मुलींचे शिक्षण हा सध्याचा कळीचा मुद्दा झाला आहे. सर्व शिक्षा अभियाना बरोबरच युनिसेफ, मीना राजू मंच, दीपशिखा आदी आपापल्या माध्यमातून शाळा-गळती व बालविवाह थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जालना जिल्ह्य़ात स्वत:चे बालविवाह रोखणाऱ्या ४४ मुलींचे नुकतेच सत्कार करण्यात आले. त्या निमित्ताने..
जालना जिल्ह्य़ातील नंदापूर प्राथमिक शाळेत सातवीमध्ये शिकणारी सुनीता देवीदास उबाळे. शिक्षणाविषयी एकूणच उदासीनता, त्यात मुलीच्या शिक्षणाबाबत विचारच नाही, अशा घरात तिचा जन्म झालेला, साहजिकच तिचं लग्न लावून टाकायचे जोरदार प्रयत्न सुरू झाले. घरची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची. तीन बहिणी व दोन भाऊ, आई, वडील सर्व जण शेतातच कुडाच्या घरात राहणारे. मुलीचं लग्न लागलं की, मोठय़ा जबाबदारीतून पार पाडल्याचं समाधान मिळवण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी तिच्या आई-वडिलांनी सुनीताचा विवाह एका तेवीस वर्षांच्या मुलाशी ठरविला. लग्नाची तारीख सात एप्रिल ठरण्यात आली. सुनीताला बघायला पाहुणे आले त्या वेळी तिने आपल्या आई-वडिलांना सांगितले की, मला शिकायचे आहे. इतक्या लहान वयात लग्न करायचे नाही. मात्र आई-वडिलांना ते पटणे शक्य नव्हते. सुनीताचे मन मात्र शिक्षणाकडेच होते. शिकून आई-वडिलांसाठी काही तरी करायला हवे हे तिचे ध्येय होते. लग्नाची तारीख जवळ येत होती आणि तिची चिंता वाढू लागली. तिच्यासमोरचे सर्व मार्ग बंद झाले असे वाटत असतानाच तिला एक मार्ग सापडलाच आणि तिने तातडीने आपल्या शाळेतील शिक्षकांकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांचा मोबाइल नंबर घेऊन त्यांना आपली हकीकत सांगितली. सांगताना तिला रडू आवरेना, ‘‘साहेब, मला खूप खूप शिकायचे आहे. मला बालविवाह नाही करायचा. तुम्ही माझा विवाह कृपया थांबवा.’’ तिची ही विनंती, आर्जव राधाकृष्णन यांना स्पर्शून गेली आणि त्यांनी तत्काळ एक पथक पाठवून, गावकऱ्यांना सोबत घेऊन तिच्या पालकांची भेट घेतली. त्यांना समजावून सांगितले. त्याचा इच्छित फायदा झालाच. बालविवाह तर थांबलाच पण ती पुढचं शिक्षणही घेते आहे.
‘युनिसेफ’ व ‘सर्व शिक्षा अभियान जि. प. जालना’ यांच्याकडून गेल्या दोन वर्षांपासून जालना जिल्ह्य़ातील बालविवाह रोखण्यासाठी जे प्रयत्न झाले, त्यात त्यांना आजपर्यंत ८८ बालविवाह रोखता आले. जालना जिल्हा तसा महिला साक्षरतेत मागासलेलाच, तसेच जिल्हय़ाचा मानव विकास निर्देशांक सर्वात कमी. त्यामुळे या ठिकाणी मुलींच्या शिक्षणाबाबत खूपच अनास्था दिसून येते. ‘युनिसेफ’ तसेच जिल्ह्य़ातील काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील पाच तालुक्यांत हा उपक्रम राबविला, त्याद्वारे त्यांना बऱ्यापैकी यश प्राप्त झाले आहे.
