शहरी पुण्यातून थेट सोलापुरातील  सांगोल्यासारख्या ग्रामीण भागाच्या सासुरवाशीण झालेल्या डॉ. संजीवनी केळकर तिथल्या पहिल्या महिला डॉक्टर. दु:ख, दारिद्रय़ यामुळे या भागाचे जे भयावह चित्र त्यांच्यासमोर आले त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली ती विधायक कामाची. काही मैत्रिणींना एकत्रित करून त्यांनी सुरुवातीला  ‘महिला सहविचार केंद्र’ सुरू केले, त्यातून ‘माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ ही महिला संस्था, त्यातूनच छोटय़ा मुलांसाठीचा ‘जिजामाता बाल संस्कार’ वर्ग आणि त्यातूनच सुरू झाले ‘उत्कर्ष बालक मंदिर’. पुढे ‘महिला अन्याय निवारण समिती’, आरोग्यदूत योजना अशा एकामागोमाग एक संस्था उभ्या करत आपल्या मैत्रिणीसह गेली ३५ वर्षे सांगोल्यातल्या ग्रामीण स्त्रीला सक्षम करत नवा जन्म देणाऱ्या डॉ. संजीवनी केळकर यांचा हा प्रवास. त्यांच्याच शब्दांत.
सांगोल्यातला डॉक्टरी व्यवसायातील माझा हा अगदी सुरुवातीचा अनुभव. एका १३-१४ वर्षांच्या मुलीला घेऊन तिची आई माझ्याकडे तपासणीसाठी आली. तपासल्यावर अ‍ॅनिमियाचे निदान झाले. हिमोग्लोबिन ४ ग्रॅम होते. मी तिला इंजेक्शन, गोळय़ा दिल्या आणि तिला प्रथिनयुक्त आहाराचा सल्ला दिला. बरोबर रक्तवाढीसाठी अंडी, दूध, मटण, खजूर, शेंगदाणे वगैरे खाण्यासही सांगितले. माझा सल्ला ऐकून तिची आई रडू लागली. म्हणाली, ‘ बाई, २ महिनं झालं, पोरीला दम भरतोय, शाळंला जाईना, जागची उठंना म्हणून तिला तुमच्याकडं आणली. येताना वाटखर्चीसबी पसं नव्हतं म्हणून घरात २ किलो जुंधळं होतं ते शेजारणीला इकलं आणि इथवर आले. आता उद्याच्याला माझ्या पोरांना खायला एकसुदिक दाणा न्हाय घरात आणि तुमी दूध, अंडी बोलताय. कसं करू वो म्या?’ मी गलबलले. दारिद्रय़ असं इतक्या भयावह पद्धतीने सामोरं येईल याची मला कल्पना नव्हती. मी नेमकी कुठे आले आहे आणि नेमकं काय करावं लागणार आहे याचं भान त्या घटनेने मला दिलेच पण अधिकाधिक मन बधिर करणाऱ्या घटना सामोऱ्या येतच राहिल्या, त्यातूनच प्रेरणा मिळाली ती इथल्या लोकांसाठी विधायक गोष्टी करण्याची.
सांगोला तालुक्यातील मी पहिली एमबीबीएस महिला डॉक्टर. पहिली आणि बरीच वर्षे एकटीच! त्यामुळे सुरुवातीच्या काळात खूप वेगळे अनुभव गाठीस पडले. पुण्यामध्ये जन्मलेल्या तिथल्या सुसंस्कृत, सुशिक्षित, संवेदनशील आणि आई-वडिलांच्या पंखाखाली सुरक्षित वातावरणातलं माहेर सोडून मी लग्न करून १९७३ मध्ये सासरी, सांगोल्याला कायमची आले. आणि माझ्या भावविश्वाच्या अक्षरश: ठिकऱ्या झाल्या..
 अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर सामाजिक बांधीलकी वगरे साठी मी सांगोल्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात आले असं घडलं नव्हतं. पती
डॉ. सतीश केळकर आणि त्यांचे आई, वडील व इतर कुटुंबीय आवडले आणि मी संजीवनी गोडबोलेची संजीवनी केळकर झाले. लग्न करताना ‘ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यवसाय’ हाच एक ढोबळमानाने स्वीकारलेला वेगळा मुद्दा होता. पण जसं जसं मी त्यात शिरत गेले तसं तसं दु:खं, दारिद्रय़ आणि मानवी नात्यांचा गुंता त्यातील भयानकतेसह प्रत्ययाला येऊ लागला.
