डॉ भूषण शुक्ल
शालेय वयात मैत्री करण्यात, भरपूर मित्रमैत्रिणी मिळण्यातही पिढ्यापिढ्यांमधला फरक जाणवतोे. पालकांनी नव्या नोकरीसाठी नवं शहर गाठणं आणि कुटुंबही त्यांच्याबरोबर तिथं तिथं फिरणं, हे पूर्वी कमी घडत असे. शाळा लांब, त्यामुळे मित्रमैत्रिणीही राहायला लांब, त्यात एकेकाचे वेगवेगळे क्लास, अशा आजच्या काळात लाजऱ्याबुजऱ्या मुलांचे मित्रच नसणं यात नवल नाही. वडीलधारे त्यांना काही मदत करू शकतील का?…
दुपारच्या कंटाळवाण्या वेळी आजी एकटीच पेपर वाचत बसली होती. ती उगाच इकडेतिकडे बघत असताना रोहन त्याच्या खोलीतून बाहेर आला. आजी तिथे आहे हे बघताच त्यानं कानावरून मोठे हेडफोन उतरवले. हसून ‘व्हॉटस् अप…’ म्हणाला. आता आजीलाही या ‘स्ऽऽऽअप’ची सवय झाली होती. ‘‘काही नाही रे… कंटाळले बघ! पण आता डोळा लागू दिला तर रात्रीच्या झोपेचं खोबरं होईल. त्यापेक्षा जरा आवराआवरी करते आणि उन्हं उतरली की खाली जाते.’’ ‘‘ऑलराइट. चिल!’’ म्हणून रोहन परत आत गेला. त्यानं दरवाजा लोटल्याचा आवाजही आला. आजीनं आपल्या खोलीत जाऊन कपाट उघडलं. एक बॅग खाली उतरवली आणि उगाच उचकत बसली. त्यात तिला काही जुने फोटो सापडले. ते बघत असतानाच जुईचे हात गळ्यात पडले. ‘‘हाय आजी… काय बघतेस? मला दाखव की!’’ आजीनं मोठ्या प्रेमानं ते फोटो लाडक्या नातीच्या हातात दिले.
‘‘वॉव… पाचवी, आठवी आणि दहावी? क्लास फोटो? थांब हं, मी तुला शोधते यात!’’ जुईला दोन-तीन मिनिटं लागली, पण तिनं आजीला तिन्ही फोटोंत शोधून काढलं. ‘‘आजी, ही कोण आहे गं? तिन्ही फोटोंत तुम्ही शेजारीच बसल्या आहात…’’
हेही वाचा : शिल्पकर्ती!
‘‘अगं, ती स्मिता आहे. माझी घट्ट मैत्रीण होती ती! पाचवी ते दहावी आम्ही एकाच बाकावर बसायचो.’’
‘‘होती म्हणजे काय? तुमची मैत्री तुटली का? भांडलीस का तू तिच्याशी? काय झालं?…’’ जुईनं एकदम प्रश्नांची फैर झाडली.
‘‘दहावीनंतर तिला शिकायला काकांकडे मुंबईला पाठवलं तिच्या घरच्यांनी. तेव्हा काही फोन नव्हते गं! एक-दोन वेळा तिचं पत्र आलं. नंतर कळलं की तिचं तिथंच लग्न झालं. मला जाताही आलं नाही. तिचा नवरा बँकेत होता. त्यामुळे त्याच्या सारख्या बदल्या व्हायच्या. नंतर मीपण इकडे तिकडे गेले… माहीत नाही स्मिता कुठे गेली… काय करते…’’ आजीच्या डोळ्यांत टच्कन पाणी आलं. ‘‘तेव्हा अवघड होतं बाई! स्वत:चा असा काही पत्ताच नाही! नवऱ्याबरोबर फिरत बसली असेल… नाव, आडनाव, पत्ता सगळं बदलून गेलं तिचं. आता समोर आली तरच भेट होणार आमची!’’
क्षणभर विचार करून जुई म्हणाली, ‘‘आजी, चॅलेंज अॅक्सेप्टेड!’’
‘‘म्हणजे काय?… कसलं चॅलेंज?’’
‘‘आजी, मी आणि रोहन स्मिताला शोधून काढणार आणि तुला भेटवणार!’’
जुईनं लगेच आत जाऊन रोहनला हा बेत सांगितला आणि दोन्ही पोरं लगेच कामाला लागली. गाव, वर्ष, शाळा, शाळेतलं स्मिताचं नाव, यांच्या जोरावर त्यांनी अख्खं इंटरनेट पालथं घातलं. एका आठवड्यातच स्मिताचा शोध लावला. त्यांच्याच शहरात सापडली ती आणि एक दिवस आजीला ‘सरप्राइज् भेट’ म्हणून स्मिता थेट घरीच आली! मग काय विचारता, नुसता आनंदी आनंद! दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून इतक्या रडल्या आणि हसल्या की बास…
दुपारी सुरू झालेल्या त्यांच्या गप्पा संध्याकाळ झाली तरी संपेनात. पन्नास वर्षांच्या सर्व घटना, आठवणी, कविता, गाणी, सगळं झालं. शेवटी आजीची स्मिताच्या घरी जायची तारीख ठरवूनच स्मिता आपल्या घरी परत गेली. रात्री सगळे जेवायला बसले तेव्हासुद्धा आजी स्वत:शीच हसत होती. तिला अलीकडे इतकं आनंदात कुणी बघितलंच नव्हतं. निदान ३-४ वेळा तरी जुई आणि रोहनला ती मनापासून ‘थँक्यू-थँक्यू’ म्हणाली.
हेही वाचा : सांधा बदलताना : सोबतीचे बळ!
जेवणानंतर सगळे आपापली कामं करत होते तेव्हा आजीच्या लक्षात आलं, की जुई अचानक शांत झाली आहे… बाल्कनीत एकटीच बसली आहे.
‘‘काय गं जुई? एकदम गप्प गप्प?…’’ आजीनं फक्त आपलं निरीक्षण नोंदवलं. खूप प्रश्न न विचारता फक्त आपलं निरीक्षण थोडक्यात सांगायचं आणि त्याला काहीही अर्थ न चिकटवता समोरच्या व्यक्तीला सविस्तर बोलायची संधी द्यायची, ही आजीची खास क्लृप्ती. त्यामुळे सगळे तिच्याशी मोकळेपणानं बोलत असत.
आजीचे एवढे शब्द जुईला पुरे होते. ‘‘आज तू किती मजा केलीस ना स्मिता आजीबरोबर? मी तुमच्या गप्पा ऐकल्या. इतक्या मैत्रिणी, इतकी मज्जा! किती छान होतं ना? नो वंडर तू इतकी खूश असतेस नेहमी. यू हॅड वेरी गुड लाइफ इन स्कूल!’’
आपल्या नातीला आपल्या शालेय आयुष्याची इतकी कौतुकमय असुया वाटते आहे, हा आजीला धक्काच होता. पण पटकन काही सारवासारव करणारं पोकळ, सकारात्मक बोललं तर जुई परत गप्प होईल आणि तिच्या मनातलं मनातच राहून जाईल हे आजीला माहीत होतं. त्यामुळे ‘इतकी काळजी नकोस करू बाळा! तुझं सगळं आयुष्य तुझ्यासमोर आहे. चांगलं होईल सगळं,’ हे अगदी ओठाशी आलेलं वाक्य गिळून आजी जिवाचा कान करून जुईचं ऐकत राहिली.
‘‘आता बघ ना, ममाला किती फ्रेंड्स आहेत! सोसायटीचा ग्रुप, ऑफिसचा ग्रुप, जुन्या ऑफिसचा ग्रुप, कॉलेजचा ग्रुप, नातेवाईकांचा ग्रुप… शिवाय रनिंगवाला ग्रुप. दर आठवड्याला कोणत्या तरी ग्रुपला भेटते. तिला काही हवं असेल की लगेच कोणा तरी फ्रेंडला फोन करते आणि पटकन काम होऊन जातं तिचं!’’ हे मात्र अगदी खरं होतं. आजीला माहीत होतं, की जुईलीची ‘ममा’ जगन्मित्र आहे. आपल्या अंतर्मुख आणि घुम्या मुलाला ही कशी सांभाळून घेते, याचं आजीला कायमच आश्चर्य वाटायचं.
इकडे जुईची गाडी वेगानं पुढे चालली होती. ‘‘आता डॅडला बघ ना, त्याचा फक्त कॉलेजचा एक छोटासा ग्रुप आहे. सोसायटीचा वॉकिंग ग्रुप सोडला, तर इथे कुणी मित्र नाहीत. मैत्रीण तर एकही नाही! ममा सोडली तर कुणाशी बोलतही नाही तो. पावसात बाकीचे लोक येत नाहीत तरी तो एकटा चालायला जातो. झाडासारखं आहे त्याचं. पक्षी बसले तर बसले! लोक आले तर आले! हा आपला त्रास करून घेत नाही. त्याचा त्याचा खूश असतो.’’
हेही वाचा : ‘एका’ मनात होती : ‘फोमो’चं उत्तर ‘जोमो’?
आपली नात इतका बारीक विचार करते आहे, हे आजीला खूप सुखावणारं होतं. शिवाय तिला तिच्या बापाचंही कौतुक होतं ही जमेची बाजू. बापाला ‘झाड’ म्हणतेय ही! बाकी कुणी थंड दगड म्हटलं असतं! पण जीव आहे हिचा बापावर. आजीचा विचार चालू असतानाच जुई पुन्हा बोलायला लागली, ‘‘रोहन पण एकटा असतो, तरी त्याला खूप ऑनलाइन फ्रेंड्स आहेत. त्याचा कार रेसिंग फॅन ग्रुप आहे. तो सारखा त्यांच्याशी ऑनलाइन गप्पा मारतो. कधी कधी ते प्रत्यक्ष ‘मीट अप’पण करतात. दोन वर्षांनी त्याचं कॉलेज संपलं की तोही कुठे तरी निघून जाईल. मग…’’
आणि जुई एकदम शांत झाली. तोंड फिरवून भिंतीकडे बघायला लागली. तिच्या डोळ्यात आलेलं पाणी ती दाखवू इच्छित नाही, हे आजीच्या लक्षात आलं. उठून तिला जवळ घ्यावं, शांत करावं, असं खूप वाटत असतानाही आजी घट्ट बसून राहिली. भावनेची इतकी मोठी लाट आली, की ती शांतपणे, धीरानं रिचवायची असते, मध्येच बोलून विचका करायचा नाही, क्षण बिघडवायचा नाही, हे आजी चांगलं समजून होती. तिनं फक्त पदर जुईच्या पुढे केला, तिला डोळे पुसण्यासाठी. डोळे पुसून झाल्यावर जुई म्हणाली, ‘‘एकच ‘जो’ होती इथं. तीही हैदराबादला गेली. सहा महिने झाले आता. मी मेसेज पाठवला की दोन दिवसांनी उत्तर देते! तिनं लगेच बघितलेला असतो मेसेज, पण पटकन उत्तरही देत नाही ती आता. तिथे आता नवीन फ्रेंडस् असणार तिचे. आजी माझी एकच फ्रेंड होती… आणि आता ती पण गेली गं!’’
स्मिताच्या फोटोवरून सुरू झालेलं हे पर्व असं जुईच्या मनात सलणाऱ्या एकटेपणावर येऊन पोहोचेल याचा आजीला अंदाज नव्हता. जुई आधीच थोडी बुजरी आणि संकोची. मित्र बनवायला वेळ लावायची. जरा बापावर गेली होती. पण तो मस्तराम आहे! स्वत:च्या संगतीत समाधानी असतो. जुईचं तसं नव्हतं. तिला मित्र हवे होते, पण मिळवता येत नव्हते. तिच्या वयाच्या इतर मुलामुलींसारखं फोनमध्ये एकटेपणा बुडवायचा, व्हिडीओ बघायचे, नाही तर गेम खेळायचे, असं जुईली नाही करायची. ती आजीकडे आशेनं बघत होती.
‘‘आजी, मी काय करू आता?’’
आजीनं खोल श्वास घेतला आणि सोडला. त्या काही क्षणांच्या शांततेत जुई पुढे काहीच बोलली नाही. तिचं सगळं बोलून संपलं आहे याची खात्री पटल्यावर आजीनं बोलायला सुरुवात केली.
