डॉ. सिसिलिया काव्र्हालो
एका उदंड वाचणाऱ्या, ग्रंथप्रेमी संशोधक गृहिणीचं बोट धरून डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन काव्र्हर, डॉ. आयडा स्कडर, डॉ. सालीम अली, डॉ. पां. स. खानखोजे, गोल्डा मेयर, डॉ. रेमंड डिटमर्स, रिचर्ड बेकर, डॉ. विलासराव साळुंखे, रोझिलड फ्रँकलीन, लीझ माइटनर, डॉ. मारी डी. हेनेगल, डॉ. रॉबी डिसिल्व्हा असे अनेक शास्त्रज्ञ, कलावंत, राजकारणी, संशोधक ज्या घरात चालत आले; त्यांनी त्यांच्या घरात ठाण मांडलंच, परंतु जगाच्या कानाकोपऱ्यातल्या मराठीजनांच्या मनातही आपलं घर निर्माण केलं. ज्यांनी या साऱ्याच असामान्य व्यक्तिमत्त्वांशी मैत्री करून त्यांची आयुष्यं आपल्या खांद्यावर पेलून धरली, त्यांचे संघर्ष आपल्या हृदयात सामावून घेतले, त्यांच्या चैतन्यशील आयुष्याला झळाळी देत कित्येक पिढय़ांची मनं उजळून टाकली, त्या वाचनवेडय़ा वीणा गवाणकर (आज- ६ मे) वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करीत आहेत!
ते करणाऱ्या व्यक्तीला सहस्रपौर्णिमा बघायला मिळतात, असं म्हणतात. मात्र वीणा गवाणकरांनी ज्या चरित्रनायक-नायिकांना मूर्तिमंत रूपात आपल्यासमोर साकार केलं, त्या व्यक्तिमत्त्वांत एक हजार पौर्णिमांची ऊर्जा सामावलेली आहे. वीणाताईंनी शब्दांकित केलेल्या एकूण साऱ्या चरित्र ग्रंथांत आणि चरित्रात्मक लेखांतही अंधारभरली आयुष्यं उजळवण्याचं, नकारातून सकाराकडे नेण्याचं सामथ्र्य आहे.
वीणाताईंच्या एकूण एक चरित्र ग्रंथांत चिरंतन जीवनतत्त्वांचे संदर्भ आहेत. त्या-त्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वांच्या आंतरिक विकासाच्या पाऊलखुणा या चरित्रलेखिकेनं नेमक्या टिपल्या आहेत. त्यांची चैतन्यशीलता चिमटीत पकडून त्यांचं हृदगत त्यांनी जाणून घेतलं. एखाद्या व्यक्तिमत्त्वाची समग्र विकसनशीलता, त्याची सत्त्वशीलता आणि त्याचं भावसामथ्र्य, हे सारं समर्थपणे मांडता यावं, यासाठी वीणाताईंनी केलेली साधना, सांभाळलेली वस्तुनिष्ठता, जमवलेल्या सामग्रीची विषयवार मांडणी, अथक मेहनत हे सारंच थक्क करणारं आहे. त्यासाठी त्यांनी कशी कशी मेहनत घेतली, त्याला सुमारच नाही. रस्त्याकडेच्या स्वस्त किंमतीच्या पुस्तकांच्या हारीत त्यांना डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन काव्र्हर दिसले. हातात आलेल्या काही चरित्रग्रंथांची सामग्री मिळवण्यासाठी त्यांना वर्तमानपत्रांतून आवाहन करावं लागलं, काही चरित्रनायक रसिक वाचक, प्रकाशक यांनी भेटवले. त्या अनुषंगानं माहिती मिळवण्यासाठी करावी लागलेली पायपीट, अपरिचित ठिकाणचा निवास-प्रवास, क्वचित प्रसंगी उद्भवलेली भाषेची अडचण, सहकार्य करणाऱ्या माणसांबरोबर कागदपत्रं सुरक्षित राहतील की नाही याबद्दल साशंकता, अविश्वास दाखवणारी माणसं, अशा परिस्थितीला सामोरं जात, पदराला खार लावून केलेल्या प्रवासातून पदरात पडलेले मानापमान उदार मनानं पचवत, कधी कौतुकाच्या क्षणांनी ओचे भरले; त्यानं भरून पावत त्यांनी चरित्रनायक-नायिकांच्या आयुष्याचे, व्यक्तिमत्त्वाचे पदर न् पदर उलगडून दाखवले आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वीण त्या नीटपणे घालत राहिल्या.
