शेपू या पालेभाजीच्या विशिष्ट वासामुळे अनेक लोक नाक मुरडतात. पण कमी कॅलरी असूनही या भाजीत डाळी आणि सुक्या मेव्यातले अनेक गुणधर्म आहेत. शेपूच्या पानातलं ‘अ’ आणि ‘क’ आणि बी कॉम्प्लेक्स ही सारी जीवनसत्त्वे तसेच कॉपर, पोटॅशियम, मँगेनीज, कॅल्शियम आणि लोह शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. मेंदू शांत ठेवतात. शेपूच्या पानात युजेनॉल नावाचं तेल असतं. ते रक्तदाब कमी करायला मदत करतं. शेपूच्या बियांचा म्हणजे बाळंतशोपांचा अर्क पचनासाठी, विशेषत: लहान मुलांना उपयोगी पडतो.
शेपू मूग डोसा
साहित्य : एक वाटी सालाची मूग डाळ, १ वाटी बारीक चिरलेला शेपू,१ चमचा लिंबाचा रस, अर्धी वाटी ओट्स, एक मोठा चमचा आल्याचे तुकडे, चार लसूण पाकळ्या, दोन हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरं, चवीला मीठ, साखर, तेल
कृती : मूगडाळ ५-६ तास भिजत घालावी. आलं-लसूण, ओट्स, जिरं आणि मिरचीबरोबर बारीक वाटून घ्यावी. त्यात लिंबाचा रस, चवीला मीठ, साखर आणि चिरलेला शेपू घालून नॉनस्टिक पॅनवर त्याचे डोसे करावे.
वसुंधरा पर्वते -vgparvate@yahoo.com