सुनील परब

मैत्रीण आणि प्रेयसी यांच्यातली सीमारेषा काही वेळा अस्पष्ट होते. मनात वादळ उठतं आणि कोणत्या बाजूला झुकायचं हा प्रश्न पडतो. अशा वेळी आपल्या विचारांवर ठाम असणारी मैत्रीणच आपल्याला त्या वादळातून सुखरूप किनाऱ्यावर आणून सोडते. ती मैत्रीण की प्रेयसी, हे त्या जमान्यात, तेव्हा कळलं नाही. कारण त्याची व्याख्या काय असते हे आजच्याप्रमाणे स्पष्ट नव्हतं. कुठे बोलू शकत नव्हतो किंवा लिहू शकत नव्हतो. पण वेळीच संस्कार मदतीला आले आणि दोन संसार मोडण्यापासून वाचले. आमची मैत्री मात्र अखंडपणे आजही सुरू आहे.

hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
Mankhurd  Shivajinagar Muslim community in confusion print politics news
मानखुर्द- शिवाजीनगरात मुस्लीम समाज संभ्रमात
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
loksatta readers feedback
लोकमानस: संशय आणि असुरक्षिततेचा परिणाम

जशी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत अस्पष्ट रेषा असते, तशी मैत्रीण आणि प्रेयसी यांमध्ये असावी! तिची ओळख एका नाटकामुळे झाली. आमच्या संस्थेतर्फे नाटक वा एकांकिका बसवण्याचं आणि वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये उतरवण्याचं काम मी करत असे. एखादं नाटक बसवायचं ठरलं की पात्रं शोधणं हे जिकिरीचं असतं. एकदा कुठल्याशा निमित्तानं ती मला भेटली आणि आतून वाटलं की माझ्या नाटकातली नायिका ती हीच.

हेही वाचा : इतिश्री: चुकलं तर चुकलं!

माझ्या नव्या नाटकात तीच नायिका असावी असं वाटल्यानं तिच्याआधी तिच्या पतीकडे विचारणा केली, परंतु त्यानं नकार दिला़, कारण तिनं त्यापूर्वी कधी स्टेजवर काम केलं नव्हतं. खरं तर अशी रंगभूमीवर काम न केलेली व्यक्ती मला आवडली असती, कारण आपण त्या व्यक्तीला संहितेनुसार ‘मोल्ड’ करू शकतो. नकार मिळाला तरी आशा होतीच. म्हणून थेट तिला विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. तेव्हाही नकारच मिळाला! मात्र त्या वेळी तिच्याशी बोलल्यानंतर मला खात्री पटली, की ही उत्तम काम करू शकेल. परंतु होकार कसा मिळवायचा हा प्रश्न होता. तिच्या पतीबरोबर चर्चा केली, तेव्हा त्यानं सांगितलं, ‘‘तुम्ही अनेक चांगली नाटकं बसवली आहेत. तिला जर तुम्हाला अपेक्षित अभिनय जमला नाही, तर कदाचित तुमच्या संस्थेचं नाव खराब होईल.’’

काही दिवसांनंतर केवळ स्त्रीपात्रांची एक एकांकिका बसवण्यासाठी मला विचारणा झाली. तेव्हा मी पुन्हा एक प्रयत्न करायचं ठरवलं. त्या वेळी सर्वच पात्रांसाठी अभिनयाचा अनुभव नसलेल्या स्त्रियांना घेऊन ती एकांकिका बसवण्याचं ठरलं. तो ‘टर्निंग पॉइंट’ ठरला. एकांकिका स्पर्धेत सादरीकरण झालं. मला दिग्दर्शनाचं द्वितीय पारितोषिक मिळालं आणि तिला अभिनयासाठीचं प्रथम पारितोषिक! मग काय हवं होतं? हळूहळू कौटुंबिक ओळख घट्ट झाली, अगदी एकमेकांच्या घरी येणंजाणं सुरू झालं. मोकळेपणानं बोलणं, गप्पा मारणं सुरू झालं. त्यानंतरच्या आमच्या संस्थेच्या नाटकात ती असणार हे गृहीतच धरलं गेलं. लगेच नवीन नाटकाची निवड झाली. त्या वेळी एक अनुभवी दिग्दर्शक तात्पुरत्या काळासाठी आमच्याकडे आला होता. ऑडिशन्स घेताना त्याला बोलावलं. तिची ऑडिशन झाली आणि निवडही झाली. पुरुष कलाकार एक-एक करून ऑडिशन देत होते, पण एकही त्यातून पार पडत नव्हता. मला त्या नाटकात काम करायचं नव्हतं, कारण त्यातील मुख्य पात्राशी माझी शरीरयष्टी जुळणारी नव्हती. त्यामुळे मी काही ऑडिशन दिली नाही. तो अनुभवी दिग्दर्शक काही दिवसांसाठीच आम्हाला उपलब्ध होता आणि पुढे मलाच त्या नाटकाची जबाबदारी घ्यावी लागणार होती. शेवटी त्यानं मला ऑडिशन द्यायला सांगितलं. मी ऑडिशन दिल्यावर तो म्हणाला, ‘‘हे काम तुम्हीच करायचं! अन्यथा नाटक करू नका.’’ मी शरीरयष्टीचं कारण सांगितलं, कारण ती २५ वर्षांची आणि मी ४५ वर्षांचा. तेव्हा तो म्हणाला, ‘‘अभिनय जोरदार करा. बाकी सर्व निरर्थक असतं!’’

हेही वाचा : लैंगिकता वाढतं आकर्षण आणि गुन्हेगारीही!

नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. जसजसं पाठांतर झालं तसतशी तिच्या अभिनयाची कळी उमलू लागली. तिच्याबरोबर काम करताना माझ्या अभिनयाचा आलेखही उंचावत होता. आणि नकळतपणे ती मला आवडू लागली. पण वयाचा अडसर… ती बाब मी विसरू शकत नव्हतो. सर्व कलाकारांचं पाठांतर झाल्यावर तालमीला मजा येऊ लागली. आणि अचानक एके दिवशी नाटकातल्या एका दु:खद प्रसंगात माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले… ग्लिसरीन- शिवाय असे अश्रू येऊ शकतात, ही गोष्ट मला नवीनच होती. माझ्याबाबतीत असं प्रथमच घडत होतं. तिनं मला विचारलं, की हे कसं घडलं? मी म्हटलं, ‘‘तुझ्या सुंदर अभिनयाचा तो परिपाक आहे!’’ तिनं पुन्हा विचारलं, ‘‘पण मग तुम्हीही इतका प्रभावी अभिनय करत असून अशा दु:खी प्रसंगात माझ्या डोळ्यांतून अश्रू का येत नाहीत?’’ माझं उत्तर होतं, ‘‘नाटकाच्या कथेत गुंतून जायचं. तेव्हाच हे शक्य होतं.’’

काही दिवसांत चमत्कार झाला आणि त्या प्रसंगात तिच्याही डोळ्यांतून अश्रू मोकळे झाले! पण एक प्रकारे ही वाईट गोष्ट होती. एखाद्या प्रसंगात सहकलाकारांचे डोळे पाणावणं कथेला मारक ठरलं असतं. नंतर आम्ही तालमीची छोटी जागा बदलली आणि मोठ्या जागेत तालीम सुरू झाल्यावर हळूहळू सर्व सुरळीत होऊ लागलं. नाटक स्पर्धेला उतरलं आणि बक्षिसांची खैरात होऊ लागली! वैशिष्ट्य म्हणजे तिनं तिचा प्रथम क्रमांक कधीच सोडला नाही, तब्बल १९ वेळा! एका प्रयोगात नाटकातल्या दु:खद प्रसंगात तिनं माझ्या पाठीवर हात ठेवला. खरं तर ती त्या कथेची गरज होती, पण मी चमकलो. तो स्पर्श काय सांगत होता ते कळत नव्हतं. मनात विचारांचं काहूर उठलं. हे वादळ तीच शांत करेल, या आशेवर मी नंतर एकांत मिळाल्यावर तिला स्पष्टीकरण विचारलं. तिच्या उत्तरानं समाधान झालं. ती म्हणाली होती, ‘‘खरं तर त्या प्रसंगात स्पर्श करण्याबाबत तुम्ही सुचवायला पाहिजे होतं. मी माझ्या पतीला विचारूनच ती कृती केली.’’ मला तिच्यातला दिग्दर्शक दिसला. नंतर पुढे काही प्रसंगी मीही तिला स्पर्श करू लागलो. तो स्पर्श मैत्रीचा, प्रेमाचा की नाटकाच्या गरजेचा… काही कळत नव्हतं. पुढे नाटक थांबलं, कारण तिच्या पतीची बदली झाली आणि तीही त्याच्याबरोबर गेली. पण त्या कुटुंबाची आणि माझ्या कुटुंबाची जवळीक कमी झाली नाही. वेळोवेळी घरातल्या विविध प्रसंगांना येणंजाणं चालू राहिलं.

हेही वाचा : संवेदनशील भावविश्वाच्या सुरक्षितेसाठी..

एकदा कामानिमित्तानं मी तिच्या घरी गेलो होतो. तिच्या पतीला कामावरून येण्यास वेळ लागणार होता. माझ्या मनातलं वादळ पुन्हा उसळी मारू लागलं. मी तिला विचारलं, ‘‘नाटकातल्या प्रसंगाची आठवण येते का?’’ ती म्हणाली, ‘‘संपूर्ण नाटक डोळ्यांसमोर उभं असतं.’’ मी स्पष्टपणे नाटकातल्या स्पर्शाबाबत विचारलं. ती म्हणाली, ‘‘तो स्पर्श नाटकाच्या गरजेचा होता. प्रेमाचा होऊ शकत नव्हता, कारण आपण विवाहित आहोत. प्रेमाचं रूपांतर विवाहात असतं. आपली फक्त मैत्री असू शकते. मलाही तुम्ही आवडता, कारण तुमचं चतुरस्रा व्यक्तित्व मला भारून टाकतं. पण आपण मित्र म्हणूनच राहू या. प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्यात वासनेचा गंध असतो. माझ्या मनात तो नाही. तुमच्यातही तो नसावा.’’ तिच्या उत्तरानं वादळ स्थिरावलं आणि माझ्या मनातली प्रेयसी आणि मैत्रीण यांतील अस्पष्ट रेषा आता स्पष्ट झाली.

आज या गोष्टीला पंचवीस वर्षं झालीत! आता असा विचार करतो, की तिनं जर मला त्या वेळी ते उत्तर दिलं नसतं, तिच्या मनातही स्पष्टतेऐवजी माझ्यासारखं वादळच असतं, तर काय झालं असतं? खरं तर ती माझ्यापेक्षा वयानं किती लहान, पण अचूक वेळी सीमारेषेची आठवण करून देणारी तीच होती, हे विसरून कसं चालेल. मला आमची मैत्री आणि त्यातला स्नेहच पुरेसा आहे!

chaturang@expressindia.com