जालना जिल्ह्य़ात बालविवाहाचे प्रमाण जास्त का आहे, याचे कारण शोधावयास गेल्यास, येथे साक्षरतेचा अभाव, त्यातही महिला साक्षरता खूपच कमी, त्यामुळे त्यांची लवकर लग्न होतात. त्यातच बालविवाहाच्या दुष्परिणामांबाबत जितकी जगजागृती आवश्यक आहे ती ग्रामीण भाग असल्याने नाही. त्यातूनही कुणाला शिक्षण घ्यायचे असेल तर अनेकदा शाळा गावाजवळ नसते, शिवाय या शाळाही चौथी किंवा सातवीपर्यंतच असतात. त्यामुळे या मुलींना पुढचे शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना परगावी जावे लागते. मुलीला परगावी कसे पाठवणार हे कारण असतेच शिवाय याच दरम्यान तिने घरातील, शेतातील थोडेफार काम करायला सुरुवात केलेली असते, महिलांना शंभर रुपये रोज अशी मजुरी मिळते, साहजिकच मग गावापासून शाळा खूप लांब आहे हे कारण सांगून त्यांचे शिक्षण थांबवले जाते.
दोन मे रोजी जालना येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात बालविवाह रोखणाऱ्या ४४ मुलींचा सत्कार करण्यात आला होता. या वेळी सर्व मुलींसोबत त्यांच्या आई उपस्थित होत्या. या ग्रामीण भागातील महिलांना बालविवाहाचे दुष्परिणाम समजायला लागलेत हे त्या वेळी दिसून आले. या ठिकाणी बोलताना अक्काबाई चौतमल म्हणाल्या, की मला कविता आणि सविता दोनच मुली. मला मुलीच का झाल्या म्हणून दारू पिणारा नवरा दररोज मारायचा. माझी परिस्थिती हलाखीची. दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून कुटुंब चालवायचे होते. मुलींना शाळेत टाकले, नंतर नवरा जास्तच मारायला लागला कारण काय तर, मुलींना शाळेत टाकले. मात्र अक्काबाईंचा निर्धार पक्का होता. सविता आणि कविता या दोघी दहावी उत्तीर्ण झाल्या. मुलींचे शिक्षण चालू असतानाच पती रागारागाने घर सोडून पुण्याला निघून गेला. या वेळी अक्काबाईंनी दिवसरात्र एक करून मुलींना शिक्षणासाठी पैशांची कमतरता पडू दिली नाही. सविता दहावी पास झाल्यावर तिला ‘पाहण्यासाठी’ पाहुणे आले, त्या वेळी आईने लग्नास नकार दिला. मात्र पाहुण्यांचे दडपण वाढायला लागले. त्या वेळी सविताने वडिलांची मदत घेतली आणि बालविवाह थांबविला. आज दोघीही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत.
येणोरा, ता. परतूर येथील चौदा वर्षांची सुनीता आसाराम घोडे या मुलीची घरची परिस्थिती हलाखीची. चार बहिणी आणि एक भाऊ. आठवीपर्यंत शाळा शिकल्यानंतर तिला शाळा सोडावी लागली आणि कुटुंबास आर्थिक आधार द्यावा लागला. यातच तिचे लग्न आई-वडिलांनी ठरविले. तिला लग्न करायचे नव्हते. तिने ही गोष्ट आपल्या गावातील अंगणवाडीताईंना सांगितली. या वेळी ताई व गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी घरी येऊन आई-वडिलांना समजावून सांगितले आणि तिचा बालविवाह रोखला गेला.
खेडय़ापाडय़ात राहणाऱ्या या सावित्रीच्या लेकी आता स्वत:हून पुढे येत आहेत. दररोज ‘दीपशिखा’ वर्गाला जाऊन त्याठिकाणी आपापले हक्क व कर्तव्यांची जाणीव करून घेत आहेत. तसेच, ज्या मुलींचा बालविवाह रोखला गेला आहे, त्याच गावागावात हे काम अतिशय जोमाने पुढे नेत आहेत व एकमेकींना साथ देत आहेत. याचेच एक उदाहरण पारनेर, ता. आंबड येथील सारिका चव्हाण हिच्या बाबत घडले. चौदाव्या वर्षीच बहिणीच्या पतीसोबत विवाह करण्याचे तिच्या आई-वडिलांनी ठरविले. तिने या विवाहास नकार दिला मात्र घरच्या मंडळीसमोर तिचे काही चालेना. या वेळी तिने आपल्या एका मैत्रिणीला ही गोष्ट सांगितली व दोघींनी ‘दीपशिखा’च्या प्रेरिकांच्या (कार्यकर्ते) माध्यमातून हा विवाह रोखला. ‘दीपशिखा’ वर्गाच्या माध्यमातून ही प्रेरणा मिळवली, असे सारिका आवर्जून सांगते.
