सतत कामात मग्न असलेल्या आजीचा दिवस आजही पहाटे पाच वाजता सुरू होतो. आजही सगळी कामं करत, ताठ कण्याने जगणाऱ्या आमच्या आजीने नुकतंच शंभराव्या वर्षांत पदार्पण केलंय. आज त्यानिमित्ताने कार्यक्रम साजरा होतोय, ती आमची आजी, इंदिरा गोंधळेकर ऊर्फ वहिनीच्या दीपस्तंभासारख्या व्यक्तिमत्त्वाबद्दल..
सुमारे चाळीस वर्षांचा काळ. गावच्या वेशीवर असलेल्या ग्रामदेवतेच्या देवळात त्या वेळी मासिक पाळी येणाऱ्या मुलींनी, स्त्रियांनी जायचे नाही, असा दंडक होता. गावाबाहेर आजूबाजूला डेरेदार वृक्ष असलेल्या शांत निवांत परिसरातील या देवळात आपण जायचेच, तेसुद्धा लपूनछपून नाही तर राजरोस जायचे, असे ठरवून मी त्या देवळात जाऊन बंदी हुकूम मोडला आणि हे सर्वाना कळविण्यासाठी तिथली घंटा मुद्दाम जोराने वाजविली. तशी मी लहानच होते त्या वेळी, पण या प्रमादाबद्दल गावकीची पंचायत भरली. त्या वेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आजीने तिच्या नातीने कोणतीच चूक केली नाही, याचे ठाम प्रतिपादन तर केलेच, वर गावकऱ्यांचेदेखील मतपरिवर्तन केले. परिणामी हे देऊळ सर्वच वयांच्या स्त्रियांसाठी कायमचे खुले राहिले. एक अनाठायी अंधश्रद्धा कायमची मोडून काढली गेली. ती मोडून काढणारी आम्हा सर्व कुटुंबीयांचा आदर्श, तरुणाईच्या भाषेत सांगायचे झाले तर आरोग्याचा, बुद्धिमत्तेचा, सुधारक विचारांचा आयकॉन असलेली, नुकतेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केलेली माझी आजी (वडिलांची आई) इंदिरा गोंधळेकर ऊर्फ वहिनी!
प्रकृतीने खुटखुटीत, बुद्धी, स्मृती सारे आजही अगदी ठणठणीत असलेली आमची अनोख्या व्यक्तिमत्त्वाची आजी. सर्व आज्यांप्रमाणे आम्हा नातवंडांचे लाड करणारी आपली आजी इतर आज्यांपेक्षा निराळी आहे हे लहानपणी कळले नाही, तरी कळत्या वयात तिचे वेगळेपण जाणवत गेले आणि तिच्या रूपाने किती अनोखा ठेवा आम्हाला लाभला आहे हे उमगले. प्रापंचिक जबाबदाऱ्यातून निवृत्त होताना वृद्धापकाळी सर्वसाधारणपणे स्त्रिया देवधर्म यात वेळ घालवू लागतात, पण आमची ही आजी म्हणजे देवळात न जाणारी, पोथ्यापुराणे यांच्या वाटेला न जाणारी, कोणतेही कर्मकांड, उपासतापास न करणारी, स्वस्थ बसून राहून जपमाळ न ओढणारी, उलट काम, कर्तव्य हीच देवपूजा, माणुसकी हाच धर्म मानणारी. तिच्या संसारातून कधी ती निवृत्त झालीच नाही.
