झोपाळूपणा अथवा थकवा वाढण्याच्या एका महत्त्वाच्या कारणाकडे आपण दुर्लक्ष करतो. ती बाब म्हणजे ‘झोपेची गुणवत्ता!’ झोप जर खंडित असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा येतो. त्यामुळे कामे पुढे ढकलण्याकडे तुमचा कल तर वाढतोच, पण तुमची निर्णय घेण्याची क्षमताही दिवसेंदिवस कमी होते. कसे ते पाहू ‘घोरणे’ या विषयावरच्या या दुसऱ्या भागात.
घनश्याम सरोदे, (नाव बदलले आहे) हे ५२ वर्षांचे गृहस्थ. एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्चपदस्थ नोकरी, घरी बायको, मुलगा आणि मुलगी असा चौकोनी कारभार. टापटिपीची आणि व्यवस्थितपणाची आवड. कामाला वाघ, ‘पटपट निर्णय घेणारा माणूस अशी ऑफिसमध्ये ख्याती.’ पण गेल्या पाच वर्षांमध्ये हा वेग थोडा मंदावला होता. ऑफिसमधली मीटिंग थोडी जरी लांबली तर जबरदस्त पेंग येऊ लागायची. घरातले अनेक प्रॉजेक्टस् लांबणीवर पडू लागल्याने बायकोदेखील नाराज! सुट्टीच्या दिवशीदेखील झोप काढण्याकडे कल असल्याने बाहेर जाऊन कुटुंबीयांबरोबर मौजमजा करणे टाळले जायचे, त्यामुळे सर्व कुटुंबीयांच्या टीकेचा सूर झेलावा लागत होता. सरोदे यांना व्यायामाची आवड, पण गेल्या दोन वर्षांत थकल्यामुळे इच्छाच होत नव्हती. वजनदेखील दहा पौडांनी वाढले.
या सगळ्या परिस्थितीचे कारण त्यांच्या मते अगदी स्पष्ट होते. कामाचा व्याप, वाढते वय यामुळे थकवा येतोय आणि या दोन्ही गोष्टी अपरिहार्य असल्याने, काही गोष्टी आपल्या हातून होणार नाहीत ही बाब कुटुंबीयांनी समजवून घ्यावी, असे सरोदेंना प्रामाणिकपणे वाटे.
भारतीय आणि अमेरिकन लोकांच्या विचारसरणीमधील एक फरक मला नेहमीच जाणवला आहे. ‘झोपाळूपणा’ म्हणजे आळशी असल्याचे लक्षण अशी आपल्या भारतीयांची मनोधारणा आहे. त्यामुळे भारतीयांना तुमचा झोपाळूपणा वाढला आहे का? असे विचारले तर बऱ्याचदा उत्तर नकारार्थी येते. याउलट थकवा (फटिग) हल्ली वाढला आहे का? याचे उत्तर ‘होय’ असे अनेक लोक देतील.
थकवा आहे याचाच अर्थ मी कामसू आहे आणि आळशी नाही हे स्पष्टीकरण कुणालाही आवडेल. वस्तुत झोपाळूपणा अथवा थकवा वाढण्याची कारणे आपण बाह्य गोष्टींमध्ये (उदा. वृद्धपणा, चिंता, तणाव, कामाचा व्याप) शोधतो, पण एका महत्त्वाच्या कारणाकडे दुर्लक्ष करतो. ती बाब म्हणजे ‘झोपेची गुणवत्ता!’
मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, गाढ झोपेतून आपण अनेक कारणांनी उठलो तरी त्याचे स्मरण राहत नाही. यामुळे आपल्या थकव्यामागे कारण झोपच आहे हे लक्षातच येत नाही. घनश्याम सरोदे यांच्या बाबतीत त्यांच्या परिस्थितीला झोपेतील बाबीच कारणीभूत होत्या. एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये सरोदेंना झोप अनावर झाली आणि सगळ्यांसमोर ते चक्क घोरू लागले. या प्रसंगानंतर सरोदे यांनी वैद्यकीय सल्ला घेतलाच आणि इंटरनेटवरदेखील संशोधन केले. हजारो लोक आपल्यासारख्या अवस्थेत आहेत हे पाहून त्यांना आश्चर्यही वाटले आणि थोडे बरेदेखील वाटले.
