१९५० मध्ये भारत प्रजासत्ताक देश झाला. स्त्रियांना घटनात्मक समानता मिळाली. सामाजिक-सांस्कृतिक दृष्टीने स्त्री-जीवनाचा स्तर उंचावला. दुर्गाबाई देशमुख यांची नियोजन मंडळावर नेमणूक झाली. विजयालक्ष्मी पंडित भारताच्या वकील म्हणून रशियाला गेल्या. उत्कर्षांच्या टप्प्याकडे जाताना स्त्रियांच्या मासिकांनी स्त्रियांबरोबर एकूण समाजाचेच प्रबोधन केले.

संक्रमण काळातील घटना, स्त्रीच्या अनुभवविश्वाचा होणारा विकास इत्यादी कालसंगत प्रेरणाच अतिशय जोरकस होत्या. ‘स्त्री’ मासिकाच्या जोडीने अन्य मासिके स्त्रियांसाठी प्रसिद्ध होऊ लागली. स्त्रियांच्या मासिकांनी सांस्कृतिक जीवन भारावून गेले. आचार्य अत्रे यांनी इंदुमती नाईक यांच्या मदतीने १९२९ मध्येच ‘मनोरमा’ मासिक सुरू केले होते. पु. ना. वर्दे यांनी शांताबाई कशाळकरांच्या सहकार्याने ‘नवी गृहलक्ष्मी’ १९३४ मध्ये सुरू केले. ‘गृहलक्ष्मी’चे नवे रूप होते. प्रसिद्ध नाटककार मामा वरेरकर यांची कन्या माई वरेरकर यांनी १९३३ मध्ये ‘महिला’ मासिकाचे प्रकाशन सुरू केले. कुमुदिनी खेर यांचे ‘वाग्विलासिनी’ होते. बहुजन (मराठा) समाजाचे ‘भगिनी’ १९४० पासून प्रसिद्ध होई, तर सातारहून सुशीला जाधव ‘मंदिर’ संपादित करीत. १९४८ मध्ये डॉ. चंद्रकला हाटे यांनी ‘वनिताविश्व’ हे महत्त्वाचे मासिक संपादित करण्यास सुरुवात केली.
मध्यवर्ती प्रवाहातील मासिकांचे बाह्य़ परिणाम होऊन अनेक ज्ञाती-समूहांनी आपापल्या समाजातील स्त्रियांसाठी स्वतंत्र मासिके प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये गौड सारस्वत समाजाचे इंदिरा तेलंग संपादित ‘शारदा’ होते. भारतीय दिगंबर जैन महिला परिषदेचे सोलापूरहून १९४१ पासून प्रसिद्ध होणारे जैन महाराष्ट्र महिला मुखपत्र सुमतीबाई शहा संपादित करीत. ‘जननी’सारखे मासिक तर ‘स्त्री-आरोग्य’ या एकमेव विषयाला प्रसिद्धी देणारे होते. या आणि यांसारख्या मासिकांतून स्त्री-मनाशी होणाऱ्या संवादाला ‘कोरस’चे रूप आहे. स्त्रियांच्या लेखन-संपादनाला विस्तृत अवकाश प्राप्त झाला.
संक्रमण काळातून जाणाऱ्या स्त्रियांचे वैचारिक उद्बोधन करून स्त्रियांना कार्यप्रवृत्त करणे, ही युगसंवेदना असल्याने सर्वच मासिकांचे उद्दिष्ट, मध्यवर्ती सूत्र सारखेच होते. तसे असणेही स्वाभाविक होते. कालसंगत सर्वच विषयांवर संपादकांनी ‘कॅमेरा’ सतत फिरता ठेवला. तरीसुद्धा प्रत्येक मासिकाचा स्वत:चे वेगळेपण, स्वतंत्र धोरण राखण्याचा प्रयत्न होता. संपादकीय निवेदनातून, मासिकाच्या अंतरंगातून संपादकांचे धोरण स्पष्ट होई. ‘मनोरमा’च्या पहिल्या अंकात अचार्य अत्रे यांनी भूमिका स्पष्ट केली.- ‘सर्व उपयुक्त विषयांचे ज्ञान स्त्रियांना घरबसल्या द्यावे, हा या मासिकाचा मुख्य हेतू आहे. आपल्या संस्कृतीचे मुख्य उद्दिष्ट लक्षात ठेवून पाश्चात्त्य समाजात आपल्या स्त्रियांनाही पहिल्या प्रतीचा दर्जा प्राप्त होण्यासाठी जरूर ते ज्ञान या मासिकाद्वारे देण्याचे ठरविले आहे.’ ‘स्त्रियांच्या प्रश्नांना नवीन जाणिवेचे स्वरूप देऊन समाजासमोर मांडण्यासाठी १९२७ मध्ये ‘गृहलक्ष्मी’चा जन्म झाला. गृहलक्ष्मी मासिकाने चालवलेले कार्य पुढे अबाधित चालावे या हेतूने आम्ही ‘नवी गृहलक्ष्मी’ मासिक सुरू करीत आहोत. तात्त्विक निष्ठेच्या बाबतीत कधीही माघार घेणार नाही’ अशी खात्री पु. ना. वर्दे यांनी दिली. स्त्रियांच्या प्रश्नांविषयी, पुरुषांच्या लेखनाला वर्दे यांनी प्रसिद्धी दिली. ‘सुशिक्षित स्त्रियांवरील जबाबदारी’- ग. स. बक्रे, ‘संततिनियमनाची आवश्यकता’- रा. बा. पठारे यांसारखे लेख तर घरगुती विषय, परंतु शास्त्रीय माहिती देणारे वा. वि. तांबे यांचे सदर प्रसिद्ध केले. ऐतिहासिक स्त्रियांच्या बरोबरीने कला क्षेत्रात पुढे येणाऱ्या स्त्रियांचा परिचय देण्याकडे संपादकांचा कटाक्ष होता. शास्त्रीय संगीतातील रागांचा परिचय प्रत्येक अंकात असे.
‘महिला’ संपादित करण्यामागे माई वरेरकरांची स्वत:ची स्वतंत्र भूमिका होती. स्त्रीच्या कर्तृत्वाचा, कार्यक्षमतेचा त्यांना अभिमानच होता. पण संपादक म्हणून त्यांनी फक्त स्त्रियांचे लेखन प्रसिद्ध करण्याचे ठरवले होते. ‘महिला’च्या पहिल्या अंकातील निवेदनातून त्यांची प्रखर भूमिका व्यक्त होते. ‘महिला मासिकाच्या धोरणाची जाहिरात वर्तमानपत्रात फडकताच माझ्या होतकरू भगिनींना तोरणा किल्ल्यावर यशाचा झेंडा फडकताच मराठय़ांप्रमाणे अनिर्वचनीय आनंद झाला असेल. तर पुरुषांना असूयेच्या, सुडाच्या भावनेने त्यांच्या मुठी वळाल्या असतील. पण सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर अशा मत्सरी भावनेने पिडलेल्या पुरुषांचाच सर्वस्वी दोष आहे. कारण खोरे आपल्या बाजूने माती ओढीत असते, हे मी सांगायला हवे अशातला भाग नाही. स्त्रियांची उन्नती करण्यासाठी आता स्त्रियांनीच धैर्याने, कळकळीने आणि समाजोन्नतीच्या अंतिम तळमळीने पुढे सरसावले पाहिजे. स्त्रियांनी आजपर्यंत निष्कपट भावनेने पुरुषांचे स्वागत केले, त्याचप्रमाणे स्त्रियांची प्रगती पाहून पुरुषांनी त्यांचे कौतुक केले पाहिजे. स्त्री वर्गाने स्वतंत्र चालण्याचा प्रयत्न करताच पुरुषांनी वाईट वाटून का घ्यावे, हेच कळत नाही.’ अन्य विषयांच्या संदर्भातसुद्धा माई वरेरकर यांची स्वतंत्र दृष्टी होती. कर्तृत्ववान स्त्रियांचा परिचय देताना राजकीय क्षेत्रातील स्त्रियांना प्राधान्य होते. कला क्षेत्रातील स्त्रियांच्या मुलाखती आवर्जून प्रसिद्ध होत. पद्मा वर्तक, ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर, लीला चंद्रगिरी, नृत्यांगना मेनका, पद्मा शाळिग्राम इत्यादी कला क्षेत्रातील स्त्रियांच्या मुलाखती नियमित प्रसिद्ध होत. ‘स्त्री-जीवनाचे सुखसाधन’ सदरातून शास्त्रीय संगीत, चित्रकलेचा परिचय करून दिला जाई. कविता, नाटय़छटा, कथा, प्रवासवर्णनासारख्या ललित साहित्यालाही प्रसिद्धी दिली जाई. १९३३ च्या इंडियन पिनल कोडप्रमाणे स्त्रीचा जीव वाचणार असेल तर गर्भपात करणे कायद्याने गुन्हा नाही असे कलम होते. हे बिल सर्व जाती-धर्माच्या लोकांना सारखेच लागू पडत असल्याने समाजाच्या सर्व घरांतील स्त्रियांच्या प्रतिक्रिया संपादकांनी मागवून क्रमश: प्रसिद्ध केल्या. विधवा असून कुंकू लावण्यास शालिनी जमखिंडीकर यांनी सुरुवात केल्यावर त्यांचा फोटो ‘महिला’च्या मुखपृष्ठावर छापला होता. ‘महिला’चे वेगळेपण यातूनच स्पष्ट होते.
‘भगिनी’ मासिकाचे सर्व व्यवस्थापन स्त्रियांचे होते. ‘महिलांसाठी महिलांनी चालविलेले एकमेव मासिक’ अशी ‘भगिनी’ची जाहिरात होती. महिला परिषदांचे वृत्तान्त प्रसिद्ध करण्यास प्राधान्य होते. त्याचबरोबर स्त्रियांचे आरोग्य, स्त्रियांचे आर्थिक प्रश्न, शारीरिक शिक्षण इत्यादी विषयांवर लेखमाला प्रसिद्ध केल्या. स्त्रियांसाठी लेखन स्पर्धा आणि स्वतंत्र बालविभाग ‘भगिनी’चे वैशिष्टय़ होते. ‘मंदिर’मधून सुशीला जाधव यांनी ‘स्वराज्य मंदिरातील पाहुणे’ ही हिराबाई भापकर यांची स्वातंत्र्यवीरांच्या कहाण्या सांगणारी लेखमाला प्रसिद्ध केली. इंदिरा तेलंग संपादित ‘शारदा’ मासिकातील स्त्रियांशी विविध विषयांवर संवाद करणारे ‘पांचाळपारू’ या टोपणनावाचे पत्ररूपी सदर वैशिष्टय़पूर्ण होते. जैन समाज व्यापारी पेशाचा. धार्मिकतेचा या समाजावर प्रभाव जास्त. तसेच स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाणही मर्यादित असताना १९४२ मध्ये सुमतीबाई शहा सोलापूरहून ‘जैन महाराष्ट्र महिला’ प्रसिद्ध करीत. हे विशेषच होते. प्रथम ‘जैन बोधक’ मासिकांत स्त्रियांसाठी एक पान असे. परंतु एका पानाची जागा कमी पडू लागल्याने स्त्रियांसाठी स्वतंत्र मासिक सुरू झाले. जैन महिला परिषदा, जैन स्त्रियांसाठी होणारे उपक्रम इत्यादींना संपादक प्राधान्य देत. धार्मिक विषयही होतेच. परंतु त्याबरोबरीनेच स्त्री-शिक्षण, स्त्रियांचे आरोग्य, बालविवाह, हुंडा इत्यादी विषयही संपादक मांडीत होते. युद्ध-काळातील काटकसरीसाठी मार्गदर्शनही यात होते. ‘व्यायामाचे महत्त्व’ सांगितले जाई. ‘आदिनाथांच्या काळात स्त्रियांना ६४ कलांचे शिक्षण दिले जात असे. साहित्य, संघटन, प्रेम, शिक्षण, सेवा हे स्त्रियांचे पंचप्राण आहेत. स्त्री ज्ञानी असणे आवश्यक आहे. स्त्रियांनी संघटित होण्याची गरज आहे. विधवा, परित्यक्ता, कुमारिका, गृहिणी सर्वाची एकजूट होऊन सुविद्य, सुशील ‘सेविका’ तयार झाल्या पाहिजेत, असे आवाहन सुमतीबाई शहा वारंवार करीत. शिक्षित स्त्रियांचे प्रमाण मर्यादित असल्याने सुलोचना भोकरे, चंचला शहा, विद्युत शहा, इंदुमती, प्रेमकुमारी जैन, शकुंतला जैन इत्यादी लेखिकांची नावे वारंवार दिसतात. तरीही १९४१-४२ च्या काळात सोलापूरमध्ये सुमतीबाई शहा यांनी स्त्रियांच्या प्रगतीसाठी केलेली धडपड कौतुकास्पदच होती.