कोकणातल्या आजीच्या घरचा मोठा राबता, मे महिन्यात येणाऱ्या कोकणच्या राजाचे अर्थात हापूस आंब्यांचे सर्व व्यवहार, व्यापार आजी वयाच्या नव्वदीपर्यंत एकहाती एकटी लीलया सांभाळायची. त्यात वर्षभर आंब्यांच्या कलमांची निगराणी, उत्पादन, व्यापार, विक्री तसेच अवीट गोडीचा दर्जा कायम राखून उत्पादन वाढविण्यासाठी चौकसपणे नवीन गोष्टी माहीत करून घेणे, शिकणे हेही आलेच. सकाळी उठताना आज संकष्ट चतुर्थीसारखी कोणती तिथी अथवा श्रावण सोमवारसारखा उपवासाचा वार आहे, उपासाची तयारी म्हणून साबुदाणा भिजत घालायचा आहे, असा सर्वसाधारण स्त्रीसारखा विचार करण्याऐवजी आज कोणत्या झाडांना कीटकनाशकाची फवारणी करून घ्यायची आहे, कोणत्या झाडांना खत घालायचे आहे, कोणत्या कलमाची बांडगुळे काढून घ्यायची आहेत, कुठे गडगा बांधून घ्यायचा आहे, विहिरीतला गाळ काढून घ्यायचा आहे, या विचारांनी जागी झालेली आजी दिवसभर ती कामे करून घेते आजही. त्याची पूर्तता करत असताना पुढच्या दिवसाच्या नव्हे तर पुढच्या वर्षीच्या योजना, आराखडे आखते.
सतत कामात मग्न असलेल्या आजीचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. मोठा राबता असलेल्या आजीच्या घरात गडी, माणसे, घरगुती कामे करणारी माणसे यांना तोटा नाही, तरीदेखील आजी अनेक कामे अजूनही कटाक्षाने स्वत: करते. ज्या कामासाठी आपल्याकडे माणसे आहेत, ती तू स्वत: या वयात कशासाठी करतेस, असे आम्ही विचारताच ती शारीरिक श्रमांचे महत्त्व, गांधीजी, विनोबा यांची शिकवण, त्यांचे आचरण, असे सांगून आम्हाला निरुत्तर करते व सरतेशेवटी, काम हेच माझे टॉनिक आहे, हे सांगायला विसरत नाही.
झाडामाडांची विलक्षण मायेने काळजी घेणारी पर्यावरणप्रेमी आजी सौंदर्य, सजावटीचीही भोक्ती आहे. रोज सकाळी परसावात सगळीकडे फिरून ती सर्व झाडाफुलांची खुशाली तर पाहतेच आणि आम्ही उठायच्या आत फुलदाणीमध्ये फुलापानांच्या रोज वेगवेगळ्या मनोहारी रचना करून ठेवते. सकाळी आम्हाला जणू ‘गुड मॉìनग’ म्हणणारी फुलदाणी मस्तपकी सजविणारी आजी दुपारी जेवणानंतर वामकुक्षीचा मोह टाळून परसावामध्ये पडलेल्या नारळांच्या झापांचे हीर सोलून त्याचे खराटेही ज्या असोशीने बांधते ते पाहताना कार्यनिमग्न, कार्यव्यग्रता म्हणजे काय याचे आकलन होते. तिचे सामान्यज्ञान चतुरस्र. नवीन काही तरी शिकले पाहिजे, वाचले पाहिजे यावर तिचा कटाक्ष. आम्हा नातवंडांना आणि तिच्या पतवंडांनादेखील हाच तिचा आग्रह.