काय प्रकार चालू होता सरोदे यांच्या झोपेत? त्याचे दूरगामी परिणाम काय घडत होते याची सविस्तर चर्चा करू या.
गेल्या दहा वर्षांत सरोदे यांचे घोरणे वाढले होते. सुरुवातीला खूप दमल्यावर, पाठीवर झोपले तरच घोरणे व्हायचे. त्यानंतर पाठीवर झोपले की घोरणे नित्याचेच झाले. सरोदेवहिनी कधीकधी त्यांना हलवून कुशीवर झोपायला लावायच्या. यापुढे कुशीवर झोपल्यावरदेखील मंद घोरणे सुरू झाले. मित्रांबरोबर एखादी बीअर अथवा वाईनचा ग्लास घेतल्यानंतर घोरण्याचा आवाज वाढायचा. घोरण्याच्या भौतिकशास्त्रीय कारणांविषयी चर्चा मागील लेखात केली होती. त्यानुसार कंप पावताना, घसा कधीकधी अर्धवट बंद होऊ लागला होता. सरोदे यांच्या मेंदूला घशाचे बंद होणे ही धोक्याची सूचना वाटत होती. (पूर्ण बंद झाला तर?) त्यामुळे मेंदू गाढ झोपेतूनदेखील त्यांना उठवत होता. अर्थात हे उठवणे काही सेकंदांचेच असल्याने सरोदेंना दुसऱ्या दिवशी याची सुतराम कल्पना नव्हती. पण अशी खंडित झोप आल्याने थकवा येतोच. त्याचा परिणाम निर्णय घेण्याच्या वेगावर होणारच. ‘आज करे सो कल, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है? जब जीना है बरसो!’ अशा तऱ्हेची टाळाटाळ वा कामं पुढे ढकलण्याची प्रवृत्ती निर्माण होते. पटकन राग येतो. झोप येत असल्याने फोकस ठेवणे कठीण जाते आणि स्मरणशक्ती कमी होते.
या सगळ्या प्रकारामुळे काही लोकांचा स्वतवरचा विश्वास उडाल्याने औदासीन्यदेखील येऊ शकते. सरोदे यांचे दहा पौंडांनी वजन वाढले. त्यामध्येदेखील या खंडित झेपेचच कारण होते. वारंवार मेंदू जेव्हा उठवतो, त्या वेळेस कॉर्टसिॉलनामक हॉर्मोन्सचा स्राव होतो. साधारणत झोपेमध्ये ही हॉर्मोन्स अगदी नगण्य असली पाहिजेत. परंतु खंडित झोपेमध्ये हे प्रमाण बरेच वाढले असते. यामुळे पोटाभोवतीच्या चरबीचे प्रमाण वाढते. या शिवाय घ्रेलीन या हॉर्मोनमुळे पिष्टमय पदार्थाची (भात, बटाटा, साखर इ.) आवड निर्माण हेते. परिणामी असे पदार्थ जास्त सेवनात येतात.
दिवसभरात थकवा जाणवत असल्याने व्यायामाचे प्रमाण आपोआप कमी होते. या सर्व गोष्टींचा परिपाक वजन वाढण्यात झाला. ही गोष्ट इथेच संपत नाही, मारुतीच्या शेपटासारखी लांब लांबच होत जाते. म्हणजे जेव्हा घोरण्यामुळे वजन वाढते, तसेच वाढलेल्या वजनामुळे गळ्याभोवतीची चरबी वाढते. मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे गळ्याचा व्यास (डायामीटर) जितका कमी तितका तो कंप पावण्याची (घोरण्याची) आणि बंद होण्याची शक्यता जास्त! अशा रीतीने गेल्या पाच वर्षांत सरोदे यांचे घोरणे विनासायास (?) वाढतच गेले.
