0anaghaप्रतिकूल परिस्थितीतही ‘उसळून’ वर येण्याची क्षमता म्हणजेच मनाची जिंकण्याची प्रेरणा अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीतही असते. आपल्याला आव्हान देणाऱ्या परिस्थितीवर विजयप्रेरणेनं नियंत्रण मिळवणं तितकं सोपं नाही, पण प्रयत्न प्रत्येक जण करू शकतोच. तसा तो करायलाच हवा.

लहानपणी आई-बाबांनी एक छान रबराची बाहुली आणली होती. तिचं नावच मुळी ‘जपानी बाहुली’ होतं. तिची गंमत म्हणजे ती आतून पूर्ण पोकळ होती. तिला मी उभी करायची आणि एक जोरात थप्पड मारली की ती खाली पडायची, पण क्षणापुरतीच. लगेच उसळून वर यायची आणि पुन्हा ताठच्या ताठ उभी राहायची. तेव्हा जादूच वाटायची ती. पण मग नंतर कळलं की तिच्या पायांमध्ये शिशाचे जड गोळे ठेवलेले होते. वरचं शरीर हलकं रबरी. त्यामुळे ते झुकलं तरी ती परत उभी राहायची.
प्रतिकूल परिस्थितीतही ‘उसळून’ वर येण्याची क्षमता म्हणजेच मनाची जिंकण्याची प्रेरणा (Resilience). ही क्षमता केवळ मोजक्या लोकांमध्ये असते, असा समज खूप काळ पक्का होता. पण आजचं संशोधन सांगतं की, ती सामान्यातल्या सामान्य व्यक्तीतही असते. फक्त आपली अवस्था ‘तुझे आहे तुजपाशी, परि जागा चुकलाशी’ अशी कस्तुरीमृगासारखी असते.
खरं तर ही क्षमता आपल्यात अगदी जन्मजात असते. तिचा पडताळा घेण्यासाठी अगदी विपरीत परिस्थितीत, अनाथाश्रमात वाढलेल्या आणि नंतर दत्तक गेलेल्या बालकांचा एक अभ्यास केला गेला. त्यातील काही मुलं अगदी ६ ते ७ महिन्यांची असताना दत्तक गेली तर काही थोडी उशिरा. जन्मानंतर नीट काळजी न घेतली गेल्याने शारीरिक, भावनिकदृष्टय़ा खूप दुर्बल बनलेल्या या बालकांनी दत्तक कुटुंबात गेल्यावर इतकी झटपट ती दरी भरून काढली की बरोबरीच्या नॉर्मल वातावरणातल्या इतर मुलांपेक्षा ती भिन्न राहिली नाहीत.
ही जी जन्मजात/ दैवदत्त विजयेच्छा आपल्यात असते, ती त्या शिशाच्या गोळ्यासारखी आहे, जी आपली मानसिक प्रतिकारक्षमता शाबूत ठेवते. इतकंच नाही तर जखमा बुजवण्याचं, भरून काढण्याचं कामही कुशलतेनं करीत असते. एव्हरेस्टवीर अरुणिमा सिन्हाच्या जिद्दीची कहाणी तुम्ही या पुरवणीच्या पान १ वर वाचली असेलच. कित्येक महिने रुग्णालयात तळमळत काढूनही तिने तिच्यातील जिद्द कायम ठेवली आणि शारीरिकदृष्टय़ा ‘अपंग’ गणली गेलेली ती एव्हरेस्टवर पाय ठेवणारी विक्रम वीरांगना झाली.
अशी विजयेच्छा कधी अनुभवाला येते/ दिसून येते? तर एखाद्या अत्यंत आव्हानात्मक, कस लावणाऱ्या प्रसंगात ती आपला परिचय देते. अशा वेळी वरवर अगदी साध्यासुध्या वाटणाऱ्या माणसांचं आयुष्य एक वेगळीच झळाळी प्राप्त करतं. बाह्य़ वलय नसूनही या ‘साध्यासुध्या जादू’मुळे प्रतिकूल परिस्थितीला थेट भिडत माणसं तिला परास्त (Knock out) करतात.