 आमच्या दूधवाल्या हिराची ही गोष्ट. वागणुकीच्या संशयामुळे तिला तिच्या पतीने सोडून दिलेलं होतं. ती हिमतीनं आपल्या विधवा आईसोबत राहून म्हशी पाळून दुधाचा व्यवसाय करीत असे. रतीब घालण्यासाठी रोज दूध घेऊन आमच्या घरी येई. अतिशय चलाख आणि हजरजबाबी होती ती. माझ्याच वयाची होती, मला नेहमी वाटे – माझ्यासारखी संधी मिळाली असती तर ही पण नक्की डॉक्टर झाली असती! आणि एक दिवस दुपारी तिची आई रडत, ओरडत हॉस्पिटलमध्ये आली आणि अक्षरश छाती बडवून सांगू लागली की, ‘हिराला तिच्या नवऱ्यानं घरी येऊन अंगणात पेटवून दिलंय!’ मी बधिर झाले. माझ्या सासऱ्यांना ही घटना लगेच सांगितली. त्यांनी ताबडतोब तिला आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्याचा सल्ला दिला आणि तातडीने तहसीलदारांना आमच्याकडे बोलवून घेतले. हिरा आल्याबरोबर तिची मृत्यूपूर्व जबानी तहसीलदारांनी नोंदवून घेतली आणि मग तिला आम्ही पुढील उपचारांसाठी सोलापूरला पाठविले. तिच्या जळाल्याच्या जखमा ७० टक्क्यांहून अधिक होत्या. त्यामुळे ती काही दिवसांतच मरण पावली. मात्र तिच्या हत्येला कारणीभूत झाल्याने तिच्या नवऱ्यावर मनुष्यवधाचा खटला दाखल झाला. त्यात माझ्या पतींची महत्त्वाची साक्ष झाली आणि तिच्या मृत्यूपूर्व जबानीमुळे तिच्या नवऱ्याला शिक्षाही झाली. हे सगळं खूप भयानक होतं. ते स्वीकारणं त्याहून भयानक होतं आणि मग अशा कितीतरी हिरा इथे आसपास असतील, त्यातल्या कितीजणींची कर्मकहाणी माझ्यापर्यंत पोहोचू शकेल आणि अशा हिरांसाठी कोण काय करेल? त्यातूनच मी काही करू शकेन का? याची शक्यता आजमावयाला माझ्या मनानं सुरुवात केली.
 रोजच्या वैद्यकीय व्यवसायात हे पक्केलक्षात येत होतं की मी प्रत्यक्ष इथे येण्यापूर्वी जी कल्पना केली होती त्यापेक्षा इथलं वास्तव खूप वेगळं आहे. अधिक भयाण आहे. यामुळे अस्वस्थता येत होती. ग्रामीण भागातील महिलांशी जवळून परिचय होत होता. त्यांची सुख-दु:खं त्यांच्या शब्दातून मनाला भिडत होती. यातून असं लक्षात येत होतं की या ग्रामीण स्त्रीचं भावविश्व खूप वेगळं आहे, तिच्या समस्यांचा पोत वेगळा आहे. त्या समस्यांची उत्तरंही वेगळी आहेत. मी आजपर्यंत वाचलेलं, पाहिलेलं, अनुभवलेलं पांढरपेशा, शहरी स्त्रीचं भावविश्व या ग्रामीण स्त्रीपासून खूप अंतरावर आहे आणि सगळीकडे लिहिलं जातं, चर्चा होतात त्या या शहरी स्त्रीला केंद्रिबदू मानून! खरं तर भारताचा ७० टक्के भाग खेडय़ांचा असताना आणि त्यात जवळजवळ ५० टक्के महिला असताना त्यांचा फारसा विचारच कोणी केलेला नाही. स्त्रीविषयक अनेक बाबींचा माध्यमांमधून विचार मांडला जातो तोही शहरी स्त्रीला केंद्रस्थानी ठेवूनच. ग्रामीण भागामध्ये राहून, सर्व प्रकारच्या अभावांना, पुरुषकेंद्रित ग्रामीण रूढी, परंपरांना, पुरुषांच्या व्यसनांना, दारिद्रय़ाला, शारीरिक कष्टांना, समाजातील गुंडगिरीला तोंड देत जगणाऱ्या स्त्रीबद्दल फारसा कळवळा कुणाला दिसत नाही. अशा विचारांमुळे अस्वस्थता वाढत होती. आपल्यासारख्या स्वत:ला सुसंस्कृत म्हणविणाऱ्या आणि संपन्न प्रतिष्ठित घरातल्या व्यक्तींनी ग्रामीण स्त्रीसाठी काही करणं खरं तर शक्य आहे, आणि जर आपल्यालाही हे जमणार नसेल तर मग कुणीतरी हे करावं असं म्हणण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? असेही प्रश्न मनाला पडत होते.
