‘तेजस्वी शलाका’ या सदरातून १८५७ ते १९३२ पर्यंतच्या स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झालेल्या व ज्यांनी आपले कार्य व कर्तृत्व सिद्ध केले, अशा अत्यंत निवडक महिलांचा परिचय आपण वाचलात. या लेखात महात्मा गांधी या व्यक्तीबद्दल अत्यंत आदरपण त्यांचा मार्ग न पटता दुसऱ्या साहसी मार्गाच्या तरुणी, इतरधर्मीय स्वातंत्र्य-सैनिका व ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी धडपड केली अशा काही विदेशी महिलांच्या स्वातंत्र्याप्रीत्यर्थ योगदानाची एक झलक वाचकांसमोर ठेवून मी सदराला माझ्यापुरता पूर्णविराम देणार आहे.
स्वा तंत्र्याकरिता हिंदवासीयांनी केलेला पहिला उठाव म्हणजे १८५७ चा उठाव! इंग्रजांनी हा उठाव जालीम उपाय वापरून मोडून काढला. प्रचंड दहशत निर्माण झाली. अशाही परिस्थितीत इंग्रजांना आपापल्या राज्यातून हाकलून देण्यासाठी ज्या तेजस्वी शलाकांनी नेतृत्व दिले त्यापैकी निवडक स्त्रियांच्या योगदानाची माहिती करून घेत घेत ‘तेजस्वी शलाका’ या सदराची सुरुवात झाली. सामान्य स्त्री या स्वातंत्र्याच्या चळवळीत कशी आली याचाही परिचय आपण विशिष्ट मुदतीच्या टप्प्यात, म्हणजे १९३२ पर्यंत करून घेतला. या लेखात स्वातंत्र्यपूर्व काळातील एकूणात हिंदी स्त्रियांनी केलेल्या योगदानाचा धावता आढावा घेत आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला (२५ डिसेंबर १८८५) सर अ‍ॅलन ह्य़ूम या इंग्रजी गृहस्थाने काँग्रेसची स्थापना केली. ब्रिटिश पार्लमेंट जसे लोकांच्या इच्छा, आकांक्षा, अडचणी, प्रश्न यांची चर्चा करून शासनाला चांगल्या कारभाराबद्दल मार्गदर्शन करते तशीच एखादी संस्था हिंदुस्थानात असावी असे त्याला वाटत होते. मात्र ही संस्था सरकारने आमंत्रित केलेल्या प्रतिष्ठित विचारवंत नागरिकांची सुरुवातीला राहील व नंतर त्यांची त्यांनी चालवावी, असा विचार त्यामागे ह्य़ूम साहेबाचा होता. दरवर्षी या काँग्रेसचे अधिवेशन भरू लागले. पहिले अधिवेशन मुंबईत झाले आणि स्त्रियांची गैरहजेरी तिथे असणे स्वाभाविक होते.
इ.स. १८८९ मध्ये ब्रिटिश खासदार चार्ल्स ब्रॅडलॉ यांनी पंडिता रमाबाई व काही हिंदी पुढाऱ्यांना काँग्रेसच्या अधिवेशनात स्त्रियांचा सहभाग असण्याची आवश्यकता पत्र लिहून कळवली. पंडिता रमाबाईंनी महाराष्ट्र व बंगालमधून दहा स्त्रियांना १८९२ च्या अधिवेशनाला जाण्यास तयार केले. त्यात महाराष्ट्रातून स्वत: पंडिताबाई, काशीताई कानिटकर, शेवंता निकुम्बे व शांता नीलकंठ या चौघींचा समावेश होता. यानंतर यशोदाबाई मोरोपंत जोशी, रमाबाई महादेव रानडे या सातत्याने काँग्रेस अधिवेशनात हजर राहू लागल्या. स्त्रियांनी राजकीय प्रश्नाकडे पाहण्याची सुरुवात ही अशी झाली. परंतु स्त्रिया काँग्रेसच्या व्यासपीठावर वक्त्या म्हणून जात नसत. त्या श्रोत्याच असत. त्यांना कुणी तुम्ही या व बोला असा आग्रह/ विनंती केली नाही. बंगालच्या कादंबिनी गांगुली या स्वत:हून एकदा व्यासपीठाची पायरी चढल्या. आपल्या भाषणात त्यांनी महिलांना काँग्रेसच्या कामकाजात भाग घ्यायचा अधिकार मिळालाच पाहिजे, या मुद्दय़ावर भर दिला. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या, महिला या कचकडय़ाच्या बाहुल्या नाहीत. पुढच्या अधिवेशनात बायकांचे पुतळे जागोजागी उभे करा. आम्ही पुतळे बनण्यासाठी इथे आता येणार नाही. कादंबिनीबाईंनी स्त्रियांची अबोल भावना बोलकी केली. देशांतर्गत राजकीय व सामाजिक विचार त्यांना मांडता येऊ लागले. पुढे स्त्रिया स्वातंत्र्यलढय़ातही उतरल्या. या सर्व गोष्टींची सुरुवात कादंबिनीबाईंमुळे झाली. आज याची जाणीव मी-मी म्हणणाऱ्या स्त्री काँग्रेस नेत्यांनाही नाही. या पाश्र्वभूमीवरच स्त्रियांच्या स्वातंत्र्य लढय़ातील महिलांचा सहभाग सुरू झाला याची जाणीव होणे गरजेचे वाटते.
‘तेजस्वी शलाका’ या सदरातून १८५७ ते १९३२ पर्यंतच्या स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झालेल्या व ज्यांनी आपले कार्य व कर्तृत्व सिद्ध केले अशा अत्यंत निवडक महिलांचा परिचय आपण वाचलात. या लेखात महात्मा गांधी या व्यक्तीबद्दल अत्यंत आदर, पण त्यांचा मार्ग न पटता दुसऱ्या साहसी मार्गाच्या तरुणी, इतरधर्मीय स्वातंत्र्यसैनिका व ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी धडपड केली अशा काही विदेशी महिलांच्या स्वातंत्र्याप्रीत्यर्थ योगदानाची एक झलक वाचकांसमोर ठेवून मी सदराला माझ्यापुरता पूर्णविराम देणार आहे.
बंगालमध्ये क्रांतिकारक स्त्रियांची यादी बऱ्यापैकी आहे. बंगाल हे क्रांतिकारकांचे घरच होते. अंदमानमध्ये शिक्षा भोगलेल्या तरुणांची यादी वाचली की मन अचंबित होऊन आपण नतमस्तक होतो. बंगाल व पंजाबमधील क्रांतिकारकांच्या शक्तीला एकत्र आणण्याचे काम स्व. गुरुदेव टागोर यांची पुतणनात सरलादेवी चौधरी यांनी केले. १ जानेवारी १९०९ रोजी लाहोरमध्ये नववर्ष साजरे करण्याकरिता लोक जमले होते. त्या वेळी सरलादेवींनी व्यासपीठावर जाऊन नववर्षांचे स्वागत करण्यासाठी ‘वंदे मातरम्’ ही घोषणा देऊन सर्वाकडून ती वदवून घेतली. या घोषणेला बंदी असताना ही घोषणा लोकांकडून जोरदार आवाजात म्हणवून घेणे याचे पहिले श्रेय सरलादेवींना आहे. १९४५ पासून मृत्यूपर्यंत त्या आंदोलनात सक्रिय होत्या.
शस्त्रास्त्रांचा वापर केल्याशिवाय स्वराज्य मिळणार नाही, असा विचार करणाऱ्यांत ज्या स्त्रिया होत्या त्यांना स्वराज्याचा मार्ग हा फक्त क्रांतिमार्गच असू शकतो असा दृढ विश्वास होता. या मार्गात हिंसा होणे हे त्यांना मान्य होते. क्रांतिकार्यासाठी प्रौढ महिलाही तरुणींची भरती करीत व त्यांना प्रशिक्षण देत. शस्त्रे खरेदी करण्यासाठी राजकीय स्वरूपाचे दरोडे घातले जात. त्या वेळी महिला त्यांना मदत करीत, असे य. दि. फडके यांनी नमूद केले आहे. कल्पना दत्त, सुनीती चौधरी, शांती घोष, बीना दास, उज्ज्वला मुजुमदार, प्रीतिलता वड्डेदार या दीर्घ मुदतीची शिक्षा भोगलेल्या क्रांतिकारक महिला आहेत. नेताजी सुभाषचंद्र या महिलांची उदाहरणे नेहमी आझाद हिंद सेनेच्या महिला जवानांना देत असत, असे स्व. कॅप्टन लक्ष्मी सांगत.
पंजाबमधील सत्यवती देवी ही अशाच स्त्रियांमधील एक. सत्यवती देवींवर मार्क्‍सवादी क्रांतिकारक विचारांचा पगडा होता. शेतकरी, कामकरी यांचे क्रांतीद्वारे राज्य हे तिचे स्वप्न होते. वारंवार होणाऱ्या तुरुंगवासामुळे त्यांची प्रकृती पूर्ण ढासळली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. पंजाबमधील क्रांतिकारक विचारांची दुसरी कन्या सुशीला दीदी. आपले सर्व स्त्रीधन तिने काकोरी कटाचा खटला चालविण्यासाठी दिले होते. सरदार भगतसिंग व इतर क्रांतिकारकांना स्वत: भूमिगत राहून तिने मदत केली. तिला पकडून देणाऱ्याला ब्रिटिश सरकारने २००० रुपयांचे बक्षीस लावले होते. क्रांतिकारक दीदीचा सल्ला घेत. पोलिसांशी एखाद्या योद्धय़ाप्रमाणे ती सामना करी. ती शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागली नाही.  गरिबी (आपले दागदागिने, पैसा अडका, घरदार देऊन ओढवून घेतलेली) व आजार यामुळे तिचा मृत्यू १९६३ मध्ये झाला. पण याची दाद या देशात कुणीही घेतली नाही.
