डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com

‘समजून घेण्याचा थकवा.’ याचा अर्थ दुसऱ्या व्यक्तीला सतत आधार देण्याचा किंवा समजून घेण्याचा येणारा ताण. अलीकडच्या संशोधनानुसार पालक-मूल संबंधांत हा थकवा येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्यापकी अनेकांना असा थकवा जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर येत असतो; परंतु तो आल्याची जाणीवही बहुतेकांना नसते. आपल्या जिवलग व्यक्तींना मानसिक आधार द्यायला आपण सदासर्वकाळ उपलब्ध असलंच पाहिजे, या भावनेचं दडपण इतकं जास्त असतं, की सहनशक्तीचा कडेलोट होईपर्यंत ते स्वत:ला फरफटत नेतात..

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
how to use data science properly how to learn data science
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्स
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
Marathwada Socio economic backwardness,
मराठवाड्याच्या अस्वस्थतेची पाळंमुळं
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?

मनालीची आई सांगते, ‘‘मनाली इतकी हळवी आहे, की जरा जरी कोणी मनाविरुद्ध बोललं तरी मनाला फार लावून घेते. तिला सारखं समजावून सांगून उभारी द्यावी लागते. परीक्षेत गुण उत्तम असतात, पण माझा अभ्यास झाला नाही, म्हणून परीक्षेच्या आधी इतकी रडारड करते, की तिच्या कलानं घेत हळूहळू परीक्षेला तयार करावं लागतं. आता ती परदेशात उच्च शिक्षण घेत आहे. पण तिचा फोन आला की मला धस्स होतं. कधी हुप्प होऊन बसेल, तर कधी घळाघळा रडेल याचा भरवसा नसतो. तिची सारखी समजूत घालावी लागते; नाही तर कोलमडून पडेल अशी भीती वाटते. ‘करोना’ची साथ सुरू झाल्यापासून तर मला तिला सारखा धीर द्यावा लागतोय. तिला तणाव आला की मीही बेचन होते. ती रडत असली की मलाही रात्रभर झोप येत नाही. हे इतकं वारंवार होतंय, की या तणावाचं ओझं मला हल्ली असह्य़ होतंय. समजून घेण्याची माझी शक्ती संपुष्टात आलीय. ’’

प्रसाद सांगतो, ‘‘माझी आई ८५ वर्षांची आहे. पायांवरची शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळे ती फारशी हालचाल करू शकत नाही. तिला होत असणाऱ्या वेदनांनी माझा जीव कळवळतो. ‘जगून काय उपयोग,’ असं ती सारखं बोलत राहते. मी तिला समजून घेऊन त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तरी ती हट्ट धरून डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य पाळत नाही की व्यायाम करत नाही. मी जराही दृष्टिआड झालो तरी ती थयथयाट करते. माझीही आता साठी उलटलीय. उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झालाय. कधी कधी माझा इतका उद्रेक होतो की मी तिच्यावर ओरडतो. मग तिला आधार देण्याचं माझं बळच संपुष्टात येतं.’’

मनालीची आई आणि प्रसाद ज्या मानसिक अवस्थेतून जात आहेत, तिला म्हटलं जातं, ‘समजून घेण्याचा थकवा’(‘कम्पॅशन फटीग’). याचा अर्थ दुसऱ्या व्यक्तीला सतत आधार देण्याचा किंवा समजून घेण्याचा येणारा ताण. दुसऱ्यांना समजून घेण्यासाठी सतत स्वत:च्या मनाला मुरड घालावी लागते. स्वत:च्या नसíगक उर्मीना दाबून ठेवावं लागतं. याचा भार वाजवीपेक्षा जास्त झाला तर भावनिक प्रतिसाद देण्याची क्षमता काही काळ हरवते. हा ताण एका रात्रीत येत नाही. जेव्हा एक किंवा अधिक व्यक्तींना मोठय़ा कालावधीपर्यंत सातत्यानं समजून घ्यावं लागतं, तेव्हा होणाऱ्या मानसिक श्रमांमुळे हा ताण येतो. ‘समजून घेण्याचा थकवा’ ही संकल्पना प्रथम आघातशास्त्रात (‘ट्रॉमॅटॉलॉजी’) वापरली गेली. मानसिक आरोग्य किंवा सेवा क्षेत्रात कार्य करणारे व्यावसायिक- उदाहरणार्थ डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ, परिचारिका, सामाजिक कार्यकत्रे, पत्रकार, इत्यादींना मानसिक आघात झालेल्या व्यक्तींसमवेत काम करावं लागतं. त्यांना समजून घेऊन अथक आधार द्यावा लागतो. याच्या अतिताणामुळे त्यांना हतबलता, चिडचिड, अविरत विचारचक्र, निद्रानाश, शारीरिक वेदना, अशा लक्षणांबरोबर कधी कधी भावनिक बधिरेपणही येऊ शकतं. थोडक्यात, त्यांना समजून घेण्याचा थकवा येतो. थकवा येणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्ष तणावातून जात नसतात, पण तणावात राहणाऱ्या व्यक्तींच्या अखंड सहवासात राहून तणाव त्यांच्यांपर्यंत संक्रमित होतो. त्यामुळे आधार देणाऱ्या व्यक्ती तणावाच्या अप्रत्यक्ष बळी होतात. मनालीची आई आणि प्रसाद हे तणावाचे असेच अप्रत्यक्ष बळी आहेत.