१९७३-७४ मध्ये डॉक्टरी व्यवसाय सुरू केल्यापासूनची चार-पाच वर्षे अशा अस्वस्थतेत गेली. या वर्षांतच घरातील वृद्ध माणसांचे प्रकृती अस्वास्थ्य आणि माझ्या दोन मुलांचा जन्म झाला. त्यामुळे या काळात फारसं काही करता आलं नाही. पण मनामध्ये विचारमंथन चालू होते. माझ्याकडे येणाऱ्या सर्व स्तरांतील महिलांशी सतत महिला डॉक्टरच्या भूमिकेतून हा विचार बोलत होते. त्यातच १९७५-७६ मध्ये देशात आणीबाणी आली आणि आपण काहीतरी करायचंच या विचारानं उचल खाल्ली. रुग्ण म्हणून परिचित झालेल्या आणि नंतर जिवाभावाची मत्रीण बनलेल्या नीला देशपांडे तसेच माधवी देशपांडे, कै. निर्मला वांगीकर, कै. नलिनी ठोंबरे, प्रतिभा पुजारी, वसुधा डबीर, वसुंधरा कुलकर्णी, प्रा. शालिनी कुलकर्णी, प्रा. चित्रा जांभळे, श्रीदेवी बिराजदार अशा आम्ही मत्रिणींनी मिळून १९७८-७९ मध्ये ‘महिला सहविचार केंद्र’ सुरू केलं. आणि हे केंद्र म्हणजे जणू आमचा ‘पाणवठा’ बनला. दर आठवडय़ातून एकदा चालणाऱ्या या केंद्रात सर्व जातीधर्माच्या, सर्व वयोगटाच्या, अशिक्षित, अर्धशिक्षित, सुशिक्षित, पदवीधर, तसेच सर्व आर्थिक स्तरांमधील ग्रामीण महिला सहभागी होऊ लागल्या. मनमोकळेपणानं आपली दु:खे मांडू लागल्या, एकमेकींचे अश्रू पुसू लागल्या, एकमेकींना आधार देऊ लागल्या आणि मुख्य म्हणजे परिस्थितीचा विचार करायला शिकल्या, विचार करून समस्यांवर तोडगे शोधायला आणि ते तोडगे अमलातही आणायला शिकू लागल्या. कालपर्यंत मानही वर न करणाऱ्या महिलांनी ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ ही महिला संस्था रजिस्टर केली आणि संस्थेच्या माध्यमातून छोटय़ा मुलांसाठीचा ‘जिजामाता बाल संस्कार’ वर्ग १९७९ मध्ये सुरू केला व तो नेटाने चालविलाही! त्यातूनच १९८०मध्ये बालवाडी सुरू करण्याची कल्पना सुचली आणि सगळ्यांनी मिळून सांगोला तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एक चॅरिटी शो आयोजित केला – जादूगार विजय रघुवीर यांचा! त्यातून बालवाडीसाठीचा निधी उभा राहिला आणि जून १९८०मध्ये डॉ. केळकर हॉस्पिटलच्या आवारातच ‘उत्कर्ष बालक मंदिर’ सुरू झाले. त्यासाठी शिक्षिका, सेविका होत्या सहविचार केंद्रातील सभासद. १९८१मध्ये पालकांच्या आग्रहाने उत्कर्ष प्राथमिक विद्यालयाचा पहिलीचा वर्ग सुरू झाला. सहविचार केंद्रातून निष्ठावान कार्यकर्त्यां मिळत गेल्या, त्यांना आम्ही हर प्रयत्नाने प्रशिक्षित केले आणि त्यांनी उत्कर्ष