एकदा का मुलींनी ठरवले की शाळेत जायचेच की मार्ग सापडतातच. असंच घडलं लक्ष्मी वाहुळेच्या बाबतीत. लक्ष्मी आठवीत शिकत होती, पण त्यासाठी दुसऱ्या गावी जावे लागायचे. वाहनांची सोय नव्हती. घरापासून दोन-तीन किमी पायी जाऊन मग शाळेसाठी बस मिळायची. मुलीच्या काळजीने शेवटी तिचे लग्न ठरविले गेले. तिला मात्र शिकायचे होते. तिने ही गोष्ट गावातील ‘प्रेरकां’ना सांगितली. त्यांनी गावातील नागरिकांना सोबत घेऊन तिच्या आईवडिलांची समजूत घातली. त्यांना हे पटलं मात्र गावात मुलींना ये-जा करण्यासाठी बस आली पाहिजे, असा आग्रह धरला. यातून लगेचच मानव विकास मिशनतर्फे गावात मोफत बसची सोय करण्यात आली.
२००४-२००५ पासून केंद्रशासनाने मुलींच्या शिक्षणासाठी सुरू केलेली कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांतर्गत जालना जिल्ह्य़ातील सात ठिकाणी दुर्गम भागातील विशेषत: अनु. जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक मुलींसाठी इयत्ता पाचवी ते नववीपर्यंत निवासी शिक्षण दिले जात आहे. सुरक्षितता, पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ज्या मुली शिक्षणापासून वंचित होत्या अशांपैकी ८३७ मुली येथे शिक्षण घेत आहेत. या मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाल्यामुळे या मुली आनंदी आहेत. विविध माध्यमांतून त्यांना नावीन्यपूर्ण गोष्टीची माहिती व्हावी, यासाठी वेळोवेळी त्यांच्या सहली काढल्या जातात. या सर्व मुलींना महिला विश्वचषका वेळी वेस्ट इंडिजच्या संघाची भेट घडवून आणली, त्या वेळी या सर्व मुली भारावल्या होत्या व तो क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता, असे मुली आवर्जून सांगतात. ‘कस्तुरबा गांधी विद्यालया’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलींच्या उपजत कलागुणांना वाव मिळत आहे. अंबड येथील काही विद्यार्थिनी राज्यस्तरीय खो-खो, कबड्डी खेळायला गेल्या. त्यामुळे त्यांच्यातील खेळ भावना जोपासली गेली, तसेच त्यांना या माध्यमातून नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
मुलींचे बालविवाह थांबविणे किंवा त्यांना शिक्षण प्रवाहात आणणे सोपे काम नव्हते. युनिसेफ व इतर संस्थांच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी लोकांचा त्रास सहन करावा लागला. तसेच, गावागावात प्रेरकांना शिव्या, मार, खावा लागला. मात्र त्या खचल्या नाहीत. यातूनच मागील वर्षी दोन मुलींना ‘नवज्योती पुरस्कार’ मिळाला. यात आस्मा शेख या मुस्लीम मुलीचाही समावेश आहे.
ग्रामीण भागातील मुलींची शिक्षण-गळती थांबवणे या प्रयत्नात अनेक जण आपापले योगदान देत आहेत. त्यातलाच एक ‘मीना-राजू मंच’. गळती थांबवणे आणि लिंगसमभावाचे बीज मुला-मुलींत शालेय वयातच रुजवण्यासाठी २०१२ सालापासून ५ ते ७ वीचे वर्ग असणाऱ्या सर्व शाळेत या मंचची स्थापना करण्यात आली. चनेगाव (ता. बदनापूर) येथील सर्वेक्षणात दोन मुले शाळाबाह्य़ आढळली. चौकशीअंती असे आढळले, हे कुटुंब कर्नाटकातील असून ते कामासाठी मागील नऊ वर्षांपासून स्थलांतरित होत असे. त्यामुळे ही मुले नेहमी शाळाबाह्य़ राहायची. यातील मनीषा संजय मिरे हिला चौथीत, तर अमोलला सहावीत वयानुरूप समकक्ष प्रवेश दिला गेला. या मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून ‘मीना -राजू मंच’ची मुले दररोज त्यांच्या घरी जायची. त्यांना शाळेत घेऊन यायची व त्यांना आपली मराठी भाषा आवडीने शिकवायची. सप्टेंबर महिन्यात पुन्हा हे कुटुंब स्थलांतर करणार आहे, अशी माहिती या मुलांना कळाली. त्यांनी तत्काळ सुगमकर्ता भारती बुजाडे यांना सांगितले. यावर सर्व शिक्षक त्या कुटुंबाच्या घरी गेले. त्यांना सांगितले की, तुम्ही कामासाठी कुठेही जा, तुमची मुले आम्ही सांभाळतो. ते त्या कुटुंबीयांनी ऐकले. या मंचातील मुलांनी त्या बहीण-भावंडांना दररोज जेवणाचा डबा पुरविला. काळजी घेतली. त्यामुळे ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली. या मुलांनी सलग दहा दिवस गावातील पाणंद रस्ता झाडून काढला, गावात यांनी भजनाची देखील सुरुवात केली. त्यामुळे गावातही ही मुले आवडती झाली आहेत. आणि त्यांच्या मदतीसाठी गाव तयार आहे.
मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षणाधिकारी गजानन कांबळेसुद्धा जातीने लक्ष घालत आहेत. शिक्षण समाजाभिमुख करण्यासाठी आणि स्त्रियांच्या विकासाच्या विविध पैलूंवर कार्य करण्यासाठी ‘सर्व शिक्षा अभियान’, ‘युनिसेफ’ आणि ‘अक्षरा’ या संस्थेच्या संयुक्त प्रयत्नाने महाराष्ट्रात ५६ ठिकाणी ‘स्त्री-संशोधन’ केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. याच्या अंतर्गतच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात चौथी ते सातवीतील मुलींना व त्यांच्या मातांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘माँ-बेटी’ मेळावे आयोजित केले गेले.
माँ-बेटी मेळाव्याच्या माध्यमातून ९०६२ मुली व त्यांच्या मातांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्यात संवाद घडवून आणला. यातील काही महिला पहिल्यांदाच आपल्या मुलीसोबत घराच्या बाहेर पडल्या होत्या व विविध खेळ खेळत होत्या. मुलींनी आईला मनमोकळेपणाने आपल्या शारीरिक अडचणी सांगितल्या व संवादाच्या माध्यमातून नवनवीन विषयांची गुंफण घातली गेली.
एकंदरीत मुलींच्या शिक्षणासाठी शासनासोबतच समाजाने,आई-वडिलांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, एक मुलगी शिकली की कुटुंब शिकतं, कुटुंब शिकलं की समाज आणि समाज शिकला की देश प्रगतिपथावर जातोच. हे लक्षात घेतलं तर अनेक गोष्टी सहज सोप्या होऊन जातील.
आम्ही मुली सांगू परोपरी, शिक्षण नेऊ घरोघरी
मुलींचे शिक्षण हा सध्याचा कळीचा मुद्दा झाला आहे. सर्व शिक्षा अभियाना बरोबरच युनिसेफ, मीना राजू मंच, दीपशिखा आदी आपापल्या माध्यमातून शाळा-गळती व बालविवाह थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जालना जिल्ह्य़ात स्वत:चे बालविवाह रोखणाऱ्या ४४ मुलींचे नुकतेच सत्कार करण्यात आले.
आणखी वाचा
First published on: 08-06-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 44 girls from jalna stopped their own under aged marriage got awarded