४० – ५० वर्षांपूर्वी कोकणातील गावांमध्ये अंधश्रद्धा, स्पृश्य-अस्पृश्यता यांचेही प्राबल्य होते. गावातील एकमेव मोठय़ा असलेल्या आजीच्या घरातील काही खोल्या शिक्षकांना भाडय़ाने राहावयास देण्यासाठी असत. गावातील शाळेत बदली होऊन आलेल्या शिक्षकांची सोय त्यामुळे होत असे. कोणी नवबुद्ध नवीन शिक्षक बदलीद्वारे आले की, त्यांना इतर ठिकाणी आलेल्या अनुभवांवरून आजीकडे खोली मागावयास ते येत नसत. अशा वेळी ती शिक्षक व्यक्ती योग्य वाटली तर आजी- ‘‘गुरुजी, राहा येथे आमच्या घरात. तुम्हाला येथे कसलीच अडचण येणार नाही,’’ असे सांगून गावकऱ्यांनी नाके मुरडली तरी त्यांना सामावून घेत असे. समानतेची शिकवण आजीने प्रत्यक्षात अंगीकारली होती. आजीच्या घरी राहत असलेल्या एका शिक्षक दाम्पत्याचा, १३-१४ वर्षांचा अडनिडय़ा वयाचा मुलगा अचानक कशाने तरी बिथरत असे आणि बेभान होऊन सगळ्या परसावात दंगामस्ती करत धावत असे. अशा वेळी त्याला आवरायला दोघेजण बोलवायला लागत. तो विहिरीजवळ जाऊन रहाटाशी दंगा करू लागल्यावर पुढची आपत्ती टाळण्यासाठी त्याला नाइलाजाने बांधून ठेवायला लागायचे. हा सर्व प्रकार म्हणजे ‘बाहेरची बाधा’ यावर गावकऱ्यांचे शिक्कामोर्तब झाले असताना ‘त्याला बांधले तरी मारू नका. त्याच्या अंगातली रग जिरविण्यासाठी त्याला मदानी खेळ खेळायला मिळाले आणि वय वाढले की तो आपोआप शांत होईल. बाहेरचं वगरे बघण्यापेक्षा त्याला मुंबईला नेऊन चांगल्या डॉक्टरांना दाखवा,’’ असे तिने त्याच्या आईवडिलांना निक्षून बजावले. चाळीस वर्षांपूर्वी मानसिक आजार, उपचार, बालरोगतज्ज्ञ, बालमानसशास्त्र, हार्मोनल बदलांमुळे होणारे गडबड, घोटाळे असे काही ऐकिवातदेखील नव्हते, तेथे केवळ आंतरिक शहाणपणामुळे, शास्त्रीय पद्धतीने समस्या सोडविण्याची, विचार करण्याची सवय असलेल्या आजीने त्या मुलाला पुढच्या अनर्थातून वाचविले होते.
संकटात, कठीण प्रसंगात देवाची आठवण बहुतेक सगळ्यांना होते. मन:शांतीसाठी, मनोबल वाढविण्यासाठी जप, जाप्य, नामस्मरण यांचा आधार बहुतांशी घेतला जातो. आजीने तरुण वयात पतिनिधनानंतर एकटीने मोठय़ा हिकमतीने मुलांना वाढविले, त्यांच्यावर धार्मिक कर्मकांडाचे नव्हे तर माणुसकीचे उत्तम संस्कार केले. छोटय़ामोठय़ा कौटुंबिक आघातांतदेखील कधीही देवाला साधे हातही जोडले नाहीत, की पूजाअर्चा केली नाही. त्याच्यावर भार टाकणे, साकडे घालणे, नवस करणे तर दूरच.
देव आहे की नाही, धर्म, रूढी यांची आवश्यकता काय, यावर कधीही कोणाशीही चर्चा वाद न घालता निव्वळ स्वत:च्या आचरणातून तिने आम्हा कुटुंबीयांवर सुधारक बुद्धी प्रामाण्यवादाचे संस्कार केले. तिने कधीच कोणालाही कर्मकांड करण्यात शक्ती आणि बुद्धीचा अपव्यय करू नको, पोथ्यापुराणे, चरित्रांची पारायणे करण्यात वेळ घालवू नको, असे ‘नको’, ‘नाही’चे नकारात्मक उपदेश केले नाहीत. ‘काय करू नये’ यावरचा उपदेश टाळून ‘काय करावे’ हे स्वत:च्या आचरणातून न बोलता शिकविणारी आजी खरीखुरी सुधारक.
आजही लाकडाची काठीदेखील न घेता ताठपणे उभी असणारी माझी आजी शंभराव्या वर्षांत पदार्पण करतेय. तिचा कणखर, ताठ कणा आजही आम्हाला मार्गदर्शन करत ठामपणे उभा आहे, एखाद्या दीपस्तंभासारखा!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा