मागील दोन लेखांत आपण ॐकाराच्या अष्टगुणांपकी विस्सठ, मंजू, विञ्ञेय्य व सबनीय या चार गुणांचा परामर्श घेतला. या लेखात आपण बिंदू, अविसारी व गंभीर हे तीन गुण उच्चारणात कसे आणायचे ते जाणून घेऊ-
बिंदू –
बिंदू म्हणजे खणखणीत, थेंबासारखा गोल, ज्याला इंग्रजीत ‘फूल राऊंडेड टोन’ असे संबोधतात. असा उच्चार येण्यासाठी साधक व्यक्तीने आपल्या कंठाचे म्हणजे ब्रह्मकंठ, विष्णुकंठ, शिवकंठाचे उभ्या रेषेत रुंदीकरण करावे.
ही क्रिया अवघड नाही. साधक व्यक्तीला उभ्या रेषेत कंठ रुंद होण्याची प्रक्रिया समजावी म्हणून येथे मी ‘ओ’च्या उच्चारणाची एक कृती सांगत आहे. साधकाने आपला जबडा उभ्या रेषेत पूर्ण उघडून, वरच्या व खालच्या दंतपंक्तीमध्ये उजव्या हाताची मधली तीन बोटे उभ्या रेषेत चिकटून ठेवावी. जबडा सिंहमुद्रेसारखा आडवा फाकवू नये, जबडय़ावर ताण आणू नये, गाल थोडेसे आत घेऊन ‘ओ’चे उच्चारण करावे. ‘ओ’च्या उच्चारणाची जाणीव साधकास ब्रह्मकंठातून म्हणजे खालच्या कंठातून झाली पाहिजे किंवा अशा पद्धतीने केलेला ‘ओ’चा उच्चार खालच्या दंतपंक्तीच्या पाठीमागच्या भागातून होतो आहे असे जाणवले पाहिजे. अशा पद्धतीने हे उच्चारण काही काळ केल्यानंतर ॐकाराचा नसर्गिक उच्चारही गोलाकार होतो, म्हणजेच त्याच्या उच्चारणात गोलाई येते. मग तो उच्चार िबदूप्रमाणे खणखणीत, थेंबासारखा गोल होतो.
अविसारी-
अविसारी म्हणजे न फाटणारा. ज्याचे आवाज पिचतात, फुटतात किंवा फाटतात त्याला इंग्रजीत ‘क्रॅकी व्हाइस’ असे म्हणतात. अशा व्यक्तींनी शास्त्रशुद्ध पद्धतीने ॐचे उच्चारण केले तर त्यांच्या हे निश्चित लक्षात येईल की, इतर शब्द उच्चारणात पिचणारा, फुटणारा व फाटणारा त्यांचा आवाज ॐ उच्चारणात पिचतही नाही व फाटतही नाही.
गंभीर-
गंभीर म्हणजे घुमारा असलेला, मंदिराच्या गाभाऱ्यातून आल्यासारखा उच्चार. आपल्या नेहमीच्या बोलण्यापेक्षाच्या तीन-चार स्वर खालच्या पट्टीत म्हणजेच ज्याला संगीताच्या परिभाषेत मंद्रसप्तक असे म्हणतात, त्या स्वरावर, त्या पट्टीत ॐ नादचतन्याचा कंठस्थ नाभीस्थ उच्चार केल्यास तो घुमारदार लागतो. म्हणजेच मंदिराच्या गाभाऱ्यातून आल्यासारखा वाटतो, यालाच मंदिर गाभारा उच्चार असे म्हणतात. असा उच्चार साधकाच्या मनात पावित्र्याची भावना निर्माण करतो.
आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने अशा उच्चाराचे विशेष महत्त्व आहे. या उच्चाराने मन एकाग्र, स्थिर होते व चित्तास शांती व प्रसन्नतेची अनुभूती येते.
डॉ. जयंत करंदीकर – omomkarom@rediffmail.com
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2015 रोजी प्रकाशित
अष्टगुणी ॐकार उच्चारण
मागील दोन लेखांत आपण ॐकाराच्या अष्टगुणांपकी विस्सठ, मंजू, विञ्ञेय्य व सबनीय या चार गुणांचा परामर्श घेतला. या लेखात आपण बिंदू, अविसारी व गंभीर हे तीन गुण उच्चारणात कसे आणायचे ते जाणून घेऊ-
First published on: 11-04-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three critical points