04-jagatइंडोनेशियातील दुर्लक्षित व दुर्गम भागातील ‘ओरांग रिम्बा’ या जमातीच्या, अरण्यवासीयांच्या मूलभूत हक्कांची पाठराखण करत त्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या, त्यासाठी गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ त्यांच्यात राहून, त्यांची जीवनशैली स्वीकारून त्यांना हसत-खेळत शिक्षणाचे धडे देणाऱ्या, त्यासाठी चाकोरीबाहेरची वाट धुंडाळत ‘सोकोला स्कूल’चे नवे मॉडेल विकसित करणाऱ्या व यंदाच्या मॅगसेसे पुरस्कार विजेत्या सौर मार्लिना मानुरंग यांच्याविषयी.

लहान बेटांच्या समूहानं बनलेला इंडोनेशिया हा देश, अत्याधुनिक शहरं आणि घनदाट अरण्यं अशा विरोधाभासानं भरलेला आहे. घनदाट अरण्यात विविध टोळ्या निसर्गाशी एकरूप होऊन वेगळंच आयुष्य जगत असतात. त्या पलीकडच्या आधुनिक जगाची त्यांना काहीही कल्पना नसते. हे लोक शांतपणे पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार जगत असतात. सुमात्रा बेटावरल्या जाम्बी या शहरापासून जवळपास अकरा तास प्रवास केल्यावर तुम्ही ‘ओरांग रिम्बा’ (अरण्याचे रहिवासी) या स्थानिक समाजाच्या निवासस्थानी पोहोचता. बुकिट डूआबेलास या घनदाट जंगलाच्या अगदी दूरच्या भागात राहणाऱ्या ‘ओरांग रिम्बा’ या टोळीला आधुनिकतेचा स्पर्शही झालेला नाही.

परंतु, बाहेरचं जग मात्र झपाटय़ानं बदलू लागलंय आणि या अरण्यवासीयांना जुन्या, पारंपरिक जीवनशैलाला चिकटून राहाणं अवघड बनू लागलंय. चौदा वर्षे, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सक्रिय सहभाग घेत असताना, त्याबरोबरच या अरण्यवासीयांना साक्षर आणि सक्षम करून त्यांची आधुनिक जीवनशैलीशी थोडीफार ओळख करून देण्याचं काम पार पाडत होती- सौर मार्लिना मानुरंग. तिनं सुरू केलेल्या ‘सोकोला रिम्बा’द्वारे (रिम्बा शाळा) साठ हजार हेक्टर्स विस्ताराच्या विस्तीर्ण अरण्यातल्या सात वेगवेगळ्या स्थानिक टोळ्यांमधली मुलं शिक्षणाचा लाभ घेत आहेत. त्यांना लेखन-वाचन, आकडेमोड शिकवणारी त्यांची ही समर्पित शिक्षिका जंगलात त्यांच्याजवळच राहून त्यांना हसत-खेळत शिक्षणाचे धडे देते आहे. विशेष म्हणजे हे करताना त्यांचा पारंपरिक सुज्ञपणा जोपासते आहे.
सौर मार्लिना हिचा जन्म २१ फेब्रुवारी १९७२ रोजी जकार्तामध्ये झाला. व्हिक्टर मानुरंग आणि अ‍ॅनाटिअर सामोसिर या मध्यमवर्गीय दाम्पत्याच्या या सुकन्येनं बांहुंग विद्यापीठातून पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर चार वर्षे तिनं एका सेवाभावी संस्थेसाठी काम केलं. हे काम करत असताना तिला बाहेरच्या जगापासून पूर्णत: संपर्क तुटलेल्या मुलांना अक्षरओळख करून द्यावीशी वाटू लागली, परंतु ही मुलगी हॅरिसन फोर्डच्या ‘इंडियाना जोन्स’ या चित्रपटाची प्रचंड चाहती होती. त्या चित्रपटाद्वारे तिनं हसत-खेळत शिक्षण देण्याची स्फूर्ती मिळवली. त्यासाठी ती अनेक महिने आपल्या विद्यार्थ्यांजवळ राहिली. त्यांची जीवनशैली तिनंही स्वीकारली. अगदी हसत-खेळत, तिनं त्या मुलांना लिहा-वाचायची गोडी लावली, साधे हिशोब करायला शिकवलं. या शिक्षण पद्धतीची घडी बसवल्यावर या जंगल प्रशालेची-साकोला रिम्बाची पद्धत इंडोनेशियातील इतर भागांतही वापरली जाऊ लागली. हल्माहेरा आणि फ्लॉरेस या भागांमध्येसुद्धा याच पद्धतीचा यशस्वीरीत्या वापर करण्यात आला. मनुष्य वस्तीपासून अत्यंत दूर असलेल्या, इतर वन्य जमातींचा विकास करण्यासाठी इंडोनेशियाचं सरकार या शिक्षण-पद्धतीचा मोठय़ा प्रमाणावर वापर करू पाहात आहे.