चरित्रलेखनात एक विणीचं काम असतं. वास्तवाला शबलित न करता, त्यातली बलस्थानं दाखवत ते व्यक्तिमत्त्व मूर्तिमंत रूपात साकार करणं हे अवघड काम चरित्र लेखकाला लीलया पेलता यायला हवं. त्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वांनी काळाला कसं मागे टाकलं असावं, हे समजण्यासाठी चरित्रलेखक समजूतदार आणि परिपक्व असावा लागतो. विशेष म्हणजे ‘स्व’चं कलम न करता, त्यांची होणारी वाढ अत्यंत तटस्थपणे बघता यायला हवी. मुळापासून रसरसत राहणारा जीवनरस शब्दांच्या चिमटीत पकडता यायला हवा. हे सारं वीणाताईंना अगदी सहजगत्या करता आलं. कारण त्यांनी त्या त्या चरित्र नायक-नायिकांशी मनस्वी नातं जोडलं. एखाद्या विषयाचं पूर्ण आकलन झाल्याशिवाय त्यांनी लेखनाला हात घातला नाही. ‘अभ्यासोनि प्रगटावे। नाहीतरी झाकोनि असावे, प्रकटोनि नासावे। हे बरे नोहे।’ ही समर्थोक्ती त्यांनी जाणली होती. चरित्रलेखक हा संशोधक असतोच, परंतु तो ललित लेखकही असावा लागतो. साध्या-सोप्या, सरळ, अनलंकृत भाषाशैलीमुळे त्यांच्या लेखनातून प्राकृतिक सौंदर्याचं मनोरम रूपदर्शन घडलं. हातानं थापलेल्या भाकरीवर एखाद्या अन्नपूर्णेच्या आत्मीय ओलाव्याचा सराईत हात फिरावा, तसा खुसखुशीतपणा त्यांच्या लेखनाला प्राप्त झालेला आहे. चरित्र नायक-नायिकांशी सौहार्द जपत आपलं लेखन अभिरुचीसंपन्नतेनं त्यांनी वाचकांच्या ताटात वाढलं. वीणाताईंचं मूळ गाव रत्नागिरी. जन्म पुण्याजवळच्या लोणी इथला. खाकी वर्दीचा आब राखणारे फौजदार वडील दिगंबर आजगांवकर यांच्या होणाऱ्या बदल्यांमुळे त्यांचं वास्तव्य ग्रामीण भागात होत राहिलं. आई सरस्वती यांचंही थोडंफार शिक्षण झालेलं. आपल्या अपत्यांना त्यांनी शिक्षणाचा मार्ग दाखवला आणि प्रगत विचारांचे संस्कार घडवले. ज्या काळात फडके-खांडेकरांच्या कादंबऱ्या गाजत होत्या, त्या काळात वीणाताई- पूर्वाश्रमीच्या सुलभा ‘बनगरवाडी’, शास्त्रज्ञांची छोटेखानी चरित्रं, उत्तरध्रुवावरचं जनजीवन अशी पुस्तकं वाचायच्या, काही वेळा तर सगळे झोपी गेल्यावर कंदिलाच्या उजेड त्यांचा सोबती व्हायचा. पुस्तकांनी त्यांना बाहेरचं जग दाखवलं.
अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पुस्तकं वाचायची आणि ती कशी वाचायची याचं बाळकडू शिक्षकांनीही पाजलं. नवीन काही वाचता यावं, यासाठी शाळकरी सुलभानं नववीत असताना हिंदीची ‘प्रवीण’ आणि मराठीची ‘प्राज्ञ’ अशा परीक्षा दिल्या. शालेय जीवनात ग्रंथालयाचं प्रथम दर्शन झालं, ते इंदापूरमधील एका चर्चच्या आवारात. पुढे ‘फग्र्युसन महाविद्यालया’च्या मोठय़ा ग्रंथालयातली पुस्तकं पाहूनही त्या अशाच हरखून गेल्या. ग्रंथपालनाची पदविका प्राप्त केल्यावर प्रथम नोकरी मिळाली, ती औरंगाबाद इथल्या मिलिंद कला महाविद्यालयात. इथल्या ग्रंथांचं सान्निध्य आणि मनमुराद वाचनानं जग अधिक जवळ आलं. वाचनाच्या बळावर विश्वाचे कोनेकोपरे त्यांनी कवेत घेतले आणि सामान्यजनांत दडलेल्या व्यक्तींतील असामान्य व्यक्तिमत्त्वांच्या विचारांनी त्यांच्या आयुष्याचे सांदीकोपरे उजळून निघाले.
चंद्रकांत गवाणकरांच्या रूपात त्यांना समंजस जोडीदार भेटला. त्यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीत, त्यांची चर्चा झाली ती माधव आचवलांच्या ‘किमया’ या पुस्तकावर. पत्रिका-कुंडली जुळण्या-जुळवण्यात दोघांनाही स्वारस्य नव्हतं. विचारांची दोन टोकं असली, तरी तर्कशुद्धता, स्पष्टवक्तेपणा माणसाला समृद्ध बनवते आणि पर्यायानं पुरोगामित्वाकडे नेते, यावर शिक्कामोर्तब झालं.