असा थकवा फक्त व्यावसायिकांनाच नाही, तर ज्यांना सतत इतरांना आधार द्यावा लागतो अशा पालक, शिक्षक, मार्गदर्शक इत्यादींनाही येऊ शकतो. अलीकडच्या संशोधनानुसार पालक-मूल संबंधांत हा थकवा येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्यापकी अनेकांना असा थकवा जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर येत असतो; परंतु तो आल्याची जाणीवही बहुतेकांना नसते. आपल्या जिवलग व्यक्तींना मानसिक आधार द्यायला आपण सदासर्वकाळ उपलब्ध असलंच पाहिजे या भावनेचं दडपण इतकं जास्त असतं, की सहनशक्तीचा कडेलोट होईपर्यंत ते स्वत:ला फरफटत नेतात आणि मनालीची आई वा प्रसादप्रमाणे अखेरीस स्वत:चं भावनिक आरोग्य धोक्यात आणतात. समजून घेण्याच्या थकव्यातून बाहेर येण्यासाठी दोन पायऱ्यांवर काम करणं आवश्यक आहे. पहिली पायरी म्हणजे आपल्याला हा थकवा आला आहे हे मान्य करणं. त्यासाठी प्रियजनांना समजून घेण्यातही चढ-उतार होऊ शकतात किंवा काही वेळा आपण त्यांना समजून घेऊ शकतही नाही, हे लक्षात घेतलं तर  स्वत:ला हतबल किंवा अपराधी न समजता व्यक्ती स्वत:च्या माणूसपणाचा स्वीकार करेल. दुसरी पायरी म्हणजे स्वत:ला समजून घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं. ‘स्वत:ला समजून घेणं’ ही इतरांना समजून घेण्याअगोदरची पायरी आहे. स्वत:ला समजून घेणं म्हणजे स्वत:कडे दयाळूपणे पाहणं. याचा अर्थ आत्मकेंद्री होणं नव्हे. तर  स्वत:ला व इतरांना समजून घेण्याचा समतोल साधणं. त्यासाठी प्रथम स्वत:चं मानसिक आरोग्य सुस्थितीत राखणं आणि त्यास प्राधान्य देणं गरजेचं आहे.

मनालीच्या आईला वाटतंय, की आपण आई आहोत म्हणजे सदासर्वकाळ मनालीकडे लक्ष पुरवणं आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी तिनं स्वत:वर इतकी अनसíगक बंधनं घालून घेतली आहेत की स्वत:च्या व्यक्तिगत गरजा आणि प्राधान्यांना ती नगण्य लेखते व स्वत:च्या उपलब्धतेबद्दलच्या मनालीच्या अपेक्षा वाढवून ठेवते. त्यामुळे मनालीलाही आईच्या गरजांकडे लक्ष पुरवण्याची गरज वाटत नाही. स्वत:ला दुय्यम समजल्यामुळे प्रसादच्याही शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम होतोय. संपूर्ण लक्ष फक्त स्वत:कडे असल्यामुळे आपल्या भावनिक मागणीमुळे इतरांची गरसोय होत आहे याची मनालीला किंवा प्रसादच्या आईला जाणीव होत नाहीये, आणि तेही ती करून देत नाहीत. परिणामी मनाली आणि प्रसादची आई स्वत:च्या भावनिक गरजांबाबत अधिकाधिक दुराग्रही आणि आत्मकेंद्री होत आहेत. या दोघांनीही स्वत:च्या गरजा आपल्या जिवलगांपेक्षा वेगळ्या आहेत हे मान्य करून त्यांना प्राधान्य देऊन त्या पुरवल्या तर समजून घेण्याचं कार्य ते सक्षमतेनं करू शकतील.

या दोघांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इतरांना समजून घेणं हे तात्पुरतं उद्दिष्ट म्हणून ठीक आहे, पण त्यांना खरी मदत निव्वळ समजून घेण्यानं होणार नाहीये. त्यासाठी समजून घेण्याच्या पुढल्या टप्प्यावर- म्हणजे मानसिक आरोग्याच्या दीर्घकालीन उद्दिष्टाकडे जायला लागेल. हा टप्पा म्हणजे मनालीला आणि प्रसादच्या आईला मानसिकदृष्टय़ा सक्षम करणं, खंबीर आव्हानांसाठी सज्ज करणं. त्यांना भावनिक स्वावलंबन शिकवायचं असेल तर त्यांना लागलेली सततच्या आधाराची सवय खंडित केली पाहिजे. त्यासाठी काही प्रसंगांत आधार न देता कठीण प्रसंग स्वत:च हाताळण्यास त्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. जर मनालीच्या आईला मनालीसारखाच आणि प्रसादला त्याच्या आईसारखाच असा तणावाचा समान अनुभव येत असेल तर याचा अर्थ ते स्वत:त आणि जिवलग व्यक्तींत भावनिक अंतर ठेवू शकत नाहीत. मदत करण्याकरिता लागणारी वस्तुनिष्ठता ते स्वत: तणावग्रस्त असताना ठेवू शकणार नाहीत. भावनिक अंतर राखणं म्हणजे तोडून टाकणं किंवा दूर जाणं नव्हे, तर हे अंतर राखूनही आपण प्रियजनांच्या जवळ राहू शकतो. किंबहुना तसं करून आपण इतरांना व  स्वत:ला पुरेसा मानसिक अवकाश पुरवत असतो. मानसिक आरोग्याच्या दीर्घकालीन उद्दिष्टासाठी ते आवश्यक असतं. हे जर या दोघांनी लक्षात घेतलं तर समजून घेण्याच्या थकव्यातून ते बाहेर येतील आणि इतरांना समजून घेणं कार्यशीलतेनं करू शकतील.

समजून घेण्याच्या थकव्याची व्याप्ती फक्त एकटय़ादुकटय़ा व्यक्तीपुरतीच मर्यादित नाही, तर त्याची लागण संपूर्ण समाजाला झपाटय़ानं होत आहे. आपण सगळे जण वैयक्तिक किंवा सामाजिक पातळीवर हा थकवा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अनुभवत असतो. दु:ख, हाल, बळी यांचं अतिरिक्त चित्रण इतक्या तपशिलांत आणि सातत्यानं आपल्यासमोर येत असतं, की पीडितांना समजून घेण्याची आपली क्षमताच बोथट होते. त्यांच्यासाठी विधायक प्रयत्न करण्याऐवजी हतबलता, भावनिक उद्रेक, नाही तर सुन्न बधिरता आपण सामुदायिकरीत्या अनुभवत असतो. हे कसं होतं, याचं यथार्थ वर्णन या क्षेत्रातले तज्ज्ञ चार्ल्स फिगली यांनी केलंय. ते म्हणतात, ‘‘आपण त्या वेदनांचा थेट अनुभव घेतलेला नसतो, पण त्या वेदनांची दर्दभरी कहाणी रोज ऐकत असतो. त्यांची तीव्रता अनुभवत असतो. एकदा, नाही तर वारंवार या कहाण्या ऐकत असतो. वेदना अनुभवणाऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांची भीती आपण अनुभवतो, त्यांचं दु:ख आपण अनुभवतो, त्यांचा स्वप्नभंग आपण अनुभवतो, आणि एके दिवशी आपल्याला कळतं, की हे सर्व अनुभवताना आपण भावनाच हरवून बसलो आहोत. आपण आजारी नसतो, पण आपल्यातलं आपलेपण हरवलेलं असतं.’’

आपलेपण हरवलं आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर समजून घेण्याच्या थकव्याचा धोक्याचा कंदिल समोर आहे असं समजा आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कृतिशील व्हा.

Story img Loader