ही ‘ऐट’ तिच्यात आहे, ‘सौभाग्यकांक्षिणीमध्ये’, म्हणूनच ती न लाजता, न कचरता स्वत:साठी स्थळ शोधायला बाहेर पडू धजते. या ऐटीला कुणीच हरवू शकत नाही, बलात्कारसुद्धा! ही ‘ऐट’ भले झूल असेल एक कदाचित, पण आसपासच्या अंधाराला धुत्कारून ‘मी आनंदातच राहणार’ असं म्हणून ही झूल पांघरायला एक विलक्षण ताकद लागते. ती तिच्यात आहे. काहींचं आयुष्य हे त्या लोकांना मोडून पाडायलाच उभं ठाकल्यासारखं वागतं; पण त्यातली काही लोकं मोडून तर पडत नाहीतच, स्वत: उलटी उभी ठाकतात आयुष्यासमोर, ‘नाही मोडत जा!’ असं म्हणून. ही तशीच आहे, सौभाग्यकांक्षिणी!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परवा खूप दिवसांनी तिच्याकडे लक्ष गेलं. म्हणजे, येता-जाता दिसत राहते ती जवळ-जवळ रोजच, पण ‘लक्ष’ असं परवा खूप दिवसांनी गेलं. एकदम वाटलं, ‘वय दिसायला लागलं आता हिचं.’ आता कधी लग्न होईल हिचं? खूप दिवसांनी तिच्याकडे लक्ष गेलं, कारण इतके दिवस मी तिला सतत ऑफिसच्या दिशेनं धावतानाच पाहिलं होतं. आज पहिल्यांदाच ‘थांबलेलं’ पाहिलं तिला. गॅलरीत उभी होती. हातात भावाचं पोर खेळत होतं. तिचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. तिची नजर दूर कुठे तरी लागलेली..
ती.. तिची गोष्ट.. तिच्यासारख्या किती तरी जणींची गोष्ट..
‘ती’ बहुतेक शहरांतल्या बहुतेक इमारतींमधल्या निदान एका तरी घरी असतेच. ‘ती’ बहुधा थोरलीच असते. तिच्या पाठीमागे मुलींवर मुली होऊन शेवटी मग एक हवा असलेला मुलगा होतो. तो थोडा मोठा होईपर्यंत वडील निवृत्तीला आणि ‘ती’ वयात आलेली असते. घरात कमावणारं आता तिच्याशिवाय कुणीच नसणार असतं. ती शिक्षण संपताच कुठेशी नोकरी धरते. तिच्या पगारावर घर चालायला लागतं. बहिणींची, भावांची शिक्षणं व्हायला लागतात. हळूहळू ती या सगळ्यात पूर्ण अडकून जाते. तिचं लग्नाचं वय उलटत चाललेलं; पण ती गेल्यावर घराचं काय? या विचारानं कसून स्थळं नाही बघत कुणी तिच्यासाठी. तिलाही वाटतं, आधी घराची घडी बसू दे, मग लग्न! हळूहळू स्वत:चा, लग्नाचा विचार तिच्याही मनात मागे पडत जातो. ती पै पै साठवून, रोज धावत ऑफिस गाठून पाठच्या बहिणींची लग्नं लावून देते. आता ती एका चक्रात अडकल्यासारखी. वय वाढतच चाललेलं. भाऊ कमावता होईपर्यंत आपण हे घर सोडणं म्हणजे तिला पापच वाटायला लागतं. ती या वाटण्यापाशीही थांबेनाशी होते. फक्त धावत राहते. घरच्यांसाठी खपतच राहते. आई-वडिलांचाही नाइलाज झाल्यासारखा. हळूहळू घरात तिच्या लग्नाचा विषयही निघेनासा होतो. बहिणींची मुलं घरी नांदायला, खेळायला लागतात. त्यांच्यावर ती ऑफिसला जाण्याआधी आणि आल्यानंतर भरभरून प्रेम करत राहते. भाऊ अजूनही शिकतो आहे. तिला स्वत:चा विचार करायला अजून सवड नाही. वर्षे सरत आहेत. तिच्या ऑफिसमधला तिच्यावर प्रेम करणारा, तिच्याशी लग्न करण्यासाठी वर्षांनुवर्षे थांबलेला कुणीसा, तोसुद्धा