वीणाताईंनी वाचनवेडामुळे असामान्य व्यक्तिमत्त्वं हुडकून काढून मायमराठीच्या अंगणात त्यांना स्वच्छंद विहार घडवून आणला. पुन्हा संत रामदासांच्याच शब्दात सांगायचं तर, ‘जे जे आपणांसि ठावे। ते ते इतरांसि सांगावे शहाणे करुन सोडावे। सकल जन।।’ या ऊर्मीतून वीणाताईंनी आपल्या कुटुंबापासूनच सुरुवात केली. लहानग्या अनुप आणि शीतलला गोष्टी सांगण्यासाठी म्हणून डॉ. काव्र्हरनं त्यांच्या घरात प्रवेश केला. वीणाताईंची मुलंही आपल्या आई-बाबांना वाचन-लेखन-चर्चा करताना पाहातच वाढत होती. मुलांना संस्कारशील गोष्टी सांगण्यापासून सुरू झालेला हा प्रवास त्यांना चरित्रलेखनापर्यंत घेऊन गेला.
अभाव-उणीव हीच जगण्याची ताकद ठरते, त्यातच जगण्याची ऊर्मी असते, असं सांगणारा डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन काव्र्हर, भीषण दुष्काळात उपासमारीनं मरणाऱ्यांसाठी शेती किती महत्त्वाची असते, हे सांगणारे डॉ. खानखोजे, पाणी ही गरीब आणि श्रीमंतांना वेगळं करणारी एक रेघ असते, असं सांगणारे डॉ. विलासराव साळुंखे आणि अन्य अनेक शास्त्रज्ञांची माहिती त्यांच्यामुळेच अनेकांना झाली. किडा-मुंगी-सरपटणारे प्राणी, यांकडेदेखील सहृदयतेनं पाहण्याची दृष्टी त्यांच्या चरित्रांनी दिली. लोकांचं कुतूहल जागं करणं ही ऊर्मी त्यांच्या लेखनाच्या मुळाशी आहे. मात्र पूर्वाभ्यास नसलेल्या विषयात घुसखोरी करताना आपलं ज्ञान पडताळून पाहण्यात त्यांनी कधी कमीपणा मानला नाही. आपल्यातल्या उणिवा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांत भरून निघालेल्या पाहून तर आपलंही जीवन त्यांच्या जीवनानं उजळून निघतंय याबद्दल त्यांना कृतकृत्य वाटत राहिलं.
पुस्तकांच्या सहवासात समृद्ध झालेलं वीणाताईंचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व ऐंशीव्या वर्षीही खणखणीतपणे, ताठ मानेनं पुढच्या चरित्रनायकाच्या शोधात उभं आहे. लवकरच त्यांच्या शब्दांतून मारिया माँटेसरी वाचकांच्या भेटीला येत आहेत. त्यांनी आज समाजमाध्यमांतून तरुण पिढीशी स्वत:ला छान जोडून घेतलं आहे. लोकांनी का आणि कसं वाचावं, हे सांगण्यासाठी तो एक चांगला मंच आहे असं त्यांना वाटतं.
वीणाताईंच्या घरून निघता निघता त्यांच्या दिवाणखान्यात ऐटीत विराजमान झालेल्या कितीतरी ‘गोष्टी’ आपल्या विचारांना सोबत करतात. त्यांचे चरित्रनायक-नायिका, असंख्य पुस्तकं.. ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून भेट मिळालेला ज्युलिअस सीझरचा अर्धपुतळा, आजही एकही चरा न उमटलेला दीडशे वर्षांपूर्वीचा आईकडचा आरसा, गौतम बुद्धांचं चेहराशिल्प, महात्मा गांधींचं प्रभावी छायाचित्र, रॉबी डिसिल्वांच्या कलानिपुण बोटांतून पाझरलेली ख्रिस्तांची आवडती प्रार्थना, काव्र्हरचं त्याच्या घरासह असलेलं छायाचित्र, दीडशे-दोनशे वर्षांपूर्वीची दुर्मीळ झालेली विविध आकारांतली पितळेची भांडी, रसिकांनी पाठवलेली वीणाताईंची व्यक्तिचित्रं, मुला-नातवंडांची छायाचित्रं! त्याचबरोबरीनं त्यांच्या घराच्या दारावर ठसठशीतपणे लिहिलेला ‘या’ म्हणजे, हे सारेच जण एकमेकांच्या आवाजात आवाज मिसळून जणू म्हणत असतात.. या.. या घराचा दरवाजा साऱ्यांसाठी खुला आहे!’
drceciliacar@gmail.com