करिअरची निवड नेहमी बरोबरच असेल असे नाही. कदाचित पहिल्या शिडीवरून खाली उतरून दुसऱ्या शिडीवरून पुन्हा वर चढावे लागेल, पण काही हरकत नाही. तसे केल्याने काही बिघडत नाही. पालकांना आत्ताच्या जगातील स्पर्धा भेडसावत असते, पण स्पर्धा असली तरी निरनिराळ्या संधीसुद्धा वाढत आहेत. प्रत्येक मुलाला चाखता येतील इतकी फळे उपलब्ध आहेत.
मु लांची इच्छा, त्यांची स्वप्नं आणि त्यांचा कल या तिन्ही गोष्टी करिअर निवडताना एकत्र येतात. चौदा वर्षांच्या मानसीने तिची पायलट होण्याची इच्छा असल्याचे पालकांना सांगितले तेव्हा तिच्या आईने भौतिकशास्त्रात तिला कसे आणि किती कमी गुण मिळाले आहेत यावरून बोलणी ऐकवली. पालकांची ही प्रतिक्रिया अगदी सामान्य आहे. मुलांच्या डोळ्यात करिअरविषयी अनेक स्वप्नं असतात आणि ती सारखी बदलत असतात. १९७१ च्या युद्धाचा इतिहास वाचला की त्यांना सन्यात भरती व्हावेसे वाटत असते आणि डॉ. होमी भाभांचे चरित्र वाचले की त्यांना त्यांच्यासारखे आपणही मोठे वैज्ञानिक व्हावे असे वाटू लागते. पण मुलांची ही स्वप्नं, त्यांच्या इच्छा याबाबत उपरोधाने न बोलता ती ऐकून घेणे महत्त्वाचे असते. त्यावर लगेच कृती करणे गरजेचे नाही, पण मुलांच्या डोक्यात काय शिजतंय हे कळून घेणे गरजेचे आहे.
१५ वर्षांच्या यशने करिअरच्या बाबतीत अजून काहीच ठरवले नाही, याचीच त्याच्या पालकांना काळजी वाटत होती. खरं तर ही अगदी सामान्य गोष्ट आहे आणि यात काळजी करण्यासारखेही काही नाही. मी जेव्हा यशबरोबर बोललो तेव्हा तो मला म्हणाला की त्याला आयुष्यात खूप पसे कमवायचे आहेत आणि श्रीमंत व्हायचं आहे. पण हे तो त्याच्या पालकांसमोर किंवा शिक्षकांसमोर बोलायला घाबरत होता, कारण सगळे टीका करतील, असं त्याला वाटत होतं. ‘श्रीमंत होण्यासाठी तू काय करायचे ठरवले आहेस?’ तेव्हाही त्याने ‘अजून ठरवलं नाहीये’ असे उत्तर दिले. त्याच्या या उत्तराचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. मुलांच्या योजना तयार असतीलच असं नाही, पण याचा असा अर्थ नाही की इच्छाच नाही. मुलांच्या डोळ्यात स्वप्नं आणि मनात इच्छा आहे हे आपण मान्य केले, तर पुढील योजना आखण्यात त्यांना मदत होते. मी त्याला आणखी काही प्रश्न विचारल्यानंतर त्याला त्याचं कोडं सुटायला लागलं आणि त्याने मला ‘मी उद्योगपती होऊ शकतो’ असे सांगितले. जेव्हा त्यांच्या इच्छांची मोठय़ांकडून दखल घेतली जाते, तेव्हा ती मुलं आपोआप त्या स्वप्नांचा पाठपुरावा सुरू करतात आणि त्यांच्या विचारांना आता पुढे काय करायचं याची चालना मिळत जाते.
लतिकाचे वडील सीए होते आणि म्हणून तिलाही त्याच क्षेत्रात जायचे होते. दुसऱ्या कुठल्याही करिअरचा तिने विचारसुद्धा केलेला नव्हता पण जेव्हा सीएच्या प्रवेश परीक्षेत ती दोन वेळा नापास झाली तेव्हा तिचा धीर सुटला. सीए होऊन तिला तिच्या पालकांना खूश करायचे होते, पण नापास झाल्यामुळे ती निराश झाली. एका चांगल्या करिअर समुपदेशकाकडून तिची परीक्षा घेतल्यावर तिचे गणित खूप कच्चे आहे हे आमच्या लक्षात आले. ती आकडेमोड करताना खूप गोंधळ घालायची. जी मुले पालकांना खूश करण्याकरिता करिअर निवडायला जातात ती बरेचदा नंतर निराश होऊन मागे फिरतात. तुमच्या अंगी असलेल्या कौशल्याला तुमच्या स्वप्नांची योग्य जोड मिळाली पाहिजे. नसíगक क्षमता, कौशल्य किंवा स्वाभाविक कल कुठे आहे हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरते.
दहावीच्या निकालानंतर पुढील दिशा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. बहुतेक पालकांना आपली मुले अभियांत्रिकी शाखेकडे जावीत असे वाटत असेल. त्यामुळे कल विज्ञान शाखेकडे असेल. काही वर्षांपूर्वी दहावीत ९४ टक्के गुण मिळवून अभियांत्रिकी शाखेकडे वळलेला जयेश भुताने झपाटल्यासारखा अभ्यास करूनही मागे पडत होता. फार काळजीपूर्वक त्याचे गुणधर्म तपासले असता, अप्लाइड फिजिक्स आणि अप्लाइड मॅथ्स हे विषय त्याच्या क्षमतेच्या पलीकडचे होते असे दिसून आले. अखेर त्याने ती शाखाच सोडली आणि वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन पुढे खूप चांगली कामगिरी केली. आजही हजारो मुले अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अनेक विषयात ‘केटय़ा’ लागल्यामुळे अडकून पडलेली आहेत. अनेकांना शाखा बदलायची इच्छा असते, पण त्यांचे पालक त्यांना तसं करू देत नाहीत आणि मग नराश्याने ग्रासलेली काही मुले व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन स्वतलाच संपवतात तेव्हा खूप वाईट वाटते.
करिअरची दिशा योग्य विचार करून ठरवणे महत्त्वाचे असते. सुजय अंकगणितात खूप मागे पडत होता, क्लिनिकल सायकॉलॉजी विषय त्याला कठीण जात होता, कारण मुळात तो त्याचा विषय नव्हता. त्याचे खरे कौशल्य भाषेत होते, पण हे त्याच्या पालकांना मान्यच नव्हते. त्याला मराठी साहित्य विषयात रस होता. त्याने त्याचे भाषिक कौशल्य उत्तम प्रकारे जोपासले होते. पालक मात्र कला शाखेत त्याने जाण्याच्या पूर्ण विरोधात होते. पण सुजयने कला शाखेकडे जाण्याचा निर्धार पक्का केला होता. पालकांच्या मनात सतत मुलांच्या इच्छा, त्यांचा कल आणि भविष्यातील संधींचा व्यवहार्य विचार याचा गोंधळ चालू असतो. माझा अजूनही मराठी साहित्य विषयात करिअर करू पाहणाऱ्या सुजयला पाठिंबा आहे. ‘ह्य़ुमिनिटीज’ हा कला शाखेतील एक उत्तम आणि आवर्जून घेण्यासारखा विषय असून यात मानवाच्या जगण्यातील विज्ञानापासून ते अर्थकारणापर्यंत सगळं काही आहे हे पालकांना कळण्याची गरज आहे. भाषेत प्रावीण्य मिळवलं तर त्याचा फायदा आज अनेक क्षेत्रात होताना दिसतो. करिअर निवडताना शाळेतील शिक्षकही मुलांना मदत करू शकतात. त्यांच्याशी चर्चा केल्याने नक्कीच मदत होते. आपला कल ओळखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर समुपदेशकाशी चर्चा आणि अभियोग्यता चाचणी केल्यास फायदा होऊ शकतो.