प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक विद्यालय उभे केले. आज आमच्या शाळेतील विद्यार्थी संख्या एकूण ७५० आहे. जून २०१२ पासून ५ वी चा वर्ग सुरू झाला आहे आणि दरवर्षी एक इयत्ता वाढवत शाळा दहावीपर्यंत वाढविण्याचा मानस आहे. मन, मनगट आणि मेंदू यांचा मिलाफ साधून ग्रामीण विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधणारी शाळा असा नावलौकिक या शाळेनं मिळवला आहे. वनस्थळी आणि निर्मला पुरंदरे यांचे मोलाचे सहकार्य या कामात आम्हाला लाभले आहे. शाळेतील औपचारिक शिक्षणाबरोबरच ग्रामीण मुलांसाठी विविध छंदवर्ग, व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, मुक्त विद्या केंद्र,
छोटय़ा -मोठय़ा सहली. उत्कर्ष कलावर्धिनी यांसारखे बहुआयामी उपक्रम संस्थेने आयोजित केले आहेत व करते आहे.
१९९० मध्ये आम्ही ग्रामीण महिलांसाठी ‘महिला अन्याय निवारण समिती’ स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून आजपर्यंत १८७० अन्यायग्रस्त महिलांच्या तक्रारी नोंद झाल्या. यातील ४० टक्के अर्जाबाबत यशस्वी तडजोड होऊ शकली. आज सांगोला येथे भारतीय स्त्री-शक्तीच्या सहकार्याने केंद्रीय समाज कल्याण बोर्डाचे ‘मत्रीण कुटुंब सल्ला केंद्र’ व मंगळवेढा येथे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने महिला समुपदेशन केंद्र सुरू आहे. ग्रामीण महिलांनी आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण व्हावे म्हणून १९९२ मध्ये आम्ही व्यवसाय प्रशिक्षणांना सुरुवात केली. शेळीपालन, गांडूळखत निर्मितीपासून ते संगणक आणि ब्यूटीपार्लर प्रशिक्षणापर्यंत ३८ प्रकारची व्यवसाय प्रशिक्षणे घेऊन आजपर्यंत ३१०३ महिला प्रशिक्षित झाल्या. त्यातून स्वत:चे छोटे छोटे व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून अधिक आहे. या प्रशिक्षणांसाठी कोल्हापूर येथील
कांचन परुळेकर यांच्या ‘स्वयंसिद्धा’चे उत्स्फूर्त मार्गदर्शन आम्हाला मिळाले.
व्यवसायाभिमुख झालेल्या ग्रामीण स्त्रीला पतपुरवठा मिळावा आणि त्यामुळे तिचे तिच्या कुटुंबातील स्थान सन्मानाचे व्हावे यासाठी १९९५ मध्ये भारतीय स्त्री शक्तीच्या साहाय्याने आम्ही पाच महिला बचतगट सुरू केले. आजपर्यंतच्या २६५ गटांपकी १४० गट स्वयंपूर्ण झाले असून १२५ गटांचे व्यवस्थापन सध्या आम्ही करीत आहोत. बचतगटांमुळे ग्रामीण महिला स्वत: सक्षम, सबल झाल्या आणि त्यांनी त्यांची कुटुंबेही तेवढीच सक्षम केली.
आम्ही मेडलरी चरख्यावर लोकरीचे सूत कातण्याचे दिलेले प्रशिक्षण घेऊन निरक्षर शकुंतला खडतरेने स्वत:च्या क्षमता वाढवीत सुरू केलेला चप्पल कारखाना, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांसाठी आम्ही दिलेले प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर झालेल्या सरपंच शारदा रणदिवेने संस्थेच्या अर्थसाहाय्यातून तिच्या गावातील ओढय़ामध्ये बांधलेला बंधारा, खाटीक व्यवसाय करणाऱ्या हसीना मुलाणीने बचतगटातून नेतृत्व विकसनाचे प्रशिक्षण घेऊन गावच्या उपसरपंचपदापर्यंत बिनविरोध मारलेली भरारी, शेळीपालनाच्या प्रशिक्षणातून एका शेळीपासून १० दुभत्या जनावरांच्या गोठय़ापर्यंत मजल मारणारी समाबाई गडदे, बालवाडी प्रशिक्षणातून प्रथम बालवाडी सुरू करून आपल्या नाकर्त्यां पतीला मिळवते करून आपला आणि शेजारपाजारच्या बायाबापडय़ांचाही संसार सावरणारी शारदा बोत्रे, शिलाई प्रशिक्षणातून स्वत:चे शिलाई मशीन घेऊन शिलाई करणाऱ्या २९० हून अधिक महिला, भाजी विक्री, फळ विक्री, चहाची टपरी, बांगडय़ांचे दुकान, किराणा दुकान, कापड दुकान, मालाची ने-आण करण्याचा वाहन व्यवसाय अशा छोटय़ा-मोठय़ा अनेक व्यवसायातून २००० हून अधिक महिला आणि त्यांची कुटुंबे विकसित झाली आहेत. समाजात प्रतिष्ठित झाली आहेत. यासाठी बँकांप्रमाणेच
प्रो. यामातो कावाकामी फाऊंडेशनने या प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान दिले आहे.
२००८ मध्ये ग्रामीण भागातील मातामृत्यू आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी आम्ही ‘आरोग्यदूत’ योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून आम्ही १० गावांमधील ग्रामीण महिलांना प्रसूतिपूर्व आणि नवजात शिशूंच्या तपासणी व धोक्यांचे प्रशिक्षण दिले. आज त्या आपापल्या गावांमध्ये ‘आरोग्यदूत’ म्हणून जबाबदारीने काम करीत आहेत व तेथील मातामृत्यूचे प्रमाण त्यांनी जवळजवळ शून्य टक्क्यांवर आणले असून नवजात शिशूंच्या मृत्यूचा दरही परिणामकारकपणे घटलेला आहे. या कामासाठी ‘सेवासहयोग’चा सहयोग मोलाचा ठरला.
 ग्रामीण महिलेचे सक्षमीकरण आणि त्यातून स्वावलंबी समाजनिर्मितीचा संकल्प हे उद्दिष्ट ठेवून शिक्षण, आरोग्य, अन्याय-अत्याचारांविरुद्ध संघर्ष, आर्थिक स्वावलंबन आणि पर्यावरण साक्षरता या पंचसूत्रीचा अवलंब आम्ही केला आहे. १९७८ पासून आज ३५ वर्षे आम्ही मत्रिणींनी आपापले संसार, व्यवसाय सांभाळून, गुण्यागोिवदाने आणि एकदिलाने, ग्रामीण समाजाचा एक भाग होऊन ग्रामीण स्त्रीला आणि तिच्या कुटुंबाला सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. या कामासाठीचे अर्थसाहाय्य समाजामधूनच आम्हाला मिळाले आहे, मिळते आहे. आजपर्यंतच्या प्रवासाचे सिंहावलोकन करताना मनात खूप समाधान आहे. काम करीत असताना नराश्यांचेही अनेक क्षण आले पण त्यात समाधानाचे पारडे मात्र नेहमीच जड राहिले. माझ्या दोन्ही मुलांनी आणि कुटुंबीयांनी या कामाला ‘माझे तिसरे मूल’ समजून आपले मानले आणि मला नेहमीच सहकार्य दिले. तसेच आज आमच्या टीममधून पुढील जबाबदारी पेलणारी दुसरी फळी आत्मविश्वासाने पुढे येते आहे ही फार फार समाधानाची बाब आहे!
संपर्क- डॉ. संजीवनी केळकर                 
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, देशपांडे लेन, केळकर हॉस्पिटलसमोर, सांगोला
जि. सोलापूर – ४१३ ३०७
दूरध्वनी- ९१२१८७-२२०७४१
 ई-मेल- – matabalak@yahoo.co.in  वेबसाइट-http://www.matabalak.org