मी ही अशाच एका गाडीत बसलेली आहे. मुंबईला जाणाऱ्या. माझ्या आईला, सासू-सासऱ्यांना, पुण्यात सोडून. मलाही पर्याय नाही. मी माझ्या ‘मुंबई स्टोरी’चा भाग आहे. मुंबईच्या वेगाशी स्वत:ला जुळवत धावते आहे. मलाही वेळ नाही. आईचा फोन आला की घाईमुळे पटकन् ‘आई, नंतर करते, ठेव फोन’ म्हटलं जातं. तो ‘नंतर’ उगवायला ‘युगं’ लोटतात..
‘टोकियो स्टोरी’ हा ओझु या प्रसिद्ध जपानी दिग्दर्शकाचा गाजलेला जपानी चित्रपट. तो कसा कुणास ठाऊक इतके दिवस पाहायचा राहायला होता. परवा तो योग अखेर जुळून आला. तो मी पाहणार आहे असं कळल्यावर एक दिग्दर्शक मित्र म्हणाला, ‘हा पाहिल्यावर आतून बाहेरून बदलून जाशील’. तो दिवस खूप धावपळीचा होता. मनही काही कारणानं थाऱ्यावर नव्हतं. दुपारचे तीन तास फक्त मोकळे होते. त्या तीन रिकाम्या चौकटीनंतरच्या सगळ्या तासांच्या चौकटी कुठकुठल्या टाळता न येणाऱ्या कामांनी भरून गेलेल्या दिसत होत्या. त्या भरलेल्या चौकटींच्या विचारांनीच दमल्यासारखं होत होतं. वाटत होतं, झोप काढावी जरा.. पण चित्रपट बोलावत होता. चांगला चित्रपट तर नेहमीच मोठय़ा आवाजात बोलावतो, ‘मला बघ’ म्हणतो. अखेर मी तो लावलाच. ओझुविषयी आधी बरंच काही ऐकलं होतं. सिनेसुहृदांकडून.. तो उगाच कॅमेरा हलवत नाही. स्थिर शांत चित्रण करतो. त्याच्या चित्रीकरणातली कमालीची सहजता कॅमेऱ्याचं सखोल ज्ञान असणाऱ्या मुरलेल्या चित्रकर्त्यांलाच साधता येईल. एरवी कुणीही पटकथाकार किंवा दिग्दर्शक चित्रपट लिहिताना अथवा करताना कथेतलं नाटय़ अधोरेखित कसं होईल हे पाहतो. याउलट ओझु मात्र ढोबळ नाटय़ात्मक प्रसंग टाळून त्याच्या आसपासचे साधे प्रसंग पटकथेत फुलवतो. त्यामुळे त्याचा चित्रपट खऱ्या आयुष्याच्या जवळचा वाटतो. आयुष्य हे छोटय़ा, साध्या, रोजच्या गोष्टींमधल्या छोटय़ा-छोटय़ा नाटय़ांनी भरलेलं असतं. ओझु ते नाटय़ पकडतो. हे येरागबाळ्याचे काम नोहे. काही पटकथाकार नाटय़ कसं फुलवावं हे न कळल्याने कधी कधी पटकथेतल्या नाटय़ात्मक प्रसंगावरून ढांगेसारखी उडी घेऊन पलीकडे जातात. ओझुच तसं नाही. त्यानं सगळी पटकथा आणि पात्र कोळून प्यायली आहेत असं दिसतं. नाटय़ टाळणं हा त्याचा सजग, ठरवून घेतलेला निर्णय वाटतो. कुरोसावासारखा मोठा दिग्दर्शकही ओझुला एवढा मानतो ते तेवढय़ासाठीच.
