राधिका टिपरे

नवरात्रीत होणाऱ्या देवीपूजनाचा अभ्यास केल्यास फार पूर्वीपासूनच्या विविध रंजक कथा दिसतात. मग ती देवी पूर्णघटाच्या रूपात असो, लज्जागौरी असो, मातृका असो किंवा कामाख्या.. स्त्रीच्या नवनिर्मिती क्षमतेचा, सर्जनशीलतेचा हा उत्सव आहे, हे स्पष्ट करणाऱ्या कथा व परंपरा जाणून घ्यायलाच हव्यात. आदिशक्ती आणि मातृदेवतेच्या रूपांचे पूजन करताना आपल्या समाजात स्त्रीवर अत्याचारही होत आहेत, हे वास्तव मात्र आजही टोचणी देत राहाते..

नवरात्रीत घटपूजनाच्या निमित्ताने आपण निसर्गाचे, तथा वसुंधरेचे मातेच्या स्वरूपात, गर्भार रूपात पूजन करतो. वास्तविक पाहता आपल्या पूर्वजांनी आपल्या सणांची निर्मिती अशा तऱ्हेने केलेली आहे, की त्या अनुषंगाने आपण नेहमीच आपल्या अवतीभोवती असलेल्या निसर्गाचे पूजन करत असतो. नवरात्रीचा सण येतो तोच मुळी वर्षां ऋतूच्या सीमारेषेवर. भूमीची तृषा शांत झाल्यामुळे एक असीम सौहार्दता तिच्या अवघ्या तनूवर विलसत असते. पर्जन्यधारांच्या वर्षांवात चिंब भिजून ‘सुस्नात’ झालेली ऋतुमती वसुंधरा हिरव्याकंच शालूने नटलेली असते. तिची कूस ओली झालेली असते. या ओल्या मातीत बीजे रुजलेली असतात. गर्भतेजाने सळसळणारी धरणी एका संपूर्ण जलकुंभाच्या रूपात चैतन्याने भारलेली असते. तिचे हे देखणे रूप साक्षात नवोन्मेषाचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणून पूर्णघटाच्या रूपात पुजण्याची परंपरा आपल्या पूर्वजांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. हिंदू खऱ्या अर्थाने निसर्गपूजक आहेत!

सध्या देवी पार्वतीची पूजा विविध रूपात केली जात आहे. कुठे दुर्गेच्या रूपात, कुठे कालीच्या उग्र रूपात ती पूजली जाते. घरामध्ये जी घटस्थापना करतात, तेही पार्वतीचेच प्रतीक. शिव आणि शक्ती हे या विश्वाचे मातापिता आहेत असे मानतात. म्हणजेच पुरुष आणि प्रकृती. मातृदेवता, महिषासुरमर्दिनी, शैलपुत्री, सती दाक्षायणी, कात्यायनी, योगेश्वरी, महाअंबिका, अंबा, गौरी.. अशा अनेकविध नावांनी तिला संबोधले जाते. ती देवी पार्वती, शक्ती. स्त्रीच्या नवनिर्मिती क्षमतेचा हा उत्सव.

स्त्रीपूजा ही अनंत काळापासून चालू आहे. वैदिक काळापासून स्त्रीला देवी म्हणून मान दिला गेला आहेच. पण सिंधू संस्कृतीमध्येसुद्धा स्त्रीच्या स्त्रीत्वाची पूजा केली जात होती याचे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत. यामध्ये बहुतांश पुरावे लहान लहान मृण्मूर्तीच्या (मातीच्या मूर्ती) स्वरूपात पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या लहान आकारातील मूर्ती मातृकांच्या स्वरूपात निर्माण केल्या जात होत्या. या मातृकांचे पूजन कशा प्रकारे केले जात होते याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नसली, तरी स्त्रीला मातृकाच्या रूपात पुजले जात असावे. ‘लज्जागौरी’ म्हणून उल्लेख केला जात असलेल्या मातृकाचा, मृण्मूर्तीच्या स्वरूपातील पहिला पुरावा सिंधू संस्कृतीच्या उत्खननात प्राप्त झालेला आहे. त्यानंतरच्या काळात, विशेषत: इ.स. पहिल्या शतकानंतर लज्जागौरीचे विविध स्वरूपात चित्रांकन झाल्याचे आपल्याला संपूर्ण भारतभरात पाहायला मिळते. हे चित्रांकन प्रामुख्याने तिच्या स्त्रीत्वाचा उदोउदो करणारेच होते. स्त्रीचे देवता म्हणून पूजन होण्यापूर्वीच तिच्या निर्मिती क्षमतेला असामान्यत्व देऊन त्याचा उदोउदो केला जात होता, हेच यावरून सिद्ध होताना दिसते.