गर्द जंगलात, शहरापासून कोणताही संपर्क नसलेल्या समाजात, अनेक महिने राहून त्यांचा विश्वास संपादन करणं आणि तिथल्या मुलांना रोजचं आयुष्य जगता-जगता शिक्षण देणं, यासाठी धाडस, समर्पितता, कल्पकता यांच्या जोडीला खरीखुरी कळकळ गरजेची असते. तिनं हा निर्णय घेतला कारण तिला निसर्गाची मनापासून ओढ तर वाटतच होती, परंतु त्याच्याच जोडीला ज्या अरण्यवासीयांना पांढरपेशे लोक ‘काबू’ (अस्वच्छ, दरुगधीयुक्त आणि मूर्ख) म्हणून हिणवत असत, त्यांच्यासाठी काही तरी करण्याची खरीखुरी तळमळ तिला वाटत होती. ज्या ‘अनक दानम’ टोळीसाठी तिनं हा प्रयत्न केला, ते लोक मात्र स्वत:ला ‘अनक रिम्बा’ (जंगलाचे सुपुत्र) म्हणवून घेतात. समर्पित भावानं केलेल्या कामानं तिला अपूर्व समाधान मिळवून दिलं. तिला युनेस्कोनं गौरवलं आणि ए.एन्.टी.व्ही.नं तिला शिक्षण प्रसारासाठीचा पुरस्कार देऊन तिचा सन्मान केला.
तिनं आपल्या आगळ्यावेगळ्या अनुभवांचं शब्दांकन करून जे पुस्तक लिहिलं आहे, त्याचा ‘जंगल स्कूल’ या नावानं इंग्रजी अनुवादही प्रसिद्ध झाला आहे. तिची कामगिरी इतकी आगळीवेगळी आहे, की ती जगापुढे आणावी या प्रेरणेनं रिरि रिझा हा दिग्दर्शक आणि मिरा लेस्माना हा निर्माता त्यावर ‘सोकालो रिम्बा’ नावाचा चित्रपट काढत आहेत. प्रिसिया नासुशान ही अभिनेत्री या चित्रपटात सौर मार्लिना मानुरंगची भूमिका वठवणार आहे. या चित्रपटात रिम्बा जमातीचं दैनंदिन आयुष्य चित्रित केलं जाणार आहे आणि आपलं आयुष्य कसं घालवायचं, याबद्दलचा एका स्त्रीचा आगळावेगळा निर्णय दुसऱ्यांचं आयुष्य कसं समृद्ध करू शकतो, याचे रेखाटन आहे. तिच्या कार्याचा आणि विचारप्रणालीचा गाभा पूर्णपणे जाणून घेण्यासाठी या दिग्दर्शकानं मार्लिनाची अनेकदा भेट घेऊन, सखोल चर्चा केली. चित्रपटात त्यानं स्थानिक लोकांनाच भूमिका करायला लावल्या. या चित्रपटातलं आणखी एक प्रमुख पात्र आहे न्युंगसँग बुंगो. बाहेरच्या कुणाकडूनही शिक्षण घेऊ नये, हा त्यांच्या टोळीचा नियम असूनही, त्याला शिक्षणाची विलक्षण तृष्णा आहे, कारण आपल्या टोळीतील माणसांना पाम वृक्षांची लागवड करणारे धनदांडगे फसवत आहेत, अशी त्याला दाट शंका येतेय. शिक्षणाशिवाय या फसवणुकीतून बाहेर पडता येणार नाही, हे तो जाणून आहे. या खऱ्याखुऱ्या मूळ न्युंगसँग बुंगोनंच चित्रपटात ती भूमिका केली आहे.