‘टोकियो स्टोरी’ची गोष्ट ही मुंबई, टोकियो किंवा न्यूयॉर्क किंवा कुठल्याही मोठय़ा शहराची गोष्ट. त्यामुळे ती जपानमधल्या एका कुटुंबाची जितकी तितकीच तुमची माझीही! गावातून शहरात येऊन पैसे कमवू पाहणाऱ्या प्रत्येक मुला-मुलीची, सुनेची, जावयाची, नातवंडांची आणि हे सगळे ज्यांना मागे सोडून आले आहेत त्या गावात राहणाऱ्या आई-बाबांची गोष्ट! टोकियोपासून दूर एका गावात राहणारं एक वयस्कर जोडपं. त्याची मुलं शिकून सवरून टोकियोत नोकऱ्या, व्यवसाय करणारी. ती किती दिवस भेटली नाहीत म्हणून त्यांना भेटायला हे गावातले आई-बाबा टोकियोला जातात. या आई-बाबांची भूमिका केलेले जपानी कलाकार तर फार थोर होते. वडिलांचं काम करणाऱ्या नटानं ओझुच्या जवळजवळ प्रत्येक चित्रपटात प्रमुख भूमिका केली आहे म्हणे. या वृद्ध आई-बाबांचे जपानी बारीकसे डोळे सतत प्रेमानं ओसंडून वाहणारे. चेहरे सतत हसरे. त्यांचा एक मुलगा डॉक्टर, एक मुलगी पार्लर चालवते, एक मुलगा तिकीट तपासनीस तर एक मुलगा युद्धात बेपत्ता. या बेपत्ता मुलाची बायको इतकी वर्षे तो परत न येऊनही त्याची वाट पाहत थांबून आहे.. आई-बाबांच्या मुलांकडे आई-बाबांसाठी अजिबात वेळ नाही. आई-बाबांची त्याबद्दल तक्रार नाही. ते आपसात बोलताना हसतमुखानं म्हणतात, ‘शहरातले खर्च किती जास्त! त्यासाठी कष्ट करावे लागणारच आपल्या मुलांना..’ त्यांच्या बेपत्ता मुलाची बायको, नोरिको, ती मात्र त्यांच्यासाठी वेळ काढते. टोकियो फिरवून आणते. तिच्या घरी नेते. शेजारणीकडून जपानी पेय ‘साके’ आणून त्यांचं आदरातिथ्य करते. तिचं घर अगदी छोटं, तिच्याकडे ही दोघं मावणं शक्यच नसतं, त्यांना आपल्या मुलांकडे राहण्यावाचून पर्यायच नसतो. नोरिकोचं काम केलेल्या अभिनेत्रीची एक लकब फार लोभस आहे, ती प्रत्येक वाक्य खुदकन् हसून बोलते. ते हसणं लाडिक नाही.. ते आतून उमलून येऊन तिच्या डोळ्यांतून खळ्कन् आपल्यासमोर फुलल्यासारखं सांडतं. काही माणसं ‘चांगुलपणा’ या शब्दालाही छोटं करतील इतक्या मोठय़ा मनाची असतात. नोरिको तशीच.. आई-बाबांशी रक्तापलीकडच्या नात्यानं जुडलेली. त्यांचा डॉक्टर मुलगा आणि पार्लर चालवणारी मुलगी यांना दिवसभर ते स्वत: खूप व्यस्त असल्यानं आई-बाबांचं काय करावं ते कळत नाही. ते पैसे खर्चून आई-बाबांना एका हिलस्टेशनला पाठवून देतात. पण तिथला दंगा आणि धागडधिंग्यानं त्यांना रात्रभर झोप लागत नाही. त्यांच्या तब्येतीला ते मानवत नाही म्हणून ते वेळेआधीच मुलीकडे परत येतात. ती एकदम गांगरते म्हणते, ‘लवकर कसे आलात? आज माझ्या पार्लरची पार्टी होती घरी. आता तुम्हीही आलात? जागा कशी पुरणार?’ आई-बाबा प्रेमानं बॅगा उचलतात. बाबा आईला म्हणतात, ‘तू नोरिकोकडं राहा, मी माझ्या मित्राकडे राहतो. उद्या आपण गावी परत जाऊ.’ बाबा ज्याच्याकडे जातात तो मित्रही आता वृद्ध. दोघं दारू पीत मुलांविषयीच बोलतात. त्या मित्राची तर सगळी मुलं वाया गेलेली असतात. तो बाबांना म्हणतो, ‘तुझी पोरं आपापलं कमावतात तरी.. नशीबवान आहेस!’ इकडे नोरिकोकडे राहिलेली आई तिला म्हणते, ‘बाई गं, माझा मुलगा, तुझा नवरा किती दारू प्यायचा. त्यानं काहीच सुख दिलं नाही तुला. तो इतकी वर्षे युद्धाहून परतला नाही तरी त्याचा फोटो कशाला घरात लावून ठेवला आहेस? तू तरुण आहेस, सुंदर आहेस. विसर आता माझ्या मुलाला. पुन्हा लग्न कर.’ यावर नोरिको नेहमीसारखं ‘खळ्ळकन्’ हसून म्हणते, ‘मी आनंदात आहे, मला नाही लग्न करायचं?’ दोघी अंथरुणावर पडतात. कॅमेरा नोरिकोच्या चेहऱ्याच्या जवळ. पूर्ण चित्रपटात एकदाच, फक्त एकदा नोरिकोचं हसू मावळलेलं दिसतं. ती छताकडे पाहत राहते.. दुसऱ्या दिवशी सामानाची बांधाबांध करताना आई-वडिलांच्या डोळ्यात मुळीच कटुता नाही. ते आपापसांत म्हणतात, ‘आपल्या मुलांकडे वेळ नसला तरी ती चांगल्या मनाची आहेत. आपली मुलं चांगली आहेत.’ स्टेशनवर सोडायला आलेल्या मुलांना आई म्हणते, ‘आम्हाला तुम्हाला भेटून खूप आनंद वाटला. आमच्यापैकी कुणाचंही काही बरंवाईट झालं तरी आता गावी येत बसू नका. उगीच धावपळ नको.’ हसरी प्रेमळ आई गावी जाते, नव्हे वाटेतच आजारी पडते. गावी पोचून प्राण सोडते. मुलं आणि नोरिको गावी धावतात. आई जायच्या क्षणी हमसून रडतात. पण दु:खासाठीही वेळ नाही. दोन दिवसांत टोकियोला परत जायला निघतात.