‘लज्जागौरी’च्या मूर्ती आपल्याला भारतात सर्वत्र, विशेषत: मध्य भारत आणि दक्षिण भारतात असंख्य ठिकाणी पाहायला मिळतात. कारण देवीचे या रूपातील पूजन हे बहुतांश ठिकाणी सर्वमान्य असावे. सुरुवातीच्या काळात ‘लज्जागौरी’ प्रतिमा पाहून त्याला वैषयिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र नंतर अभ्यासकांच्या लक्षात आले, की या प्रतिमांच्या निर्मितीचा उद्देश हा तिच्या मातृत्वाशी निगडित आहे. स्त्रीची प्रजनन क्षमता, गर्भारपण, मातृत्व या साऱ्याशी निगडित असणाऱ्या अवयवांना ठळकपणे दर्शवणाऱ्या या प्रतिमा ‘लज्जागौरी’ या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. या प्रतिमांमध्ये तिचे उरोज, तिची योनी आणि तिची कूस यांना ठसठशीतपणे अंकित केले जाऊ लागले. याचे कारण तिची ही प्रतिमा ‘मातृका’ म्हणून किंवा ‘जन्म देणारी’ म्हणून असते. लज्जागौरी ही पार्वतीचेच एक रूप. ती ‘अदिती उत्तानपाद’, आदिमाया, ‘गॉडेस ऑफ बर्थ’ या विशेषणांनी ओळखली जाते. स्त्रीच्या स्त्रीत्वाची पूजा हेच यामागचे उद्दिष्ट असल्याचे आपल्याला लक्षात येते आणि ही पूजा आजच्या काळातील नसून हजारो वर्षांपासून केली जाते. लज्जागौरी प्रतिमेच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे यातील बहुतेक प्रतिमांमध्ये स्त्रीचा चेहरा मात्र अंकित केला जात नाही. त्याऐवजी चेहऱ्याच्या ठिकाणी पूर्णत: उन्मिलित कमलपुष्प दाखवले जाते. ही स्त्री नेहमीच पूर्ण उमललेल्या कमलासनावर बसलेली असते, शिवाय तिच्या दोन्ही हातांमध्ये कमळफुले धरलेली असतात. या विवेचनावरून आपल्याला नवरात्रीमधील घटस्थापना सोहळय़ापाठीमागची पार्श्वभूमी लक्षात येते.

देवीपूजनाला हिंदू धर्मविधींमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. कारण देवांना प्रत्येक कार्यात मदत करण्यासाठी देवता नेहमीच अग्रभागी असल्याचे आपल्याला पुराणकथांमध्ये पाहायला मिळते. ज्या वेळी देवांची शक्ती तोकडी पडते, दुष्ट प्रवृत्तींचे निर्दालन करण्यासाठी शिव, विष्णू या देवतांना यश आले नाही, त्या त्या वेळी देवी पार्वती पुढे येऊन दुष्ट शक्तींचा नायनाट करण्यासाठी सज्ज झाल्याचे पुराणकथांमधून पाहायला मिळते.