प्रतिभा जेमतेम बारावीपर्यंत शिकली आणि आई-बाबांनी तिचं लग्न केलं. नवरा नुसताच व्यसनी नव्हता तर तिला जबरदस्त मारहाण करणाराही होता. सासर-माहेर कुणाचाच आधार नव्हता. संशयी नवऱ्यानं खिडकीबाहेर बघायची बंदी केली, इतकंच नाही तर दिवस दिवस उपाशी ठेवायला सुरुवात केली. सुरुवातीला प्रतिभा खूपच घाबरली, निराश झाली. आत्महत्येचे विचार मनात यायला लागले. एकदा तर तिनं पेटवून घेण्यासाठी अंगावर रॉकेल ओतून घेतलं. काडेपेटी हातात घेतली आणि मनात विचार चमकून गेला. ‘का करतोय आपण हे? असं करण्याइतकं आपलं जगणं फुटकळ, किडामुंगीसारखं आहे का?’ या एका प्रश्नामुळे तिची जिद्द उसळी मारून वर आली. नेसत्या कपडय़ांवर घर सोडून ती लांबच्या मावशीकडे गेली. पडेल ते काम करून, पसे जमवून, रात्र महाविद्यालयात शिकून पदवी मिळवत असतानाच ती कराटेही शिकली. आज प्रतिभा एका महाविद्यालयात कराटे इन्स्ट्रक्टर म्हणून काम करते आणि तिच्यासारखा अन्याय सोसाव्या लागणाऱ्या मुलींना यथाशक्ती मदतही करते. साधी-सरळ, मार खात जगणारी ही एक मुलगी, पण अन्यायाविरुद्धच्या एका विचारानं तिच्यातली लढाऊ वृत्ती उसळून आली आणि ती स्वत:ला त्या दुष्टचक्राच्या बाहेर काढू शकली.
एखाद्या वाईट/ धोकादायक परिस्थितीशी जुळवून घेणं यापेक्षा ‘हे उसळून येणं’ काहीसं वेगळं आहे. जुळवून घेण्याची प्रक्रियाही काहीशी सावकाश, दमादमानं, टप्प्याटप्प्यानं होते, तर विजयी उसळीमुळे एखाद्याचा समस्येला दिला जाणारा प्रतिसाद अक्षरश: तीनशे साठ अंशांत फिरतो आणि त्यामुळे भावनिक उद्ध्वस्ततेऐवजी माणूस त्याच भावनांची ताकद विधायक बदलासाठी वापरत त्या परिस्थितीवर मात करतो.
काही शारीरिक आजार असे असतात की, जेव्हा खरोखरच मनोधर्याचा कमालीचा कस लागतो. आजाराचा सामना करणाऱ्यांची मनाची उभारी चटकन ढासळू शकते. त्याचा परिणाम आजार बळावण्यात होऊ शकतो. पण जेव्हा आजाराशी लढण्याची वृत्ती प्रबळ बनते, तेव्हा चमत्कार होऊ शकतो.
माझ्या अगदी जवळच्या दोन व्यक्तींचा असा निकराचा लढा मी पाहिला आहे. वयाच्या सत्तरीत/ ऐंशीत जेव्हा खरं तर शरीराच्या मूळ क्षमता उतरणीला लागलेल्या असतात, तेव्हा उद्भवलेल्या गंभीर व्याधींशी त्यांनी सीमेवरच्या सनिकाप्रमाणे बेधडक दोन हात केले. वैद्यकीय उपचार, प्रेमाच्या माणसांची सेवा हे होतंच, पण आजाराचं स्वरूपच असं होतं, या सगळ्यांपेक्षा त्यांची स्वत:ची झुंज देण्याची इच्छा जास्त असण्याची गरज होती. आणि खरोखर केवळ त्या निर्णायक घटकामुळे त्या व्यक्ती पूर्ण चित्र उलटवू शकल्या. आवश्यक तेवढी क्रियाशीलता परत मिळवू शकल्या. ही विजयेच्छा कशाकशातून निर्माण होते हे एक कोडं आहे. पण त्यातील काही भाग तरी माणसाच्या ‘तगून’ राहण्याच्या मूळ प्रेरणेचा नक्कीच असतो असं खात्रीनं वाटतं. आपली शरीराची एक सुनिश्चित प्रतिकारक्षमता जशी अगदी जन्मापासूनच कामाला लागलेली असते. ती अधिक बळकट करण्याचं काम मग वेगवेगळी औषधं/ लशी करतात. मनाची प्रतिकारक्षमताही अशीच जन्मजात असते. त्यातही अनुवंशानं आलेला काही भाग असतो आणि त्या त्या माणसाची अनुभवानं मिळवलेली काही पुंजी त्यात भर घालते. ही अनुभवसमृद्धी आणि त्यातून शिकण्याची संधी प्रत्येक जण कशी घेईल यावरही लढाऊ वृत्ती किंवा विजयेच्छा किती बळकट होते हे अवलंबून असतं.
वर्तमानपत्रात रोजच आपण आत्महत्यांच्या बातम्या वाचतो. सर्व थरांतल्या, सर्व वयांतल्या, भाषा/ जात/ धर्म/ देश अशा गटांतल्या व्यक्ती त्यात असतात. वस्तुत: त्या ज्या परिस्थितीत जगत असतात, तशी परिस्थिती अनेकांची असू शकते. पण त्यांची दृढता त्याचा सामना करण्याचं मनोबळ देतं. असे लोक स्वत:शी काय संवाद करीत असतील?