काही उदाहरणांमध्ये असे दिसून येते की, मुलांनी त्यांचा कल बरोबर ओळखलेला असतो आणि आपल्या निर्णयावर ते ठाम असतात. काही वर्षांपूर्वी मी एका मुलीला भेटलो होतो, तेव्हा तिने मला, ‘तिला मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा दुर्बल असणाऱ्या मुलांच्या शाळेत शिक्षिका व्हायची इच्छा’ बोलून दाखवली होती. ही इच्छा तिच्यात कुठून उत्पन्न झाली मला माहीत नाही पण त्या मुलीने आपल्या इच्छेप्रमाणे करिअर केले. ‘मला न्युरो सर्जन व्हायचे आहे’ हे जेव्हा मला एका सहावीत शिकणाऱ्या मुलीने सांगितले तेव्हा मला आश्चर्य वाटले होते. तिची आई मेंदूच्या विकाराने गेल्यामुळे त्या मुलीने हा निर्णय घेतला होता आणि आज त्या मुलीचा त्याच दिशेने प्रवास सुरू आहे. फार लहान वयात काही मुले करिअरचा निर्णय घेतात आणि त्या दिशेने ठरवून पावले टाकीत एका निश्चित धेयाने पुढे जात राहतात. जिथे धेय्य निश्चित असते आणि एका गोष्टीवर मन एकाग्र असते तिथे इतर कोणतीही प्रलोभने तुमच्या धेय्यापासून दूर नेऊ शकत नाहीत.
हेही तितकेच खरे की मुलांची स्वप्ने सतत बदलत असतात. मी लहानपणी एकदा आजारी पडलो होतो. तेव्हा मी मोठेपणी डॉक्टरच व्हायचे असे ठरवले होते. रुग्णांना बरे करण्याची डॉक्टरांची हातोटी, त्यांचा तो पेहराव, त्यांच्या कामाची पद्धत पाहून मी खूप प्रभावित झालो होतो. त्यामुळे मी विज्ञान विषयात रस घेऊ लागलो होतो. पण प्रत्येकाच्या बाबतीत असंच होईल असे नाही. आई-वडील दोघेही डॉक्टर असताना त्यांच्या मुलाला मात्र संगीत कलेचे वेड होते. पालकांना त्याने डॉक्टर व्हावे असे वाटत होते पण त्याला डीजे व्हायचे होते. आज तोच मुलगा आघाडीच्या डीजेपकी एक आहे.
आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी क्लासेसवर पाण्यासारखा पसा ओतण्याची जणू एक लाटच पालकांमध्ये आलेली दिसते. ज्या मुलांना विज्ञान शाखेकडेच जायचे आहे त्यांना कदाचित या क्लासेसचा फायदा होऊ शकतो, पण इथे पुन्हा व्यावहारिक आणि ताíकक विचार करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा क्लासच्या पहिल्या काही दिवसांतच हे आपल्याला जमणारे नाही याची मुलांना खात्री पटते पण तोपर्यंत ती त्यात अडकलेली असतात. ‘क्लास सोडून दे’ सांगण्यात पालकांना लाज वाटते कारण मग -‘शेजारपाजारचे लोक, मित्रवर्ग आणि नातेवाईकांमध्ये काय सांगायचे’ असा अर्थशून्य प्रश्न त्यांना मुलांपेक्षा महत्त्वाचा वाटत असतो. म्हणूनच कुठल्याही क्लासला पसे टाकण्याआधी मुलांच्या शाळेतील शिक्षक, करिअर समुपदेशक यांच्याशी बोलून मग निर्णय घेणे हितावह असते.
करिअरची निवड नेहमी बरोबरच असेल असे नाही. कदाचित पहिल्या शिडीवरून खाली उतरून दुसऱ्या शिडीवरून पुन्हा वर चढावे लागेल, पण काही हरकत नाही. तसे केल्याने काही बिघडत नाही. पालकांना आत्ताच्या जगातील स्पर्धा भेडसावत असते पण स्पर्धा असली तरी निरनिराळ्या संधीसुद्धा वाढत आहेत. प्रत्येक मुलाला चाखता येतील इतकी फळे उपलब्ध आहेत,
फक्त तिथपर्यंत पोहचायची आणि ते गोड फळ चाखायची इच्छा असायला हवी.
डॉ. हरीश श़ेट्टी -harish139@yahoo.com
(क्रमश)