महिषासुराचे दमन करणाऱ्या दुर्गेची कथा आपणा सर्वाना ठाऊक आहेच, परंतु अंधकासुराशी युद्ध करणाऱ्या शिवाला युद्धात मदत करण्यासाठी देवी पार्वती रक्त प्राशन करणाऱ्या योगेश्वरीच्या रूपात धावून गेली होती. हे पाहून, विष्णू, ब्रह्मा, इंद्र, यम, कुमार या देवांनी आपापल्या पत्नींना शक्तीरूपात युद्धभूमीवर प्रकट केले. देवी पार्वतीसह या देवताही भगवान शिवाच्या बरोबरीने युद्धात लढल्या. पुढे या सर्व देवतांना मातृकांचा दर्जा दिला गेला. या सप्तमातृका म्हणजेच माहेश्वरी (योगेश्वरी), वैष्णवी, ब्रह्माणी, कौमारी, इंद्राणी, वाराही आणि चामुंडा होय. या देवतांच्या मदतीमुळेच भगवान शिव अंधकासुराचा विनाश करू शकले. अनेक घरांत आजही या सप्तमातृकांचे कुलदैवत म्हणून पूजन केले जाते. ही पुराणकथा अतिशय रोमांचक आहे.  देवांच्या खांद्याला खांदा लावून देवतांनी असुरांशी लढताना समरांगणात शौर्य दाखवल्याचे दाखले आजच्या काळातील स्त्रीलाही मार्गदर्शकच आहेत.

  नवरात्रीमध्ये देवी पार्वतीचे सर्व स्तरांतून पूजन केले जाते, तिच्या नावाचा जयघोष केला जातो. कुणी तिला शैलपुत्री म्हणून पुजते, कुणी ब्रह्मचारिणी, कुष्मांडा, स्कंदमाता, कालरात्री, महागौरी, सिद्धीदायिनी या व अशा इतर अनेक नावांनी देवीचा जयघोष केला जातो. काही भागांत नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या तीन रूपांत तिची पूजा केली जाते. मुख्य म्हणजे देवी पार्वती- जी शक्तीचे प्रतीक म्हणून पूजली जाते, दुसरी देवी महालक्ष्मी- जी धन आणि संपत्तीची देवता म्हणून पूजली जाते, तिसरी देवी सरस्वती- जी मुख्यत्वे करून ज्ञानाची देवता मानली जाते.

योनीपूजनाचा दाखला द्यायचा झाला, तर आसाममधील कामाख्या मंदिराचे उदाहरण देता येईल. आसामच्या संस्कृतीची ओळख कामाख्या मंदिराच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होणार नाही. कामाख्या देवीचे मंदिर हे आसामसाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान आहे. आसामी लोकांची नितांत श्रद्धा असणारे अत्यंत महत्त्वाचे शक्तिपीठ अशी ओळख असलेले कामाख्या गुवाहाटी शहराजवळ नीलांचल पर्वतावर आहे. भारतातील काही महत्त्वाच्या शक्तिपीठांपैकी एक असणारे हे देवस्थान आहे. प्राचीन दंतकथेनुसार, या शक्तिपीठाचे मूळ सतीच्या रूपात जन्म घेतलेल्या पार्वतीच्या कथेशी जडलेले आहे. आख्यायिकेनुसार दक्षकन्या सतीने आपल्या इच्छेनुसार भगवान शिवाशी