‘मी कशा प्रकारची व्यक्ती आहे, हे मला बऱ्यापकी माहीत आहे.’
‘अशा अडचणी/ गंभीर आव्हानं आयुष्याचा अटळ भाग आहेत, हे मला नीट उमजलेलं आहे.’
‘अडचणींवर मात करणं हे परिस्थितीपेक्षा माझ्या प्रयत्नांवर जास्त अवलंबून आहे.’
‘माझ्याकडची कुठली कौशल्य, युक्त्या माझ्या अडचणीला तोंड देण्यासाठी वापरता येतील? बाहेर पडायला कुठला मार्ग शोधता येईल?’ ‘संकट कितीही मोठं असलं तरी मी बळी जाणार नाही, त्यावर स्वार होण्याचा प्रयत्न करीन.’
‘संकटाच्या वेळी गरज असेल तर माझ्या विश्वासू लोकांकडून मदत मागण्यात मला अजिबात संकोच/ लाज/ अपमान वगरे वाटणार नाही.’
‘फक्त कुटुंबातल्या व्यक्ती नव्हे तर त्यापलीकडच्या मोठय़ा समाजाशीही माझं नातं आहे, हा विचार मला किती बळ देऊन जातो!’
ही सगळी वाक्यं मनात म्हटल्यामुळे परिस्थितीतील ‘असह्य़’ वाटणाऱ्या भागाचं ‘सह्य़’मध्ये रूपांतर होऊन जातं, नाही का? बऱ्याचदा काय होतं, की अडचणीतल्या, दुर्धर परिस्थितीच्या कचाटय़ात सापडलेल्या इतर लोकांचा धीर खचताना, त्यांना मोडून पडताना बघितल्यामुळे ‘अशा वेळी असंच होतं’ हे मनात ठसतं आणि आपली मूळ लढाऊ वृत्ती विस्मृतीत जाते. आवश्यकता असते ती तिला पुन्हा जागे करण्याची!
अनेकांना या वृत्तीची ओळख पटते ती आयुष्याच्या संध्यापर्वामध्ये! जेव्हा एकेक गात्र थकून जात असतं. अभ्यास असं दर्शवतात की, जैविक कारणांमुळे होणारी विस्मृती किंवा अल्झायमरसारखे आजार असले तर बहुसंख्य वृद्ध अन्य आजारांना तोंड देत आपलं दैनंदिन आयुष्य शक्य तेवढं नियमितपणे जगण्याचा प्रयत्न करीत असतात. तरुण लोक आपली दूरवरची उद्दिष्टं गाठण्याची धडपड करीत असतात, तर वृद्ध मात्र सरत्या दिवसांचं भान असल्यामुळे रोजच्या घडामोडी मधून मिळणारं जेवण/ नातेवाईक/ मनोरंजन इ. छोटे-मोठे आनंद साठवत असतात. वयाच्या किंवा एकटेपणाच्या थपडा बसत असतानासुद्धा त्यातून क्रियाशील राहण्याची पराकाष्ठा करीत राहतात. वृद्धत्वाचा स्वीकार डौलदारपणे करणाऱ्या लोकांची विजयेच्छा अतिशय दमदार असते, म्हणूनच ते अंतिम श्वासापर्यंत परिपूर्ण जगतात.
तर ही ‘विजय-प्रेरणा’ आपला एक महत्त्वाचा साथी! त्याची सोबत आपण जाणीवपूर्वक घेतली तर मग म्हणायला हरकत नाही.
‘बार बार हां, देखो यार हां
अपनी जीत हो-उनकी हार हां..’
आपल्याला आव्हान देणाऱ्या परिस्थितीवर विजय-प्रेरणेनं नियंत्रण मिळवणं आणि सुकाणू हवेच्या दिशेला वळवणं वाटतं तितकं सोपं नाही, पण प्रयत्न प्रत्येक जण करू शकतोच. कारण प्रत्येकालाच वाटत असतं, आम्ही जिंकूच जिंकू.. जिंकू!

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
north nagpur
ध्रुवीकरणाशिवाय उत्तर नागपुरात भाजपला यश मिळवणे अशक्य? मतविभाजन काँग्रेसला रोखणार का?
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?

“Tension is who you think you should be. Relaxation is who you are.”
-Chinese Proverb
“How many cares one loses when one decides not to be something but to be someone.”
-Gabrielle “Coco” Chanel
डॉ. अनघा लवळेकर