नोरिको मात्र थांबते. तिच्यात आणि गावात आई-बाबांची सेवा करणारी एक अगदी तरुण शिक्षिका मुलगी असते, त्यांच्यात जो प्रसंग घडतो त्यानं चित्रपट वेगळ्याच उंचीवर पोचतो. ती मुलगी न राहवून नोरिकोला म्हणते, ‘बरं झालं थांबलीस. मला निघून गेलेल्या सगळ्यांचा राग आला आहे. मुलीसारखी मुलगी, तीपण निघून गेली?’ नोरिको हसून म्हणते, ‘तिचीही एक बाजू आहे. तिचीही एक परिस्थिती आहे. मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरी जाते तेव्हा तिला आई-वडिलांशी असं वागणं भाग पडतं. तिच्यावर जबाबदाऱ्या आहेत, मुलं-बाळं आहेत. कदाचित मी तिच्या जागी असते तर अशीच वागले असते.’ त्या छोटय़ा तरुण मुलीचे डोळे ती अचानक मोठी झाल्यासारखे विस्फारतात. तिला नोरिकोचं म्हणणं कळतं, पण त्यानं थोडा धक्काही बसतो. मोठं होताना बालमनाला असे धक्के खावेच लागतात. ती एकदम म्हणते, ‘आयुष्य फार डीप्रेसिंग आहे!’ नोरिको खळ्ळकन् हसून म्हणते, ‘हो, आहे!’ आणि घर आवरायला उठते. ती आवरासावरी करताना वडील सावकाश चालत येतात. गेलेल्या आईचं एक जुनं घडय़ाळ जे तिनं रोज बाळगलं होतं ते नोरिकोच्या हातात ठेवतात. म्हणतात, ‘हे तुला दिलेलं तिला आवडलं असतं. तू खूप केलंस आमच्यासाठी. आता नवं आयुष्य सुरू कर.’ ते घडय़ाळ छातीशी धरून ती हमसून रडते. एक आगगाडी दिसते, टोकियोच्या दिशेनं जाणारी. त्यात बसलेली नोरिको आपल्या हातातलं घडय़ाळ एकदा प्रेमभरानं कुरवाळते आणि समोर पाहते. तेव्हा तिच्या डोळ्यात एक वेगळी शांत शक्ती दिसते. चित्रपट संपतो. पण माझ्यासाठी तो चालूच राहतो..
मी ही अशाच एका गाडीत बसलेली आहे. मुंबईला जाणाऱ्या. माझ्या आईला, सासू-सासऱ्यांना, पुण्यात सोडून. मलाही पर्याय नाही. मी माझ्या ‘मुंबई स्टोरी’चा भाग आहे. मुंबईच्या वेगाशी स्वत:ला जुळवत धावते आहे. मलाही वेळ नाही. पुण्याच्या माणसांचा फोन झाला की कधी कधी दोन-दोन दिवस त्यांना उलटा फोन करायला होत नाही. आईचा फोन आला की घाईमुळे पटकन् ‘आई, नंतर करते, ठेव फोन’ म्हटलं जातं. तो ‘नंतर’ उगवायला ‘युगं’ लोटतात. आई कधी आनंदात लहानपणीची कुठलीशी आठवण फोनवर रंगवून सांगायला लागली की पुढचा कुठला तरी कामाचा फोन आठवून नकळत घडय़ाळाकडे लक्ष जातं. आईच ती, तिला माझ्या हं हंमधला यांत्रिकपणा आपसूक समजतो. तीच मग ओशाळी होऊन म्हणते, ‘घाईत आहेस ना बाळा, ठेवते हं!’
पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या गाडीत बसते, तेव्हा माझे हात मला कसे हवे आहेत? रिते? का नोरिकोसारखे? मी ठरवलं आहे, मुंबईतल्या घाईशी जुळवायला तर हवंच, पण त्यासाठी बळही हवं. ते बळ मिळवण्यासाठी हातात असं काही तरी हवं, नोरिकोला मिळालेल्या आईच्या घडय़ाळासारखं असं घडय़ाळ जे शहराच्या वेगातही आपल्या स्वत:च्या चालीनं चालतं, आपल्या स्वत:च्या आगळ्याच काटय़ांवर. त्याची टिक टिक घाबरवणारी नसेल. ते मला बरोबर शिकवेल, मी नेमक्या कुठल्या वेळी नेमकं कुठं असायला हवं! न पळता, न दमता.. ते मला शिकवेल, घाईलासुद्धा थोडा ‘वेळ’ लागतोच! ते मला शिकवेल, एक शांत खोल श्वास आणि तेच शिकवेल, नोरिकोच्या डोळ्यातून उमलून सांडणारं ‘खळ्कन्’ हसू!
टोकियो स्टोरी – मुंबई स्टोरी
मी ही अशाच एका गाडीत बसलेली आहे. मुंबईला जाणाऱ्या. माझ्या आईला, सासू-सासऱ्यांना, पुण्यात सोडून. मलाही पर्याय नाही. मी माझ्या ‘मुंबई स्टोरी’चा भाग आहे.
First published on: 23-08-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व एक उलट...एक सुलट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tokyo story mumbai story