भगवती चरण व्होरा (वहोरा) उत्तर प्रदेशात १९३० मध्ये बॉम्ब तयार करत असताना स्फोट होऊन हुतात्मा झाले. दुर्गाभाभी या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या पत्नीने त्यांचे  काम  पुढे चालवले. सरदार भगतसिंग व बटुकेश्वर दत्त या दोन क्रांतिकारकांच्या सुटकेसाठी तिने अथक प्रयत्न केले. स्वत:च्या कर्तबगारीवर त्यांनी क्रांतिकारकांचे नेतृत्व केले.
आसाममधील कनकलता बारुआ एक अल्लड किशोरी. हिने १९४२ साली पोलीस स्टेशनसमोर झेंडावंदन करण्यासाठी युवकयुवतींचा गट तयार केला. झेंडावंदन होण्यापूर्वीच पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ती हुतात्मा झाली. विसाव्या शतकात भारतभूमीवर स्वातंत्र्य लढय़ात हुतात्मा झालेली कनकलता ही पहिली हुतात्मा. याच वयाची वेलियाम्मा द. आफ्रिकेत सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल माफी मागण्याचे नाकारून हुतात्मा  झाली.
महाराष्ट्रात क्रांतिकार्य म्हणजे घातपाती कृत्यात भाग घेतलेला दिसतो. त्यात नासिकच्या इंदूताई उपासनी यांनी बिळाशी जंगल सत्याग्रहात पोलिसांच्या हातातील बंदुका हिसकावून घेणाऱ्या राजू कदम, सुलोचना जोशी, धोंडूबाई मटकर, मैना यमगर, स्टेशन जाळपोळीत खानदेशच्या लीला पाटील, सांगलीच्या राजमती बिरनाळे, विदर्भातील हसीना हैदरभाई, सिंधू शेंजडे (रेल्वे रुळ उखडणे व स्टेशन पेटवणे), कोल्हापूरमधील विल्सनच्या पुतळ्याला भरदिवसा डांबर फासणाऱ्या भागीरथीबाई तांबट व जयाबाई हवेरी, शेणोली स्टेशन जाळणारी कृष्णाबाई शिंदे, ब्रह्मी खजिना लुटायला मदत करून त्यातील दोन लाख पन्नास हजारांची रक्कम जीव धोक्यात घालून मुंबईला रत्नाप्पा कुंभारांकडे स्वाधीन करणारी कोल्हापूरची सुभद्रा सावंत यांची नावे प्रामुख्याने दिसतात. पण भूमिगतांना मदत करून  दारूगोळा, पत्रे वगैरे पोहोचविण्याचे काम करणाऱ्या अनेक आबालवृद्ध स्त्रिया होत्या.  त्यांचीही नोंद झाली पाहिजे.
गांधीजींच्या हाकेला प्रतिसाद देणाऱ्या उच्चभ्रू स्त्रियांत जानकीदेवी बजाज, कमला नेहरू, बिजयालक्ष्मी नेहरू (पंडित), राजकुमारी अमृतकुंवर, मृदुला साराभाई, सरलादेवी साराभाई अशा नामांकित परिवारातील लेकी, सुना तुरुंगात जात-येत राहिल्या. गांधीजींचा प्रभाव पडलेल्या स्त्रियांत मुसलमान आणि विदेशी स्त्रियांचाही समावेश आहे. १९२०-२२ मधील खिलापत चळवळीत चमकलेल्या अमन बाबू बेगम या त्यापैकीच एक. आपले दोन्ही मुलगे शौकतअली व महंमदअली यांना चळवळीत उतरण्याची प्रेरणा त्यांनी दिली. स्वत: पडदा सोडला व इतर सधर्मीय स्त्रियांना पडदा सोडून सामाजिक व राजकीय कार्यात समाविष्ट होण्यास प्रेरणा दिली. त्यांच्या सुनेनेही या चळवळीत सासूच्या पावलावर पाऊल ठेवले.
रेहना तय्यबजी या गांधीजींच्या एक जवळच्या स्नेही होत्या. त्यांनी घर सोडले व आश्रमात राहू लागल्या. हिंदू-मुस्लीम एकतेसाठी त्यांनी अविश्रांत श्रम केले. त्यांनी काकासाहेब कालेलकर व गांधीजी यांवर लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. गांधीजींच्या चळवळीतील एक बिनीची लढवय्या म्हणजे पतियाळाच्या बिबी अमृतसलाम. हिंदू-मुस्लीम एकतेसाठी तिने आयुष्य वेचले. हिंदू-मुस्लीम दंग्यांच्या क्षेत्रात घुसून दोन्ही पक्षांचे मतपरिवर्तन करण्याचा त्या प्रयत्न करीत.
अशीच काही उदाहरणे विदेशी स्त्रियांचीही आपल्याला देता येतात. या स्त्रियांनी हिंदुस्थानच आपला देश मानला व सामाजिक व राजकीय सुधारणांसाठी तुरुंगवासही भोगला. मार्गारेट कुझीन या आयरिश स्त्रीने या देशात स्त्रीमताधिकाराची चळवळ उभारली.  नेली सेनगुप्ता या ब्रिटिश कन्येने सासरी बंगालमध्ये आल्यापासून लगेच हिंदी स्वातंत्र्यलढय़ाच्या मार्गावर चालायला सुरुवात केली. अनेक वेळा तुरुंगवासही भोगला. अ‍ॅनी बेझंट या आणखी एक विदेशी भगिनी इथे आल्यावर होमरुल चळवळ सुरू करून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. आर्यलडला परत जाण्याचा सरकारी हुकूम न मानल्यामुळे त्यांना तुरुंगवास घडला. १९३३ मध्ये त्या मद्रासमध्ये ख्रिस्तवासी झाल्या. ईस्ट इंडिया स्टेशनचे कमांडर इन चीफ अ‍ॅडमिरल स्लेड यांची कन्या मेडेलाइन ही १९२५ मध्ये हिंदुस्थानात आली व गांधीजींच्या आश्रमात राहिली. हिंदी स्वातंत्र्याच्या लढय़ात मीरा बहेन या नावाने त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला.वरील कथा आहेत भारतातच स्थायिक असलेल्या किंवा समज आल्यावर भारतात येऊन  स्थायिक झालेल्या विदेशी स्त्रियांच्या. अशाही काही स्त्रिया आहेत की ज्यांनी भारतीय वंशाच्या होत्या, पण त्या किंवा त्यांचे माता-पिताही कधी भारतात आले नव्हते. अशी वस्ती आग्नेय आशियात मोठी होती. रबराच्या मळ्यात काम करणाऱ्या दक्षिण भारतीय स्त्रिया, बँकॉक, सिंगापूर येथील मजूर स्त्रिया, ब्रह्मदेशातील मध्यम व उच्चमध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्रिया या सुभाषबाबूंनी स्थापन केलेल्या आझाद हिंद फौजेच्या महिला पलटणीत भरती झाल्या होत्या. गेल्या वर्षी दिवंगत झालेल्या कॅ. लक्ष्मी या पलटणीत कर्नलपदापर्यंत पोहोचलेल्या जगातील पहिल्याच महिला. त्यांची राणी झाशी रेजिमेंट भारताच्या सीमेच्या जवळ पोहोचली होती. आझाद हिंद फौजेचे भारतातील पहिले पाऊल ही राणी झाशी रेजिमेंट ठरणार होती. इथपर्यंत पोहोचताना दोन-तीन मुली लहानलहान चकमकीत धारातीर्थी पडल्या. या पलटणीत सर्व धर्माच्या सुशिक्षित व अशिक्षित, अर्धशिक्षित, मायदेशाबद्दल फक्त ऐकीव माहिती असलेल्या वय वर्षे १४ ते ४५ पर्यंतच्या १५०० मुली होत्या. तो एक स्वतंत्र व रोमहर्षक विषय आहे. ते भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील महिलांच्या योगदानाविषयीचे सोनेरी पान आहे.
आज या लेखमालेची सांगता करताना या स्त्रियांचे पाहिलेले व न पाहिलेले व ऐकीव योगदान डोळ्यांसमोर येते व डोळे भरून येतात. या सर्वावर लिहायचे व बोलायचे ठरवले तर त्यासाठी प्रांतवार लेखक पुढे यावे लागतील. आधीच प्रसिद्ध असलेले लेख पुनर्मुद्रित होऊन लोकांसमोर यावे लागतील. मुलांना या देशाचे खरे नागरिक बनविण्यासाठी हा सुंदर देश आपल्याकरिता स्वतंत्र करून देणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या गोष्टी त्यांच्या कानावर घालणे जरुरीचे आहे. त्यांच्या कथा अशाच लोकांसमोर यायलाच हव्यात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला
                                                         (समाप्त )

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा