जातात. उदाहरणार्थ ते म्हणतात,
पावित्र्य हीच बनव तू आपली भट्टी
तुझं लोहाराचं दुकान म्हणजे तुझा धीर आणि शांती
गुरूचा उपदेश ही तुझी ऐरण
आणि तुझा हातोडा म्हणजे सत्याचं ज्ञान
ईश्वराचं भय हा असू दे भाता,
तपश्चर्येचा अग्नी प्रज्वलित असू दे
प्रेमाच्या तुझ्या मुशीत मग
दिव्यत्वाचा अमृतरस वितळून वाहू दे
शेतकऱ्याला ते देहाचं शेत करून त्यात सत्कर्माचं बी पेरायला सांगतात. प्रभुनामाचं पाणी देऊन हृदयातला ईश्वर अंकुरित करण्याची आणि दुष्ट वासना उपटून टाकण्याची सूचना त्याला करतात.
नुसत्या तीर्थयात्रा, नुसते उपवास आणि नुसता ठरावीक दानधर्म करून ईश्वराचं प्रेम पुरेसं मिळत नाही, पण वाचनानं, श्रवणानं, चिंतनानं आणि हृदयातल्या गाढ भक्तीनं त्याची कृपा भरभरून मिळू शकते, असे सांगत नानकांनी भक्तिहीन कर्मकांडाला स्पष्टपणे दूर सारलं आणि शुद्ध कर्माचा आग्रह धरला. माणूस जे जे कर्म करतो त्याचं गाठोडं तो बरोबर वागवतच असतो. त्यामुळे तो जे पेरतो तेच वेचतो हे ध्यानात धरण्याचा इशारा दिला आहे.
प्रत्येकाची योग्यता त्याच्या कर्मावरून ठरते, असं म्हणताना त्यांनी जातीवरून आणि धर्मावरून किंवा आर्थिक स्थितीवरून माणसाचं मूल्यमापन करणाऱ्या मोजपट्टय़ा नाकारल्या आहेत. केवळ दिखाऊ गोष्टींना आणि शाब्दिक अवडंबराने माणसं साधुपदाला पोचत नाहीत. चमत्कार करून दाखवणं हे तर दांभिकपणाचंच लक्षण आहे, एवढंच म्हणून नानक थांबलेले नाहीत, त्यांनी जातिभेदांवर स्पष्टच प्रहार करून म्हटलं आहे,
जातिभेद म्हणजे वेडेपणा,
वेडेपणाच्याच आहेत पदव्या आणि कीर्तीही
जे आहेत अतिनीच, तिथे जाईल हा नानक, परमेश्वराची कृपादृष्टी असेल तिथेही
नानकांनी मलिनतेची व्याख्या करून शुद्धतेचं स्वरूप स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात की, लोभ म्हणजे हृदयाची मलिनता. दुसऱ्याच्या द्रव्याकडे आभिलाषेनं पाहणं ही डोळ्यांची मलिनता. परनिंदा ऐकणं ही कानांची मलिनता. तथाकथित साधू जर असं मलिन आचरण करतील तर ते शुद्ध कसे म्हणावेत. ते स्वर्गात जातील असं तरी कसं म्हणावं!
गुरू नानकांची अशी वाणी पंधराव्या शतकातल्या पंजाबच्या भूमीवर गुंजत राहिली. महाराष्ट्राशी नानकपरंपरेचा दृढ संबंध आला तो नामदेवांच्या पंजाब यात्रेमुळे आणि पुढे नानकांचे पुत्र आणि उदासी संप्रदायाचे प्रवर्तक श्री चंद्राचार्य महाराष्ट्रात आले असताना त्यांच्याशी घडलेल्या रामदासस्वामींच्या भेटीमुळे. गुरू गोविंदसिंह आणि बंदा वैरागी यांचीही आठवण महाराष्ट्राने अद्याप जपून ठेवलेली आहेच. उभय प्रांतांना अभिमान वाटावा अशाच या संतभेटी म्हटल्या पाहिजेत.   

Story img Loader