ॐकार साधनेतील मूलतत्त्वे समजून घेणे, अंगीकारणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ती मूलतत्त्वे उच्चारणात अंगीकारली तरच ॐकार उच्चारणातून सुयोग्य स्पंदने मिळतील व म्हणूनच उत्तम परिणाम दिसतील, अन्यथा नाही. ती मूलतत्त्वे खालीलप्रमाणे –
*ॐकार उच्चारताना आधी मुद्दाम खोल श्वास घेऊन उच्चार सुरू करू नये. आपण दैनंदिन जीवनात बोलताना, कधी आधी श्वास घेऊन बोलतो का? मुळीच नाही ! मग ॐकार उच्चारताना आधी श्वास कशासाठी? कारण नसर्गिकत: श्वास सोडल्यानंतरही ५०० सी.सी. श्वास फुप्फुसात असतोच ज्याला टीडल एअर असे म्हणतात आणि तेवढा श्वास ॐकार उच्चारणासाठी पुरेसा असतो. श्वास घेताना तो मुद्दाम ओढू नये, खेचू नये, घिसडघाईने अथवा गचके मारत घेऊ नये. ॐकाराचा उच्चारही कंठातून बोलण्याइतका सहज व लयबद्ध झाला पाहिजे तरच ॐकाराची परमशुद्ध स्पंदने निर्माण होऊन सुसंवाद साधून सुयोग्य परिणाम घडतील. कितीही वेळ साधना केली तरीही साधकास थकवा येणार नाही.
* ॐकार साधना ही उदरश्वसनाच्या (म्हणजे श्वासपटलाधारित श्वसनाच्या) पायावरच उभी राहिली पाहिजे म्हणजे दोन ॐकार उच्चारणामध्ये जो श्वास घ्यायचा आहे तो मुखाने, कंठाने, पोटाने, सहज, लयबद्ध, फुप्फुसाच्या मागच्या भागातून व खालच्या दिशेने घेतला गेला पाहिजे, असा सप्तगुणाने श्वास घेणे ही ॐकार उच्चारणातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. छातीतील फुप्फुसांचा वरचा निमुळता भाग फुगवून व खांदे उचलून श्वास मुळीच घ्यायचा नाही. आपण पोटाने श्वास घेत आहोत की नाही हे तपासण्यासाठी उजव्या हाताचा पंजा पोटावर (नाभीवर) व डाव्या हाताचा पंजा छातीच्या वरच्या भागाच्या मध्यावर ठेवावा. दोन ॐकारांच्या मध्ये जर पोटाने श्वास घेतला गेला (पोटाने श्वास घेणे म्हणजे पोटात हवा भरणे नव्हे तर श्वासपटल आकुंचित करून फुप्फुसाच्या खालील रुंद भागात हवा भरणे) तर पोटावरील हात उचलला जाईल, श्वास घेताना तसा तो उचलला गेला पाहिजे. छातीवर ठेवलेल्या हाताची ॐकार उच्चारणामधील श्वास घेताना बिलकूल हालचाल होता कामा नये. दोन ॐकार उच्चारणामध्ये, वर सविस्तर सांगितल्याप्रमाणे श्वासपटलाधारित श्वसन केले म्हणजेच पोटाने श्वास घेतला तर साधनाभर साधकाचा कंठ खुला राहतो, परंतु खांदे उचलून किंवा छातीचा वरचा भाग फुगवून श्वास घेतला तर कंठ बंद होतो. म्हणून ॐकार साधकाने खांदे उचलून आणि छातीचा वरचा भाग फुगवून कंठ बंद करणारा श्वास कधीही घेऊ नये मग ती प्राणायामाची क्रिया असो वा ॐकार उच्चारणाची.
सारांश – दोन ॐकार उच्चारणामध्ये श्वासपटलाधारित श्वसन हा ॐकार उच्चारणाचा पाया आहे.
डॉ. जयंत करंदीकर-omomkarom@rediffmail.com
ॐकार उच्चार साधना
ॐकार साधनेतील मूलतत्त्वे समजून घेणे, अंगीकारणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ती मूलतत्त्वे उच्चारणात अंगीकारली तरच ॐकार
First published on: 14-02-2015 at 03:18 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talking in daily life