या चित्रपटामुळे मार्लिनाचा शैक्षणिक सिद्धांत तर सर्वाना समजेल/ पटेलच! परंतु त्याखेरीज इंडोनेशियातील शहरी आणि ग्रामीण समाजातली पराकोटीची आणि गहन तफावतही स्पष्टपणे उघड होईल. या चित्रपटाच्या दिग्दर्शकानं म्हटलंय, ‘शहरी लोक आणि हे अरण्यवासी या जमीन अस्मानाएवढी, तफावत असली, तरी त्यांना कमी प्रतीचं लेखणं अत्यंत चुकीचं ठरेल.’ ‘सोकोला रिम्बा’ चित्रपटामुळे आणखी एक गोष्ट होणार आहे. आधुनिक सुविधांपासून वंचित असलेल्या, गर्द अरण्यात राहणाऱ्या लोकांकडे दयाबुद्धीनं पाहाण्याची गरज नाही, हे सर्वाना कळणार आहे. इंडोनेशियातील प्रत्येक गटासाठी किंवा समाजासाठी शिक्षण आणि विकासाची एकच ढाचेबंद पद्धत वापरणं योग्य ठरणार नाही, हा संदेश या चित्रपटामुळे नक्कीच सर्वदूर पसरणार आहे. ओरँग रिम्बा टोळीसमवेत दहा वर्षांहून जास्त काळ वास्तव्य केलेल्या मार्लिनाचंसुद्धा तेच मत आहे. ‘बाहेरच्या जगाकडून येणारे धर्माबाबतचे, राजनैतिक आणि व्यापारविषयक प्रस्ताव या लोकांना गोंधळात पाडतात. अशा प्रस्तावांना तोंड देणं हे त्यांच्यापुढलं सर्वात मोठं आव्हान आहे,’ असं ती म्हणते. उदाहरणच द्यायचं तर, या चित्रपटात काम करणाऱ्या स्थानिक कलाकारांना पैशात मोबदला न देता कापडय़ासारख्या अन्य वस्तूंद्वारे मोबदला चुकता करावा लागला. त्या गोष्टी त्यांना अधिक मोलाच्या वाटल्या. मार्लिन म्हणते, ‘आधुनिक जीवनशैली स्वीकारावी किंवा नाही, याचा निर्णय रिम्बांनीच घ्यायला हवा. मी त्यांना दिलेलं शिक्षण हे बदलाला सामोरं जाण्यासाठीचं केवळ एक साधन आहे. परंतु आपल्यासारखी जीवनशैली स्वीकारायची किंवा नाही, हे त्यांचं त्यांनाच ठरवावं लागणार आहे!’
मार्लिननं आपल्या कार्यानं शिक्षणाची पारंपरिक व्याख्याच बदलून टाकलीय. शिक्षण म्हणजे खुल्या मनानं नवीन कल्पनांचा स्वीकार करणं, नव्या गोष्टी समजून घेणं. अनक-दानम-जमातीतल्या मुलांना शिकवताना तिनं हेच तत्त्व यशस्वीरीत्या वापरलं. तिनं आपल्या अंतर्मनाचा कौल घेऊन दीर्घकाळ हे शिक्षण प्रसाराचं आगळंवेगळं काम केलंच, परंतु त्या जमातीनं आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार करावा की नाही, हा निर्णय त्यांच्यावर सोपवला. तिनं वेगळा पर्याय त्यांच्या समोर ठेवला, तो स्वीकारता येण्यासाठी त्यांना सक्षमही केलं. परंतु निर्णय मात्र त्यांच्यावरच सोपवला. परिपक्व आणि संतुलित गुरूप्रमाणे ती वागली!

Story img Loader