शारदा प्रसूतिगृहाच्या संचालिका शारदा मराठे यांनी स्त्रियांना आरोग्यविषयक माहिती देण्याच्या उद्देशानेच ‘जननी’ (शास्त्रमाता- The Mother of science) हे मासिक सुरू केले. जीवन दिवसेंदिवस गतिमान, गुंतागुंतीचे आणि विज्ञानाकडे वळणारे आहे. नवतेकडे जाणारे आहे. तेव्हा या नव्या युगामध्ये आरोग्यविषयक शास्त्रीय माहितीची जरूर आहे. स्त्रीने, मातेने आरोग्यविषयक आजार, औषधोपचार याविषयी माहिती करून घेणे आवश्यक आहे, हा हेतू शारदा मराठे यांनी स्पष्ट केला. त्या स्वत: लेखन करीत. आरोग्य, प्रसूती, स्त्रियांचे आजार इत्यादी विषयांवर शास्त्रीय माहिती संपादक जाणीवपूर्वक देत.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या टप्प्यावर सुरू झालेले ‘वनिताविश्व’ हे संपादित महत्त्वाचे मासिक होते. डॉ. चंद्रकला हाटे यांनी समाजशास्त्रात पीएच.डी. केले होते. व्यापक समाजशास्त्रीय दृष्टीचा बाणा त्यांच्या लेखन-संपादनाला होता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या टप्प्यावर ‘वनिताविश्व’ सुरू करताना आशयाच्या दृष्टीने व्यापक व्यूह संपादकांनी आखला होता. वनितांच्या जागतिक पातळीवरील माहितीचे संकलन करणारे मासिक ‘वनिताविश्व’चे घोषवाक्य सूचक होते. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील घडामोडींवर भाष्य करीत सदर विषय वाचकांपर्यंत पोचवण्याची संपादकांची धडपड होती.
स्वातंत्र्य मिळाले म्हणजे नेमके काय? भाषावार प्रांतरचनेसाठी नेमलेले ‘दार’ कमिशन, हिंदू कोड बिल घटना समिती, स्त्री-शिक्षणाचा पुनर्विचार, मुंबई महाराष्ट्राची, इत्यादी विषयांचा समावेश संपादकांनी स्त्रियांच्या विषयांच्या बरोबरीने करून घेतला. हिंदू कायद्याचा मसुदा व त्यावरील खुलासा मराठीत प्रसिद्ध केला. जानेवारी १९५० मध्ये भारत प्रजासत्ताक देश होत आहे, याचे औचित्य साधून ‘भारतीय राज्यघटनेचा घोषवारा’ प्रसिद्ध केला. ‘हिंदू कोड बिल आणि आंबेडकर’ या शीर्षकाने
डॉ. आंबेडकरांचे भाषण प्रसिद्ध केले. ‘वनिता जगत’, देशोदेशींच्या स्त्री-जीवनाचा परिचय व्हावा म्हणून ‘दूरदेशच्या मैत्रिणी’ ही मालती दांडेकर यांची लेखमाला प्रसिद्ध करताना जोडीने ‘हिंदी वनितांचे आरोग्य आहे कसे व सुधारेल कसे’ ही डॉ. कृ. श्री. म्हसकर यांची लेखमाला, तर ‘महाराष्ट्रीयन स्त्रियांची वाङ्मयीन प्रगती’ ही लीला मस्तकार रेळे यांची लेखमाला प्रसिद्ध करण्यास संपादक विसरल्या नव्हत्या.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘हिंदी’ राष्ट्रभाषा झाली. हिंदी भाषा शिकण्याचा एक नवीन उत्साह निर्माण झाला. त्यासाठी ‘घर बैठे बैठे राष्ट्रभाषा पढीये’ हे विशेष सदरही सुरू केले. १९४८ सालच्या संपादकीयात ‘भगिनींशी हितगुज’ करताना दिवाळीत फराळाचे पदार्थ करण्यात भगिनींनी सर्व वेळ, श्रम वाया घालवू नयेत असे म्हणून नवीन संकल्प करण्याचे आवाहन केले. ‘आमचे जीवन अधिक कार्यक्षम, कर्तव्यतत्पर होण्यासाठी आपला दृष्टिकोन व्यापक करण्याकरिता आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत. तरी आपण या दिवाळीपासून व्यापारी वर्षांचे नवे पान उलटू या’ या आवाहनाप्रमाणेच स्त्रियांना येणाऱ्या नवकाळाची सर्वागीण जाणीव देण्याचा प्रयत्न डॉ. चंद्रकला हाटे यांनी केला.
१९५० मध्ये भारत प्रजासत्ताक देश झाला. स्त्रियांना घटनात्मक समानता मिळाली. सामाजिक-सांस्कृतिक दृष्टीने स्त्री-जीवनाचा स्तर उंचावला. एकीकडे स्त्रियांचे होमगार्ड पथक प्रशिक्षण घेत होते, दुसरीकडे दुर्गाबाई देशमुख यांची नियोजन मंडळावर नेमणूक झाली. विजयालक्ष्मी पंडित भारताच्या वकील म्हणून रशियाला गेल्या. उत्कर्षांच्या टप्प्याकडे जाताना स्त्रियांच्या मासिकांनी स्त्रियांबरोबर एकूण समाजाचेच प्रबोधन केले.
डॉ. स्वाती कर्वे – dr.swatikarve@gmail.com

Story img Loader