अखेर मनाविरुद्ध दुसऱ्या कुणाशी तरी संसार मांडतो. करता करता आयुष्य निम्म्यापेक्षाही वर कधी आणि कसं निघून गेलं तिचं तिलाही समजत नाही आणि मग अखेर एक दिवस भावाला नोकरी लागते. घर हुश्श म्हणतं. त्याचं लग्नही होतं. घर सुखावतं. आता तिच्या पगारावर काही अवलंबून नाही. तिला घरात मान आहे; पण तिच्या पैशांची गरज संपली आहे. मग कुठे तरी ती पहिल्यांदा थांबते, गॅलरीत उभी असताना समोर कुठेशी एकटक बघत राहते. आता कुठे तिला ‘थांबणं’ परवडतं आहे. तिच्या आसपास भावाचं पोर दुडदुडतं आहे. बहिणींची पोरं कधी तरी घरी येऊन पुन्हा त्यांच्या घरी जाणारी. भावाचं हे इटुकलं मात्र कायम घरीच. त्याच्या दुडदुडण्यात तिचं मागे पडलेलं, न मिळालेलं किती काही दुडदुडतं आहे तिच्या आसपास! कुठलीशी तंद्री लागलेल्या तिच्याकडे बघताना तिच्या डोळ्यांपाशी मला ठेचकाळायला होतं आहे. तिच्या डोळय़ांत मला दिसतं आहे, तिला आयुष्याच्या या टप्प्यावर दिङ्मूढ व्हायला झालं आहे. तिच्यावर आता कुणीच अवलंबून नाही; पण आता आतून स्वत:ला पुन्हा एकदा गोळा करून लग्नासाठी तयार करण्याचं वय आणि उमेद केव्हाच मागे पडून गेली आहे. तिची तंद्री लागलेले डोळे कुठे पाहात आहेत? नक्की कुणाकडे? का कुठेच नाही? शून्यात?
विजय तेंडुलकरांचं एक नाटक आहे. ‘चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी.’ वरवर पाहताना ती अशाच एका मुलीची गोष्ट; पण शून्यापुढं सुरू होणारी. या नाटकाची नायिका अशीच वय उलटून गेलेली; पण म्हणून शून्यात बघत राहत नाही. ती स्वत:च स्वत:साठी स्थळं शोधायला बाहेर पडते. मला ही भूमिका आयुष्यात एकदा तरी रंगवायचीच आहे. तिच्यात एक वेगळीच ताकद आहे. आसपासच्या शून्य, अंधारलेल्या सगळय़ा सगळय़ातून स्वत:ला एका जीवतोड असोशीनं बाहेर काढण्याची. तिला तिच्यातला खोल अंधार दिसतो; पण ती त्यात रुतून नाही बसत. तिनं त्या सगळय़ा अंधारात स्वत:ला एक वचन दिलं आहे- अंधारातलाही प्रकाश बघण्याचं.. हो मग? गेलं उलटून वय लग्नाचं, तर? तिला कणव नको आहे तुमची, स्वत:चीही. ती ताठ आहे; पण ताठ बाई आवडणारी माणसं कमी. तिची टर उडवण्याची पद्धत आहे, त्यानुसार सौभाग्यकांक्षिणीचीही उडते. तिच्या आयुष्यात पुढे पुढे तर जे घडत जातं त्यानं आपण खचू असं वाटतं; पण ती नाही खचत. तिच्या आयुष्यात पुरुष नाही. वय उलटून गेलं तरी ती कुमारिकाच, पुरुषाचा स्पर्शही नाही. नाटकात अशा काही घटना घडत जातात, की एका टप्प्यावर तिच्यावर बलात्कार होतो, पाशवी! ती विस्कटलेली, उद्ध्वस्त. त्यानंतर तिच्या तोंडी एक स्वगत आहे. त्यात ती म्हणते, ‘‘कसा का होईना ‘तो’ क्षण आला तर होता!’’ पुरुषस्पर्शाचा तो जादूई क्षण, कुणाच्या आयुष्यात हळुवार येतो.. स्वप्नाळू, कुणाच्या आयुष्यात ध्यानीमनी नसताना अवचित येतो. तिच्या आयुष्यात तो असा ओरबडल्यासारखा आला आहे जबरदस्तीनं आणि ती म्हणते आहे, ‘‘ठीक आहे, पण तो आला तर खरा!’’ हे एकुलतं एक आयुष्य त्या पुरुषस्पर्शाविनाच कोरंच निघून जाणार असं वाटत असताना तो क्षण आला तर खरा.. कसा का होईना तो क्षण आला तर होता. मी हे स्वगत पहिल्यांदा वाचलं तेव्हा आतून डचमळायला झालं होतं मला. बाहेरून या सगळय़ाकडे बघताना या सगळय़ातली करुणताच जास्त पोचत होती. तिचं स्वत:चं स्वत:साठी ‘स्थळ’ शोधणं, बलात्कारातही सुख मानणं हे मी बाहेरून बघताना मला हतबल करत होतं. मला हा शब्द वापरायचा नाही; पण मला तिची दया येत होती. मला माझ्यासमोरची गॅलरीतली शून्यात बघणारी ती खरी सौभाग्यकांक्षिणी आठवत होती. नाटकातल्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणीसारखी तीही निघाली खरोखर स्वत:साठी स्वत:चं ‘स्थळ’ शोधायला, तर किती लोक तिचा खराखुरा आदर करू शकतील? का टर उडवतील? का फक्त तिच्या शरीराच्या मागे लागतील? बलात्कार म्हणजे नक्की काय असतं? तो फक्त शरीरानंच केला जातो का? कुणाचाही कुठल्याही गोष्टीसाठी फायदा उठवणं हा बलात्कारच नाही का? कधीकधी समोरचा माणूस काही बोलू धजत नाही; पण आपल्याला कळत असतं ना, आपण फायदा उठवतो आहोत तिचा? तिनं तोंड उघडलं नाही म्हणून काय झालं? तिच्या पैशांची गरज आता संपली असली तरी कुणी तरी तिच्या बाजूनं उभं राहील का? तिनं ऑफिस ते घर चाललेल्या शेकडो दमलेल्या पावलांसाठी आणखीही किती कशा कशासाठी? उशिरा का होईना ‘तो’ क्षण तिच्या आयुष्यात येईल का? बलात्काराशिवाय? ‘बाहेर’ आणि ‘आत’ यात फक्त एका पावलाचा फरक असतो; पण त्या एका पावलानं कधीकधी आपलं ‘दिसणं’ मात्र उलटय़ाचं सुलटं होऊन जातं. बाहेरून एक दिसणारं काहीसं आत जाऊन आतून पाहिलं की वेगळंच, दुसरंच दिसतं, तसंच माझं  झालं ‘सौभाग्यकांक्षिणी’बाबत. बाहेरून बघताना तिची दया येणारी मी एकदा तिच्या आत गेले, म्हणजे जावं लागलं. अमोल पालेकरांनी पुण्यात ‘विजय तेंडुलकर महोत्सव’ केला होता. त्यात आम्ही काही अभिनेत्रींनी तेंडुलकरांच्या वेगवेगळय़ा नायिकांचे निवडक प्रसंग सादर केले होते. त्यात माझ्या वाटय़ाला आली नेमकी ‘चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी’. तिचं ते स्वगत! ते तयार करताना जसजशी तिच्या जवळ आणि मग आत जायला लागले तसतशी तिची ताकद जाणवून स्तिमित होत गेले. तेंडुलकरांनी या स्वगतात तिच्या तोंडी लिहिलेले शब्द जेव्हा मी बोलायला लागले तेव्हा जाणवलं, ती जे मांडते आहे ते ‘स्टार्क’ आहे; पण कणवेचं, स्वदयेचं नाही. त्यात कुठे तरी एक समजूत आहे सगळय़ा पलीकडची, स्वत:ला सगळंच्या सगळं समजून घेणारी. स्वत:ला न मिळालेल्या पुरुषस्पर्शातलं ‘न मिळतेपण’ तिनं पूर्ण पाहिलं आहे, स्वीकारलं आहे. त्याबद्दल असं मोकळेपणानं ती ज्या ताकदीनं बोलू शकते ते त्यामुळेच. त्या मोकळेपणामुळं ती माझ्यासाठी फार फार मोठी होऊन जाते, तिची टर उडवणाऱ्या, तिच्यावर जबरदस्ती करणाऱ्या सगळय़ा सगळय़ांपेक्षा..