खंडित झोपेचा (फ्रॅगमेंटेड स्लीप) परिणाम दुसऱ्या दिवशी मेंदूच्या कार्यप्रवणतेवर होतो. निर्णय घेण्याचा वेग ३० ते ५० मिली सेकंदांनी मंदावतो!
आपल्या मेंदूचा निर्णय घेण्याचा वेग आणि प्रतिक्षिप्त (रिप्लेक्स) क्रिया किती पटकन होते हे मोजण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आमच्या संस्थेमध्ये (इंटरनॅशनल इन्स्टिटय़ुट ऑफ स्लीप सायन्सेस, आय.आय.एस.एस) यावर भरपूर संशोधन झाले आहे. हे तंत्रज्ञान सोपे, साधे आणि फुकट देण्यात आम्हाला यश आले आहे. कुणीही व्यक्ती आपल्या लॅपटॉपवर हे डाउनलोड करू शकतील. आमचा पुढचा प्रयत्न हे सॉफ्टवेअर ‘अॅन्ड्रॉईड’ भाषेत लिहिण्याचा आहे; जेणेकरून कुठलाही डॉक्टर आपल्या मोबाइल / स्मार्ट फोनवरून रुग्णाची चिकित्सा करू शकेल. या तंत्रज्ञानाबद्दलची माहिती पुढील काही लेखांमध्ये येणार आहेच. सरोदे यांची प्रतिक्षिप्त क्रिया (रिफ्लेक्स) जवळजवळ ५० मिली सेकंदानी (१००० मि. सेकंद = १ सेकंद) मंदावली होती. अनेक वाचकांना वाटेल की फक्त ०.०५ सेकंदांनी काय फरक पडणार? उत्तर असे आहे की हा जीवन की मृत्यू? इतका फरक असू शकतो. गाडी ड्राइव्ह करत असताना वाहनचालकाचा रिफ्लेक्स ३० मिली सेकंदांनी चुकला तरी अपघात होऊ शकतो. किंबहुना अमेरिकेमध्ये झालेल्या संशोधनात दारूखालोखाल झोपाळूपणा हे अपघातांचे प्रमुख कारण आहे हे सिद्ध झाले आहे.
सरोदे यांना त्यांच्या ड्रायव्हिंगबद्दल विचारले असताना, त्यांनी एकदोनदा झपकी आल्याचे कबूल केले. पण त्यात त्यांना काही विशेष काळजी घेण्यासारखे वाटले नाही. संशोधनामध्ये असेही आढळले आहे की ज्यांची झोप कुठल्याही कारणाने कमी होते अथवा खंडित होते तेव्हा गॅम्बलिंग (जुगार) करायची प्रवृत्ती वाढते. ही प्रवृत्ती मोजण्याची ऑब्जेक्टीव पद्धती आमच्या संस्थेत आहे.
याच कारणामुळे अमेरिकेमध्ये कमर्शियल वाहनचालकांना परवाना देण्याअगोदर आणि दर दोन वर्षांनंतर घोरण्याची / झोपाळूपणाची चाचणी दिली जाते. आपल्या देशात जर अशी काळजी घेतली तर अनेक अपघात निश्चितच टळतील. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील झालेले अपघात हे विशिष्ट वेळेला होतात हे ध्यानात घेतले पाहिजे.
या लेखात आपण घोरणे आणि स्लीप अॅप्नीया यामुळे वजन कसे वाढते, एकंदरीत जीवनावर कसा परिणाम होतो, अपघात होण्याची शक्यता कशी वाढते हे पाहिले. पुढील लेखात घोरणे आणि रक्तदाब, मधुमेह तसेच हृदयविकार आदींवर माहिती घेऊ, तोवर सर्व वाचकांना ‘बिनघोर’ झोपेची शुभेच्छा!
घोरणे
झोपाळूपणा अथवा थकवा वाढण्याच्या एका महत्त्वाच्या कारणाकडे आपण दुर्लक्ष करतो. ती बाब म्हणजे ‘झोपेची गुणवत्ता!’ झोप जर खंडित असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा येतो.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
आणखी वाचा
First published on: 26-04-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To snore