विवाह केला; परंतु राजा दक्षाला स्मशानजोगी असणारा जावई अजिबात पसंत नव्हता. राजा दक्षाने एकदा यज्ञ करण्याचे आयोजिले, यज्ञासाठी आपली लेक सती आणि भगवान शिव यांना आमंत्रित केले नाही. सतीला या गोष्टीमुळे भयंकर दु:ख झाले. मात्र आमंत्रणाशिवाय तिने पित्याच्या घरी जाण्याचे ठरवले. शिवाने तिला तेथे जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण ते न ऐकता सती यज्ञ समारंभात गेली. त्या वेळी राजा दक्षाने तिचा अपमान केलाच, वर भगवान शिवाबद्दल अपशब्द काढले. यामुळे संतप्त झालेल्या सतीने पित्याच्या समक्ष यज्ञवेदीमध्ये उडी घेतली. ही गोष्ट भगवान शिवाला कळली तेव्हा अत्यंत क्रोधित होऊन यज्ञवेदीमध्ये संपूर्णपणे जळालेल्या सतीचे धड हाती घेऊन त्यांनी महाप्रलयकारी तांडव करण्यास सुरुवात केली. त्यांचा क्रोध इतका अनावर झाला होता, की संपूर्ण पृथ्वीचा विनाश होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. शिवाला कसे शांत करायचे, हा प्रश्न समोर असलेल्या भगवान विष्णूने स्वत:चे सुदर्शन चक्र त्यावर सोडले. त्यामुळे तांडव करणाऱ्या शिवाच्या हातातील सतीच्या देहाचे अनेक भाग झाले. भगवान शिवाच्या हातून तिच्या देहाचे हे भाग संपूर्ण भारतभूमीवर विखुरले गेले. ज्या ज्या ठिकाणी सतीच्या देहाचे भाग पडले, त्या प्रत्येक स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आणि त्या प्रत्येक स्थानावर पार्वतीचे मंदिर शक्तिपीठाच्या रूपात उभारले गेले. अशी १०८ शक्तिपीठे भारतभर विखुरलेली आहेत असे सांगतात. 

नीलांचल पर्वतावर सतीच्या गर्भयोनीचा भाग पडला असे मानले जाते. भगवान शिवाच्या शापामुळे कायारहित झालेल्या कामदेवाने या संधीचा फायदा घेतला आणि सतीचे गर्भ आणि योनी ताब्यात घेऊन त्याची या स्थानावर स्थापना केली. त्यामुळे कामदेवाला त्याच्या शापातून मुक्तता मिळाली आणि कामभावनेचे पुनरुज्जीवन झाले. म्हणून या ठिकाणी देवीला ‘कामाख्या’ असे नाव मिळाले आणि या ठिकाणी पार्वतीची योनी रूपात पूजा सुरू झाली. म्हणूनच हे शक्तिपीठ ‘योनीपीठ’ म्हणूनही ओळखले जाते. अवघ्या भारत देशातील हे एकमेव असे मंदिर आहे, जेथे देवी पार्वतीची पूजा मूर्त रूपात न होता योनी रूपात केली जाते. कामाख्या देवीला ऋतुमती होणारी देवता म्हणून प्रसिद्धी मिळालेली आहे.

   नवरात्रोत्सव आणि घटस्थापना या दोहोंचे महत्त्व विशद करून सांगत असताना एक प्रश्नही मनात येतो. आजच्या काळातही नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने समाजात स्त्रीदेवतेचे मोठय़ा थाटामाटाने पूजन होत असताना दुसरीकडे स्त्रीवर इतके अत्याचार का होत आहेत? घरातल्या व बाहेरच्या स्त्रियांना दुय्यम दर्जा देऊन त्यांचा छळ करणे, स्त्रीला भोगवस्तू समजणे, तिचा सन्मान कमी, अपमान जास्त करणे, तिच्यावर बलात्कार करून तिला ठार मारणे, हे समाजात घडत आहेच. जी दुर्गा महिषासुराशी लढली, त्या दुर्गेची आपण पूजा करतो, मग स्त्रीवर बलात्कार करणाऱ्या मानवी महिषासुरांशी आपण कसे आणि कधी लढणार, हा खरा प्रश्न आहे. समाजाच्या मनात बदल घडवण्यास यश मिळू लागले आणि एक दिवस या मानवी महिषासुरांचे निर्दालन करता आले, तरच दुर्गापूजन आणि घटपूजाला आजच्या काळात खरा अर्थ प्राप्त होईल..

radhikatipre@gmail.com

Story img Loader