 चार्ली चॅप्लिनच्या बहुतेक सिनेमांत तो गलिच्छ दारिद्रय़ात असतो, पण तरीही ऐटीत असतो. ती ऐट त्याला त्या दारिद्रय़ातही श्रीमंत करून जाते. एका प्रसंगात त्याच्या पोटात भुकेनं कावळे ओरडत असतात. इतके की, शेवटी तो बूट खातो! हा प्रसंग चॅप्लिननं असा काही ऐटीत रंगवला आहे. बुटांची लेस चमच्याला गुंडाळून खाताना त्याच्या चेहऱ्यावर गरम मॅगी नूडल्स भुरकल्यासारखं सुख आणि चैन दिसते. ही ‘ऐट’ तिच्यात आहे, ‘सौभाग्यकांक्षिणीमध्ये’, म्हणूनच ती न लाजता, न कचरता स्वत:साठी स्थळ शोधायला बाहेर पडू धजते. या ऐटीला कुणीच हरवू शकत नाही, बलात्कारसुद्धा! ही ‘ऐट’ भले झूल असेल एक कदाचित, पण आसपासच्या अंधाराला धूत्कारून ‘मी आनंदातच राहणार’ असं म्हणून ही झूल पांघरायला एक विलक्षण ताकद लागते. ती तिच्यात आहे. काहींचं आयुष्य हे त्या लोकांना मोडून पाडायलाच उभं ठाकल्यासारखं वागतं; पण त्यातली काही लोकं मोडून तर पडत नाहीतच, स्वत: उलटी उभी ठाकतात आयुष्यासमोर, ‘नाही मोडत जा!’ असं म्हणून. ही तशीच आहे, सौभाग्यकांक्षिणी! म्हणून ती बलात्कारांनतरच्या उद्ध्वस्त विस्कटातही म्हणू शकते, ‘‘कसा का होईना तो क्षण आला तर होता.’’
आयुष्यात प्रत्येकाची काही ना काही ‘आकांक्षा’ असते. ती पूर्ण होतेच असं नाही. कुणी सौभाग्य ‘कांक्षिणं’, कुणी अजून कशाची तरी मनापासून आकांक्षा असणारं, इच्छा असणारं, आकांक्षेच्या कुठल्याही रस्त्यावर कधी ना कधी असाही टप्पा येतो, जेव्हा सगळं काही उद्ध्वस्त झाल्यासारखं दिसतं, सगळं काही मनाविरुद्धच झाल्यासारखं दिसतं. त्या सगळय़ा विरुद्धाच्या सांदरीसापटीतनं आपल्या उरल्यासुरल्या आकांक्षेला शोधून पुन्हा हातात घट्ट पकडणं किती जणांना जमतं?      
 कांक्षिणीला ते जमतं. कुठल्याही क्षेत्रात कुणी तरी आपल्या मनाविरुद्ध आपल्यावर बळजबरी करणं हे सगळय़ांनाच भोगावं लागतं, पण त्या बलात्कारातही आपल्याला हवं ते काही तरी दडलेलं आहे हे किती जण पाहू शकतात? सौभाग्यकांक्षिणी सुन्न नाही. ती शून्यात एकटक बघत नाही. तिनं न दमण्याचं ठरवलं आहे, कसून. तिनं जगण्याचं ठरवलं आहे, समोर काहीही, अगदी शून्य असलं, तरीसुद्धा!