‘‘खरंय तुझं. आमच्या वेळी आणि अगदी तुझ्या ममा-बाबाच्या वेळीसुद्धा हे खूप सोपं होतं. तुमच्या शाळा लांब लांब असतात. पटकन उठून स्वत:चे स्वत: मित्रांकडे खेळायला जाता येत नाही. शिवाय दरवर्षी पत्ते पिसून पुन्हा वाटावे तसे मुलांचे वर्ग बदलत राहतात. रोजच्या रोज वर्गात बसायच्या जागासुद्धा बदलतात म्हणे! आई-बाप चांगल्या नोकरीच्या मागे धडाधड शहरं बदलतात. बघ ना, तुझ्या जोआनाला जावंच लागलं की हैदराबादला बाबांच्या नोकरीसाठी. सुट्ट्यांच्या वेळा वेगवेगळ्या असतात. संध्याकाळी किती तरी मुलं कोणत्या ना कोणत्या क्लासला जातात. मैत्रीला मूळ धरायला वेळच मिळत नाही. जरा निवांतपणा हवा, जरा स्थिरपणा हवा ना एका जागी… नाही तर नातं कसं वाढणार?’’
हेही वाचा : स्त्री ‘वि’श्व : ट्रॅड वाइफ’चा आभासी ट्रेंड?
‘‘पण आजी, ममासारखी पटकन मैत्री करता यायला हवी की नको? नाही तर डॅडसारखा कॉन्फिडन्स तरी पाहिजे ना! आता जोचं बघ की… तिनं नवीन स्कूलमध्ये पटकन मित्र मिळवले. आता ती तेलुगूही बोलायला शिकतेय त्यांच्याबरोबर. मला तर हे जमलंच नसतं. मी ममाला सांगितलं असतं की मी होम स्कूलिंग करते!’’
आता आपला मुद्दा मांडायची आणि सूचना देण्याची संधी आहे, हे आजीला जाणवलं. ‘‘जुई, तुला आठवतं का, तीन वर्षांपूर्वी जो इथे नवीन राहायला आली होती, तेव्हा तिनं स्वत:हून तुझी ओळख करून घेतली होती. वेगळ्या शाळेत आणि वेगळ्या बसमध्ये असूनसुद्धा फक्त तुझ्याशी जरा गप्पा मारता याव्यात म्हणून ती तुझ्या बसच्या वेळेआधी खाली येऊन थांबायची. तिनंच पहिल्यांदा तुला खेळायला घरी बोलावलं होतं. तिची आई तुम्हाला मूव्ही बघायला घेऊन गेली होती… आठवतं का तुला?’’
‘‘हो ना! जो स्वत: पहिल्याच दिवशी सोसायटीमध्ये खाली आली आणि सगळ्यांना नावानं ओळख करून दिली. मी मुंबईहून आले आहे, आता इथे ‘विद्या भवन’मध्ये पाचवीला जाणार आहे. आमच्याकडे मांजर आहे… सगळं सांगितलं तिनं. एकदम पहिल्या वेळेसच. रोज खाली खेळायला यायची आणि जे कोणी असेल त्यांच्याशी बोलायची. काही तरी खाऊ घेऊन यायची, शेअर करायची…’’
‘‘जुई, हे तुलाही जमेल बेटा! नीट स्वत:चं नाव सांगायचं, छान स्माईल करायचं, दोन वाक्यं बोलायची… हे रोज करायचं. मित्र सापडतात गं! जोनं तुला शोधून काढलंच होतं की नाही? तुझा मूळचा स्वभाव तसा नाही, पण ट्रायल करून बघू या की! ही सध्याची स्कूल टर्म आहे ना, त्यात रोज निदान दोन नव्या मुलामुलींशी बोलून तर बघ! करायचा का प्रयोग?’’
हेही वाचा : इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
‘‘आजी, हे खूप अवघड आहे… लाइफ इज व्हेरी डिफिकल्ट! बाकीचे बोललेच नाही तर? मला हसले तर? मला भीती वाटते!’’
‘‘राजा, मी उद्यापासून तुला रोज एक मस्त ‘स्नॅक बॉक्स’ बनवून देते. बघू या काय होतंय ते. तुला या टर्ममध्ये एखादी जुई, एखादी जो किंवा स्मिता सापडेल असं मला खूप वाटतंय… शोधायला सुरुवात तर करू या!’’
chaturang@expressindia.com